सुभाष अवचट Subhash.awchat@gmail.com

रेखाचित्र : अन्वर हुसेन

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

भीती ही लहानपणातल्या बागुलबुवांची असते. आणि हा बागुलबुवा भातुकलीच्या खेळातल्या बाहुल्यांसारखा असतो. वाढत्या वयानुसार त्याची भीती निघून जाते. आत्ताच्या पिढीतल्या मुलांचे बागुलबुवा हे सायन्स फिक्शन, कॉमिक्समध्ये निरनिराळ्या अवतारांत येतात. ते मुलांच्या खेळातले त्यांचे सवंगडी असतात. ‘भीती’ शब्दाची तेवढी भीती वाटत नाही, पण ‘डर’ शब्दातल्या भीतीने घाबरायला होतं. ‘डर गया सो मर गया!’ या म्हणीचा परिणामही मोठा असावा. पण ‘भय’ या शब्दात अधिक खोल भीती आहे. खऱ्या भीतीचे अर्थ आपापले वैयक्तिक असतात. कधी ते वैश्विकही होऊ शकतात. प्रत्येकाच्या भीतीचे परिणाम, अर्थ, कारणं वेगवेगळी असतात. ती तुम्हाला झोपेतून, स्वप्नातून दचकवून जागे करते. ती तुमच्या मनातच लहानाची मोठी होते. तिचा परिणाम तुमच्या दैनंदिन हालचालींत उतरतो. काही माणसं डोळे मिटून बोलतात, तर काही दुसरीकडेच मान वळवून बोलतात. डोळ्यांत डोळे घालून बोलायला घाबरतात. चालताना सारखं मागे वळून बघतात. तर काही आयुष्यभर गप्प बसून राहतात. माझ्या काही मैत्रिणी फोनवर बोलायला घाबरतात. रिअ‍ॅक्शन देण्यास घाबरतात. माझा मित्र घरात सारखा हात धुतो आणि दरवाजाच्या कडय़ा नीट लागल्या की नाही, हे तपासत बसतो. माझ्या मैत्रिणी दिवसभर केस ब्रश करतात, नाही तर नखं कुरतडतात. आर्ट स्कूलमधला माझा क्लासमेट मोने- त्याच्या हाताला थोडा जरी रंग लागला तरी हात धुवायला जात असे. एके दिवशी डेस्कवरची शाईची दौत धक्क्याने उलटी होऊन त्याच्या पँट-शर्टावर सांडली. आपले सामान क्लासमध्येच सोडून तो धावत घरी गेला आणि कधी परतलाच नाही. जस्मीन ही माझी क्लासमेट पारशी मैत्रीण. सुंदर दिसायची. तिला बघायला सारे सायकल स्टँडपाशी जिन्यात उभे असायचे. दोन दिवस ती क्लासला आली नाही म्हणून मी तिला फोन केला. फोनवर ती घाबरून बोलत होती. मी विचारले, ‘अरे, झालं काय?’ ती म्हणाली, ‘घरी ये.’ ती कॅम्प एरियात राहायची. कमानी, लाकडी जिने, समोरची राखीव बाग अशा तिच्या घरात मी पोहोचलो. खिडक्या-दारे बंद होती. काहीतरी घडलं आहे अशा अस्वस्थ अवस्थेत मी बेल वाजवली. बऱ्याच वेळाने आतून आवाज आला. ‘कोण आहे?’ मी म्हणालो, ‘अवचट!’ तसं तिने दार उघडलं. तिला पाहून मी घाबरलोच. ही जस्मीन मी कधीच पाहिली नव्हती. तिचा चेहरा फिका आणि आजारी होता. चेहऱ्यावर भीती दाटली होती. डोळ्यांखाली काळी वर्तुळे होती. केस विस्कटलेले होते. ती काहीतरी पुटपुटत होती. घरातल्या त्या हॉलमध्ये सर्वत्र मेणबत्त्या, जुने दिवे लावले होते. मेणबत्त्या, दिव्यांच्या धुराचा वास घरभर होता. हॉलमधल्या एका सोफ्यात त्यांचा एक तरुण धर्मगुरू हातात पुस्तक घेऊन पठण करीत होता. तिचा डॉक्टर भाऊही बंडी-पायजम्यात येरझाऱ्या घालत होता. मला कळेना, काय झालं! कोणी निवर्तलं की काय? तिने मला एका खुर्चीत हात धरून बसवलं. ती बहुधा ट्रान्समध्येच असावी. मला तिने सांगितलं, ‘अवचट, फार वाईट वेळ आहे. काही नक्षत्रं आकाशात एकत्र आली आहेत. सारं जग आता बुडणार. रोगराई होऊन माणसं मरणार!’ तिच्या डोळ्यांत भीती दाटली होती. माझ्या या सुंदर जस्मीनला आता कसं समजावणार! तिच्या साऱ्या घरात भीती दाटली होती. एव्हाना पठण संपवून तो धर्मगुरू निघाला. मीही निघालो. तेव्हा ती म्हणाली, ‘तू आता कॉलेजला जाऊ नकोस. घरात दिवे लाव!’ मी बाहेर पडायच्या अगोदर एक खिडकी थोडी उघडली. त्या दडपलेल्या घरात बाहेरची सूर्यकिरणं आत आली. मी निघताच तिने दरवाजा घट्ट बंद केला. धर्मगुरू स्कूटर स्टार्ट करून निघून गेला. आता या जस्मीनचं आणि तिच्या भीतीचं काय करावं? काही दिवसांतच ती क्लासला परत आली. परत कॉलेजची मुलं तिला पाहायला जिन्यात, सायकल स्टँडपाशी ब्रेकमध्ये उभी राहायला लागली. खरं सांगायचं तर जस्मीन माझी अधिक चांगली मैत्रीण झाली खरी, पण मधूनच मी तिच्या डोळ्यांत पाहायचो. तिच्या आतल्या भीतीची एक विचित्र काळजी काही काळ माझ्यापाशी होती. तिला मी समजावून सांगणंही शक्य नव्हतं. कारण तारे, नक्षत्रे पृथ्वी अचानक कशी नष्ट करणार याचा माझा अभ्यास नव्हता. त्यांची भीती तर मला नव्हतीच, पण प्रचंड आकर्षण होतं आणि आहे.

