प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

शि. द. फडणीस यांचे चित्र पाहिलेलेच नाही अशी साक्षर व्यक्ती महाराष्ट्रात तरी शोधून सापडणार नाही. याचं साधं कारण म्हणजे, महाराष्ट्रातल्या प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी गणिताची पुस्तकं चित्रमय आणि सुलभ केली. लाखो विद्यार्थ्यांची प्राथमिक गणिताशी दोस्ती या चित्रांमुळे अभावितपणे पक्की झाली होती हे त्या विद्यार्थ्यांना कदाचित माहितीही नसेल. पण हे साध, सोपं गणित समजून सांगण्यासाठी साधी, सोपी चित्र काढणे किती अवघड, क्लिष्ट आणि जबाबदारीचं काम होतं हे फडणीसच जाणोत. त्यांच्या ‘रेषाटन- आठवणींचा प्रवास’ (ज्योत्स्ना प्रकाशन) या पुस्तकातील ‘सचित्र गणित’ हे प्रकरण मुळातूनच वाचण्यासारखं आहे. एका बाजूला निर्मितीक्षम कलावंत तर दुसऱ्या बाजूला  सरकारी अजस्र यंत्रणा अशा या द्वंद्व युद्धामधून अखेरीस कोटय़वधी विद्यार्थ्यांचा फायदाच झाला हे महत्त्वाचं. दोन वर्षांच्या चाचणीनंतर जेव्हा हे पुस्तक शाळांमध्ये लागलं तेव्हा ‘अखेरीस मी पहिलीची परीक्षा उत्तीर्ण झालो!’ असे मिश्किल उद्गार त्यांनी काढले.

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
What Prakash Mahajan Said About Raj Thackeray?
“राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण, हिंदुत्वाची शाल पांघरुन..”, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य चर्चेत
What Aditya Thackeray Said?
“४० गद्दारांनी आता विचार करावा..”, आदित्य ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य
Ajit Pawar Statement about Baramati
“बारामतीचा सस्पेन्स थोडा राहू देत, जे नाव तुमच्या मनात..”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य

ही चित्रं आकर्षक आहेत. त्यातून निरागस भाव व्यक्त होतो. म्हणून ती नेहमी पाहावीशी वाटतात हेच शि. द. यांच्या चित्रकलेचं मर्म आहे. गणिताच्या पुस्तकासंदर्भातला हा प्रवास २० वर्षे सुरू राहिला. एखाद्या जातिवंत कलावंताचा कस लावणारा हा काळ होता. पण यातून प्राथमिक गणित समजणाऱ्या काही कसदार पिढय़ा निर्माण झाल्या एवढे मात्र नक्की.

व्यंगचित्रकाराला कल्पना नेमक्या कशा सुचतात या विषयी अनेकांना स्वाभाविक कुतूहल असतं. ही नेमकी प्रक्रिया सांगता आली नाही तरी काही चित्रांच्या बाबतीत फडणीस यांनी या प्रक्रियेवर भाष्य केलं आहे. आपल्याकडची अष्टभुजा देवी आणि ग्रीक सौंदर्य देवता व्हिनस- जिला दोन्ही हात नसतात- या संदर्भात त्यांना काही कल्पना सुचल्या, पण त्या फक्त डायरीतच, रेखाटनाच्या वहीतच राहिल्या. अंतिम आकाराला येऊ शकल्या नाहीत. यानंतर त्यात शिल्पकार येऊन काही हात तोडतो वगैरे वगैरे प्रयोग करून रेखाटने झाली. पण चित्र मात्र पूर्ण झालं नाही.

दरम्यान ११ वर्षांनंतर त्यांनी या कल्पनेवर पुन्हा विचार करायला सुरुवात केली. आणि अखेरीस अनेक काटछाट करून चतुर्भुज देवी आणि व्हिनस यांच्यामधलं हे सोबतचं रंगीत चित्र पूर्ण झालं आणि एका मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकलं. मला वाटतं, पाश्चात्त्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती यावरच हे प्रभावी भाष्य आहे. अनेक पौराणिक कथा, साधू-संतांची वचने, अभंग, श्लोक यात दातृत्वाविषयी जे सांगितलं गेलं आहे, ते सारं हे चित्र पाहताच क्षणात आपल्या मनासमोरून जातं.

