02 June 2020

News Flash

संज्ञा आणि संकल्पना : दृष्टीआडची सृष्टी

आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो किंवा आपल्याला काही आवाज ऐकू येतात.

(संग्रहित छायाचित्र)

पराग कुलकर्णी

‘मी तिथेच तर होतो’, ‘अरे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे..’ असे जेव्हा कोणी आपल्याला सांगते; तेव्हा आपला नाइलाज होतो आणि समोरचा जे सांगतोय त्यावर आपण विश्वास ठेवतो. तो माणूस तिथे होता आणि त्याने स्वत:च्या (!) डोळ्यांनी पाहिले म्हणजे अजून काय पुरावा हवा? कोर्टातही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे खूप महत्त्व असते; पण खरेच आपण दुसऱ्याच्या आणि स्वत:च्या डोळ्यांवर नेहमीच एवढा विश्वास ठेवू शकतो का?

एका सभागृहात काही प्रेक्षकांना बसविण्यात आले होते. समोर व्यासपीठावर खेळाडूंचे दोन संघ होते. एका संघाने पांढरे कपडे घातले होते, तर दुसऱ्याने काळे. दोन्हीही संघांकडे एक एक मोठा चेंडू होता. प्रेक्षकांना सांगण्यात येते की, आता ते खेळाडू एकमेकांकडे चेंडू पास करतील आणि तुम्हाला केवळ पांढऱ्या खेळाडूंनी दुसऱ्या पांढऱ्या खेळाडूंकडे केलेल्या पासची संख्या मोजायची आहे. खेळ सुरू झाला आणि खेळाडू एकमेकांकडे चेंडू पास करू लागले. हा प्रकार काही वेळ असाच चालू राहिला आणि मग काही मिनिटांनी थांबवण्यात आला. यानंतर प्रेक्षकांना दोन प्रश्न विचारण्यात आले. पहिला प्रश्न- ‘पांढऱ्या खेळाडूंनी कितीदा चेंडू पास केला?’ बऱ्याच लोकांनी याची बरोबर उत्तरे दिली. मग दुसरा प्रश्न विचारण्यात आला- ‘किती लोकांना गोरिला दिसला?’ या दुसऱ्या प्रश्नाचं अनेक लोकांना आश्चर्य वाटलं आणि पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी गोरिला न पाहिल्याची कबुली दिली. पण गोरिला आला कुठून? आणि खरेच गोरिला होता का? प्रेक्षकांना आधीच्या खेळाचे व्हिडीओ शूटिंग पुन्हा दाखवण्यात आले. खेळ सुरू झाल्यावर काही क्षणांतच एक गोरिलाचा सूट घातलेला माणूस एका बाजूने हळूहळू व्यासपीठावर येऊन मध्यभागी उभा राहतो, स्वत:ची छाती बडवतो आणि दुसऱ्या बाजूला विंगेत पुन्हा हळूहळू निघून जातो.. हे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते. पण तरीही बऱ्याच लोकांना खेळ चालू असताना गोरिला दिसलाच नाही, हा काय प्रकार आहे?

आपला मेंदू जेव्हा एखाद्या कामात गुंतलेला असतो; तेव्हा डोळ्यासमोर एखादी वस्तू येऊनही ती न दिसणे याला नाव आहे, ‘इनअटेंशनल ब्लाइंडनेस’(Inattentional Blindness)! म्हटले तर आपण ती वस्तू डोळ्यांनी ‘पाहतो’ पण ती आपल्याला ‘दिसत’ नाही. आपला मेंदू त्या वस्तूची नोंदच घेत नाही. १९६० च्या दशकात उलरीच नेइस्सर यांनी काही प्रयोगांनी हा काही विशिष्ट परिस्थितीत, काही गोष्टींसाठीच येणारा आंधळेपणा शोधून काढला. याचाच पुढे अभ्यास करून १९९२ साली एरियन मॅक आणि आयर्वनि रॉक या दोघांनी या प्रकाराला ‘इनअटेंशनल ब्लाइंडनेस’ (लक्ष नसल्याने येणारा आंधळेपणा) हे नाव दिले. आपण वर बघितलेला खेळ हा डॉ. ख्रिस्तोफर छाब्रिस आणि डॅनियल सिमन्स यांनी केलेला हा एक खूप प्रसिद्ध प्रयोग आहे; ज्याद्वारे त्यांनी आपल्या डोळ्यांच्या मर्यादा जगाला दाखवून दिल्या (गोरिला टेस्ट आणि त्यासारखे इतर अनेक प्रयोग यूटय़ूबवर आहेत- ज्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो) पण खरे सांगायचे तर हा काही डोळ्यांचा दोष नाही. हा दोष किंवा आंधळेपणा म्हणजे आपल्या मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे निर्माण झालेली एक अवस्था आहे, मेंदूची एक मर्यादा आहे.

आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो किंवा आपल्याला काही आवाज ऐकू येतात. किंवा काही वास आपल्या नाकात शिरतात तेव्हा डोळे, कान, नाक या इंद्रियांकडून मेंदूला संदेश जातात. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणारे असे करोडो संदेश मेंदूला प्रत्येक क्षणी येत असतात. जरी आपला मेंदू खूप सारी माहिती जमा करून त्यानुसार काय करायचे हे ठरवू शकतो, तरीही या माहितीच्या महापुरातल्या प्रत्येक संदेशाचे विश्लेषण करण्यात शक्ती वाया घालवणे हे मेंदूला शक्य नाही, आणि ते व्यवहार्यही नाही. अशा वेळी अनेक संदेश जरी मेंदूपर्यंत पोहोचत असले तरी तो त्याची शक्ती फक्त ‘महत्त्वा’च्या संदेशाचे विश्लेषण करण्यात खर्च करतो. ज्या गोष्टींवर आपले लक्ष (attention) आहे त्याच गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. गोरिला टेस्टमध्ये चेंडूचे पास मोजण्याचे काम देऊन आपल्या मेंदूला गुंतवून ठेवण्यात येते. पास होणाऱ्या चेंडूवर लक्ष केंद्रित होऊन मेंदू या महत्त्वाच्या कामात इतका व्यस्त होतो, की तेव्हा आपल्या डोळ्यासमोर अनपेक्षितरीत्या आलेला गोरिला आपल्याला दिसतही नाही. मेंदूला कशाचे ‘महत्त्व’ वाटते आणि ‘अनपेक्षितता’ हे इथे कळीचे दोन मुद्दे आहेत. महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष असताना त्याच्या परिघाबाहेर घडणाऱ्या इतर बिनमहत्त्वाच्या, अनपेक्षित गोष्टी मेंदूपर्यंत पोहोचतच नाहीत. आपल्या रोजच्या जगण्यात अशा करोडो बिनमहत्त्वाच्या गोष्टींकडे आपण सतत दुर्लक्ष करत असतो- जे आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यकच आहे. पण त्याचबरोबर ज्या गोष्टी खरेच महत्त्वाच्या आहेत, (मेंदूला त्या क्षणी त्याची जाणीव असो व नसो) त्यावर आपले पूर्ण लक्ष असणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे. समजा, आपण गाडी चालवताना मधेच मोबाइलवर बोलायचे किंवा एखादा मेसेज वाचायचा ठरवले की मेंदूचे लक्ष गाडी चालवण्यावरून उडून मोबाइलवर येते- त्या क्षणी मेंदूला मोबाइल बघणे हे महत्त्वाचे काम वाटते. अशा वेळेस जर समोर काही अडथळा आला किंवा समोरच्या गाडीने अचानक ब्रेक दाबले, किंवा आपले गाडीवरचे नियंत्रण कमी झाले तर या गोष्टी मेंदूच्या या अवस्थेत बिनमहत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे हे संदेश मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाहीत, ज्याचे पर्यवसान अपघातात होऊ शकते. म्हणूनच गाडी चालवताना काही क्षणांसाठीही लक्ष विचलित न होऊ देणे खूपच जरुरीचे आहे.

‘इनअटेंशनल ब्लाइंडनेस’ आपल्या सर्वाच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. खूप विचारात असताना समोरची वस्तू न दिसणे, कोणी बोललेले ऐकू न येणे इथपासून जादूच्या प्रयोगांपर्यंत त्याचा अनुभव आपण सगळेच घेत असतो. पण हा खरेच आपल्या मेंदूचा दोष किंवा कमतरता आहे का? नक्कीच नाही. आजूबाजूला घडणाऱ्या करोडो गोष्टींना गाळणी लावून काही ठरावीक माहितीचाच आपण जेव्हा स्वीकार करतो, तेव्हाच आपण महत्त्वाच्या कामांवर, विचारांवर, अनुभवांवर लक्ष केंद्रित करू शकतो. वर सांगितल्याप्रमाणे, इनअटेंशनल ब्लाइंडनेसमुळे जसे अपघात होऊ शकतात, तसेच त्याच कारणामुळे गाडी चालवताना आजूबाजूच्या अनेक बिनमहत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष न जाता आपल्याला गाडी सुरक्षितरीत्या चालवताही येते. त्यामुळे एक प्रकारे आपली दैनंदिन कामे लक्ष विचलित न होता करण्यासाठीही याचा उपयोग होतो. जाता जाता एक ‘आगाऊ’ सूचना- तुमचा नवरा, तुमची बायको किंवा मुले टीव्ही, मोबाइल बघत असताना त्यांना तुमचा आवाज ऐकू न येणे यामागे इनअटेंशनल (Inattentional) ब्लाइंडनेस (दुर्लक्ष होणे) आहे का इंटेंशनल (Intentional) ब्लाइंडनेस आहे, हे मात्र प्रत्येकाने कौटुंबिक अपघात न होऊ देता स्वत:च्या जबाबदारीवर ठरवावे! शेवटी काय, दृष्टीआड सृष्टी!

parag2211@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2019 12:05 am

Web Title: sadnya ani sankalpana article parag kulkarni abn 97 3
Next Stories
1 गवाक्ष : ऋण..
2 लेखनप्रवाहात खेचून घेणारा साहित्यिक
3 जगणे.. जपणे.. : संघर्ष से निर्मिक है हम!
Just Now!
X