10 July 2020

News Flash

अफसाना लिख रही हूँ.. : ‘तुझ को चलना होगा..’

आपला आजार साधासुधा नसून असाध्य असा रक्ताचा कर्करोग आहे, हे समजल्यावर आतून तुटलेला अविनाश विमनस्क अवस्थेत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

मृदुला दाढे- जोशी

mrudulasjoshi@gmail.com

आपला आजार साधासुधा नसून असाध्य असा रक्ताचा कर्करोग आहे, हे समजल्यावर आतून तुटलेला अविनाश विमनस्क अवस्थेत आहे. नीलाला सोडून मधेच उतरून जावं लागणार.. हवंहवंसं वाटायला लागलेलं हे आयुष्य संपतही आलं? इथपर्यंतच होती का ही साथ? या विषण्णतेतून आलेलं हे गाणं..

‘जिंदगी का सफर है ये कैसा सफर,

कोई समझा नहीं, कोई जाना नहीं

है ये कैसी डगर, चलते है सब मगर,

कोई समझा नहीं, कोई जाना नहीं!’

अतिशय कमी स्वरांत साधासुधा बांधलेला मुखडा किती प्रभावी ठरू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे हे. प, सा, नि, रे या केवळ चार स्वरांत फिरतो हा मुखडा. गायला अतिशय सोपा.

‘जिंदगी। का सफर। है ये कै। सा सफर।’ असं किंचित चुकीचं विभाजन असलं तरी गाताना त्यातल्या जागा भरत गेल्यामुळे ते कानाला खटकत नाही. बघा, यातल्या प्रत्येक विभागातल्या शेवटच्या अक्षरावर एक ठहराव आहे. त्यात ते हताशपण आणि तुटलेपण दिसतं. माणूस जेव्हा पूर्णपणे खचतो तेव्हा तो लांब पल्लेदार वाक्यं बोलायच्या मन:स्थितीत नसतो. तो असाच स्वत:शी पुटपुटत असतो. तसं आहे हे गाणं..

‘जिंदगी को बहोत प्यार हमने दिया,

मौत से भी मुहब्बत निभायेंगे हम’

यात खरं तर असहायताच दिसते. आयुष्यावर तर प्रेम केलंच, पण आता मृत्यूचंही स्वागत करावंच लागणार आहे. ‘मौत से भी मुहऽऽऽब्बत’ म्हणताना कोमल निषाद किती भरीव लागतो! किशोरकुमारचा आवाज घनगंभीर होतो तेव्हा एक वेगळाच दर्द त्याच्या आवाजात असतो. फार व्यथित, जखमी आवाज आहे या गाण्यात.

‘रोते रोते जमाने में आये मगर, हसते हसते जमाने से जायेंगे हम’ असं म्हणतोय अविनाश. पण त्या जाण्याचं दु:ख तो लपवू शकत नाहीये. देखणं आयुष्य जगणं ही त्याची आत्यंतिक ऊर्मी आहे. आणि ते आयुष्य संपणार, हे कटू वास्तव आहे. यातल्या पुढच्या ओळी मला फार खोल अर्थाच्या वाटतात.

‘जीवन भी है जो जिये ही नहीं,

जिनको जीने से पहले ही मौत आ गयी’

आपण जी स्वप्नं बघतो त्यात आपलं आयुष्य कसं असावं, कुणासोबत ही वाट चालावी, त्या प्रवासातले उत्कट प्रसंग, सुखदु:खं, प्रणय, विरह.. सगळं आपण कल्पिलेलं असतं. ‘त्या’आयुष्याचा पट आपल्यासमोर तयार असतो. आत्ताच्या चालू काळाव्यतिरिक्त एखादी समांतर, वेगळी मिती अस्तित्वात असावी, त्या मितीतल्या घटना, माणसं वेगळी असावीत; तसंच काहीसं हे! ‘ते’ आयुष्य सुरू व्हायच्या आधीच संपलं!

‘फूल ऐसे भी है जो खिले ही नहीं,

जिनको खिलने से पहले फिजा खा गयी’

किती भीषण आहे हे! उमलण्याआधीच कुस्करून टाकलेल्या या कोमल कळ्या! त्या आयुष्याची ही भ्रूणहत्या? अनेकदा आपलं आयुष्य रिव्हाइंड करून त्याला विशिष्ट पॉइंटला वेगळी कलाटणी द्यावी असं वाटत असतं. पण ते होत नाही. काळ अत्यंत निर्घृण आहे. या जखमांना कसलंच औषध नाही.

नीलालाही अतिशय धक्का बसलाय. ज्याच्यावर सगळ्या आशा लावल्या, सगळं भावविश्व ज्याच्याभोवती विणलं, त्याला डोळ्यापुढून नियती हिरावणार आहे. मी काहीही करू शकणार नाही. असहायपणे बघत बसण्यावाचून माझ्या हातात काहीही नाही. ‘डूबी जब दिल की नय्या, सामने थे किनारे’!  किनारा डोळ्यापुढे असताना नौका बुडावी! अविनाश आयुष्याचा सहप्रवासी होता होता मधेच साथ सोडून जाणार?

‘हम थे जिनके सहारे वो हुए ना हमारे

डूबी जब दिल की नय्या सामने थे किनारे!’

