|| सुभाष अवचट

शहर पायी फिरल्यानंतरच त्याचा तोंडवळा लक्षात येतो. जेव्हा मुंबई ही ‘बॉम्बे’ होती, त्यावेळची ही गोष्ट! जे. जे. स्कूलमध्ये आमच्या अ‍ॅडव्हान्स डिप्लोमाच्या फायनल परीक्षा होत असत. त्या जवळजवळ पंधरा-वीस दिवस चालत. आम्ही क्लासमेट भायखळ्याच्या सुपारीच्या वखारीत एकत्र राहत असू. नंतर मात्र ग. प्र. प्रधान मास्तरांनी आमची सुटका करून आमदार निवासात व्यवस्था केली. बहुतेक मित्र पहिल्यांदाच बॉम्बेला आले होते. भीती आणि कुतूहल सर्वांपाशी होते.

एकदा आमचा पेपर संपला. दुपार मोकळी होती. मी आणि माझा मित्र खरवलीकर चालत चालत फोर्टमध्ये आलो. आपण हरवले जाऊ ही भीती होतीच. त्यावेळचं व्ही. टी. स्टेशन, टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग, फूटपाथवरची असंख्य दुकानं, सतत बोलणारी माणसं आसपास होती. खरवलीकरनं माझा हात पकडून ठेवला होता. फ्लोरा फाऊंटनपाशी आम्ही उभे होतो. आपण कुठल्यातरी इंग्रजी पुस्तकातली चित्रं पाहत आहोत आणि एकेक पान उलगडत जावं अशी गॉथिक, दगडी चिरेबंदी, घुमट परिधान केलेल्या इमारती, डेव्हिड ससून लायब्ररी, हॉर्नबिल हाऊस, म्युझियम, लायन गेट एकामागून येत गेले. त्यापलीकडे म्युझिकने भरलेलं हिंदम हाऊस आणि शेजारी उंच कमानींनी तोललेलं ‘वे साइड इन’ हे इंटलेक्च्युअल रेस्टॉरंट. चोहीकडची गर्द झाडी आणि त्यांच्या हलत्या सावल्यांतला हा काळा घोडा परिसर. यामधेच खुणावणारी शुभ्र पांढरी, पायऱ्या चढत जाणारी, उभी बैठी जहांगीर आर्ट गॅलरी! आम्ही दोघं त्या पायऱ्यांवर दमून बसलो. समोरच्या परिसरात चैतन्य होतं. इथं चित्रं आहेत, संगीत आहे, लायब्ररीमध्ये सांभाळलेलं ज्ञान आहे. इथे रेंगाळणारी अनेक चेहऱ्यांची आनंदी माणसं आहेत. इथे स्वप्नं आहेत. त्या दिवशी आम्ही भीतभीतच आर्ट गॅलरीत फिरलो. समोर ‘सामोवार’ रेस्टॉरंट दिसलं. गॅलरीत बसलेले चित्रकार, त्यांची चित्रं पाहताना भीती वाटत होती. ती ही की कोणी आपल्याकडे एन्ट्रीचे पैसे तर मागणार नाहीत ना? आम्ही तेथून निघालो. मी वळून पाहिलं- पायऱ्यांवर माझ्याचसारखे अनेक स्टुडंट्स बसलेले होते. मी परत येथे येणार आहे याची सुतराम कल्पना मला नव्हती. आणि काही वर्षांतच मी येथे येत-जात राहिलो. त्यावेळी मी डेक्कन क्वीनने यायचो. समोरच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये मी संडे एडिशनमध्ये इलस्ट्रेशन करीत असे. डॅरल डिमोन्टे हा संपादक होता. मध्येच मी जहांगीरला येत असे. त्या पायऱ्यांवर बसायला मला आवडत असे. त्यावेळी माझ्या मनात भीती नव्हती. जहांगीर आर्ट गॅलरी हे चित्रकारांसाठी स्वप्न आहे. माझ्याभोवती याच पायऱ्यांवर आर्ट स्कूलमधील अनेक स्टुडंट्स बसलेले असत. पास आऊट झाल्यावर जहांगीरमध्ये प्रदर्शन करायचं, हेच स्वप्न मी त्यांच्या डोळ्यात पाहत आलो आहे. भारतात अनेक गॅलरीज् आहेत; पण जहांगीरचा थाट काही वेगळाच आहे!

