‘‘पंधरा दिवस कष्ट घेऊन रोज तूप लावून मिश्या वाढवल्या आहेत, एकदम परफेक्ट शिखर धवन स्टाइल मिशी करून दे, सगळ्यांची.. सात जणांची.’’ तालुक्याच्या ठिकाणी मॅचच्या आदल्या संध्याकाळी दिल्या, पक्या, राजू, बापू आणि फुल गँग रंगात आली होती. एकदम मुंबई-पुणे स्टाइलमध्ये भव्य पडद्यावर मॅच बघण्याची आयडिया बापूच्या मनात आली आणि lok02मग साईलीला मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये भव्य पडदा माननीय आमदारसाहेबांकडून देणगी आणि मग अर्थातच त्यांच्या सौं.च्या हस्ते उद्घाटन, सगळ्यांना फ्री जेवण, आदल्या दोन दिवसांत टेनिस चेंडू एक टप्पा आऊटची भव्य स्पर्धा, विजेत्यांना निळ्या रंगाचा क्रिकेटचा पोशाख फ्री, फटाके, ज्योतिषी, यज्ञासाठी चार ब्राह्मण, अवघड इंग्लिश शब्द समजावून सांगायला ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य बोंगाळेसर, सगळ्या टीमचे रजनी स्टाइल कटआऊट्स अशी फर्मास योजना होती. सगळ्या बापूगँगनी शिखर धवन स्टाइल मिशी ठेवून मॅच बघायची असंही फिक्स झालं. त्यामुळे बबनच्या न्यू इंटरनॅशनल सलूनमध्ये गँग जमली होती.
‘‘बापू.. हिंदीत असते की कॉमेंट्री.. तो चॅनल लावू की, कशाला तो बोंगाळ्या हवा इंग्लिश समजावून सांगायला, उगाच लई शायनिंग मारतो तो.’’
 ‘‘इंग्लिशमध्ये भारी वाटतंय की.. सिक्स, फोर, आऊट एवढं कळतंच की आणि बाकी ते फाड फाड बोलतात ते भारी स्टायलिश वाटतं.’’ बापू म्हणाला. बापू हा ‘तालुका तरुण मित्रमंडळा’चा अध्यक्ष, त्यात आमदारसाहेबांचा माणूस; तेव्हा त्याला कोणीही विरोध केला नाही. दोन दिवसांपासून एस.टी. स्टॅण्डसमोर चार ठिकाणी ‘प्रथमच भव्य पडद्यावर वर्ल्ड कप बघा’ असे मोठे फलक. त्यावर भारताच्या टीमचे फोटो मीडियम साइजमध्ये, बापू व गँग मोठय़ा साइजमध्ये आणि आमदारसाहेब एकदम भव्य साइजमध्ये गदेच्या ऐवजी बॅट घेऊन!!
आदल्या रात्री चर्चेला उधाण आलं होतं.. ‘‘अरे, मी असं ऐकलंय की धोनी सकाळी पूजा केल्याशिवाय निघत नाही म्हणे मॅचला.. रहाणे तर लय शिंपल आहे. तो तर म्हणे बॅटिंग करताना मंत्र म्हणतो..’’ तेवढय़ात आदल्या रात्रीच श्रमपरिहाराला बसलेला पक्या म्हणाला, ‘‘सगळं फिक्स असतं. तुम्ही येडे उगाच जीव वरखाली करताय..’’ बापूचं रक्त उसळलं, ‘‘ए.. पक्या.. फुल्या फुल्या फुल्या फुल्या.. ते जवान तिथे लढतायेत आणि तू इथे डाऊट घेतोस.. तुझ्यासारखा माणूस नको या देशाला.. हलकट..!!’’ पक्याने घाबरून ग्लास तोंडाला लावला. मग मोटरसायकल रॅली झाली आणि रात्री दोन वाजता तालबद्ध हॉर्न वाजवत संपूर्ण बापूगँग तालुक्यात फिरून घरी परतली.
