सिंहस्थास येणारे साधू-महंत इतर वेळी काय करतात, हे कुतूहल शमवणारा लेख..
सराम नाम का सहारा है. हम तो मुसाफीर हैं कुछ चंद दिनों के. उसका बुलावा आया तो चल दिए..’ चिलीमचा झुरका मारणारा साधू सांगत असतो. करारी भावमुद्रा, भगवा वेश, अस्ताव्यस्त जटा, कपाळावरील ठसठशीत टिळा.. त्याचे हे रूप पाहिल्यावर जीवनाचे सार सांगणारा हा साधू कुठून आला असेल, असा प्रश्न पडतो. कुंभमेळ्यानिमित्त नाशिक-त्र्यंबकेश्वरी साधूंचे जथ्थे येऊ लागले आहेत. त्यातल्या काहींनी तपोवनातील साधुग्रामात, काहींनी गोदाकाठावरील छोटय़ा-मोठय़ा मंदिरांत, तर काहींनी त्र्यंबकेश्वरमध्ये बस्तान मांडले आहे. या साधू-महंतांची जीवनशैली आश्चर्यचकित करणारी आहे.
पर्वणीतील शाही स्नानासाठी लाखो साधू-महंतांची पावले कुंभनगरीकडे वळत आहेत. त्यात देशभरातील शैव-वैष्णवाची आराधना करणारे साधू-महंत आहेत. जवळपास दोन महिने त्यांचा या ठिकाणी मुक्काम असणार आहे. पहिले शाही स्नानास अजून अवधी आहे. खालसे व आखाडे यांनी सोपवलेल्या दैनंदिन कामांत ही मंडळी गुंतलेली दिसतात. रामनामसाधना व शिवआराधनेत तसेच पर्वणीकाळातील धार्मिक कार्यक्रम, अन्नछत्र आदींच्या नियोजनात ते मग्न आहेत.
हिंदू धर्माचा प्रचार व प्रसाराचे त्यांचे काम सिंहस्थवगळताही नियमित सुरू असते. कुंभमेळ्याची तयारी वर्षभरापासून आश्रमात सुरू होते. कामाची वाटणी, विविध समित्या स्थापणे, सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे नियोजन ही कामे आधीच केली जातात. सध्या कुंभमेळ्यात रमलेल्या साधू-महंतांचे मेळ्यावेगळे आयुष्य नाही. परंतु ते जेव्हा आपल्या आश्रमात वास्तव्यास असतात तेव्हा पहाटे तीन ते चार वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. स्नानानंतर आपल्या पंथानुसार भगवे, सफेद, पिवळे, काळे वस्त्र परिधान करून देवपूजा, गुरूमंत्राचा जप करतात. तिन्ही प्रहरी सामूहिक पूजा, धार्मिक कार्यक्रमांत दिवस व्यतित होतो. अध्यात्म्यात नामसाधना महत्त्वाची, तसेच कर्म करत राहणेही क्रमप्राप्त. आश्रमातील वेगवेगळ्या कामांची जबाबदारी प्रत्येकावर सोपवलेली असते. अन्नदानाला त्यांच्या लेखी महत्त्वाचे स्थान. अनेक आश्रमांत भाविकांसाठी अन्नदान केले जाते.
मध्य प्रदेशातील होशंगाबादचे श्रीमहंत रामदास त्यागीमहाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा दिनक्रम यापेक्षा वेगळा नाही. त्यांच्या आश्रमात आधुनिक सोयीसुविधांचा वापर न करण्यावर कटाक्ष असतो. पर्वणीव्यतिरिक्त आश्रमात महाराजांचे वास्तव्य असते. अधूनमधून ते देशभरातील तीर्थक्षेत्रांना भेटी देतात. आश्रमात रामनामकथा, गीतरामायण, भजन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम अव्याहतपणे सुरू असतात. सकाळची आन्हिके आटोपल्यावर पूजाअर्चा व भजनांना सुरुवात होते. आश्रमाची गोशाळा आहे. गोसेवा आणि शेतातील कामांची जबाबदारी काही साधूंवर आहे. दुपारी मात्र सर्वजण दोन तास वामकुक्षी घेतात. सायंकाळी पुन्हा भजन, रामनाम-जपानंतर रात्रीच्या भोजनोत्तर दिवस संपतो.
अयोध्यास्थित जानकी घाटावरील दिगंबर आखाडय़ाचे मंजुनदास आश्रमातील व्यस्त दिनक्रमात दिवस कधी सरतो, हेच तिथल्या आश्रमवासींना कळत नाही. आश्रमाचे व्यवस्थापन व अन्नछत्राची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
वैदेहीभवन आश्रमातील हरी मोहनशरणदास महाराज सांगतात की, आश्रमातर्फे अन्नछत्र चालवले जाते तसेच गोप्रकल्पही. वैदिक शाळेत शिकणाऱ्या गरीब, गरजू मुलांच्या निवास व भोजनव्यवस्थेची जबाबदारी आश्रमाने स्वीकारली आहे. एखाद्या कार्यालयाप्रमाणे सर्व जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. मंदिराची पूजा करण्यासाठी पुजारी, गोसेवेसाठी वेगळे, भोजनसेवेसाठी कोठारी, भंडारी आदींची नेमणूक करण्यात आली आहे. वेतनावर काम करणारा भंडारी वगळता आश्रमातील इतर सर्व एकाच कुटुंबातील सदस्य असतात. या सदस्यांचे पालनपोषण, वैद्यकीय उपचार आदीची संपूर्ण जबाबदारी महंताची असते.