भारतातील अनेक चित्रकारांसाठी येथे प्रदर्शन करणं हा सोहळाच आहे. त्या सुमारासच माझा मित्रमंडळींचा ग्रुप तयार झाला होता. त्यात स्मिता पाटील, आयेशा कागल, प्रदीप गुहा, शैला बोगा, फ्रान्सिस डिसूझा, समीर तर्नेजा अशी स्वप्नं असलेली मित्रमंडळी होती. कोणी फोटोग्राफर, जर्नलिस्ट, एडिटर, तर कोणाचा म्युझिक बँड होता. त्यावेळी आपल्याला काहीतरी करायचं आहे, हीच उमेद होती. स्मिताला ती अ‍ॅक्ट्रेस बनणार, हे तिच्या गावीही नव्हतं. ती छान लिहायची. त्यात मी पेंटिंग  करणार आहे हेपण अधांतरी होते. आणि आमचा अड्डा हा जहांगीरच होता. पायऱ्यांवर बसणं, खादी भांडारात चक्कर मारणं, फूटपाथवरच्या जुन्या पुस्तकांच्या ढिगात एखादं पुस्तक शोधणं किंवा हिंदम हाऊसमध्ये नवीन म्युझिक शोधणं आणि शेवटी गॅलरीत पेंटिंग बघत शेजारच्या सामोवार कॅफेत मिंट-टी पिणं. ते एकमेकांशी भांडायचेही दिवस होते. नंतर सारे आपापल्या रस्त्याने गेले आणि अनोख्या कामांत गुंतून पडले.

‘सामोवार’ हा अद्भुत इन्टलेक्च्युअल लोकांचा कॅफे होता. चित्रांच्या या गॅलरीचा तो सतत जागरूक कॅफे होता. पाच पिढ्या त्याने पाहिल्यात. त्या खुच्र्यांत बसलेले अमिताभ बच्चन, एम. एफ. हुसेन, लेखक व्ही. एस. नायपॉल, आय. एस. जोहर, हायकोर्टातले वकील आणि त्यांचे अशील, थिएटरचे बुजुर्ग अ‍ॅक्टर्स ते फिल्म डिरेक्टर्स, संगीतकार ते समोरच्या एलफिन्स्टन कॉलेजमधले फुलपाखरांसारखे, चिमण्यांसारखे चिवचिवाट करणारे स्टुडंट्स! या कॅफेनं त्यांचं तारुण्य, स्वप्नं सांभाळली. शेजारच्या दालनातल्या पेंटिंग्जमधल्या रंगांची नाती जपली. असा हा सांस्कृतिक कॅफे माझ्या जीवनाचा नंतर एक अविभाज्य घटक झाला. सतत हसऱ्या, कपाळावर मोठं लाल कुंकू आणि सर्वांपाशी एकदा बोलल्या तरीही त्या आपल्याच नात्यातल्या आहेत अशा वाटाव्यात अशा त्या उषा खन्ना. चित्रकारांवरच नाही, तर सर्वांवर ममतेने प्रेम करणाऱ्या या मम्मी म्हणजे ग्रेट अ‍ॅक्टर बलराज सहानी यांची सख्खी भाची! आमच्याच ग्रुपमधली मालविका संघवीची आई! माझी त्यांची ओळख झाली तेव्हापासून सामोवारशी नाते ते बंद पडेपर्यंत टिकलंच; पण त्या नव्वद वर्षांच्या झाल्या तोपर्यंत ते दृढ राहिले. त्या जहांगीरला ११ च्या सुमारास येत असत. दुपारी गॅलरीत जात आणि प्रत्येक चित्रकाराची, ग्रुप शो असेल तेव्हा प्रत्येक विद्याथ्र्याची त्या आपुलकीनं विचारपूस करीत. कधी एकट्या बसलेल्या चित्रकाराला धीर देत असत. पन्नास वर्षांपूर्वी एक स्टोव्ह आणि काही भांडी घेऊन त्या तेथे आल्या. तेव्हा प्रोग्रेसिव्ह ग्रुपमधले चित्रकार हुसेनपासून ते रझापर्यंत सगळ्यांना त्या चहा, भजी करून देत असत. तेही उधारीत. सारेच गरीब होते. त्याकाळी जहांगीरमध्ये शुकशुकाट असे. कधी वेळोवेळी त्या दहा-पंधरा रुपये देऊन त्यांना मदतही करत. ती उधारी या चित्रकारांना परत करता येत नसे. त्यामुळे ते उषाजींना आपले एखादे पेंटिंग देत असत. कल्पना करा, आता केवढा अमूल्य खजिना उषाजींकडे जमला असेल.

