|| पराग कुलकर्णी

एखाद्या अंधाऱ्या रात्री आकाशातल्या ताऱ्यांचे डोळे दिपवणारे वैभव बघून हे सर्व काय आहे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? हे काय आहे? कोणी निर्माण केले? निर्माण केले का असेच होते-आहे-असणार आहे? या विश्वाच्या पसाऱ्यात आपलं अस्तित्व काय आहे? आपण कोण, कोठून, का आलो? असे आकाशातल्या ताऱ्यासारखे हजारो प्रश्न मनात निर्माण होतात. अर्थात अगदी आदिम काळापासून माणसाला हे प्रश्न पडतच आहेत. या मानवी कुतूहलाला शमवण्यासाठी जवळपास प्रत्येक धर्मात, संस्कृतीत विश्वाच्या निर्मितीच्या कल्पना मांडण्यात आल्या आहेत. गेल्या शंभर वर्षांत विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे आपल्याला आपल्या या विश्वाबद्दल बरीच नवी माहिती मिळाली आहे. आपलं विश्व निर्माण झालं कसं, या प्रश्नाचं उत्तर देऊ पाहणारी आजची आपली संकल्पना म्हणजे बिग बँग सिद्धांत.

बिग बँग किंवा महास्फोटाचा सिद्धांत हा आपल्या विश्वाच्या उत्पत्तीबद्दल भाष्य करणारा एक खूप महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे. बेल्जिअन कॅथोलिक धर्मगुरू, खगोल शास्त्रज्ञ व भौतिकशास्त्राचे प्राध्यापक जॉर्जे लेमत्रे यांच्यापासून याची सुरुवात झाली. १९२७ साली त्यांनी विश्व विस्तारत आहे असा सिद्धांत मांडला. या सिद्धांतात त्यांनी विश्वाच्या विस्तारण्याचा वेग, तसेच आजचे विश्व कसे निर्माण झाले असावे, याबद्दलचे विचार मांडले. पुढे दोनच वर्षांत एडविन हबल या अमेरिकन खगोलशास्त्रज्ञाने विश्वाचा विस्तार होत आहे, हे सिद्ध करणारे पुरावे शोधून काढले. एखाद्या गाडीच्या (उदा. अ‍ॅम्ब्युलन्स किंवा रेल्वे) आवाजावरून आपल्याला ती गाडी आपल्या जवळ येत आहे की आपल्यापासून दूर जात आहे हे समजते. ध्वनिलहरींच्या बदलणाऱ्या गुणधर्मामुळे (फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंग्थ) आपण हे ओळखू शकतो यालाच ‘डॉपलर इफेक्ट’ असे म्हणतात. हेच तत्त्व ध्वनिलहरींप्रमाणे प्रकाशलहरींनाही लागू होते. दूरच्या ताऱ्यांपासून येणाऱ्या प्रकाशलहरींच्या कमी-जास्त होणाऱ्या वेव्हलेंग्थवरून आपल्याला तो तारा आपल्यापासून दूर जातोय (रेडशिफ्ट) का आपल्याजवळ येतोय (ब्लूशिफ्ट) हे समजते. हबलच्या निरीक्षणात त्याला अशी रेडशिफ्ट आढळून आली आणि त्यावरून त्याने विश्वाचा विस्तार होतो आहे हे सिद्ध केले आणि त्याचबरोबर या विस्ताराच्या वेगाचे गणितही मांडले. लेमत्रे आणि मग हबल यांनी मांडलेल्या विश्वाच्या विस्तार सिद्धांताचा एक महत्त्वाचा उपयोग झाला, तो म्हणजे त्याआधारे भूतकाळात काय घडलं असावं याबद्दल तर्क करणे- हा तर्क म्हणजेच बिग बँग सिद्धांत! बिग बँग सिद्धांत सांगतो की, आजचे प्रसारण पावणारे विश्व हे कधी काळी (१३.८ बिलियन वर्षांपूर्वी) अनंत घनता, उष्णता असलेले आणि एका बिंदूत केंद्रित झालेले असे खूपच छोटे विश्व होते. ही खरं तर विश्वाच्या सुरुवात होण्याच्या आधीची अवस्था होती- ज्याला सिंग्युलॅरिटी (Singularity) म्हणतात. तेव्हा वेळ (time), अवकाश (space) यांचेही अस्तित्व नव्हते. एवढेच काय, पण त्या अवस्थेत विज्ञानाचे कोणतेच नियमही लागू पडत नव्हते. इथूनच विश्वाच्या प्रसरणास सुरुवात झाली. पहिल्या काही सेकंदातच त्याचा खूप वेगाने विस्तार वाढला आणि त्याचबरोबर त्याचे तापमानही कमी कमी होत गेले. एका विशिष्ट तापमानाला काही कणांची (सब ऑटोमिक पार्टिकल्स- उदा. क्वॉर्क्‍स) निर्मिती झाली. या कणांच्या एकत्र येण्यातूनच पुढे प्रोटॉन, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स बनले आणि त्यापासून शेवटी अणू निर्माण झाले. यातूनच सुरुवातीला हायड्रोजन, हेलियमसारखी मूलद्रव्ये बनली आणि पुढे जाऊन आज आपण पाहतो ते ग्रह, तारे, सूर्यमाला हा सगळा विश्वाचा पसारा निर्माण झाला.

