मागच्या लेखात आपण मेंदूच्या विचार करण्याच्या दोन पद्धती बघितल्या. सिस्टिम १- जी सदैव सक्रिय असते आणि ज्याद्वारे मेंदू जलद गतीने निर्णय घेतो. सिस्टिम १ गरजेनुसार सिस्टिम २ ला कामाला लावते; जी माहितीचे विश्लेषण करून सिस्टिम १ ला निर्णय घेण्यास मदत करते. मेंदूच्या या विचार करण्याच्या पद्धती, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध, मेंदूत साठवलेल्या स्मृती, आठवणी, भावना, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची मेंदूची मर्यादित क्षमता आणि त्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे होणारे दुर्लक्ष या सगळ्याचा मेंदूच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होतो. यालाच आपण ‘कॉग्निटिव्ह बायसेस’ असे म्हणतो. हे कॉग्निटिव्ह बायसेस काय आहेत आणि ते कसे काम करतात हे आपण बघू या. उत्तरांची सुरुवात अर्थातच प्रश्नांनी करू :

‘जगातील सर्वात उंच झाडाची उंची १२०० फूटापेक्षा जास्त आहे की कमी आहे?’ व ‘तुमच्या अंदाजानुसार सर्वात उंच झाडाची उंची काय असेल?’ हे प्रश्न काही लोकांना विचारण्यात आले आणि त्यांची उत्तरे नोंदवून घेतली गेली. त्यानंतर इतरांना हाच प्रश्न थोडासा बदलून विचारण्यात आला. फक्त प्रश्नात १२०० फूटांऐवजी ‘१८० फूट’ असा बदल केला गेला. ज्यांना १२०० फूटाचा प्रश्न विचारला त्यांनी झाडाची उंची सरासरी ८४४ फूट असेल असे सांगितले. तर ज्यांना १८० फुटांचा प्रश्न होता त्यांनी झाडाची उंची सरासरी २८२ फूट असेल असे सांगितले. लोकांच्या उत्तरांत इतका फरक का पडला?

नोबेल पुरस्कारविजेते डॅनियल काहनमन यांनी या व अशा प्रश्नांचा अभ्यास करून कॉग्निटिव्ह बायसेस काय असतात आणि ते कसे काम करतात हे दाखवून दिले. या उदाहरणात लोकांनी व्यक्त केलेला अंदाज हा त्यांना पहिल्या प्रश्नातून मिळालेल्या आकडय़ाच्या जवळपासचाच  होता. १२०० हा आकडा बघून झाडाच्या उंचीचा अंदाजही वाढवला गेला आणि १८० बघून अंदाज खाली आला. वरचे उदाहरण हे अँकिरग (अल्लूँ१्रल्लॠ) या कॉग्निटिव्ह बायसचे आहे. आपला मेंदू आधीच माहिती असणाऱ्या गोष्टी आणि नवीन गोष्टी यांचा सतत संबंध लावण्याचा प्रयत्न करतो. यातूनच पहिल्या प्रश्नाद्वारे गोळा झालेली माहिती पुढच्या प्रश्नाच्या उत्तरावर प्रभाव टाकते. जहाजाचा नांगर (अल्लूँ१) जसा जहाजाला जखडवून ठेवतो, तसेच सुरुवातीला मिळालेली माहिती ही आपल्या पुढच्या विश्लेषणाला आणि निर्णयाला जखडून ठेवते. म्हणून याला ‘अँकिरग बायस’ म्हणतात. याचे रोजच्या व्यवहारातील उदाहरण म्हणजे- समजा, तुम्हाला तुमचा मोबाइल ५००० रुपयांना विकायचा आहे, तर तुम्ही त्याची किंमत ६००० ठेवू शकता. म्हणजे तुमच्या ग्राहकांसोबत वाटाघाटी या रु. ६००० (अँकर)च्या जवळपास होतील आणि तुम्हाला तुमच्या अपेक्षित किमती- एवढा किंवा थोडा जास्तच फायदा होईल. अर्थात तुम्ही जेव्हा ग्राहक असाल तेव्हा सुरुवातीची किंमत ही अशा प्रकारे वाढवण्यात आली आहे हे समजूनच पुढची बोलणी करणे फायद्याचे ठरेल. थोडक्यात, अँकिरग बायस ओळखून तुम्हाला तुमचे डावपेच ठरवता येतील.

