|| मकरंद देशपांडे

नाटकातील पात्रांची नाती नाटककार ठरवतो. त्यांची नियती, नीती-अनीती या सगळ्यांवर नाटककाराचं नियंत्रण असतं. तो गरजेनुसार परिस्थिती निर्माण करतो आणि पात्रांना सद्गती देतो किंवा अधोगती! पण तेंडुलकरांसारखा एखादाच नाटककार सांगतो, की पात्रांच्या नियतीमध्ये नाटककारांनी आपल्या लेखणीचा अधिकार आणू नये. पात्र हे स्वत:चे जीवन जगायला लागले की त्यांची नियती त्यांना सामाजिक स्तरावर येऊन भेटते.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
raigad lok sabha marathi news, sunil tatkare marathi new
रायगडात युती आघाड्यांच्या राजकारणात कार्यकर्त्यांची फरफट
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
lokmanas
लोकमानस: भाजपची हूल आणि गडी बाद

तेंडुलकरांशी माझं नातं तसं बघायला गेलं तर काहीच नाही.. आणि खूप काही. त्यांच्या मुलाचा मी मित्र होतो. पाल्रे पूर्व, संत जनाबाई पथावर ‘बद्रीधाम’मध्ये ते राहायचे आणि मी पाल्रे-‘निमिष’मध्ये साधारण चार इमारतींच्या अंतरावर. राजू, त्यांचा मुलगा अतिशय देखणा- आपल्या अल्सेशिअन कुत्र्याला घेऊन चालायचा. आमची रस्त्यावरची तोंडओळख.. मग हसणं, मग बोलणं. त्यांच्या घरी घेऊन गेला. अर्थातच ‘विजय तेंडुलकरां’च्या घरी आपण जातोय याचं भान मला होतं. पण मी राजूचा मित्र, त्यामुळे प्रिया (त्यांची मुलगी), आई, तनुजा  माझ्याशी गप्पा मारायच्या. कधी कधी आईच्या आग्रहाखातर जेवायचो. तेंडुलकरांशी खूप गप्पा नाही, पण मुलाच्या मित्राशी जेवढं बोललं जातं तेवढं बोलायचे. मग आशुतोष (गोवारीकर) आणि मी त्याच्या ‘लगान’ फिल्मच्या आधी एका विषयावर काम करत होतो- टेलिविजनसाठी. तर त्याचा स्क्रीनप्ले आणि संवाद तेंडुलकरांनी लिहावा म्हणून त्या विषयावर तेव्हा थोडीबहुत चर्चा व्हायची. आम्ही केलेला रिसर्च त्यांनी पाहिला आणि विचार करू लागले. मला ते लेखक म्हणून नाही तर अभिनेता म्हणून ओळखायचे. नंतर त्यांनी लिहिलेल्या सीरिअलसाठी प्रियाने मला बोलावलं. ती दिग्दर्शन करत होती. तेव्हा ते मला पाहून म्हणाले होते, ‘‘तू जीजस क्राईस्टसारखा वाटतोस मला!!’’ राजूच कॅमेरामन होता, त्यामुळे अगदी घरच्या वातावरणात चेंबूरला शूटिंग झालं. प्रिया फारच प्रेमळ वागली.

एक दिवस माझ्या घरचा लँडलाइन वाजला. आता आठवत नाही- माझ्या आईनं उचलला की भावाने, पण दुसऱ्या बाजूने बोलत होते ‘बाबा’ (तेंडुलकर). त्यांना राजूमुळे मी बाबाच म्हणायचो. ‘‘मकरंद, तू नाटक लिहितोस असं मला आत्ताच कळलं आणि तू २२ नाटकं लिहिली आहेस!’’ मी ओशाळून ‘हो’ म्हणालो. (खरं तर मला त्यांना कळू नये असं वाटायचं. कारण एकदा कळलं की उगाचच आपण कुठेतरी एका सर्वश्रेष्ठ नाटककारासमोर नाटककार म्हणून बसतो आणि लेखकाच्या अधिकारानं बोलायला लागतो आणि विषयांची मोकळीक घालवून बसतो.) ‘‘मला एखादं नाटक वाचायला पाठव.’’ मी पुन्हा ‘हो’ म्हणालो आणि त्यानंतर घरी जाणं टाळलं. कारण त्या आठ-दहा वर्षांत मी फारच उत्स्फूर्तपणे- लेखनाचे किंवा मंचनाचे काहीही नियम न पाळता मुक्तपणे- बागडत होतो.

