गोष्ट आहे एका खोलगट उघडय़ा भांडय़ात ठेवलेल्या बेडकांची. भांडय़ाला झाकण नव्हते. साधे फडक्याचे आवरणसुद्धा नव्हते. बेडूक जातिवंत किमती आणि महत्प्रयासाने जमा केलेले.. पण असे असूनही एकही बेडूक भांडय़ाच्या बाहेर पडला नाही. एखादा तसा प्रयत्न करू लागला की, भांडय़ाच्या निसरडय़ा कडा-बाजूंवरून परत खाली घसरायचा आणि त्यातही एखाद्याने ‘जोर लगाके’, ‘हटके’ प्रयत्न केलाच तर भांडय़ातले बाकीचे त्याला खाली ओढायला सरसावायचे. भांडय़ातल्या विश्वात ते रमले होते.  भांडय़ाबाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्कच काय, साधी दृष्टीभेटही नव्हती. सुखी बेडकांच्या या समुदायातून एकाने मात्र हिंमत केली. आपल्या शेजाऱ्यांच्या जंजाळातून सुटका करून घेत साहेबरावांनी टुणकन् जी उडी मारली ती भांडय़ाच्या काठावर. आता त्यांना सभोवतालचे दृश्य, हिरवागार निसर्ग, पलीकडच्या खिडकीमागचा जलाशय, गवतावर बागडणारे छोटे किडे- हे सारे सारे दिसू लागले.  इतरांच्या दृष्टीने साहेबराव ‘शेफारले’, ‘विमान उडवू लागले’, ‘स्वत:ला फार समजू’ लागले होते. साहेबरावांना नवी समज आली होती, हे इतरांना उमजत नव्हते. भांडय़ाच्या काठावर साहेबराव एकटे पडले.  उच्चासनावर बसल्याचा आनंद झाला होता खरा, पण आपण एकटे आहोत ही खंत त्यांना खात होती.  शेवटी पर्याय दोनच होते, पुन्हा भांडय़ात उतरायचे किंवा भांडय़ाबाहेर पडून नव्या जगाचा आनंद लुटायचा. साहेबरावांनी एकटेपणाची शिक्षा स्वीकारून दुसरा पर्याय निवडला. भांडय़ातले बेडूक प्रयोगशाळेचे धनी झाले. साहेबराव आजही जलाशयाच्या काठी खडकावर ‘सन-बाथ’ घेताना दिसतात.
The closer you get to excellence in  your life, the more friends you will loose.  People love you when you are  average because it makes them comfortable.  But when you pursue greatness it  makes people uncomfortable. Be prepared to lose some people on  your journey
                     – Tony Gaskins
टोनी गॅसकिन्सच्या या छोटय़ाशा उताऱ्यात यशाचे रहस्य आणि आयुष्याचे कटू सत्य ठासून भरले आहे.  
तुमचे क्षेत्र कोणतेही असो – वैद्यक, शल्यक्रिया, बँकिंग, इंजिनीअिरग, मॅनेजमेंट – हा नियम सदासर्वदा, सर्वथव लागू होतो. जोपर्यंत तुम्ही गर्दीचा भाग असता, तोवर तुम्हाला स्वत:चा चेहरा नसतो, तुम्ही गर्दीत मिसळलेले असता. पण जेव्हा तुमच्या कष्टांना, गुणांना वाव मिळतो तेव्हा तुम्हाला तुमचा चेहरा मिळतो.  गर्दीत तुमची वेगळी ओळख निर्माण होऊ लागते. मध्यम स्तर तुम्हाला जाचू लागतो. आहोत तसेच ‘ठेविले अनंते’ राहण्यात तुम्हाला रुची नसते आणि मग या अजागळ, आडमुठय़ा सर्वसामान्य स्तरापासून तुम्ही वेगळे होऊ लागता. यश तुम्हाला खुणावू लागते, तुम्हाला सर्वोत्कृष्टतेचा ध्यास लागतो. वरचे पद, प्रतिष्ठा, पसा दोन्ही हात पसरून तुमच्या स्वागताला सिद्ध होतात. तुम्हाला गर्दीपासून वेगळी ओळख लाभते आणि नेमक्या याच वेळी आजवर ज्यांच्याबरोबर तुम्ही वावरलात, त्यांना तुमचा वावर खुपायला लागतो. तुम्ही इतरांसारखेच सर्वसामान्य असता तेव्हा तुमचा मित्र परिवार मोठा असतो. कारण तुमचे त्यांच्यातीलच एक असणे इतरांना सोयीचे, सुखाचे आणि सहन करण्याजोगे असते. ती सर्वाची मिळून तयार झालेली ‘कम्फर्ट लेव्हल’ ही त्या बेडकांच्या भांडय़ावरचे अदृश्य झाकण असते. जेव्हा तुम्ही त्या चाकोरीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागता; तेव्हा तुमचे हात-पाय मारणे इतरांना लाथा मारल्यासारखे वाटू लागते, आणि इथेच बिनसायला सुरुवात होते. तुमच्याशी खूप मनातले बोलणारे तुमचे स्नेही तुम्हाला टाळू लागतात, अबोला धरतात, तुमच्याबद्दल प्रवाद निर्माण होऊ लागतात, अफवांची पेरणी होते, टीकेची झोड उठू लागते, गप्पांची मफल रंगलेली असताना तुम्ही तेथे गेल्यावर मंडळी नि:शब्द होतात आणि आजवर फुलातला रंग, रूप, सुगंध साहणाऱ्या सहकाऱ्यांना अचानक काटय़ांची खुपरी जाणीव होऊ लागते. हे सत्य स्वीकारणे, अंगीकारणे आणि तरीही पुढची वाटचाल चालू ठेवणे खूप कठीण असते. आपण समजूत काढण्याचा निष्फळ प्रयत्न करतो, पण शेवटी दुखरी बोच आपल्या प्रगतीत आहे हे सत्य पटले, की भांडय़ातून बाहेर पडणाऱ्या साहेबरावांचाच मार्ग बरोबर होता हे लक्षात येते.
जग सामान्यांचे बनलेले असते. तेथे भाऊगर्दी असते, पण वरिष्ठ जागा, वरचे पद, अधिकार हे एखाद-दुसरेच असतात. त्या जागा खूप एकाकी असतात. तेथे फारसे विश्वासाचे मत्र नसते, जीवघेणी स्पर्धा असते. मिळणे सोपे, इतके टिकून राहणे कठीण असते; पण खरी इतिकर्तव्यता त्यातच तर असते.
.. एव्हरेस्टच्या मोहिमेत अनेकजण असतात, पण माथ्यावर पाय ठेवून झेंडा रोवण्याचे भाग्य एखाद्यालाच लाभते. आणि ते मिळवण्यासाठी त्या गिर्यारोहकाला इतरांचा मान ठेवूनही इतरांपासून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करावेच लागते.
तस्मात् साहेबराव व्हा!