संजीव खांडेकर यांच्या ‘ऋतुसंहार’ या वैचारिक लेखसंग्रहाला अविनाश सप्रे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील संपादित अंश…

संजीव खांडेकर यांच्या ‘ऋतुसंहार’मधील लेख वेगवेगळे असले तरी त्यामध्ये एक समान सूत्र आहे; ते म्हणजे त्यांचा संदर्भ समकालीन सर्वंकष स्थिती-गतीशी आहे. यातून त्यांनी या काळातील ‘अमानुषता’ आणि माणसाचे झालेले ‘वस्तूकरण’ व्यापक परिप्रेक्ष्यात अधोरेखित केले आहे. अतिशय अभ्यासपूर्वक आणि संदर्भसंपृक्त असे हे लेखन आहे. ‘उत्तर आधुनिकते’च्या या कालखंडातील भाषा आणि भाषिक व्यवहार, व्यक्ती, समाज, साहित्य, संस्कृती, ललितकला, निसर्ग, पर्यावरण, राजकीय/आर्थिक व्यवस्था, कुटुंबसंस्था, स्त्री-पुरुष संबंध आणि लैंगिकता अशा सर्वव्यापी विषयांना कवेत घेत, त्यांच्यातले परस्परसंबंध दाखवत हे लेखन माणसाचे सद्य:काळातले भागधेय दाखवून देते.

BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
nashik, Fraud Case Registered Against Panjarpol , Nashik Panjarpol Sanstha Managers, Forged Letter, Allegedly Signed by Chief Minister, land acquisition panjrapole nashik, panjrapole nashik fraud, forged letter cm eknath shinde,
भूसंपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे बनावटपत्र, श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
Uddhav Thackrey Kundli Shine In Loksabha Elections Till 2027
“उद्धव ठाकरेंच्या पत्रिकेतच पुरावा, लोकसभेत शिवसेनेला..”, ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी

खांडेकर यांच्या या लेखांतून प्रत्ययाला येणाऱ्या मूलगामी चिकित्सेच्या केंद्रस्थानी ‘माणूस’ आहे आणि या माणसाची सद्य:काळातली (बिघडलेली) मानसिकता आणि त्याला सर्वागाने घेरणाऱ्या सामाजिक वास्तवाचे विवेचन करताना त्यांनी प्रामुख्याने फ्रॉईड आणि मार्क्‍स यांच्या विचारांचा, त्यांच्या विचारात भर घालणाऱ्या, नवी परिमाणे दाखवून देणाऱ्या अभ्यासकांचा एकत्रित विचार केला आहे. फ्रॉईड आणि मार्क्‍स हे दोन परस्परविरोधी ध्रुव आहेत, त्यांच्या भूमिका संपूर्णपणे वेगळ्या आहेत असे मानले जाते. पण वरवर पाहता तसे जाणवले तरी त्यांच्यामध्ये माणसाचा विचार करणारे परस्परपूरक समान दुवेही आहेत, असे दाखवून खांडेकर आपल्या चिकित्सेमध्ये त्यांचा एकत्रित विचार करतात. अशा तऱ्हेची भूमिका यापूर्वी जर्मन मानसोपचारतज्ज्ञ आणि  विचारवंत एरिक फ्रॉमने घेऊन भांडवलशाहीची चिकित्सा केली होती. माणसाला भांडवली व्यवस्था कशी सातत्याने ‘भ्रमाच्या साखळी’मध्ये अडकवून ठेवते, त्याला कसे मनोरुग्ण बनवते, स्वातंत्र्यापासून पलायन करायला लावते, हे त्यांनी दाखवून दिले होते. एरिक फ्रॉमप्रमाणेच फ्रॉईड आणि मार्क्‍स यांच्या विचारांच्या संश्लेषणातून संपूर्णपणे बदललेल्या आणि सतत बदलत असलेल्या सद्य:काळाची चिकित्सा खांडेकर करीत आहेत. मराठी विचारविश्वात अशा तऱ्हेची चिकित्सा पद्धती नवीन आहे.