सुरुवातीचे ‘हम थे जिनके सहारे’ हे शब्द लताबाई तालाशिवाय गातात. त्यातला ‘हम’चा उच्चार एक उसासा घेऊन येतो. आणि ‘सहारे’चं टायिमग समजणं कुणाच्याही आवाक्याबाहेरचं आहे. प्रत्येक वेळी ‘सहारे’ शब्द वेगळ्या टायिमगने येतो. त्यातल्या ‘हा’ला दिलेल्या पंचमाच्या स्पर्शाची नेमकी जागा कुठली, ते समजण्याची जगात स्वत: लताबाई सोडून कुणाचीच कुवत नाही. एकदा कधीतरी ती मात्रा पूर्णपणे वापरत तो ‘सहारे’मधला ‘हा’ किंचित लांबवलाय. अन्य ठिकाणी मात्रेतला काही भाग बाकी ठेवून किंचित अलीकडे त्या पंचमाचा कण त्यात मिसळतात. हे अद्भुत आहे. तोच प्रकार ‘हमारे’ शब्दाबाबत. पहिल्या दोन्ही ओळी एक ‘स्टेटमेंट’ करतात. पण त्यातली भयंकर घटना ‘डूबी जब दिल की नय्या’ इथे येते. मग स्वरांची दाहकता वाढते. ‘नैय्या’ शब्दावरचा शुद्ध मध्यमावरचा तो ठहराव असहाय करतो. ‘सामने थे किनारे’ ही अगदी हताश ओळ खालच्या धवतावर सोडलीय. कारण ते अपुरेपण कधी षड्जावर येऊच शकत नाही. प्रेमाच्या आणाभाका म्हणजे ‘रेत की दीवारें’! किती अचूक शब्द आहे हा! कुणीही यावं आणि लाथाडावं या वाळूच्या भिंतींना. लताबाई यात आणखी एक चमत्कार करतात.

‘है सभी कुछ जहाँ में, दोस्ती है वफा है

अपनी ये कमनसीबी

हमको ना कुछ भी मिला है..’

या ओळींमध्ये एक कडवट पराभव आहे. मी कुठे म्हणतेय की, जगात प्रेम, मत्री नाही? सगळं आहे; पण ‘माझ्या’ वाटय़ाला नाही आलं ते. हे ‘माझं’ फुटकं नशीब. ‘हमको ना कुछ भी मिला है’ ही ओळ नीट ऐकली तर यातली कडवट धार जाणवते. काय करतात लताबाई? तर, ‘कुछ भी मिला है’ म्हणताना कुठेही स्वराला आस ठेवत नाहीत. अगदी जागच्या जागी ठेवलंय त्यांनी स्वरांना. विशेषत: ‘कुछ, भी’ आणि ‘मि’ हे तीन स्वर- ग, रे, ग किती तुटक येतात. आणि लताबाईंच्या एरवी श्रुतींमधली आससुद्धा सांधण्याच्या गायकीत किती वेगळे लागतात कानाला! पण तीच या शब्दांची गरज नाही का? हाच स्पष्टपणा ‘जो जिंदगी में कमी थी, वो कमी तो रहेगी’ हे अत्यंत भीषण वास्तव स्वच्छपणे स्वीकारताना जाणवतो. ‘यूं तो दुनिया हॅंसेगी, तनहाई फिर भी डसेगी’नंतरचा ‘जो’ शब्द त्या बीटवर घेतात. या चालीचे बाकीचे शब्द ऑफबीट असताना ‘जो’ हाच शब्द बीटवर (तालाच्या मात्रेवर) आहे. कारण त्यात एक निकराचं सांगणं आहे, की हे मोठं न्यून कायम राहणारच माझ्या आयुष्यात! ‘प्राणांवर नभ धरणारं’ नाहीच कुणी- हे सांगायलासुद्धा धाडस लागतं ना? आणि पुन्हा तेच ‘ग रे ग’ हे स्वर. अत्यंत कठोरपणे उच्चारलेले. इथे लताबाई नसत्या तर? हे गाणं एवढं प्रचंड दाहक झालं असतं?

एवढय़ावरच झालं नाही. शेवटी, ‘सामने थे किनारे’ ही कायम निषादावर असणारी ओळ हलकेच, फार पुसटशी, खालच्या पंचमावर आणून पटकन् सोडून दिलीय. का? तो पंचम घायाळ करतो, काटा आणतो, जीव घेतो.

कसं सुचलं असेल हे?

नीलाचा शेखरशी विवाह, नंतर अविनाशबद्दल संशय, शेखरची आत्महत्या.. अशी वळणं चित्रपट घेतो. खुनाच्या आरोपातून सुटका झालेली नीला पुन्हा रुग्णसेवेत रुजू होते. पण एके दिवशी त्याच हॉस्पिटलमध्ये अविनाश दाखल होतो. अत्यवस्थ असल्याने त्याचा मृत्यू होतो. नीला शेवटच्या क्षणीही नसतेच त्याच्यासोबत. ती ‘कमी’ त्याच्याही आयुष्यात राहतेच शेवटी. आणि हे दोन समांतर किनारे कधीही एकत्र न येणाऱ्या आपापल्या वाटा चालत राहतात. एका किनाऱ्याने स्वत:चा अनंताचा प्रवास सुरू केलेला असतो, तर  दुसरा किनारा अनेकांच्या मृत्यूशी लढायला स्वत:चं आयुष्य पणाला लावायला निघतो. त्यानं एकच सत्य स्वीकारलेलं असतं-

‘तुझ को चलना होगा, तुझ को चलना होगा!’

(उत्तरार्ध )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 4:08 am

Web Title: safar a journey song tujhko chalna hoga lokrang afsana likh rahi hoon article abn 97
Next Stories
1 काश्मिरी पंडितांचे काय?
2 काश्मीर : आज
3 ‘माझे भारतीयत्व..’ ‘त्या’ दिवसाने पार उद्ध्वस्त केले..
Just Now!
X