रोजीरोटीची हमी देणारी माझी टेलिव्हिजनची नोकरी मी सोडली आणि दिल्लीला रामराम ठोकून मुंबईला मुक्काम हलविला. मुंबई ही भारतामधली चित्रपटसृष्टीची राजधानी आणि नाटकाचे माहेरघर. तेव्हा व्यावसायिक कलाक्षेत्रात उतरायचे ठरविले, तर मुंबापुरीला धाव घेण्याखेरीज गत्यंतर नव्हते. शिवाय आई आणि आप्पा (शकुंतला परांजपे आणि तिचे वडील रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे) दोघे पुण्याला, म्हणजे अधिक जवळ असणार होते.
नोकरी सोडलेली, अरुणची आणि माझी नुकतीच फारकत झालेली आणि पदरी दोन छोटी मुलं- अशा परिस्थितीत आयुष्यामधल्या एका नव्या पर्वाची सुरुवात करायची, एका अनोख्या शहरात ‘स्ट्रगलर’ म्हणून दाखल व्हायचं, हे फारसं सुज्ञपणाचं लक्षण नव्हतं. पण आयुष्यात माझ्यावर कुणी सुज्ञपणाचा फारसा आरोप केलेला नाही. उत्तम मानाची नोकरी-तीसुद्धा सरकारी- सोडली, म्हणून लोकांनी मला मूर्खात काढले. ‘तुला हे धाडस तरी कसं झालं?’ असं सगळे विचारीत. मग ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस!’ असं काहीसं ‘बाणेदार’ उत्तर देऊन, मी चुकचुकणाऱ्या हितचिंतकांना गप्प करीत असे.
आता कुठलीच मर्यादा नव्हती. कसलेच बंधन नव्हते. माझी सगळी आवडती माध्यमं समोर उभी ठाकली होती. नाटक, लघुपट, बालचित्रपट, चित्रपट आणि टेलिव्हिजन या सगळ्याच माध्यमांमध्ये काम केल्यामुळे समर्थ अनुभव गाठीशी होता. सगळीकडे मुक्त प्रवेश होता ही केवढी भाग्याची गोष्ट! पण ‘कुठलं माध्यम तुम्हाला अधिक भावतं?’ हा प्रश्न माझा सतत पाठपुरावा करतो. मुलाखत घेणारा प्रत्येक वार्ताहर हटकून हा सवाल करतोच. काय उत्तर देणार! त्या दिवशी जसा कल असेल तसं मी उत्तर देते. प्रत्येक क्षणाला जिवंतपणाचा साक्षात्कार घडवणारे नाटक, दर शॉटगणिक पकड घट्ट करीत जाणारा, नानाविध कलाविष्कारांच्या संगमाने समृद्ध होणारा चित्रपट, घराघरांत शिरून प्रत्येक कुटुंबाचा घटक बनलेला तत्कालीन निकडीचा टेलिव्हिजन, ही सगळीच माध्यमे थोर आहेत. डावे- उजवे कसे ठरवायचे?
मी आलटून पालटून कलाविष्काराच्या या सगळ्याच अनुभवांना सामोरी गेले. प्रत्येक माध्यमाची यंत्रणा वेगळी आणि तरीही मुळाशी तीच कलात्मक जाणीव. प्रत्येक नवा संकल्प आपले स्वत:चे असे वेगळेच आव्हान घेऊन येई. ते आव्हान झेलताना, रोज नव्याने परीक्षेला बसल्याचा प्रत्यय येत असे. रोमारोमांतून एक उत्साह सळसळत असे. खरंच फार बहारीचा काळ होता तो. उदंड आत्मविश्वास होता आणि हातातल्या लेखणीची सतत साथ होती. तिने कधी दगा दिला नाही. कधी कंटाळा केला नाही. (चुकले! अगदी अलीकडेच ‘सय’ लिहिताना नाटय़क्षेत्रामधल्या माझ्या कामगिरीचे कथन संपल्यावर, एखाद्या अडेलतट्टूप्रमाणे ती मध्येच थांबली. ‘थोडा विसावा घेऊ’ म्हणाली. मीही जास्त रेटलं नाही. पण हा झाला अपवाद.)
