29 May 2020

News Flash

अधुऱ्या स्वप्नांचा जादूगार

साहिरनं अनेक चित्रपटगीतं लिहिली. आजही आपल्यावरची त्यांची जादू जराही ओसरलेली नाही.

निरंजन पेडणेकर niranjan.pedanekar@gmail.com

‘वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन

उसे इक ख़ूबसूरत मोड़ दे कर छोडना अच्छा..’

साहिर लुधियानवीचे हे शब्द म्हणजे प्रेमात फसलेल्या अनेक प्रेमिकांचं अडीअडचणीचं जीवनसूत्र असावं.. ‘‘जी गोष्ट आपल्याला पूर्ण करता येणार नाहीए, तिला एका सुंदर वळणावर आणून सोडून देऊयात.’’ विभक्त होताना एका व्यक्तीनं दुसरीला पटविण्यासाठी या शब्दांचा सहारा किती वेळेला घेतला असेल, आणि मग त्या सुंदर वळणाची वाताहत- अर्थात फ्रेंड्-झोन- दुसऱ्या व्यक्तीनं किती वेळा सहन केली असेल! शब्दांची हीच मजा आहे. त्यांचा वापर आपण आपलं वैयक्तिक सत्य म्हणून करू शकतो; मग ते उदात्त असेल किंवा तोकडं. साहिर लुधियानवी अशी अनेक वैयक्तिक सत्यं उदात्तपणे जगला आणि आपल्यासारख्यांना तोकडेपणानं का होईना, जगायला ती सत्यं पुरवली.

‘साहिर’ या शब्दाचा अर्थ जादूगार. साहिरच्या कवितांमधून शब्द, नाद, लय यांतून अर्थ वाहण्याची त्याची प्रतिभा जादूसारखीच झळकते. एखादा रेशमाचा तागा खोलावा आणि तो झुळझुळत जमिनीवर पसरावा तसे त्याचे शब्द नाद आणि लयीच्या झुळझुळण्यातून आपल्या सर्वागी भिडतात. यालाच उर्दू कवितेच्या सौंदर्यशास्त्रात ‘रवानी’ म्हणतात. ‘रवानी’ म्हणजे वाहणं. साहिरची कविता सुरू झाली की वाहत सुटते असं वाटतं.

साहिरनं अनेक चित्रपटगीतं लिहिली. आजही आपल्यावरची त्यांची जादू जराही ओसरलेली नाही. पण ‘मं पल दो पल का शायर हूँ’ हे ‘कभी कभी’मधलं सर्वपरिचित गीत त्याच्या मूळ ऩज्मरूपात..

‘सागर से उभरी लहर हूँ मं, सागर में फिर खो जाऊँगा

मिट्टी की रूह का सपना हूँ, मिट्टी में फिर सो जाऊँगा’

अशी हृदयस्पर्शी ओळ पोटात सामावतं, हे आपल्याला कदाचित माहीत नसेल. चित्रपटगीतं सोडून साहिरनं अनेक ऩज्म (म्हणजे कविता) आणि अनेक गझला लिहिल्या. पण त्या पाहायला गेलं तर त्यातला सूर स्वप्नभंगाचाच आहे.. अपूर्णतेचा आहे. ‘सौ बार जनम लेंगे’ असं चित्रपटात लिहिणारा साहिर (अरे हो.. ८ मार्च रोजी साहिरची जन्मशताब्दी सुरू होतेय.) शायरीत मात्र ‘तंग आ चुके हैं कश्मकशे-ज़िंदगी से हम’.. ‘मी माझ्या आयुष्यातल्या संघर्षांला कंटाळलोय..’ असंच म्हणत राहिला.

स्वप्नं अधुरी राहण्यासाठी मुळात स्वप्नं बघावीही लागतात. साहिरनं अनेक स्वप्नं बघितली. प्रेमाची, मीलनाची, सुखाची, शांतीची, सौहार्दाची. पण या साऱ्या स्वप्नांना त्याच्या कवितांमध्ये हुरहुरीची, शंकेची, अधुरेपणाचीच झालर आहे.