बॉम्बेमध्ये गर्दीत फिरताना अचानक पोरकं वाटायचं. सामोवार हे माझं हक्काचं ठिकाण झालं होतं. तेथे खुर्चीत बसलं की या अफाट शहरात आपलं एक ठिकाण आहे, इतकं सुरक्षित वाटायचं. तिथला खिमा पराठा, मटण चॉप्स पुलाव, बिर्याणी, दहीवडा, लस्सी, चहा-कॉफीची चव अजूनही जिभेवर आहे. तिथला मॅनेजर शेट्टी, वेटर हे सारे या कुटुंबाच्या चित्राचाच एक भाग आहेत. अनेक चित्रकारांनी सामोवारच्या छतावर, भिंतीवर स्केचेस केलेली… कधी दिवे, कधी फुलपाखरे, कधी कागदी मुखवटे, तर कधी निरनिराळ्या घंटांनी ते सजत असे. जहांगीर म्हणजे सामोवार आणि सामोवार म्हणजे उषाजी हे असं एकजीव सांस्कृतिक ठिकाण झालं होतं. तेथे निरनिराळ्या क्षेत्रांतील बसलेली माणसं पाहायला मिळणं हाही वेगळाच अनुभव असायचा. त्या काळात जहांगीर प्रसिद्ध व्हायचं आणखी एक विलक्षण कारण होतं ते म्हणजे तिथलं स्त्री-पुरुषांचं टॉयलेट होय. तेव्हा फोर्टमध्ये कुठे टॉयलेट उपलब्ध नव्हतं. या टॉयलेटचा वापर करायला माफक पैसे मोजायला लागत. प्रदर्शन बघायला आलेल्या स्त्रिया-पुरुष गाडीतून उतरून घाईघाईत टॉयलेटला जात. बहुधा मेकअप वगैरे ठीकठाक करून, फ्रेश होऊन बाहेर येत. अचानक तरुण मुलामुलींचा फॅशनेबल थवा येई. बॉम्बेची घामेजलेली हवा, तासन् तास प्रवास, गर्दी… त्यामुळे हे टॉयलेट सगळ्यांचा आधार होतं. चित्रं पाहणं हे नंतर… पहिला नॅचरल कॉल महत्त्वाचा होता. ते साहजिक होतं. गंमत म्हणजे प्रदर्शन असलेल्या चित्रकारांना ते मोफत होतं.