प्रसरण पावणाऱ्या विश्वावरून जरी ही बिग बँगची कल्पना केली असली, तरी इतर अनेक पुरावेही याचेच समर्थन करतात. विश्वातले हायड्रोजन आणि हेलियम यांचे जास्त असलेले प्रमाण हा असाच एक पुरावा मानला जातो, कारण एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अस्तित्वात असणारा हायड्रोजन आणि हेलियम हा बिग बँगच्या वेळी निर्माण झालेल्या विशिष्ट परिस्थितीतच निर्माण होऊ शकतो. दुसरा एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे- वैश्विक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी (Cosmic Microwave Background). मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी म्हणजे विश्वात सर्व ठिकाणी पसरलेला एक मंद प्रकाश किंवा उष्णता- ज्याचे उगमस्थान कोणत्याही ताऱ्यात नाही- ही उष्णता ‘बिग बँग’मधूनच निर्माण झाली आणि याचे अस्तित्व म्हणजे बिग बँगचा एक मोठा पुरावा आहे. जरी आज बिग बँग सिद्धांत हा सर्वसामान्यपणे स्वीकारला गेलाय तरीही विश्वाच्या निर्मितीबाबत भाष्य करणारे इतर पर्यायही अस्तित्वात आहेत. स्थिर विश्व (स्टेडी स्टेट युनिव्हर्स) हा असाच एक पर्याय म्हणून सुरुवातीच्या काळात पुढे आला होता. यानुसार, विश्वाला ना सुरुवात आहे ना शेवट- सतत प्रसरण पावणाऱ्या विश्वात सतत पदार्थ (मॅटर) निर्माण होत असतो, असे हा सिद्धांत सांगतो. एक मजेशीर गोष्ट म्हणजे, स्थिर विश्वाचे खंदे समर्थक असलेले खगोल शास्त्रज्ञ फ्रेड हॉयल यांनीच उपरोधाने महास्फोटाच्या सिद्धांताला ‘बिग बँग’ असे नाव दिले होते, जे पुढे तसेच प्रसिद्ध झाले.

बिग बँगमुळे आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे मिळाली असली तरी अजून बऱ्याच गोष्टींची उत्तरे मिळणे बाकी आहे. सिंग्युलॅरिटी म्हणजे नेमके काय, तिथे आपल्याला माहिती असलेल्या विज्ञानाचे नियम का चालत नाहीत तसेच या सिंग्युलॅरिटीतून विश्वाचे अचानक प्रसरण का सुरू झाले, असे अनेक प्रश्न आहेत. पण या प्रश्नांची उत्तरे कोण देऊ शकेल? ऋग्वेदाच्या नासदीय सूक्तामध्ये विश्वाच्या उत्त्पत्तीबद्दल भाष्य केले आहे. दूरदर्शनवर ‘भारत एक खोज’ या मालिकेचे गाजलेले जे शीर्षक गीत होते (सृष्टी से पहले सत् नहीं था, असत् भी नहीं..) ते म्हणजे याच नासदीय सूक्ताचा हिंदी अनुवाद आहे. त्या गीताच्या शेवटच्या ओळी आहेत-

‘सृष्टि का कौन है कर्ता?

कर्ता है या है विकर्ता?

ऊँचे आकाश में रहता

सदा अध्यक्ष बना रहता

वही सचमुच में जानता

या नहीं भी जानता

है किसी को नही पता

नही पता

नही है पता

नही है पता॥’

हे विश्व निर्माण करणारा कोणी (देव) आहे का नाही आणि असलाच तर त्याला तरी या विश्वाची सर्व रहस्ये माहिती असतील का, अशी शंका या ऋग्वेदाच्या स्तोत्रात व्यक्त केली आहे. देवाने विश्व निर्माण केले अशा सोप्या, सोयीस्कर उत्तराच्या मोहात न अडकता, आपल्या प्रश्नांचा आणि त्याची उत्तरे आज तरी माहिती नसण्याचा जर आपण खुल्या मनाने स्वीकार केला, तर भविष्यात कधीतरी आपण त्या उत्तरांपर्यंत आणि विश्वाच्या रहस्यापर्यंत नक्की पोहोचू. नाही का?

parag2211@gmail.com