‘मं ने चाँद और सितारों की तमन्ना की थी

मुझ को रातों की सियाही के सिवा कुछ न मिला’

या दोन ओळींतून त्याचं तारांकित स्वप्नरंजन आणि जगानं त्याला दिलेला रात्रीच्या काळोखासारखा प्रतिसाद एकाच प्रतिमेत कैद होतो.

‘मेरे ख़्वाबों के झरोकों को सजाने वाली

तेरे ख़्वाबों में कहीं मेरा गुज़र है कि नहीं

पूछ कर अपनी निगाहों से बता दे मुझ को

मेरी रातों के मुक़द्दर में सहर है कि नहीं’

‘..तू माझ्या स्वप्नांत तर येतेस, पण मी तुझ्या स्वप्नात येतो-जातो का?’

‘मता-ए-़गर’ या ऩज्ममध्ये स्वतच्या स्वप्नांबद्दलच्या अशा शंका त्याच्या शब्दांत सतत झाकोळतात.

‘कहीं ऐसा न हो पाँव मिरे थर्रा जाएँ

और तिरी मरमरीं बाँहों का सहारा न मिले

अश्क बहते रहें ख़ामोश सियह रातों में

और तिरे रेशमी आँचल का किनारा न मिले’

अशा काळवंडलेल्या शंकांचं पर्यवसान.. तिचं न मिळणं.. तो ‘हिरास’ (भीती) या ऩज्ममध्ये उलगडून दाखवतो.

‘इस लिए ऐ शरीफ़ इन्सानो

जंग टलती रहे तो बेहतर है

आप और हम सभी के आँगन में

शम्अ’ जलती रहे तो बेहतर है’

त्याच्या ‘ऐ शरीफ़ इन्सानों’ या ऩज्ममध्ये सामान्य माणसाला लागलेली शांतीची आणि प्रकाशाची ओढही फुलून येते.

साहिरच्या या स्वप्नभंगाची मुळं कदाचित त्याच्या अधुऱ्या प्रेमकहाण्यांमध्ये दडलेली असावीत. मिहदर कौर, इशर कौर आणि अमृता प्रीतम यांसारख्या प्रेमिका त्याच्या जीवनात आल्या खऱ्या; पण त्याच्या प्रीतीचं स्वप्न त्या पूर्ण करू शकल्या नाहीत. सहा फूट उंची असलेल्या साहिरला त्याच्या दिसण्याबद्दलही थोडासा न्यूनगंडच होता. त्याच्यावर साम्यवादी विचारांचा पगडा असल्यामुळे त्याला जगात होणाऱ्या अत्याचारांची आणि त्यासमोर वैयक्तिक प्रेमाच्या फोलपणाचीही जाणीव होतीच. त्यातून सामाजिक विषमतेपुढे स्वप्नाचा भंग होतोच अशीही त्याच्या कविमनाची समजूत असावी. आणि अशा स्वप्नभंगाचा त्रास कदाचित त्या प्रेमिकांना होतच नाही की काय असाही त्याचा (गैर)समज असावा. म्हणूनच..

‘तिरी तडप से न तडपा था मेरा दिल लेकिन

तिरे सुकून से बेचन हो गया हूँ मं’

अर्थात, तुझी तगमग झाली होती तेव्हा मला काही वाटलं नाही; पण आता तू शांत आहेस त्यानं मात्र मी बेचन झालो आहे.. अशा ओळींमधून त्या अधुरेपणाची धुरा साहिर एकटाच वाहत बसतो की काय असं वाटायला लागतं. काहींच्या मते, त्याचं आईवर असलेलं निस्सीम प्रेम हेही त्याच्या कुणाबरोबर प्रेमात दृढ व्हायच्या विरोधात गेलं असावं.