या लेखमालेच्या सुरुवातीलाच मी नमूद केल्याप्रमाणे, माझे काळ, काम, वेगाचे गणित अतिशय कच्चे आहे. घटना घडामोडींबद्दलची स्मरणशक्ती अगदी कमजोर आहे. तेव्हा ‘आधी हे नाटक, मग तो चित्रपट, नंतर दूरदर्शनसाठी केलेली ती मालिका’ असे तपशीलवार मला सांगता येणार नाही. म्हणून माझ्या कला-कामगिरीचा वृत्तान्त हा कालपरत्वे न सांगता माध्यमाच्या जातकुळीच्या अनुषंगाने सांगणे मला अधिक सोयीचे वाटते. खेरीज, काय केले याला महत्त्व आहे. कोणत्या वारी किंवा तारखेला केले हा मुद्दा गौण आहे, असं मला वाटतं. तर आता टेलिव्हिजन मालिकांकडे वळते.
दूरदर्शनद्वारा एक टेलिसीरिअल करण्यासाठी मला विचारणा करण्यात आली. इतके वर्षे तिथे नोकरी केल्यामुळे तिथले सगळे छोटे-मोठे अधिकारी साहजिकच ओळखीचे होते. माझं काम सगळ्यांना ठाऊक होतं. याचा फायदा होत असे (क्वचित तोटाही!). खरं तर प्रत्यक्ष दूरदर्शनमध्ये असताना, मी या नाटय़ मालिकेच्या फंदात पडले नव्हते. रोजचा उपसा पुरे करताना नाकी नऊ यायचे, तेव्हा हे ‘पुढे चालू’वाले लचांड गळ्यात घेण्याचा प्रश्नच नव्हता. पण आता मोठय़ा उत्साहाने मी हा नवा प्रकार हाती घेतला. कोणत्याही दर्जेदार नाटक, चित्रपट वा टेलिफिल्मला लागणारे घटक सीरिअललाही आवश्यक होते- समर्थ कथा, नाटय़पूर्ण प्रसंग, वेधक व्यक्तिचित्रे, उत्कंठा वाढवीत ठेवणारी हाताळणी इ. खुसखुशीत विनोद, तडाकेबाज संवाद, प्रेमाची नाजूक गुंतागुंत हा मसालाही आवर्जून हवा. फक्त तंत्र थोडे वेगळे. टप्याटप्याने कथानक उकलत न्यायचे. दर वेळी कोणत्यातरी उत्कंठापूर्ण घटनेपाशी येऊन थांबायचे. यात अवघड काहीच नव्हते. पुष्कळ वेळा ‘पुढे’ काय होणार, हे मलाच ठाऊक नसायचे. (हा गौप्यस्फोट आता करायला हरकत नाही.)
मालिकेसाठी मी एक ढोबळ कहाणी लिहिली. नाव दिले ‘अडोस पडोस’. मथळा सूचित करतो, त्याप्रमाणे कथेमध्ये शेजारी होतेच. नमुनेदार इरसाल शेजारी. या परिसरात मनमोकळं वातावरण होतं. घराघरांतून मुक्त आवक-जावक होती. कुणीही, कुणाकडेही, केव्हाही डोकवावं. दारं उघडी असत. मदतीला धावून जावं किंवा प्रसंगी नको ती लुडबुड करावी. माझ्या मनात ठसलेला प्रसन्न चेहरा ‘अडोस पडोस’मध्ये रेखाटण्याचा मी प्रयत्न केला. कहाणी आता तपशीलवार आठवत नाही, पण ढोबळमानाने ती अशी होती. एका टुमदार अपार्टमेंट बिल्डिंगमधल्या एका शानदार फ्लॅटमध्ये एक तरुण बाप आपल्या आठ वर्षांच्या चुणचुणीत मुलाबरोबर राहतो. छोटय़ा रॉबिनची देखभाल करण्याचा जिम्मा संपूर्णपणे त्याच्या खांद्यावर असतो, कारण रॉबिनची आई अनेक वर्षे उपचारासाठी मनोरुग्णांच्या एका दवाखान्यात दाखल आहे. घरात रॉबिनचे आजोबापण आहेत, नातवावर उदंड प्रेमाचा वर्षांव करणारे. रॉबिनला शिकवायला एक छानशी शिक्षिका येऊ लागते. तिच्या येण्याने त्यांच्या स्त्रीविरहित रूक्ष जीवनक्रमामध्ये थोडा बदल घडून येतो. ओलावा जाणवू लागतो.