दिल्लीचं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, भोपाळ रंगमंडळ, इप्टा आणि इंग्रजी थिएटरचे बरेच तरुण मला येऊन भेटायचे आणि थिएटरच्या आत किंवा बाहेर नाटक करत राहायचो. युद्धकाळात किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत भूमिगत नाटय़चळवळ असायची. पण त्यावेळी तशी काही परिस्थिती नसताना मी पृथ्वी थिएटरला फार वाच्यता न करता नाटक करत होतो.. अहेतुकपणे. कोणी आपली दखल घेण्यापेक्षा आपण खूप काम करावं अशीच इच्छा असायची. असो.

बाबांना नाटककार म्हणून भेटणं टाळलं. मग राजूचं अकाली निधन झालं आणि मग घरी जाणंच थांबलं. मग पुढे सोनाली कुलकर्णी नाटकात काम करायला लागल्यामुळे पुन्हा तेंडुलकरांशी संपर्कात आलो. सोनालीचं त्यांच्याशी खूप जवळचं नातं म्हणायला हरकत नाही. मी एक दिग्दर्शक आणि कोणा एकेवेळी मुलाचा मित्र अशी ती ओळख, पण आता थोडं बदललेलं चित्र होतं. त्यांची पाठ खूप दुखत असल्यानं ते जास्त फिरायचे नाहीत. त्यामुळे संत जनाबाई पथावर त्यांचं चिंतन-मनन करत चालणं दिसायचं थांबलं, पण घरी खुर्चीवर बसलेले, अल्सेशियन कुत्रा पायाशी. तुम्ही जे बोलाल त्याला ते उत्तर देतीलच असं नाही, पण मी त्यांना फोन करून भेटायला जायचो. आता दिग्दर्शक म्हणून आणि त्यांच्या लेखनाचा फॅन म्हणून भेटल्याने संभाषण अचानक रंगायचं. पात्राच्या नियतीमध्ये लेखकाने बळजबरीनं किंवा आपल्या अट्टहासानं हस्तक्षेप करू नये हे सांगताना (अगदी या शब्दात नाही) त्यांनी लिहिलेल्या ‘अर्धसत्य’च्या शेवटी सबइन्स्पेक्टर अनंत वेलणकरनी रामा शेट्टीला मारणं हे चुकीचं होतं, तो बदल दिग्दर्शकाने केला होता. त्यांचं म्हणणं असं पडलं की, अनंत वेलणकर ज्या व्यवस्थेत आहे त्यात राहून तो रामा शेट्टीला मारू शकत नाही. म्हणजे आपल्या नायकानी शेवटी नायक होण्यासाठी दानव वृत्तीला मारणं हा अट्टहास आहे. त्यांच्या मते, पोलीस सबइन्स्पेक्टर अनंत वेलणकर हा आत्महत्या करू शकतो. त्याचा शेवट तो होऊ शकतो. तेंडुलकरांच्या वास्तविक लेखनातली ताकद आणि भेदकता, प्रामाणिकतेमुळे आणि जीवनाच्या सखोल समजुतीमुळे आलेली आहे असं मला वाटतं.

एक दिवस पृथ्वीला गेल्यावर मला कळलं की, तेंडुलकरांच्या लिखाणाला Tribute असा एक उत्सव होणार आहे आणि त्यात काही मान्यवर दिग्दर्शक तेंडुलकरांच्या लिखाणावर नाटक सादर करणार आहेत. यावेळी मला असं वाटलं की, नाटकाचे प्रवेश करण्यापेक्षा तेंडुलकर जे लिहितात त्या लेखन शैलीचाच तपास करू या. मी तेंडुलकरांना भेटलो आणि सांगितलं, ‘‘बाबा, ‘सखाराम बाईंडर’ नाटकाच्या शेवटी लक्ष्मी आणि सखारामने मिळून चंपाचा खून केला. तर मला तो जो सखाराम तुम्ही जिवंत केलात त्याला पकडायचंय, अरेस्ट करायचंय आणि त्याची विचारपूस करताना मला तुम्ही लिहिलेल्या मानवातल्या पाशवी वृत्तीचा आणि पारंपरिक विचारसरणीवर केलेल्या आघाताचा तपास करायचाय. त्यासाठी मी नाटक लिहिणार आहे. ‘सखाराम की खोज में हवालदार.’ ते ऐकून ते म्हणाले, ‘तू वेडा आहेस.’