आठवड्यानंतरची जहांगीरमधली संध्याकाळ ही अत्यंत नाट्यमय असते. चारही हॉलमध्ये लग्न मंडपातलं कार्य संपल्यावर जसा मंडप रिकामा होतो तसं उदास वातावरण असतं. मुख्य दिवे मालवले जातात आणि छोट्या दिव्यांच्या प्रकाशात तो हॉल उदास वाटू लागतो. भिंतीवरची चित्रं खाली उतरवली जातात. त्यांचं पॅकिंग सुरू होतं. डेकोरेशनवाला जशा खुर्च्या, टेबलं, रंगीत दिव्यांच्या माळा टेम्पोमध्ये घालायला लागतो, तशा साऱ्या भिंती उजाड होतात. हॉलमध्ये चित्रकारांचे मित्र प्लॅस्टिक पेपर्स, कोरोगेटेड शीटने साऱ्या चित्रांचे गठ्ठे बांधतात. प्रदर्शन खाली होतं. जहांगीरच्या पायऱ्यांपाशी उलटा उभ्या असलेल्या टेम्पोत ही चित्रं जपून ठेवली जातात. जो-तो चित्रकार आपापल्या गावाकडे निघतो. कोणी बॉम्बेतल्या मित्राकडे चित्रं ठेवतो, कोणी थेट दूर गावातल्या स्टुडिओकडे जातात. या बिदाईत ते दमलेले असतात. कोणी हिरमुसलेले असतात. यात विक्री, प्रसिद्धीचे गुंते असतात. पण हा टेम्पो निघतो आणि दुसरा टेम्पो रिव्हर्समध्ये परत जहांगीरच्या पायऱ्यांपर्यंत येतो. त्यातले उत्साहाने भरलेले चित्रकार, त्यांचे सहकारी पटापट उतरतात. स्टुडिओतून पॅक केलेली चित्रं उतरवतात आणि हॉलकडे वाहतूक सुरू करतात. उद्या सकाळी परत तो हॉल सजतो. नवी चित्रं भिंतीवर लटकतात. दिव्यांची योजना होते. उत्साह, आशा, हुरहुरीनं जसा लग्नमंडप पुन्हा सजतो तसं प्रदर्शन सुरू होतं. हे चक्र अखंडपणे इतकी वर्षं चालू आहे. जहांगीर भारतातील एकमेव गॅलरी असावी, जी वर्षभर बुक्ड् असते. इथं प्रदर्शन भरविण्यासाठी तीन-चार वर्षं वाट पाहावी लागते. जहांगीरमध्ये मी प्रदर्शन भरवावं असं माझ्या मनात कधीही नव्हतं; पण स्मिता आणि विनोद खन्नानं मला ढकलून बॉम्बेत आणलं होतं. त्यावेळी जहांगीरचे बुकिंग झटकन् मिळत असे. प्रसिद्धी माध्यमं नव्हती. जहांगीरमध्ये बायरची भलीमोठी यादी मिळते. त्यात त्यांचे नाव-पत्ते असतात. अजूनही ती मिळत असेल. त्यावर निमंत्रणं पोस्टानं पाठवणं एवढीच सोय होती. काही वर्षांनी मला समजलं, त्या यादीतील अनेक बायर्स कधीच स्वर्गवासी झाले आहेत. येथे माझी अनेक मोठी, निरनिराळ्या विषयांची प्रदर्शनं झाली. या प्रदर्शनांच्या अनुभवांवर मला पुन्हा सविस्तर लिहावं लागेल.

उषाजी माझ्या प्रदर्शनात आल्या. चित्रं पाहून त्यांनी माझी पाठ थोपटली. ते मला नवीन नव्हतं. प्रत्येक चित्रकाराशी प्रेमाने वागणं हा त्यांचा स्वभावच होता. पण इथं वेगळंच घडलं. बॉम्बेतल्या अनेक मित्रांना त्यांनी फोन करून निमंत्रण दिलं. सारे आले आणि माझ्या त्या प्रदर्शनाला वेगळंच परस्पेक्टिव्ह मिळालं. याच प्रदर्शनाला माझे वडील डॉ. त्र्यंबक अप्पाजी अवचट आले. कोट, टोपी, धोतरातल्या माझ्या वडिलांची मी उषाजींशी ओळख करून दिली. उषाजींनी त्यांचे हातात हात घेऊन माझं कौतुक सुरू केलं खरं; पण वडील जाम बावरले. ते सारखे मागेपुढे करीत होते. चित्रकला, प्रदर्शन, बॉम्बे वगैरे त्यांच्या कोष्टकात नव्हतं. उषाजींनी त्यांना व मला सामोवारमध्ये नेलं. वडिलांसाठी सामोसे, चहा मागवला आणि परत ‘तुमचा मुलगा गुणवान आहे…’ असं काहीसं त्या सांगत होत्या, आमचे पिताश्री काट्याने सामोसा तोडण्याच्या अयशस्वी प्रयत्नांत होते. उषाजी इतक्या आनंदात होत्या की त्यांनी वडिलांच्या हातातले काटे-चमचे काढले आणि हाताने त्यांच्या हातात सामोसा ठेवला. आमचे कडक पिताश्री इतके लाजलेले मी कधीच बघितले नव्हते. जाताना ते म्हणाले, ‘‘ही बाई कोण होती? ती काय बोलत होती?’’ मी म्हणालो, ‘‘त्या तुम्हाला विचारीत होत्या, ओतूरला तुम्ही कधी जाणार?’’