साहिरच्या एका मित्रानं- हाफ़िज़ लुधियानवीनं मात्र त्याच्या आठवणींत काही वेगळंच सांगितलं आहे. तो म्हणतो : ‘साहिर कुठल्याच गुंत्यात अडकून बसला नाही. त्याच्या ऊर्मी या त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या शोकांतिकांच्या वेळीच जोरानं उफाळून आल्या.. त्यांच्या कविता झाल्या. आणि जणू त्याला वाटलं, त्याचं काम झालं. त्याच्या साऱ्या कविता या अशा प्रेमभंगांतून आणि हलवून सोडणाऱ्या घटनांमधूनच निर्माण झाल्या आहेत.’’ म्हणजे कदाचित साहिरची ही अधुरी स्वप्नं ही एखाद्या म्युझियमसारखीच आहेत. त्यांच्या झालेल्या कविता आपण या अपूर्णतेच्या दालनात अवाक् होऊन पाहत राहतो. तोच त्याच्या एका कवितेत म्हणतो :

‘दुनिया ने तजुर्बात-ओ-हवादिस की शक्ल में

जो कुछ मुझे दिया है वो लौटा रहा हूँ मं’

जगानं मला अनुभव आणि संकटांच्या रूपात जे काही दिलंय, तेच मी परत करतो आहे.. साहिरच्या कविता हे जगानं दिलेल्या जखमांचं जणू म्युझियम आहे.

याचा अर्थ साहिरच्या कवितांमध्ये आशा नाहीतच का? अर्थातच आहेत. पण त्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नसून समाजाबद्दलच्या आहेत हे त्याच्या कवितांतून जाणवतं. त्याच्या ‘वो सुब्ह कभी तो आएगी’ या ऩज्ममध्ये तो अशाच समाजाचं चित्र रेखाटतो..

‘संसार के सारे मेहनत-कश खेतों से मिलों से निकलेंगे

बे-घर बे-दर बे-बस इन्साँ तारीक बिलों से निकलेंगे

दुनिया अमन और ख़ुश-हाली के फूलों से सजाई जाएगी

वो सुब्ह हमीं से आएगी’

आज भांडवलशाहीनं आपल्यावर चांगलाच कब्जा केला आहे. आणि कदाचित त्या काळातल्या साहिरच्या आशा आज अनेकांना वेडय़ा वाटू शकतात. जे बेघर आणि असहाय आहेत ते आपल्या अंधाऱ्या बिळांमधून बाहेर येत आहेत, ही प्रतिमा कदाचित आजमितीला त्यांना घडी बिघडवणारी वाटू शकते. कदाचित आजची आपल्यासमोरची दुनिया शांतीच्या, प्रेमाच्या, सौहार्दाच्या फुलांनी सजायला तयारच नसावी.

८ मार्च १९२१ रोजी साहिरचा लुधियाना गावात जन्म झाला. खरंच झाला. तरी कवी नरेश कुमार शाद यांनी एका मुलाखतीत त्याला प्रश्न विचारला, ‘‘तुझा जन्म कुठे झाला?’’ यावर साहिरचं उत्तर- ‘‘मित्रा, हा नेहमीचाच प्रश्न झाला ना? त्यापेक्षा विचार- तुझा जन्म का झाला?’’ काव्यप्रतिभेचे अनेक शक्तिशाली मंत्र अवगत असलेल्या या जादूगाराचा जन्म कदाचित अधुऱ्या स्वप्नांना जागं ठेवण्यासाठीच झाला असावा. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर.. उद्याकरता एखादं स्वप्न रचू यात. नाहीतर या कठोर वर्तमानातली ही रात्र हृदयाला अशी काही डसेल, की आयुष्यभर त्याला एकही सुंदर स्वप्न रचता येणार नाही.

‘आओ कि कोई ख़्वाब बुनें कल के वास्ते

वर्ना ये रात आज के संगीन दौर की

डस लेगी जान ओ दिल को कुछ ऐसे कि जान ओ दिल

ता-उम्र फिर न कोई हसीं ख़्वाब बुन सकें..’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2020 1:22 am

Web Title: sahir ludhianvi sad songs on love the untold love story of poet sahir ludhianvi
Next Stories
1 हास्य आणि भाष्य : व्यंगचित्रकार श्रीमती..
2 इतिहासाचे चष्मे : अनुभूतीचे धागे
3 खेळ मांडला.. : क्रिकेटमधील ‘किवी शाईन’
Just Now!
X