मृदुला दाढे- जोशी

mrudulasjoshi@gmail.com

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
ilayaraja-biopic
धनुषच्या आगामी ‘इलयाराजा’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “एक स्वप्न…”

जन्माच्या क्षणापासून प्रवासालाच निघतो आपण! निरंतर वाटचाल कुठल्याशा अनामिक मंजिलकडे चाललेली! पहिल्या श्वासाचं भान नाही, शेवटच्या श्वासाचं ज्ञान नाही. सगळाच अधांतरी मामला! वाटेत कोण भेटणार, कोण जीव लावणार, कोण साथ सोडून जाणार.. कशावरच नियंत्रण नसलेले आपण. आपल्या हातात फक्त वाटचाल करत राहणंच आहे. ही ‘सफर’ कधी अपेक्षापूर्ती, तर कधी अपेक्षाभंग, कधी प्रेमाची ऊब, तर कधी उपेक्षा असे पडाव घेत जाते. पण शेवटच्या श्वासापर्यंत ही वाट चालावीच लागते.

१९७० साली आलेला ‘सफर’ हा मुशीर रियाझ निर्मित, असित सेन यांनी दिग्दर्शित केलेला, आशुतोष मुखर्जीच्या कादंबरीवर आधारित चित्रपट. राजेश खन्ना, शर्मिला टागोर आणि फिरोज खान यांनी साकारलेली नियतीच्या हातातली तीन बाहुली : अविनाश, नीला आणि शेखर.. एका आवर्तात सापडतात. प्रेम, त्याग, मत्री सगळंच पणाला लागतं. पहिलं प्रेम ज्याच्यावर जडलं त्या अविनाशला असाध्य कर्करोग होतो आणि अविनाशच्याच हट्टामुळे ज्या शेखरशी विवाह करावा लागतो, तोही गैरसमजातून वैफल्याने आत्महत्या करतो. खुनाचा आळ नीलावर येऊनही त्यातून ती सुटते. आयुष्याचा प्रवाह नीलाला थांबू देत नाही. त्या नदीच्या लाटांवर तिला आयुष्याची नौका हाकारावीच लागते.. त्याची ही कहाणी. इंदीवर आणि कल्याणजी-आनंदजी यांच्या गाण्यांमुळे या कथेतला जीवनसंघर्ष तीव्र झाला, गहिरा झाला. व्यावसायिक संगीताची नस सापडलेले कल्याणजी-आनंदजी आणि  सामान्यांच्या आवाक्यातल्या रचना करण्यासाठी प्रसिद्ध असे इंदीवर. त्यामुळेच कसलाही वेगळा पवित्रा न घेताही ही गाणी चपखल बसली. गाण्यांचा अर्थ शोधत बसावा लागला नाही. चाली गुणगुणता आल्या. इंदीवरच्या शब्दांना नाद आहे. त्या शब्दांत चित्रपटाची कथा उतरते. कल्याणजी-आनंदजींच्या या चालींना एक प्रवाहीपणा आहे. सांगीतिक कसरती न करता ‘कॅची’ चाल देण्यात हातखंडा असलेले कल्याणजी-आनंदजी इथे जराही अवघडलेले वाटत नाहीत. यातली चार प्रमुख गाणी.. ‘जीवन से भरी’, ‘नदिया चले’, ‘जिंदगी का सफर’ आणि ‘हम थे जिनके सहारे..’ आणि एक त्यातल्या त्यात साधं गाणं- ‘जो तुमको हो पसंद..’ ही सगळी गाणी खूप गाजली.

अविनाश मेडिकलचा विद्यार्थी आणि उत्कृष्ट चित्रकारही. नीलाच्याच वर्गातला. कुठल्याशा अनामिक ऊर्मीतून नीलाचीच चित्रं त्याच्या कुंचल्यातून साकारतात. त्याच्या असाध्य आजाराची कल्पना त्यांच्या सरांना- म्हणजे डॉ. चंद्रा यांना आहे. त्याच्या आजारपणात तो वैफल्यग्रस्त झालेला असताना नीला त्याची शुश्रूषा करते. पुन्हा जगावं असं वाटायला लावणारे क्षण नीलामुळे अविनाशच्या आयुष्यात येतात. त्याच्या कुंचल्यातून रेषा उमटतात त्या नीलाच्याच पापण्यांना हलका स्पर्श करत. त्या डोळ्यांची ताकद अविनाशला आतून समजलेली असते. मृत्यूकडून जीवनाकडे खेचण्याची ताकद.. जीवनरसाने भरलेले ते डोळे.. तो तिचा वावर.. यांतून शब्द येतात..

‘जीवन से भरी तेरी आँखें..’