आता पुढचा प्रश्न : ‘विमानाने प्रवास करणे सुरक्षित आहे का?’

हा प्रश्न ऐकताच तुम्हाला मागच्या काही दिवसांत झालेले विमान अपघात आठवले असतील तर तुम्ही याचे उत्तर ‘नाही’ असे द्याल. या प्रश्नाचे उत्तर देताना आपल्या मेंदूने काय केले? त्याने आपल्या जमवलेल्या आठवणींमधून ‘विमानांचे अपघात’ या विषयाशी संबंधित आठवणी शोधून काढल्या आणि त्यावरून उत्तर दिले. मागच्या आठवडय़ात विमान अपघात झाल्याने ती ताजी माहिती सहज उपलब्ध झाली आणि विमानप्रवास सुरक्षित नसतात, हा निष्कर्ष काढण्यास मेंदू लगेच तयार झाला. पण रोज जगात होणारे हजारो विमानांचे सुरक्षित प्रवास आणि कधीतरी होणारे अपघात यांचा सांख्यिकी पद्धतीने अभ्यास केला तर विमानप्रवास जास्त सुरक्षित आहे अशी आपल्याला माहिती मिळू शकेल. अर्थात प्रत्येक गोष्टींचा एवढा खोलात जाऊन विचार करणं मेंदूला दर वेळी शक्य नाही आणि ते व्यावहारिकही नाही. त्यामुळे मेंदू असे शॉर्ट-कट्स वापरतो. अशा प्रकारे केवळ सहज उपलब्ध होणाऱ्या आठवणींच्या आधारे एका निर्णयावर येणाऱ्या मेंदूच्या या कलाला ‘अव्हेलेबिलिटी बायस’ असे म्हणतात. यात आपण एखादी गोष्ट घडण्याची शक्यता विचारात न घेता आपल्याला गोष्टी किती सहजपणे आठवतात यावरूनच आपले मत बनवतो.

आपण भावना बाजूला ठेवून, वस्तुनिष्ठ आणि तर्कशुद्ध विचार करून निर्णय घेऊ शकतो असे आपल्या सर्वानाच वाटत असते. पण आपल्याही नकळत काही गोष्टी आपल्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला प्रभावित करत असतात आणि तर्काचा रस्ता आपण कधी सोडला हे आपल्यालाही कळत नाही. कॉग्निटिव्ह बायसेस समजावून घेणे म्हणजे आपल्या विचारांच्या रस्त्यांवरचे धोका दाखवणारे बोर्ड वाचण्यासारखे आहे. काही महत्त्वाच्या निर्णयाच्या वेळेस आपण हा निर्णय का आणि कसा घेतला, त्यात आपले कोणते पूर्वग्रह डोकावताहेत, हे थांबून पाहणे फायद्याचे ठरू शकते. एखादी गोष्ट समजावून घेताना त्या गोष्टीची मर्यादा समजावून घेणे हा एक महत्त्वाचा भाग असतो. ‘कॉग्निटिव्ह बायसेस’ अशाच मर्यादांची आपल्याला जाणीव करून देतात. तरीही विश्वाचे रहस्य शोधणारा आपला मेंदू एक दिवस स्वत:चेच रहस्य आपल्यासमोर उलगडून ठेवेल आणि ते समजावून घेण्यात आपल्याला मदतही करेल. तोपर्यंत हा स्वत:च स्वत:ला समजावून घेण्याचा प्रवास असाच चालू राहील.

– पराग कुलकर्णी
parag2211@gmail.com