शि. द. याचं काम तसं प्रचंड आणि वैविध्यपूर्ण आहे. मासिकांची मुखपृष्ठे, वाड्.मयीन पुस्तकातील रेखाटने, जाहिराती, औद्योगिक कंपन्यांची कामे ही तर आपल्याला माहिती आहेतच. पण त्यांनी काही खास अर्कचित्रंही रेखाटली आहेत. सोबतचे यशवंतराव चव्हाण यांचे चित्र हे खास शि. द. स्पर्श असलेलं अर्कचित्र आहे. या चित्रातील अनेक गोष्टी या यशवंतराव यांच्या तत्कालीन व्यक्तिमत्त्वाशी संबंधित आहेत हे बारकाईने पाहिल्यावर लक्षात येतं.

जाहिरातींच्या क्षेत्रातही शि. द. यांनी स्वत:चा ब्रश मिश्किलपणाच्या शाईत बुडवून चित्रं काढली. सोबतचे हे पॅकेजिंगविषयीचे चित्र त्याची साक्ष आहे. त्याशिवाय बँकिंग, व्याकरण, व्यवस्थापन, विज्ञान इत्यादी एरवी रुक्ष वाटणारे विषयही त्यांनी सचित्र करून आकर्षक व सुलभ केले.

त्यांची क्रिएटिव्हीटी ही त्यांच्या ‘हसरी गॅलरी’ या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या मांडणीतही दिसते. पहेलवानाचे एकच चित्र काढून त्याच्यासमोर आरसा ठेवून दोन (एकसारख्या) पहेलवानांची कुस्ती दाखवणं असो वा पुतळ्याचे दात घासताना खरा टूथ ब्रश वापरणे आणि तो (मोटरच्या साहाय्याने) मागे-पुढे हलवणे अशा अनेक मजेशीर चमत्कृती ते करतात.

शि. द. यांच्या हास्यचित्रांचा मुख्य यूएसपी ‘अद्भुतता’ हा आहे. ही अद्भुतता पकडणं, सुचणं फार अवघड. एखादं उदाहरण द्यायचं तर बॅडमिंटन खेळण्यासाठी निघालेली युवती आणि सुतारकामासाठी निघालेल्या बापईगडय़ाची भर बाजारात झालेली सायकलींची टक्कर हे चित्र घेता येईल. लेडीज सायकलवरून वेणी उडवत जाणारी, स्लीवलेस ब्लाउज घालणारी, स्मार्ट, आकर्षक चेहऱ्याची, मध्यमवर्गीय कॉलेज तरुणी, तिच्या चेहऱ्यावरचे ते ‘अगं बाई’चे भाव, मोठे डोळे, नाजूक टिकली, कापली गेलेली रॅकेट आणि ‘काय झालं म्हायतीच न्हायी बघा’ अशा निर्विकारपणे निघून चाललेला धोतर, मुंडासेवाला सुतारबाबा, त्याची सायकल, सुतारकामाचं कॅरियरला लावलेलं इतर साहित्य आणि एखाद्या खलनायिकेसारखी वागलेली लांबलचक करवत! या साऱ्यावरून आपली नजर झरझर फिरते. पण तरुणीच्या पायातले पांढरे स्पोर्ट शूज आणि सुतारबाबाच्या कानावरची पेन्सिल हे तपशील निसटू शकतात. ते ही महत्त्वाचे आहेत. कारण त्यातून दोन्ही व्यक्तिरेखा ठळक होतात. एकूण चित्र पाहिल्यावर हसू हे हमखास येणारच. पण मुद्दा आहे फॅन्टसीचा. मुळात ही अशी कल्पना सुचणंच फार अतक्र्य आहे. कारण हा प्रसंग प्रत्यक्षात घडू शकणारा नाही. पण फडणीस यांचं हेच तर बलस्थान आहे. आकर्षक रंगसंगती, निळ्या किंवा पिवळ्या रंगात सूचकपणे रेखाटलेली पाश्र्वभूमी, मुख्य पात्र ठसठशीत, गोंडस, चेहऱ्यावर शक्यतो निरागस भाव, मध्यमवर्गीयांच्या आजूबाजूला असणारे विषय, अभावितपणे घडणारे विनोदी प्रसंग आणि एखादी अद्भुत कल्पना!

या सर्व हातातल्या आणि मनातल्या कौशल्यांचा वापर करून, जवळपास ७० वर्षे मराठी वाचकांसमोर अनेक माध्यमातून अभिरुचीपूर्ण हास्यचित्र सादर करणारा हा प्रतिभावंत, चिरतरुण, हसतमुख कलावंत येत्या २९ जुलै रोजी वयाची ९५ वर्षे पूर्ण करत आहे. त्याबद्दल गुरुवर्य शि. द. फडणीस यांना विनम्र अभिवादन!