एक अतिशय कोमल गाणं. ज्यात किशोरचा आवाज एका हळव्या प्रियकराची भावना घेऊन आलाय. बागेश्रीच्या जवळचा, अतिशय व्यामिश्र भावनांचा राग- मालगुंजी. त्यात एक विरहार्त वेदना आहे आणि प्रणयही. या रागाचा भाव विरह व्यक्त करतो. पण हा विरह तुटलेपण दाखवत नाही, तर भेटीची आस घेऊन येतो. ‘मजबूर’ शब्दावर चमकणारा शुद्ध गंधार मालगुंजीचं अस्तित्व दाखवतो. ‘जीवन से भरी तेरी आँखे, मजबूर करे जीने के लिये..’! खरं तर नको नको झालेलं हे आयुष्य भरभरून जगावंसं वाटतंय ते केवळ तुझ्या डोळ्यांतला अथांग जीवनरस बघून. काय नसतं डोळ्यांत? डोळ्यांतून जगण्याची प्रेरणा मिळते, डोळे हसवतात, रडवतात, जरब निर्माण करतात. डोळे अनुरागी, तर कधी कामुक. कधी वात्सल्यपूर्ण, तर कधी तुच्छ  लेखणारे.. ही ताकद आहे डोळ्यांची. आणि इथे तर ते डोळे विझू पाहणाऱ्या अस्तित्वाचा जणू दीप राग! ‘मजबूर’ या शब्दातली जगण्याची सक्ती आणि तरीही नुकतीच निर्माण झालेली आसक्ती एकाच वेळी व्यक्त होतात. संमिश्र भावना दाटून येण्याचा भाव व्यक्त करण्यासाठी मालगुंजी रागाचे सूर सुंदर कॅनव्हास देतात. प्रियेची स्तुती करताना उपमांची कमतरता भासत नाहीच. खरं तर कुंचला केवळ तुझ्याच प्रतिमा रेखाटतोय. ओठातून शब्द उमलतात ते तुझंच काव्यमय वर्णन करण्यासाठी. पण तरीही या रंगांमध्ये तुझी छटा उतरणं अशक्य; आणि कुठल्याही वृत्तात, छंदात तुझं सौंदर्यवर्णनसुद्धा कठीण.. हेच खरं. ‘‘किस तरहसे इतनी सुंदरता..’ ही ओळ खरं तर रिषभावर संपते. पण तिला पूर्णत्व देण्यासाठी तोच शब्द पुन्हा घेऊन षड्जावर येणं फार मोहक आहे. तिसऱ्या ओळीकडे लक्ष वेधण्यासाठी एका व्हायोलीनच्या फिलरनंतर ‘इक धडकन है तू दिल के लिये, इक जान है तू जीने के लिये..’ असं उत्कटतेनं आणि उमाळ्यानं म्हणताना धवतापासून ते वरच्या षड्जापर्यंतचा तो सुंदर आरोह आहे. ती भावना कशी तीव्र होत जाते बघा. ‘जीवन से भरी तेरी आँखे’ हे शब्द खालच्या स्वरांवर आहेत. ‘मजबूर करे जीने के लिये’ हे शब्द चढत जातात. त्यातला आवेगही वाढतो. उपमा देता देता ‘मधुबन की सुगंध, कमल की कोमलता, किरनों का तेज, हिरनों की चंचलता’ अशी प्रासयुक्त विशेषणांची मुक्त उधळण करताना अतिशय महत्त्वाच्या आणि खोल अर्थ असलेल्या पंक्तीवर आपण येतो. ‘आँचल का तेरे है इक तार बहुत, कोई चाक जिगर सीने के लिये..’ क्या बात है! म्हणजे आधी सौंदर्यपूजक वाटणारं हे गाणं एका अतिशय दुर्मीळ गुणावर येऊन थांबतं की! तुझ्या पदराचा एक धागा एखादं विदीर्ण काळीज पुन्हा सांधायला पुरेसा आहे. काय आणि किती सांगून गेली ही एक ओळ! हेच मर्म आहे. तुझं अस्तित्व माझ्यात असणं म्हणजे नेमकं काय? स्त्रीच्या अस्तित्वाचं प्रतीक ठरलेला पदर. त्या पदरात सगळ्या सुखदु:खांसहित, गुणदोषांसहित स्वीकारण्याची क्षमता आहे. म्हणूनच त्याचा प्रत्येक धागा हा उसवलेलं मन सांधणारा आहे. तुझी एक हलकीशी सोबतसुद्धा सुखाची झुळुक घेऊन येते. या एका गुणापुढे ते सगळे सौंदर्याचे मापदंड फिके पडतात.

नीला आणि अविनाशमधलं नातं घट्ट होत चाललंय. नदीकिनारी बसलेले असताना दोघे नावाडय़ाच्या गाण्यात हरवून जातात..

‘नदिया चले, चले रे धारा..’

दोन किनारे. दोन समांतर आयुष्यं. जीवनाचा प्रवाह कुणासाठीच थांबत नाही. तुम्ही त्यात स्वत:ची नाव सोडली नाहीत तर प्रवास सुरूच होणार नाही. हे गाणं खूप व्यापक अर्थ घेऊन येतं. अतिशय सुंदर कोरस, वल्हवताना येणारा पाण्याचा आवाज आणि मन्नादांचा मस्त लागलेला खुला स्वर अतिशय वेधक आहे. ‘जीवन कहीं भी ठहरता नहीं है, आँधी से तुफान से डरता नहीं है!’ तू आला नाहीस तर वाटा निघून जातील पुढे. तुझे डोळे तरसतील मग मंजिलसाठी. प्रवाहात राहणं म्हणजेच तरून जाणं. नाही तर ठिकठिकाणी भोवरे आहेतच- त्या आवर्तात खेचून घेणारे. काळाचा वेग इतका तुफान आहे की किनारेसुद्धा वाहून जातील, तिथे तुझ्या छोटय़ाशा होडीची काय कथा?

आपली आयुष्यं, त्यातले भावनिक संघर्ष यांना या काळाच्या विशाल पडद्यावर किती नगण्य अस्तिव आहे! ‘किनारा’ शब्दावर मन्नादांचा पंचम फार सुंदर लागतो. आणि त्याच वेळी त्याचा तोल सांभाळणारा कोरसचा मंद्र सप्तकातला पंचम अतिशय परिणाम साधून जातो.

हा प्रवास पुढे एका वेगळ्याच वळणावर जाणार आहे, कारण तिसरा प्रवासी या प्रवाहात त्याची नाव घेऊन उतरलाय. संघर्ष अटळ.. तीव्रही! ‘ज़िन्दगी का सफर’ आणि ‘हम थे जिनके सहारे’ ही नितांतसुंदर गाणी आपल्याला भेटणार आहेत तिथे!

(पूर्वार्ध)