घरामध्ये रॉबिनचे खूपसे मुके मित्र असतात. कासव, ससा, पांढरे उंदीर आणि अर्थातच एक छानसा कुत्रा. ‘अडोस पडोस’चे चित्रविचित्र शेजारी आलटून पालटून आपल्या विभिन्न लीलांनी, दर नव्या ‘कडी’ला एक वेगळाच रंग भरत. त्यांची उपकथानके सशक्त होती आणि हे ‘पडोसी’ पेश करणारे सगळेच कलाकार मोठय़ा ताकदीचे नट होते.
माझ्या कोणत्याही कलाकृतीसाठी मी नेहमीच अतिशय चोखंदळपणे पात्रयोजना करते. भूमिकेत फिट्ट बसणाऱ्या नटाची निवड केली, की अर्धी लढाई तिथेच सर होते, असा माझा विश्वास आहे. माझ्या निर्मितीकडे मागे वळून पाहिलं, तर ‘स्पर्श’मध्ये नसीरुद्दिन शहा, ‘साज’मध्ये शबाना, ‘पंजे’ (हिंदी जास्वंदी) मध्ये सुषमा सेठ, ‘माझा खेळ मांडू दे’मध्ये सुधा करमरकर, ‘सख्खे शेजारी’मध्ये अरुण जोगळेकर या मंडळींच्या जागी दुसऱ्या कुणाची कल्पना करवत नाही.
‘अडोस पडोस’साठी उत्कृष्ट कलाकारांचा संच जमला. प्रमुख भूमिका अमोल पालेकरकडे सोपवली. अमोलचे हसरे, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि बोलण्या-चालण्यातला स्वाभाविक डौल आणि मोकळेपणा त्या व्यक्तिरेखेला साजेल असा होता. त्याच्या मुलाचे-रॉबीनचे काम मृणाल जव्हेरीने केले. टीना मुनीमचा (आताची सौ. अनिल अंबानी) तो भाचा. मृणाल अतिशय हुशार होता, पण एक मोठी अडचण होती. रॉबिनला जनावरांचे विलक्षण वेड, तर हा पठ्ठय़ा एकजात सगळ्या प्राण्यांना विलक्षण घाबरत असे. रॉबिन आपल्या लाडक्या कुत्र्याबरोबर कुस्ती खेळतो, सशाला लेटय़ूसचा पाला खिलवतो, अंगाखांद्यावरून पांढरे उंदीर खेळवतो असे नाना प्रसंग या मालिकेत होते. मग मृणालने मनाचा हिय्या केला आणि हळूहळू त्याची भीती चेपली. मालिका संपेपर्यंत तर त्याची आपल्या पशू सहकलाकारांबरोबर चांगली दोस्ती जमली होती. आजोबांच्या भूमिकेसाठी हरीन्द्रनाथ चटोपाध्याय दाखल झाले. हा मोठाच मानाचा तुरा होता. सरोजिनी नायडूंचे हे धाकटे बंधू स्वत: उत्तम कवी होते. विशेषत: लहान मुलांच्या त्यांच्या कविता अप्रतिम होत्या. मी आकाशवाणी पुणेच्या ‘बालोद्यान’मध्ये ताई असताना, ते एकदा कार्यक्रमात आले होते. आपली ‘रेलगाडी’ ही कविता त्यांनी अशी काही जोशात म्हटली की त्या सुसाट गाडीत बसल्याचा साक्षात्कार आम्हाला त्या वातानुकूलित बंदिस्त स्टुडिओमध्येही झाला.