मला भीतीदायक सिनेमे, गोष्टी लहानपणापासून फार आवडतात. त्यातही भूत- प्रेते, मंत्र, अघोरी विद्या, पिंपळावर बसलेली हडळ, तिन्हीसांजा फिरायला निघालेली पिशाच्चं हे माझे फार जवळचे आहेत. मुंजा हा त्यातलाच. हे सर्व आपापले घट्ट मित्र असावेत. प्रत्येकजण आपापले झाड निवडतो. त्यावर बसतो. त्यांचे गावातले मित्र म्हणजे मांत्रिक होय. ते बहुतेक त्याच्या कानात सांगत असावेत. असे की, आज रात्री पार्टीला डिनरला कोंबडी-वडे हवेत. कधी त्याबरोबर खण-चोळी. जशी पिशाच्चांची इच्छा असेल तो मेन्यू ठरवला जात असावा. पण गावाबाहेरच्या पालावर राहणाऱ्या या मांत्रिकाचा पोरगा मच्छय़ा माझा मित्र होता. तो नदीवर मासे पकडताना, साप पकडताना माझा मित्र झाला होता. नंतर दोस्ती झाली तसा तो म्हणाला, ‘तुमच्यात वशाट खात नाहीत. घरी ये.’ मी लपतछपत गेलो. बाप मुंज्याला निवेदासाठी वाहिलेली कोंबडी कापत होता. त्याच्या आईनं कंदिलाच्या प्रकाशात कालवण केलं. मी खात असताना ती म्हणाली, ‘अरं, तू बामनाचा! घरी सांगू नकोस, नाहीतर आमाला गाव सोडावं लागंल.’ तेव्हा मला उत्तर देता आलं नसावं. आत्ता वाटतं, पिशाच्चं, हडळी, मुंजा, भुतं यांच्यात जातीयवाद नसतो. पुढे पुण्यातही अशीच मित्रांची टोळी जमली. आम्ही लग्नसराईत कोपऱ्यावर उभे राहत असू. नवरदेवावर ओवाळून नारळ, लिंबे फेकत असत. आम्ही ते गोळा करून त्यातलं खोबरं आणि लिंबं चोखीत वडाच्या झाडाखाली पार्टी करीत असू. फरक इतकाच, वय वाढलं तसं आम्ही रमच्या ग्लासमध्ये लिंबं पिळत असू. माझी मैत्रीण उगाचच काळजी करायची. गोरीपान होती ती. तिला माझी चिंता असायची. तिला एकदाच समजावलं होतं मी : ‘काळजी करू नकोस. साऱ्या अभद्र नजरा आम्ही ग्लासात पिळून मोठे झालो आहोत.’ हे ऐकून ती भीतीने मला सोडूनही गेली. काही हरकत नाही.