पंच जुना आखाडय़ाचे मूळचे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यामधील गोस्वामी मंगलगिरी नागा बाबा हे गावातील समाधीजवळ कुटीत एकटेच राहतात. ज्या ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो तिथे ते शाही स्नानाकरता जातात. ब्राह्ममुहूर्तावर उठायचे, स्नान झाल्यानंतर पूजाविधी, योगसाधना, प्रभात फेरी असा त्यांचा रोजचा शिरस्ता असतो. गावातील धार्मिक कार्यक्रमांचे निमंत्रण आल्यास ते तिथे हजेरी लावतात. एरवी कुटीत त्यांची आराधना सुरू असते. भक्तांकडून मिळणाऱ्या देणगीतून भोजनाची व्यवस्था होते, असे ते सांगतात.
एकंदर आश्रमातील साधू-सेवकांची नियमित कामे ठरलेली असतात. प्रत्येकावर विशिष्ट जबाबदारी सोपवलेली असते. पण महंतांचे तसे नसते. त्यांच्या पदास साजेसा त्यांचा आब आणि मानमरातब असतो. शाही पर्वणी मिरवणुकीत हत्तीवरून वा सजवलेल्या रथातून मार्गक्रमण करणारे महंत कुंभमेळ्याव्यतिरिक्त तसे निवांत आयुष्य जगतात. अखिल भारतीय श्रीपंच निर्वाणी अनी आखाडय़ाचे राष्ट्रीय महासचिव महंत गौरीशंकर दास हे अशांपैकी एक. अखिल भारतीय संत समितीच्या उत्तर प्रदेश शाखेच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा ते सांभाळतात. फैजाबादमधील हाथी दालान पट्टी बसन्तिया येथे ते वास्तव्यास असतात. आलिशान कारमधून देशभर भ्रमंती करताना उत्तर प्रदेश पोलिसांची सुरक्षा त्यांच्या दिमतीस असते. नियमित पूजाअर्चा झाल्यानंतर सामाजिक उपक्रमांतून ते सहभागी होतात. संत समितीचे कार्यक्रम, बैठका, निर्वाणी आखाडय़ाशी संबंधित आश्रमांचे प्रश्न यावर त्यांचे काम सुरू असते. आर्थिकदृष्टय़ा सधन आश्रमांमध्ये प्रमुखांची आलिशान व्यवस्था असते. त्यांची सेवा करणे हा सेवकांचा धर्म असतो. काही आखाडे व खालशांचे प्रमुख महंत तर राजेशाही थाटात वावरतात. असे असले तरीही काही खालसे गरीब नसूनही त्यांचे प्रमुख साधूंबरोबर नित्यकर्मात सक्रियपणे सहभागी होतात. कुंभनगरीत असे महंत बोटांवर मोजण्याइतपतच सापडतात. धर्माचार्य शिवानी दुर्गा सिंग सरस्वती यांचा दिनक्रमही वेगळा नाही. ब्राह्ममुहूर्त ते शयन समय या कालखंडात सहा आरत्या, मंत्रपठण, धर्मग्रंथाचे वाचन हा त्यांचा नित्यनेम. नव्याने या क्षेत्रात आलेल्यांकरता ब्राह्ममुहूर्त; मात्र ज्येष्ठांना नामसाधनेसाठी वेळेचे बंधन नसते. आश्रमाला मिळणाऱ्या देणग्यांवर सर्व काही सुरळीत चालत असल्याचे त्या सांगतात.
आश्रम व खालसे यांच्यापासून दूर असणारे काही साधू कोणत्याही पंथात न अडकता ‘सब भूमी राम की’ म्हणत पर्वणीव्यतिरिक्त सर्वत्र मुक्त संचार करतात. मंदिराचा आडोसा, धर्मशाळेचे आवार, नदीकिनारा, पुलाखालचा परिसर या ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो. जप-तपानंतर सर्व भावनांवर नियंत्रण राहावे, मानवी भावपाशापासून दूर जात शून्य स्थितीत येण्यासाठी ही मंडळी अमली पदार्थाचे सेवन करतात. उपजीविकेसाठी आर्थिक साहाय्य मागत फिरणे, हा त्यांच्या दिनक्रमाचाच एक भाग. सर्व साधू-महंत आपापल्या दिनक्रमाचे कटाक्षाने पालन करत असल्याने सिंहस्थाला येणाऱ्या साधूंची संख्या प्रचंड असली तरी गोंधळ न होता शांततेत सारे पार पडते.

आखाडा ध्वजारोहण– १९/०८/२०१५
शाही स्नान (पर्वणी)
नाशिक
प्रथम- २९/०८/२०१५
द्वितीय- १३/०९/२०१५
तृतीय- १८/०९/२०१५

शाही स्नान (पर्वणी)
त्र्यंबकेश्वर
प्रथम- २९/०८/२०१५
द्वितीय- १३/०९/२०१५
तृतीय- २५/०९/२०१५