हरीन्द्रनाथ हरहुन्नरी होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. थोर साहित्यकार, विद्वान, वक्ते आणि नट अशी त्यांची अनेक रूपे होती. पुढे दिल्लीला दूरदर्शनमध्ये असताना मी त्यांना अधूनमधून कार्यक्रमासाठी पाचारण करीत असे. आमची छान दोस्ती होती. त्यांनी माझा एक उच्चार सुधारल्याचं चांगलं स्मरणात आहे. Oven  या शब्दाचा मी चुकीचा उच्चार केला. तत्क्षणी हरीनदा म्हणाले, ‘नॉट ‘ऑव्हन’ माय डार्लिग, ‘अव्हन!’ गंमत म्हणजे पुण्याच्या घरातले, पुरुषोत्तमामधले जुने अल्बम उपसताना मला एक पुराणा फोटो सापडला. केंब्रिजचे तरुण पदवीधर ओळीने बसलेले. पहिल्या रांगेत माझी आई, मागच्या ओळीत हरीन्द्रनाथ चटोपाध्याय! ‘अडोस पडोस’मध्ये काम करायला ते आनंदाने तयार झाले. पण दोन अडचणी होत्या. हिंदी भाषेचा सराव नाही आणि प्रचंड विस्मरण. दोन ओळींचा कधी कधी तर एका ओळीचासुद्धा संवाद असला की दादा हटकून अडखळत. मग स्वत:च ‘कट’ म्हणून ओरडत. मग रागावत. स्वत:वर, माझ्यावर, सहकलाकारांवर, कॅमेरामॅनवर, कुणावरही. पुन्हा टेक होई. पाच-सहा प्रयत्नांनंतर जो ‘ओ. के.’ टेक होई, तो मात्र लाजबाब असे. त्यांचा चेहरा विलक्षण बोलका होता. सगळ्यांचे ते लाडके होते.
या मालिकेनिमित्ताने एक मजेदार अनुभव आला. एफटीआयआयमधून डिप्लोमा घेऊन बाहेर पडलेला एक हुशार तरुण आमच्या बिल्डिंगमध्ये राहायला आला. त्याने नुकतेच लग्न केले होते आणि बायकोच्या वडिलांचा दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट होता, तिथे हे नवविवाहित जोडपे दाखल झाले. एक हुशार आणि ताकदीचा नट म्हणून या मुलाची ख्याती मी ऐकली होती. तो मल्याळी होता, बायको गुजराथी. एव्हाना ‘स्पर्श’, ‘चश्मेबद्दूर’ आणि माझी मराठी नाटकं यामुळे माझं नाव थोडंफार माहीत झालं होतं. साहजिकच हा होतकरू सितारा ‘ब्रेक’ मिळवण्याच्या खटपटीत होता. तो मला वरचेवर भेटून काम देण्यासाठी आर्जवं करू लागला. मी तेव्हा मराठी नाटय़प्रपंचात गुंतले असल्यामुळे, त्याच्याजोगती भूमिका सध्या नसल्याची दिलगिरी व्यक्त करून त्याला वाटेला लावत असे. पण एकाच बिल्डिंगमध्ये राहत असल्यामुळेतो वरचेवर मला गाठून तगादा चालू ठेवी. बराच काळ लोटला. त्याच्या नम्र विनवण्या चालूच होत्या. मग एक वेळ अशी आली, की मी त्याला टाळू लागले. माझ्या हेरांनी टेहळणी करून ‘धोका नाही’ असा इशारा दिल्यावरच मी घराबाहेर पडू लागले. मात्र योग्य संधी येताच त्याला चांगला रोल द्यायचा असा मी मनात निर्धार केला होता आणि मग ‘अडोस पडोस’च्या रूपाने ही संधी आली. या इसमासाठी मी मुद्दाम एक भूमिका लिहिली. लंडनला नाटय़शिक्षण घ्यायचे स्वप्न पाहणाऱ्या एका नाटकवेडय़ा कलाकाराची. त्याला आणि त्याच्या बायकोला घरी बोलवून ही अभूतपूर्व बातमी दिली. साहजिकच आनंदी आनंद वर्तला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. सिरिअलमधली आपली भूमिका पक्की झाल्याची खात्री पटल्यावर त्याचा एकूण नूरच पालटला. त्याला मी उत्साहाने पहिल्या दिवशीच्या शूटिंगबद्दल सांगायला गेले, तेव्हा तो उर्मटपणाने म्हणाला, ‘‘आपला व्यवहार काहीच ठरला नाही. करारपत्रावर सह्या झाल्या नाहीत. you are taking me for granted.’’ गोष्ट खरी होती. घाई गडबडीत हा उपचार राहून गेला होता. पण हा ‘घरचा’ नाही तरी ‘शेजारचा’ म्हणून मी थोडा शिथिलपणा केला होता खरा. तत्काळ मी त्याला रीतसर करारपत्र धाडले आणि एका एपिसोडचा मेहनताना आगाऊच धाडला. दुसऱ्या दिवशी फिल्मिस्तानमध्ये मुहूर्त झाला. दणक्यात चित्रण सुरू झाले. अमोल, दादा, रामेश्वरी, अरुण, उषा, अनंत, नीना आणि तमाम बाल चमू सगळेच आनंद सोहळ्यात सामील झाले होते. अरेरावी करणारा हा एकटा ‘स्टार’ होता. दोन-तीन दिवसांनी तो घरी आला. ‘पुढचं शेडय़ूल मला मिळालं नाही.’ त्यानं तक्रार केली. ‘आता शूटिंग कधी आहे?’