‘‘चित्र दिसतंय, पण आवाजाचा प्रॉब्लेम आहे.’’ नऊला मॅच सुरू होणार आणि साडेआठ वाजता सुपर साऊंड सिस्टीमच्या पप्पूने नांगी टाकली. मग भव्य पडद्यावर मॅच पाहायची आणि रेडिओ ऐकत बोंगाळेसर कॉमेंट्री करतील असं ठरलं. साडेआठपासून कार्यालयात तुफान गर्दी जमायला लागली. चौथीत शिकणारा आमदारसाहेबांचा नातू-नानू आजीबरोबर आला होता. ‘‘आजी, धोनी कधी येणार?’’ नानूने विचारलं. ‘‘अरे इथे दिसेल बघ आता.’’ ‘‘आणि मलिंगा?’’ आजी चपापली.. सचिन, गावस्कर, धोनी एवढीच काय ती माहिती असणाऱ्या सौ. आमदारसाहेबांना नानूने एकदमच गुगली टाकला. त्यांनी बापूला बोलावलं आणि नानूला तुमच्याबरोबर बसवा आणि सगळी माहिती सांगा असं ठणकावलं.
धोनी टॉसला जाण्यापूर्वी त्याच्या पत्रिकेतील गुरूला बळ देण्यासाठी मंत्रोच्चार सुरू केले. सगळ्यांनी ‘‘भारतमाता की जय.. इंडिया जीतेगा.. धोनी तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ है.. ऑस्ट्रेलिया गो बॅक.. अशा आरोळ्या दिल्या. बोंगाळेसर इंग्रजीत म्हणाले, ‘‘नो गो बॅक टू ऑस्ट्रेलिया अ‍ॅज इट इज द होस्ट’’ सगळ्यांना वाटलं महत्त्वाचे बोलले.. टाळ्या.. शिट्टय़ा.. पुन्हा घोषणा..
‘‘रोहित शिखर लक्षात ठेवणे
भारताने अजिंक्य राहणे’ हे गीत सादर झाले..
शेवटी पुन्हा एकदा घोषणा.. धोनी कप लेके आओ.. सारी दुनिया पर छा जाओ.. ऑस्ट्रेलिया गो बॅक.. पाकिस्तान मुर्दाबाद.. आमदारसाहेबांचा विजय असो..
गुरूचे बळ थोडे कमी पडल्यामुळे धोनी टॉस हारला. पण मॅचच्या काळात यज्ञ करून आपण अ‍ॅडजस्ट करू, असे गुरुजींनी बोंगाळेंच्या कानात सांगितले. तीन वेळा मनातल्या मनात याचे इंग्रजी भाषांतर करून बघून शेवटी मराठीतून हा निरोप माईकवरून सांगितला. मग आयपीएलची प्रसिद्ध धून उगीचच सात-आठ वेळा वाजवली. रेडिओवर ऐकून खेळपट्टी, हवामान, अंदाज हे सांगायला लागल्यावर बोंगाळेंनी स्वत:चंच भाषण सुरू केलं, ‘‘इंडिया इज वंडरफुल कंट्री. वी ऑल लव क्रिकेट. क्रिकेट इज लाइक अवर कुलदेवता.’’ बापूंनी माईक काढून घेऊन सौ. आमदारसाहेबांना मार्गदर्शनपर बोलण्याची विनंती केली. ‘‘आपल्या तालुक्यात आमदारसाहेबांनी जो विकास केला आहे त्याचे फलित म्हणजे हा भव्य सामना!! आम्ही स्वत: मोहनसिंग धोनीला पाठिंबा देतो, यंदाचा टेनिस चेंडू चषक जिंकलेला विजू काटे हासुद्धा मोठा खेळाडू आहे, आम्ही आमदारसाहेबांशी बोलून त्याला मुंबईला पाठवू.’’ टाळ्या.. पुन्हा घोषणा.. नानूने बापूला पहिला गुगली टाकला, ‘‘काका, मुंबई इंडियन्सची बॉलिंग आहे?’’
‘‘अरे, ही वेगळी मॅच आहे.. आयपीएल नाहीये नानू..’’