भीती मला किक देते अथवा थ्रिल! ती प्रत्येकाला असावी. माझा तसा आग्रह नाही. भीती उत्कंठा वाढवते. मी हिचकॉकचे सिनेमे पाहताना हे थ्रिल अनुभवलं आहे. ‘विटनेस फॉर प्रॉसिक्युशन’, ‘सायको’ असे अनेक सिनेमे सांगता येतील. अथवा जॅक निकोल्सनचा ‘शायनिंग’, ‘१९८०’ असे सायकॉलॉजिकल थ्रिलर पाहताना जाम घाबरलो होतो. पण थिएटरमधून बाहेर पडताना- ‘वा! काय सिनेमा होता!’ म्हणत घाबरण्यात आनंद होता. हिंदी सिनेमात रामसे बंधूंनी लोकांना घाबरवण्यासाठी अनेक सिनेमे काढले. त्यांची नावंही तशीच- म्हणजे ‘कफन’, ‘दरवाजा’ अशी होती. सगळ्या सिनेमांत एकच भयानक तयार केलेला मास्क असायचा. पण झालं भलतंच. लोक सिनेमा बघताना हसायचे. घाबरणं दूरच! हिंदी सिनेमातल्या व्हिलनची भीती फार कमी वाटायची. तो शेवटी मरणार, हे गृहीतच असायचं. पण ‘मधुमती’ या सिनेमातल्या व्हिलन प्राणची मात्र भीती वाटायची. इतर व्हिलन हे फुसका बार निघायचे. थिएटरमध्ये थोडा वेळ घाबरण्यासाठी ही भीती तयार केली जाते. पण खरी भीती ही तुम्ही डोक्यात साठवलेल्या गचपणातून तयार होते. तिच्या अनेक छटा असतात. आजारपण आणि मृत्यू यांच्या गडद छटा असतात. मृत्यूनंतर घरातल्या लोकांचं काय होईल, याचं भय जिवंतपणी घेऊन माणसं वावरतात. आणि पैसा त्यातून सुटका करू शकतो, हा अपंग विचार त्यात मिसळलेला असतो. पण आहे आणि नाही हा गोंधळ चालूच राहतो आणि त्यामुळे या भयाची राखण करीत अपरात्री जागवल्या जातात. यामध्ये कधी तुम्हीच हिरो आणि तुम्हीच व्हिलनच्या भूमिका तयार करता. मोठ्ठी भीती ही ‘सेक्स’ या सर्वावर उपरणे गुंडाळून बसलेली असते. एक कळत नाही, की या भीतीवर कधी जप्ती येत नाही. बुटकेपणाची भीती, अपुऱ्या नाकाची, विरळ केसांची, सावळ्या रंगाची, लठ्ठपणाची, नोकरी-ऑफिसची, राहत्या वस्तीची, मुलींनंतर मुलगा व्हावा या अनैसर्गिक प्रतीक्षेची, स्वत:च्या दातांची आणि भ्रमिष्ट भीतीशी माणसं अहोरात्र लपंडाव खेळत बसतात. त्यातून ती साचत साचत तिचा फोबिया होतो. नंतर ती पॅनिक बनते. जगावयाची भीती आणि काळोखाच्या भिंती बांधून माणसं राहायला लागतात. शास्त्रज्ञ, विज्ञान ही कोडी सोडवायला खेळत राहतात. पण भयाला नसतो वेळ आणि सवड. नैसर्गिक कोप, महामारी, जळणारी अथवा जाळणारी जंगलं, धर्माधतेतून होणारे बॉम्बस्फोट, राजकीय आक्रमणं, बलात्कारांची सत्यता, भेसळ करून तयार होणारी औषधे, अन्न, पाणी, मृत्यूंचा हा धंदा करणारे. त्यातून जगात निर्माण होणारं भय शेवटी गल्ल्याबोळांत फिरायला लागतं. या लॉकडाऊनमध्ये ते सर्वाच्या चेहऱ्यावर पसरलं. दूध, ब्रेड मिळवण्यासाठी लागलेल्या रांगांमध्ये ते उभं असतं. आणि प्रत्येकाच्या मनात दडलेल्या अन्योन्य भावनांचं दर्शन घडतं. मनातला गिल्ट भयापोटी देवळाकडे धाव घेतो. स्वत:चंच सांत्वन करण्यासाठी बाबांच्या चरणी करोडो रुपयांच्या देणग्या ओतल्या जातात. मंदिरांकडे जाणारे व्यापारी रस्त्याच्या कडेला मुंग्यांना साखर वाटत जातात. देव, महाराज अशा वेळी सर्वाना हवे असतात. त्यांना स्वत:ला सुटकेसाठी एक सोयीस्कर जस्टिस हवा असतो खरा. पण त्यांच्या मानगुटीवर बसलेली भीती संपता संपत नाही. भय हे इल्युजन आहे, हे त्यांना कळत नाही. त्यामुळे ती पूर्ण अंगीभूत बनते.