‘आता कशाचं शूटिंग?’ मी म्हटलं ‘तुझ्या पात्राला लंडनला ‘राडा’ (Royal Academy of Dramatic Art)ची शिष्यवृत्ती मिळाली आणि त्याला तत्काळ जावं लागलं. तेव्हा ‘अडोस पडोस’मधली तुझी भूमिका संपली. थँक्यू!’ लेखणीची ताकद त्या दिवशी मला खरी कळली. नंतर त्याची बायको घरी येऊन रडली. ‘हा नेहमी असंच करतो,’ म्हणाली. पण आता इलाज नव्हता. इतक्या दूर लंडनला गेलेल्याला परत कसं बोलावणार?
अनंत महादेवन आणि नीना कुलकर्णी यांनी चिंतामणी आणि चंपाकळी यांची गृहस्थी अतिशय वेल्हाळपणे सादर केली. हे जोडपं प्रचंड लोकप्रिय झालं. आपल्या सुंदर पण तिखट बायकोच्या मुठीत असलेला भाबडा चिंतामणी हा खास करून नवरे लोकांची सहानुभूती मिळवून गेला. एकदा अनंतने गंमत म्हणून हरीनदादांशी नीनाची ओळख ‘ही माझी बायको’ म्हणून करून दिली. पुढे काही दिवसांनी दिलीप कुलकर्णी आमच्या सेटवर आला. नीनाने त्याची ओळख ‘माझा नवरा’ म्हणून केल्यावर हरीनदा म्हणाले, ‘माझं काही चुकत असेल तर ठीक आहे. पण तुझं काही चुकत असेल ना, तर गंभीर गोष्ट आहे.’
चंपाकळीचा भाऊ भूतनाथ, हे आणखी एक भन्नाट पात्र. तो भुरटा चोर आणि तरबेज खिसेकापू असतो. रस्त्यांत बायकांच्या अंगावर रबरी पाल फेकून, तो त्यांची पर्स लंपास करतो. हा माझा कल्पनाविलास नसून, अशा एका चोरटय़ाची बातमी मी कधीतरी, कुठेतरी वाचली होती. भूतनाथचे काम अरुण होर्णेकरने केले. बेमालूम, अजून त्याला भूतनाथ म्हणून ओळखणारे चाहते भेटतात.
‘अडोस पडोस’मधली आणखी एक कहर कंपनी म्हणजे मामा परिवार. मामा, मामी आणि त्यांची सहा-सात मुलं ‘मामे की पलटन’. अरुण जोगळेकर, उषा नाडकर्णी आणि परिश्रमपूर्वक निवडलेले बाल रंगरूट या पलटणीत होते. इतक्या सगळ्या मुलांची खरी नावं आठवत बसण्यापेक्षा, सोपी युक्ती म्हणून मामा मामी ‘अ-ब-क-ड’ पासून ते ‘फ’ पर्यंत त्यांचे नामकरण करतात. ‘फ’ म्हणजे फुल स्टॉप! पण तरीही नंतर एक अपत्य होते. मग त्या मुलीचं नाव ठेवतात ‘ग’. ग म्हणजे गलती. गच्या कामासाठी उषा नाडकर्णीने आपली छोटी भाची आणली. कडेवरची ही छोकरी मावशीपेक्षाही सरस अभिनयपटू आणि वस्ताद होती. पलटणीमधली सगळीच बाराखडी लोभस होती. सगळ्यात थोरली ‘अ’ -कश्मिरा पटेल (आता वझिफदार) सध्या मुलांसाठी अभिनय आणि वक्तृत्व याचा वर्ग घेते. त्याचा खूप बोलबाला आहे. अगदी अलीकडे मला ‘फ’ची अमेरिकेहून अचानक ईमेल आली. तो ‘सय’ नियमित वाचतो- इंटरनेटवर. लग्न करून तो तिकडेच स्थायिक झाला आहे. त्यानं विचारलं ‘फ’आठवतो का? अरे, मोठाल्या टपोऱ्या डोळ्यांचा, गुबगुबीत गालाचा छोटा ‘फ’ मी कसा विसरेन? त्याच्या मेलचा मला मनापासून आनंद झाला. मान, सन्मान, पारितोषिकांपेक्षा हे असे उत्स्फू र्त अनुभव कितीतरी अधिक मोलाचे वाटतात. केलेल्या कामगिरीची ही खरीखुरी पावती म्हणता येईल.