मला आज आठवून थोडंसं आश्चर्य वाटतं की तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकातल्या कंसात दिलेल्या सूचनासुद्धा ते बदलू द्यायचे नाहीत, पण त्यांनी मला कसं काय बरं त्यांच्या नाटकावर- तेसुद्धा ‘सखाराम बाईंडर’वर नाटक लिहायला परवानगी दिली? याचं कारण मला आज असं वाटतं की, माझं त्यांच्याशी नातं एका नाटककाराचं दुसऱ्या नाटककाराशी असतं तसं नव्हतं, तर एका अनुभवी, बुद्धिवान, प्रतिभावंत लेखकाचं दुसऱ्या उत्स्फूर्तपणे जगणाऱ्या रंगकर्मीशी होतं.

सुरुवातीला ती ५० मिनिटांची एकांकिकाच होती. ती पृथ्वीला झाल्यावर ते मला म्हणाले की, ‘‘तुला स्त्री पात्र कळतं. ‘सखाराम बाईंडर’मध्ये लक्ष्मी आणि चंपा खूपच ताकदीच्या व्यक्तिरेखा आहेत. एक कमी बोलून सगळं सहन करणारी आणि दुसरी एक चुकीचा शब्दसुद्धा चालवून न घेणारी. दोघींत एकच समानता की दोघी समाजाने बाहेर टाकलेल्या स्त्रिया.’’

हे नाटक १९७२ साली रंगमंचावर आलं. नाटक अश्लील आहे असं समीक्षकांनी म्हटलं, पण खरं तर नाटक न पाहिलेल्यांनीच जास्त चर्चा केली. ‘या नाटकामुळे विवाहसंस्था धोक्यात आहे, आपल्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे’ वगैरे आरोप करत हे नाटक बंद पाडलं गेलं. सेन्सॉरने बंदी टाकली. कमलाकर सारंगांनी हे दिग्दर्शित केलं होतं आणि या सगळ्या प्रकरणातून केलेला भन्नाट प्रवास ‘बाईंडरचे दिवस’ नावाच्या पुस्तकात लिहिला. ते वाचल्यावर माझ्यासाठी सत्तरच्या दशकातला सखाराम बाईंडर हा कोणीतरी विवाहसंस्थेचा, संस्कृतीचा आणि चंपाचा खून करत फिरणारा खुनी आजही फिरत आहे का? तो खलनायक होता का? का क्रांतिकारी विचारांचा सत्यवादी होता?.. अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं शोधताना मी ‘सखाराम की खोज में हवालदार’ हे नाटक आजच्या काळात लिहिलं.

नाटकाच्या पहिल्या प्रवेशात शहरात रात्रीची नाकाबंदी सुरू असते. एक हवालदार चार जणांना थांबवतो आणि त्यांची चौकशी करतो की, इतक्या उशिरा ते कुठून येताहेत. उत्तर ऐकून तो चक्रावतो. कारण ते सांगतात की, ते नाटकाची तालीम संपवून येत आहेत. हवालदाराला जेव्हा नाटकाचं नाव ‘सखाराम बाईंडर’ आहे असं कळतं तेव्हा तो चपापतो. कारण त्याच्या मते, सखाराम बाईंडर हा मोठ्ठा खुनी आहे आणि त्याला सेन्सॉरने बंद केलं, पण पुन्हा त्या नाटकाचे प्रयोग होत राहिले. आता जर तुम्ही नाटक करत असाल तर मला ते नाटक बघायला आणि शेवटी चंपाच्या खुनानंतर सखारामला पकडायला आवडेल. याच्या पुढचं, पुढच्या लेखात.

जय तेंडुलकर! जय बाईंडर!

जय राजू! जय मैत्री!

mvd248@gmail.com