‘‘मलिंगा कधी येणार?’’- नानू.. बापूने दुर्लक्ष केलं. कारण एव्हाना दोन चौकार, एक षटकार बसले होते; ऑस्ट्रेलियाने बॅटिंगचा निर्णय घेऊन धोपटायला सुरुवात केली होती.
बोंगाळेसरांनी मॅचविषयी कितीही माहिती सांगितली तरी हॉलमध्ये बसलेल्या तीनशे-साडेतीनशे लोकांमध्ये आपापसात चर्चा चालूच होती. मधे मधे लहान पोरं रडत होती. कुणी फोनवर मोठय़ामोठय़ाने बोलत होतं.. ‘‘अरे, कितीही करा म्हणावं त्या ऑस्ट्रेलियाला आमचा रोहित, धवन आणि कोहली तिघेच भारी आहेत तुम्हाला..’’ ‘‘तीनशेच्या वर गेला ना स्कोअर! तर गप विमानात बसून घरी..’’ ‘‘कसलं वातावरण आहे इथे.. लय पोरी आल्यात गावातल्या, ज्याची त्याची अनुष्का.. हॅ हॅ हॅ हॅ..’’ अशी फोनवरची चर्चा.. कोणी टेकून बसून तंबाखू चोळतंय.. कुणी नुसतंच भारावून इकडेतिकडे बघतंय.. कोणी भारताचा झेंडा हातात घेऊन  मोबाइलवर फोटो काढतंय.. दारात काही मंडळी उभी राहून टवाळक्या करताहेत.. अशी अनेक दृश्यं बघायला मिळत होती. कोणी ‘‘घे रे पटकन् आऊट, दीडशेत गुंडाळा,’’ असा सल्ला फेकत होतं, तर कोणी ‘‘अंपायर लब्बाड वाटतोय.. काही खरं नाही आज.’’ अशी भीती व्यक्त केली. कोणी, सचिन असता तर फार बरं झालं असतं म्हटलं. कोणी गांगुली-द्रविडच्या आठवणी काढल्या. काही जुनी खोडं तर थेट वाडेकर, पतौडी वगैरे बोलत होती. तेवढय़ात बोंगाळेसर ओरडले, ‘‘आणि ही दुसरी विकेट, इट्स ए कॅच..’’ आणि एकच जल्लोश.. ढोल-ताशे टीम तर अशी रंगात येऊन वाजवायला लागली की, पुढे दहा मिनिटं फक्त तेवढंच!!
एकदम कोणी तरी आयडिया काढली. ‘‘ऑस्ट्रेलियाची माणसं लईच हाणत्यात.. आपण अर्धा तास वेगळा चॅनेल भव्य पडद्यावर बघूया?’’ बापूचं डोकं सटकलं, ‘‘अरे, आज आपले अकरा जवान उन्हातान्हात, पावसापाण्यात आपल्या जिवाची पर्वा न करता शत्रूशी लढतायत आणि तुम्हाला दुसरं काही तरी बघायचंय, हीच का आपली देशभक्ती, हाच का धर्म? तुम्ही पांडव आहात का कौरव? आठवा जरा आपली परंपरा.. ते क्रांतिकारक, तो त्याग!! २६ जानेवारीला पाठ केलेलं भाषण बापूंनी बारीकसारीक बदल करून इकडे चिकटवलं. पण परिणाम नेमका झाला. पुन्हा एकदा घोषणा.. स्मिथ मुर्दाबाद.. शेन वॉटसन हाय हाय..!!
कितीही मंत्र, इच्छाशक्ती सगळ्याचं बळ लावलं तरी धावांचा डोंगर उभा राहिला आणि फ्री जेवणाचा आनंद लुटायला मंडळी बाहेर पडली. नानूने पुन्हा आपली निरागस प्रश्नमंजूषा सुरू केली.
‘‘कोहली आणि गेल हवे ना ओपनिंगला?’’
‘‘आपल्या लोकांनी रन आऊटचे बॉलच नाही टाकले, आमचा मन्या टाकतो तसे.’’ ‘‘बापूकाका, आपले प्लेअर ब्रेकमध्ये सहा सहा अंडी खातात ना?’’.. बापू दमून गेला होता. ‘स्पॉन्सरशिप नको. पण नातू आवर’ अशी अवस्था झाली होती.