मामाच्या घरामधला एक प्रवेश आठवतो. काटकसर म्हणून मामा अवघ्या कुटुंबासाठी नेहमी कापडाचा एक अख्खा ठाणच्या ठाण विकत घेतात. मग सगळे जण एकाच गणवेषात! मामींचे पोलके, बाळाचे झबले, मुलींचे स्कर्ट, मुलांचे बुशशर्ट- सगळे एकजात तशाच फुलाफुलांच्या नक्षीचे. संध्याकाळी माजघरात सगळे आपापल्या उद्योगात गर्क आहेत. मामा ऑफिसातून थकून-भागून येतात. ‘चहा कर’ असे मामींना फर्मान सोडतात आणि हाशहूश करीत आपली पँट उतरवतात. त्यांची आतली अर्धी विजार तशी फुलाफुलांच्या नक्षीची असते.
‘अडोस पडोस’मध्ये इतरही अनेक गुणी कलाकार होते. इंग्रजी थिएटर करणारी मेहर जहांगीर, लिंडा या अँग्लो इंडियन मुलीचं काम करी. तिचा पेइंग गेस्ट होता हिंदी नाटय़सृष्टीमधला नरेश सुरी, शिवाय गुजराती सुप्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवे होती. सतीश पुळेकर होता. या सगळ्यांनी मुंबईच्या कॉस्मॉपॉलिटन समाजाचे झकास दर्शन घडवले. रीमा लागूने एकाच एपिसोडमध्ये काम केले, पण त्या तेवढय़ा अवधीत वीज लखलखून जावी तद्वत टी.व्ही.चा छोटा स्क्रीन ती उजळून गेली. रॉबिनच्या मनोरुग्ण आईची ती भूमिका होती. हा एपिसोड खूप गाजला. दुर्दैवाने या मालिकेचा आज काहीही अवशेष उरला नाही. स्क्रिप्टचादेखील कपटा उपलब्ध नाही. पुढे किती वहिन्यांनी या मालिकेसाठी विचारणा केली, पण हाताशी काहीच उरलं नव्हतं.
टेली मालिकांचा तो अगदी सुरुवातीचा काळ होता. इतर कोणत्याच वाहिन्या नव्हत्या. ‘दूरदर्शन एके दूरदर्शन’ ध्वनिचित्र लहरींवर विराजमान होतं. तेव्हा एकमात्र ‘हमलोग’ ही मालिका गाजत होती. ‘अडोस पडोस’ अगदी प्रारंभीच्या काळात दाखल झाली. सीरिअल हा प्रकार मी आधी हाताळला नव्हता. दूरदर्शनमध्ये असताना हाती असलेले कार्यक्रम पार करताना एवढी धांदल उडे, की आणखी विकत श्राद्ध कोण घेणार? कारण सीरिअलचं गणित नाटक-सिनेमापेक्षा फार वेगळं होतं. ते चालू असेपर्यंत अळंटळं करायला वाव नसे. मारुतीच्या शेपटीप्रमाणे प्रकरण लांबतच जाई. भुभुक्षू टेलीराक्षस सदा ‘आ’ वासून भेडसावत राही. त्याला कितीही गिळायला घातले, तरी त्याचे तोंड वासलेलेच! आजकालच्या काही मालिकांमधून पुन:पुन्हा तेच ते अनावश्यक क्लोझअप्स दाखवण्याचा जो केविलवाणा वेळभरू प्रकार चालतो, तो याच अडचणी पायी उद्भवला असावा!