या भयाची दुसरी बाजू सकारात्मक असते. ती चक्क क्रिएटिव्हिटीमध्ये उतरते. आणि ती मौलिक रूपात नाटकांत, औद्योगिक क्षेत्रात, फिल्म्स, कथा, कविता, कादंबऱ्यांमध्ये, समाजसेवेमध्ये नवं बारसं होऊन येते. मानवी मनाचा थांगपत्ता लावणं म्हणजे कालियामर्दनही त्यापुढे सोपं वाटू लागतं. क्रूरतेचा नायक हिटलर, नाझी असं समजलं जातं. पण या क्रूरतेचा रक्तरंजित इतिहास आहे. वर्णद्वेष, महत्त्वाकांक्षा, धर्मातल्या अंधश्रद्धांमध्ये तो भरलेला आहे. इतिहासाकडे पाहून जग शिकत नाही. त्यात मग हिरोशिमा, व्हिएतनाम, अरबी रानटी टोळ्या, मोगल, चीन, जपान, इंग्रज यांच्या अमानुष कत्तलींनी तो भरला आहे. त्या भयाने अनेक पिढय़ा बरबाद झाल्या आणि वैश्विक भयाने पुढच्या पिढय़ा सावरून उभ्या राहिल्या. नाझींनी केलेल्या ज्यूंच्या कत्तलींच्या आफ्टर इफेक्टमधूनच एकोणीसशे एकोणसाठ साली गुंथर ग्रास या जर्मन लेखकाने ‘द टिन ड्रम’ नावाची कादंबरी लिहिली. त्यावर फिल्मही आली. ती पाहताना मी गोठून गेलो होतो. त्या फिल्मने भयाचं एक वेगळं पर्स्पेक्टिव्ह जगाला दिलं. ऑस्कर नावाच्या एका अनयुज्वल मुलाची ही गोष्ट आहे. जोपर्यंत त्याची आई त्याला वाजवायला एक छोटा टिन ड्रम देत नव्हती तोपर्यंत आईच्या पोटातून तो बाहेर यायला तयार नव्हता. आई त्याला प्रॉमिस करते खरी, पण तीन वर्षांच्या नंतर तो वाढतच नाही. ते खेळण्यांचं दुकान- जेथून हा टिन ड्रम विकत घेतला, त्याचा मालक ज्यू असतो. तो नाझींच्या भयानं आत्महत्या करतो. हा ड्रम हे ऑस्करचे ऑब्सेशन झालेले असते. नव्हे, त्या अत्याचाराविरुद्धचे हत्यार झालेले असते. त्याशिवाय तो जगू शकत नव्हता. छोटय़ा म्युझिकच्या साहाय्याने तो त्याच्या मनातला क्रोध व्यक्त करीत होता. या नाझींनी त्याचं बालपण हिरावून घेतलं. त्याच्या बालपणाची त्यांनी चोरी केली होती. त्याचीच नाही, तर त्याच्या निष्पापतेची त्यांनी कत्तल केलेली होती. ऑस्कर डोळ्यांतून बोलायचा. त्याच्या या क्रोधात एवढी ताकद वाढली की तो किंचाळायचा. त्याची तीव्रता एवढी होती की तावदाने, घडय़ाळांच्या काचा तडकायच्या. सैनिक, माणसांच्या कानांचे पडदे त्याच्या तीव्रतेच्या फ्रीक्वेन्सीपुढे टिकायचे नाहीत. झालेल्या भयाण कत्तली, कॉन्सन्ट्रेशन कॅम्पस्पुढे ‘थरकाप’ हा शब्दही लुळा पडतो. समाजातल्या या क्रोधाचं, भयाचं प्रतिनिधित्व छोटा ऑस्कर करतो. अलीकडे अन्यायाविरुद्ध मेणबत्त्या घेऊन निषेध नोंदवतात. पण ऑस्करच्या आयुष्यात घडलेल्या, त्याने पाहिलेल्या मनुष्यजातीच्या क्रूरतेचं दर्शन त्याच्या किंकाळ्यांतच येऊ शकतं. ही व्यथा आपल्या छोटय़ा मुलाच्या आयुष्यात येऊ नये, अथवा त्याने ती पाहू नये. भय तुम्हाला निराधार करतं. तेच तुम्हाला किंकाळ्यांतून आक्रमक बनवून नवीन आशा, पिढय़ांचे रस्ते बनवतं.