ब्रेकमध्ये बोंगाळेसरांनी काहींना प्रश्न विचारले, ‘‘कोण जिंकेल?’’ सगळ्यांनी जल्लोश केला, ‘‘वर्ल्ड कप कोणाचा? भारताचा!!’’
जेवण जड झाल्यामुळे काहींनी घरचा रस्ता पकडला, काहींनी ‘‘मी जरा पडून बघतो.’’ असा पवित्रा घेतला.. सुरुवातीलाच भारताच्या विकेट पडल्यानंतर धोनीच्या पत्रिकेमधल्या गुरुला बळ देण्यासाठी मंत्रोच्चार सुरू झाले. कुजबुज सुरू झाली.. ‘‘अवघड वाटतंय गडय़ा!’’ ‘‘होनार रे होऽनाऽर! लिहून घे.. आज आपला विराट.. असं म्हणेपर्यंत विराट आऊट झाला. आता बापूगँगचा धीर सुटत चालला होता. मॅच जिंकणार अशी खात्री असल्यामुळे आणलेला गुलाल, फटाके, श्रमपरिहाराची सोय सगळ्याचाच प्रश्न समोर येत होता. बोंगाळेसरांनी पाच विकेट गेल्यानंतर, ‘‘चालायचंच, आपल्या हातात काही नसतं.. इट्स ए गेम.. वी शुड बी गुड ह्य़ुमन..’’ अशी निरवानिरवीची भाषा सुरू केली. सौ. आमदारसाहेब ब्रेकमध्येच सटकल्या होत्या. नानूला समजावताना बापू दमला होता. ‘‘पोलार्ड येणार का आता धोनीबरोबर?’’.बापूने त्याला दामटवून घरी सोडलं.
आपले खेळाडू, त्यांची आजपर्यंतची कामगिरी, फोटो, वर्णनं यात बुडून गेलेल्या सूर्यफुलांची दिशा संध्याकाळपर्यंत संपूर्णपणे बदलली होती. आता चर्चा होती ती ‘‘किती पैसे मिळतात यांना!!’’ ‘‘फिक्सिंग असेल का’’!!  ‘‘ती ‘ही’ आली तो ‘हा’ क्रिकेट विसरला इथपासून ते धोनीचा गुरू आपल्यामुळे स्ट्राँग राहिला आणि तो विकेटवर टिकला.. अशी मखलाशीही झाली.
शिखर धवनसारखी मिशी ठेवलेले सात मित्र जवळजवळ वीस मिनिटे उदासीच्या गुहेत अडकले. पण मग मात्र त्यांनी, ‘‘आपल्याकडनं होऊ शकेल ते आपण केलं.. बॅनर, प्रार्थना, मंत्र, झेंडे सगळं झालं.. पण नशिबापुढे काही चालत नाही. तेव्हा फटाके, गुलाल आपण निवडणुकीसाठी ठेवून देऊ आणि दु:ख विसरण्यासाठी धाब्यावर श्रमपरिहार करू.
भव्य पडदा.. शांत झाला.. लोक आपापल्या घरी जाऊन सासू-सून-खून-संशय-विनोद सगळं सगळं एकत्र असणाऱ्या मालिका बघू लागले. निरागस नानू शांत झोपला.. मलिंगा, गेल असते तर आपण जिंकलो असतो, असं तो पुटपुटत होता. सूर्यफुलांची दिशा बदलली होती. आपल्याला मिळालेली धोनीची पत्रिका खरी कशावरून? यावर दोन गुरुजी वाद घालत होते आणि बापू आणि मंडळी.. आता आपण रामनवमीचा भव्य उत्सव करूया. आमदारसाहेब आहेत पाठीशी.. रामायण मालिकेतली नटी बोलावू.. सगळ्यांना फ्री जेवण.. रामायणावर व्याख्यान.. आणि गावात प्रथमच.. ‘लेझर शो..’ ठरलं तर!! आता लावा गाणी.. फायरब्रिगेड मंगवा दे तू..ओ बल्मा..!!