या ग्रंथातील ‘नाझ, लाज आणि माज’ या लेखात खांडेकरांनी नव्या भांडवली व्यवस्थेत निर्माण झालेल्या ‘आत्मरत’ (नार्सस्टि) माणसाची चिकित्सा केली आहे. भांडवलशाहीने पोसलेल्या व्यक्तिवादाच्या अतिरेकातून ही मानसिक विकृती निर्माण होते. त्यातून पुढे जाऊन निर्माण होणारी ‘हुकूमशहा’सह अनेक प्रकारच्या विकृती कशा संभवनीय असतात याची चर्चा या वादसंकल्पनेच्या अभ्यासकांनी केली आहे याची इथे आठवण होते. ‘ऋतुसंहाराचा काळ: अर्थात भविष्याचा बर्फखडा’मध्ये त्यांनी अशा स्वत:च्या पलीकडे न पाहणाऱ्या आणि विस्तारलेल्या नवमध्यमवर्गाच्या मानसिकतेचा ऊहापोह केला आहे.  हा काळ ‘भांडवली लालसेने व सुखलोलुपतेने’ भरलेला, ऋतुसंहाराचा नव्हे, तर ‘ऋतुविनाशाचा’ काळ आहे असे त्यांचे निष्कर्ष आहेत. वेग हेच जीवन मानल्यामुळे सारासार विचार करण्याची माणसाची वृत्ती कशी खुंटली आहे, त्यातून भवतालाचा विसर (कसा) पडतो, माणसाचा संवाद (कसा) खुरटतो, यांत्रिकता वाढते, तात्त्विक व नैतिक प्रश्नांचा विसर पडतो, निसर्गाशी असलेल्या मानवी संबंधांचा पाया (कसा) उखडला जातो, ते या लेखातून खांडेकर दाखवून देतात. ‘वेडे करून सोडावे सकळ जन’ हे लेखाचे शीर्षक अर्थाच्या दोन पातळ्या सूचित करते. वाच्यार्थाने सध्याच्या बाजारकेंद्री भांडवली अर्थव्यवस्थेचा एककलमी प्रमुख हेतू त्यातून सूचित होतो आणि व्यंगार्थाने  रुजवलेल्या चाकोरीबद्ध व्यवस्थेला झुगारून देण्यासाठी आवश्यक असणारी क्रांतिगर्भता त्यातून सूचित होते. संभावित शहाणपणापेक्षा सर्जनशील, क्रियाशील वेडेपणाचे माहात्म्य व्यक्त होते. या लेखात भाषेच्या सार्वभौम शक्तीचे स्वरूप, तिची सद्य:स्थिती आणि अवस्था सांगितली आहे. भाषा म्हणजे समाज आणि संस्कृतीचे संचित. माणसाचे आत्मभान आणि अस्तित्वभान. भाषा म्हणजे अर्थनिर्मिती. म्हणूनच ‘भाषा नासली की मने नासतात, मन नासले की माणसाचा कानूस होतो,’ असे खांडेकर स्पष्टपणे सांगतात आणि सद्य:काळात ‘भाषा गुदमरते आहे काय?’ असा प्रश्न उपस्थित करतात. यासंदर्भात ते दिलीप चित्रे यांच्या ‘कवी काय काम करतो?’ या प्रसिद्ध लेखातील मते उद्धृत करतात आणि त्याचबरोबर भाषेचा राजकारणाशी असलेला संबंध उलगडताना जॉर्ज ऑरवेलच्या ‘पॉलिटिक्स अ‍ॅण्ड इंग्लिश लँग्वेज’ या लेखाचा संदर्भ देतात. बेराडी या अभ्यासकाचा हवाला देऊन खांडेकर ‘मुक्त बाजारपेठीय भांडवली व्यवस्थेत भाषेचे नि:संदर्भीकरण होते म्हणजे भाषा अर्थवाहिनी म्हणून दिवाळखोर बनते-’ असे दाखवून देतात.