याच भयाचं दर्शन पेंटिंग्जमध्येही उतरलं. अठराशे त्र्याण्णव साली एडवर्ड मंच या नॉर्वेजियन चित्रकाराचं ‘स्क्रीम’ (पुन्हा किंकाळीच!) हे चित्र आलं. तेही या भयाचं एक्स्प्रेशन आहे. ते चोरीला गेलं. चोरांनी ते परत केलं. त्या चित्रातली वेदना त्यांना सहन झाली नसावी. युद्ध हा मानवजातीला शाप आहे. कदाचित निसर्गाने सिंथेसिस राखण्यासाठी हा तयार केला असावा. अथवा विश्वाचा हा बॅलन्स ही माणसं जगली तर राहणार कसा? निसर्गात वाया काही जात नाही. मनुष्य हा प्राणी, पक्षी, झाडांपेक्षा वेगळा आहे, हे दाखवण्याचे प्रयत्न हजारो वर्ष झाले आणि संपले. मृत्यूपुढे आपण सारे हताश आहोत. या ऋतुचक्रापुढे तुम्हाला विनम्र व्हायलाच हवं. संहार तो ठरवतो. निसर्ग तुम्हाला जीवनातला भयभक्कम देतो आणि दुसरा दिवसही देतो.

एकोणीसशे सदतीस साली नेहमीप्रमाणे स्पॅनिश वॉर झाले. अशा युद्धांचा इतिहास, कारणं कोरडेपणाने अभ्यासता येतात. त्याचा उपयोग होत नाही. संहार हा होत जातो आणि जाईल. बार्सिलोनात हे युद्ध चालू होतं. तिथे पिकासोची आई राहत होती. तिने पिकासोला पत्र लिहिलं. ‘‘जळणाऱ्या शहरातून येणाऱ्या धुराने माझ्या डोळ्यांत सतत पाणी येतं.’’ त्यानंतर पिकासोने जगप्रसिद्ध ग्युएर्निका (Guernica)  हे पेंटिंग युद्धाच्या पार्श्वभूमीवर केलं. त्यात हीच मानवी क्रूरता, भय त्याने दाखवलं आहे. ते कधीच जुने होणार नाही. संहारात संहार घडवून आणणारे आणि त्यानंतरही संहारात ऑस्करच्या किंकाळीने नष्ट झालेले भयग्रस्त लोक संपले गेले.. नव्हे, ते यापुढेही संपत राहतील.

मी पिकासोचं हे संहाराचं ग्युएर्निका (Guernica)  पेंटिंग प्रत्यक्ष पाहिलं आहे. साधं पांढऱ्या-काळ्या रंगातलं ते आहे. त्यावर जगभर चर्चा, अनेक ग्रंथ लिहिले गेले. पण खरं सांगू? जेव्हा मी त्या पेंटिंगसमोर उभा होतो, त्या वेळी मला जाणवलं- अथवा आठवली ती पिकासोची आई. तिने पत्रात लिहिलं होतं, ‘मुला, पेटलेल्या या शहरातल्या धुराने माझ्या डोळ्यांतलं पाणी आटतच नाही रे!’