सीरिअल्सच्या सुरुवातीच्या काळात, एकूण लो बजेट  फिल्मच्या धर्तीने काम चालत असे. व्यावसायिक  दृष्टिकोन नसायचा. आपल्या घरचे कार्य असल्याच्या उत्साहाने सगळे नट आणि कर्मचारी स्वत:ला अभियानात झोकून देत. कपडेपट हा प्रकार नव्हताच. नट मंडळी सहसा आपापले कपडे जमवून आणीत. सुरुवातीला अमोलने आवर्जून आपले निवडक शर्ट, कोट, बूट आणले. पण तीनचार भाग प्रदर्शित झाल्यावर तो हळूच मला म्हणाला, ‘सई, स्वत:चे कपडे आणायला माझी हरकत नाही, पण प्रत्यक्षात उलटाच प्रकार घडतो आहे. इथे वापरलेला शर्ट मी इतरत्र कुठे वापरला, तर दोस्त मंडळींच्यात टिंगल होते- ‘वा पालेकर! शूटिंगचे कपडे लंपास केले काय? मजा आहे!’ मला अमोलची व्यथा पटली. ताबडतोब ‘अडोस पडोस’चा कपडे विभाग निर्माण झाला. त्याची जबाबदारी राणी पाटीलकडे सोपवण्यात आली.
आमचं चित्रण फिल्मिस्तानमध्ये होत असे. अमोलच्या घराचा सेट लागला होता. सामानाची थोडी फिरवाफिरव केली आणि चारपाच ठळक वस्तू बदलल्या की चिंतामणीचे किंवा मामाचं घर तयार होत असे. छायांकन वीरेन्द्र सैनीने केले. माझ्या ‘स्पर्श’, ‘चश्मेबद्दूर’ आणि ‘कथा’चे चित्रण त्यानेच केले होते. आमचा दिल्लीचा मित्र आणि सहकारी सुदेश स्याल मुद्दाम या प्रस्तुतीचा भार संभाळण्यासाठी दिल्लीहून आला. माझ्या दिल्लीमधल्या सगळ्या नाटकांमध्ये त्याचा मोलाचा सहभाग होता. निर्मितीच्या सगळ्या कटकटी सुदेशने समर्थपणे सांभाळल्या. माझ्यावर केवळ कलात्मक कामगिरीची जबाबदारी काय ती उरली.
पाहता पाहता ‘अडोस पडोस’ची खूप हवा झाली. आम्ही मुद्दाम एक छानशी ‘शीर्षक फिल्म’ बनवून घेतली होती. खिडक्यांच्या दोन रांगा. तावदानांची उघडझाप होते आणि वेगवेगळे शेजारी बाहेर डोकावतात आणि मग शीर्षकाची अक्षरे उमटतात, अशी ही अ‍ॅनिमेशन फिल्म होती. तिचे संगीत ऐकले की घरोघर पोरे त्या तालावर बागडू लागत. हे शेजारी आता फक्त महाराष्ट्राचे राहिले नाहीत. त्यांच्या शेजारधर्माचे लोण भारतामध्ये दूरदूपर्यंत पोचले. माझ्या लहानपणी ‘माय इंडिया’ हे मिनू मसानी यांचे पुस्तक मला आप्पांनी दिले होते. ते मला अतिशय प्रिय होते. त्याची पानं खिळखिळी होईपर्यंत मी पारायणं केल्याचं आठवतं. पुढे मुंबईला आल्यावर खुद्द मिनू मसानी यांची माझी ओळख झाली. त्यांच्या सेक्रेटरीनं मला सांगितलं की मसानी ‘अडोस पडोस’चे प्रचंड चाहते आहेत. मंगळवारी ते बाहेर जाण्याचं कुठलंच आमंत्रण स्वीकारीत नाहीत, कारण त्या रात्री ही मालिका प्रसारित होते. ही आणखी एक मोलाची पावती..    

employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
maharashtrachi hasya jatra fame gaurav more went to cheer mumbai indians
मुंबई इंडियन्सच्या मॅचला पोहोचला हास्यजत्रा फेम गौरव मोरे! फिल्टरपाड्याच्या बच्चनला पाहून नेटकरी म्हणाले, “दादा आज…”
Arvind Kejriwal
CM Arvind Kejriwal Arrest : दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण, कोर्टाने निकाल ठेवला राखून
AAP morcha kolhapur
केजरीवालांच्या अटकेविरोधात ‘आप’चा कोल्हापुरात भाजप कार्यालयावर मोर्चा; पोलिसांशी झटापट