शरद्चंद्र मुक्तिबोध, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, इतिहासाचार्य राजवाडे, र. धों. कर्वे अशा मराठी विश्वाला परिचित असलेल्या नामवंतांचे विचार व लेखन खांडेकर पूर्णपणे नव्या स्वरूपात व नव्या संदर्भासह आपल्यासमोर ठेवतात, ही या पुस्तकाची एक अत्यंत जमेची बाजू आहे. भांडवलशाहीची चिकित्सा करताना आणि तिचे परिणाम तपासताना खांडेकर यांनी मार्क्‍स/ फ्रॉईडसह पुढच्या पाश्चात्त्य अभ्यासकांचे संदर्भ घेणे साहजिकच होते, पण त्याचबरोबर आपल्याकडच्या परिस्थितीची विशिष्ट (युनिक) वास्तवता लक्षात घेता या विवेचनात इथले काही संदर्भही लक्षात घेणे आवश्यक होते. उदा. : इथला सनातन आणि प्राचीन ब्राह्मणी वर्णवर्चस्ववाद. वर्णवर्चस्ववादाचे नव्या व्यवस्थेत काय झाले? तो संपला का? की त्याचे रूपांतरण झाले? इथल्या संस्कृतीचे अधिष्ठान लाभलेल्या लिंगभेदाचे आणि स्त्री-पुरुष संबंधातील पुरुष वर्चस्ववादाच्या स्वरूपाचे या नव्या व्यवस्थेने काय केले?  महत्त्वाचे म्हणजे ‘जात’ या घटकाकडे नव्या व्यवस्थेने कसे पाहिले? इथल्या मार्क्‍सवाद्यांनी तिकडचे अंधानुकरण करीत वर्गसंघर्षांचा विचार केला, पण जातवास्तवाकडे दुर्लक्ष केले आणि या जातवास्तवाचा मूलभूत विचार करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडेही दुर्लक्ष केले. बाबासाहेबांना मानणाऱ्यांनी मार्क्‍सवादाचा अव्हेर केला. पाश्चात्य जगात मार्क्‍सवादाला कालबाह्य़ ठरवणाऱ्या ‘उत्तर आधुनिकतावादी’ विचारांचा प्रतिवाद नवमार्क्‍सवादी फ्रेडरिक जेम्सनसारख्यांनी समर्थपणे केला, मार्क्‍सवादाचे पुनर्वाचन केले, नवे अन्वयार्थ दिले. आपल्याकडे असे होताना दिसले नाही. उलट, पहिल्यापासूनच इथल्या अ‍ॅंटी-मार्क्‍सिस्ट असणाऱ्यांनी आता मार्क्‍सवाद मृत झाल्याचे जाहीरही केले आणि इथल्या ‘उजव्यांनी’ नव्या जागतिक भांडवलशाहीचे आणि त्याच्या आडून येणाऱ्या खासगीकरणाचे आणि उदारीकरणाचे स्वागत केले. अधलेमधले पुरोगामी गडबडले. माणूस ‘वस्तू’ झाला, देश ‘बाजारपेठ’ झाली. ज्ञान ‘विक्रेय वस्तू’ झाले. हे वर्तमान खांडेकर कसलाही आडपडदा न ठेवता आपल्यासमोर ठेवतात.

‘समिथग इज रॉटन इन द स्टेट ऑफ डेन्मार्क’ असे शेक्सपियरचा हॅम्लेट म्हणतो. हे आता सर्वत्रच अनुभवाला येणारे सत्य. ‘या विंचवाला उताराही’ सुचवायला हवा आणि तसा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्याची दखलही घ्यायला हवी. खांडेकर यांनी ‘वेडे करूनी सोडावे सकळ जन’ या लेखात वॉल्टर बेंजामिनने उपस्थित केलेला ‘विवाद किंवा परस्परविरोधी दावे सोडवण्याचा अिहसात्मक मार्ग कोणता?’ हा प्रश्न उद्धृत केला आहे आणि ‘म. गांधींचा सारा जन्म याच प्रश्नाचे तांत्रिक उत्तर शोधण्यात गेला..’ असे म्हटले आहे. हे विधान महत्त्वाचे आहे. गौतम बुद्धापासून म. गांधींपर्यंत आणि त्यांना वाट पुसत असा शोध ज्यांनी ज्यांनी घेतला आहे, त्यासंबंधी खांडेकर यांनी आपले चिंतन मांडावे असे यानिमित्ताने सुचवावेसे वाटते. त्यातून मग मार्क्‍स आणि फ्रॉईडबरोबर बुद्ध आणि गांधी यांचे दार्शनिक स्वरूप पुढे येऊन विचारांचे एक वर्तुळ पूर्ण होईल. एक अभ्यासक या नात्याने संजीव खांडेकर यांनी सद्य:स्थितीचा आरसा आपल्यासमोर धरला आहे. त्यात पाहिल्यावर आपण भ्रांतचित्त होणे साहजिक आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत भांडवलशाहीच्या अजगराने आपणाला गिळंकृत करून टाकले आहे. त्याच्यातून बाहेर कसे पडायचे? माणसाचे हरवलेले माणूसपण, गमावलेली मानुषता कोणत्या मार्गाने पुन्हा स्थापित होईल? हे लेख वाचताना अशा यक्षप्रश्नांनी अस्वस्थ केले आणि अशी अस्वस्थता व्यक्तिगत न राहता सार्वत्रिक व्हायला हवी. अशा लेखांचे मोल म्हणूनच आहे.