आता जहांगीर एसी लावल्यानं गारेगार झालं आहे. अनेक बदल झाले आहेत. वर-खाली गॅलरीजची संख्याही वाढली आहे. आता सामोवार तेथे नाही. त्यामुळे आता मला जहांगीर रडकं वाटतं. दर आठवड्याला प्रदर्शनं होतात. वाइन, चीज दिलं जातं. त्यात ओळखीचे चेहरे दिसतात. टाय घातलेले, हातात फाइल असलेले ते पत्रकार वाटतात, पण ते पत्रकार नसतात. खरं तर ते अनेक वर्षे तेथे आहेत. ते कोण आहेत, त्यापेक्षा ते तेथे वाइन-चीज खाऊन जातात; त्यांना माफ करायला हवं. आता मुंबईदर्शनची बस तेथे थांबते. भराभर राजस्थानी, गुजरातचे पाहुणे मुलाबाळांसह गॅलरीत शिरतात. मुलं पेंटिंगवर हात फिरवीत हॉलभर गोल हिंडतात आणि निघून जातात. गॅलरीत बसलेल्या चित्रकाराला थोडा वेळ उगाचच वाटते, आपण फेमस आहोत. गॅलरीत तुम्ही सोफा ठेवलात तर तासन् तास त्यावर बसायला भटके प्रवासी येतात. कोणी इम्प्रेशन पाडायला कॅटलॉग, प्राइस लिस्ट मागतात. चित्रकाराला बायर आला असं थोडा वेळ वाटतं, तोपर्यंत ते निघून गेलेले असतात.

जहांगीरच्या पायऱ्यांपाशीच फूटपाथवर आर्ट प्लाझा सुरू होतो. अनेक चित्रकार तिथं आपापली चित्रं टांगतात. खुर्चीत बसून पोट्र्रेट करून उदरनिर्वाह करतात. आसपास मुंबईदर्शनाला आलेली माणसं तेथे गर्दी करतात. संध्याकाळी तेच चित्रकार या पायऱ्यांवर बसतात. त्यांच्यापाशीही तेच स्वप्न असतं, की कधीतरी जहांगीरच्या आतल्या गॅलरीत आपल्या चित्रांचं प्रदर्शन व्हावं.

जहांगीर हा माझ्या आयुष्यातला एक घटक आहे. भिंतीवर पेंटिंग परफेक्ट लटकवणारा दाजी, दिव्यांची अ‍ॅरेंजमेंट करणारा दाढीवाला करीम, माझ्याशी सदैव भांडणाऱ्या सर्वेसर्वा मेननबाई, दर आठवड्याला आशा, निराशा, आनंद, उत्सुकता देणाऱ्या गॅलरीचं हे चक्र… पण ही वास्तू भेट देणाऱ्या कावसजी जहांगीर यांचे या शहरावर ऋण आहे. त्यांना ही गॅलरीची कल्पना देणाऱ्या चित्रकार के. के. हेब्बर आणि जी. एम. भूटा या आर्किटेक्टना विसरून चालणार नाही.

कधीतरी मी रिगलला सिनेमा बघून अपरात्री परतताना जहांगीरपाशी दूर थांबतो. त्या पायऱ्यांकडे बघताना मला काळ थांबल्यासारखा वाटतो. स्मिता, आयेशा, प्रदीप, फ्रान्सिस आणि मी त्या पायऱ्यावर बसून खिदळत आहोत… त्या पायऱ्यांनी माझीच नाही, तर अनेक चित्रकारांची स्वप्नं जपली. काही आठवतात, काही पुसट झाली. माझी अनेक प्रदर्शनं इथे झाली. आमच्या त्या ग्रुपमधले मित्र-मैत्रिणी कोठे कोठे गेले. स्मिता तर अदृश्य झाली. तिने माझं पहिलं प्रदर्शन भरवलेलं होतं. प्रत्येक पायरीवर माझा हात हातात घेऊन तिनं अलवारपणे जहांगीरच्या काचेचा दरवाजा माझ्यासाठी ढकलला होता!

Subhash.awchat@gmail.com