News Flash

पाण्यातला विठ्ठल

गवाक्ष

|| समीर गायकवाड

दत्तू गावात कधी आला, कुणाबरोबर आला याच्या विविध वदंता होत्या. कुणी काहीही म्हणे. गावात आलेल्या वरातीसोबत तो आला; गावाजवळून जाणाऱ्या वारीतल्या एका दिंडीत तो सामील होता, नजरचुकीनं गावात आला; त्याला एका मालट्रकनं सडकेला सोडत गावाचा रस्ता दाखवला, वगरे.. नेमकं कुणालाच ठाऊक नव्हतं. गावात अनोळखी माणूस आल्यावर त्याच्याकडं संशयानं न पाहता त्याला सहानुभूतीनं पाहण्याचा तो काळ होता. दत्तूला विचारावं म्हटलं तर अडचण होती. तो काहीसा गतिमंद होता. बोलताना अडखळायचा. कुणी फार प्रश्न विचारले, की तोंडाचा चंबू करून घुमा व्हायचा. त्याला खळखळून हसताना वा फडाफडा बोलतानाही कुणी पाहिलं नव्हतं. दावणीला मुकाट बांधून गुमान उभं असलेल्या गायीच्या डोळ्यांत जे खारं पाणी पाझरायचं, तेच दत्तूच्या डोळ्यांतून ओघळायचं. त्यानं कुणी अस्वस्थ झालं नाही नि कुणाच्या पोटात खड्डा पडला नाही. नाही म्हणायला दत्तूचं पाण्याशी आणखी एक नातं होतं.

कालांतरानं दत्तू साऱ्या गावाचा पाणक्या झाला. त्याच्या मानेवर मोठं गळू होतं- जे खूप घट्ट होतं. गावातल्या तालेवार लोकांच्या घरी पाणी भरून त्याच्या उजव्या खांद्यावरही तशीच मोठी गाठ तयार झाली होती. दोन्ही तळहातांना घट्टे पडलेले. जोडीला त्याच्या हातांना चिखल्या झाल्या होत्या. सतत पाण्यात हात घालून त्याच्या हाताची त्वचा पांढुरकी झालेली. जाड खाकी रंगाची हाफपँट, मांजरपाटाची बिनबाह्य़ांची जाडीभरडी छाटी हा त्याचा कायमचा वेश. सणासुदीलादेखील त्यात बदल नव्हता. दत्तू दिसायलाही ओबडधोबडच होता. वर्णानं काळासावळा. काशी बोरासारखे मोठे गरगरीत डोळे खोबणीतून बाहेर आल्यासारखे वाटायचे. दाट आडव्या भुवयांमुळे बुब्बुळं स्पष्ट नजरेत येत. डोक्याचं भलंमोठं भेंडोळं, अरुंद कपाळावर पुढे सूज आल्यासारखं भलंमोठं टेंगुळ. लांबुळका चेहरा, अपऱ्या नाकपुडय़ांची मोठाली छिद्रं. गालाचं हाड आत गेलेलं, हनुवटीही लोंबणारी. उभट कानाच्या टोचलेल्या पाळ्या सदा हलत. काळ्याकुट्ट राठ ओठांआडून डोकावणारे वेडेवाकडे दात. त-त-प-प करू लागला, की त्याच्या ओठांच्या कडांतून फेस डोकावू लागे. मग हात आडवा करत मनगटानंच तो पुसून काढी. गच्च मानगुटीवरून गळ्यात रुळणारी तुळशीची माळ त्याला शोभून दिसे. भल्या पहाटे लावलेला अष्टगंध पाण्यासोबत वाहून जाई, पण कपाळावर त्याचा केशरी डाग असे.

कोंबडा आरवायच्या आधी हा आडावर गेलेला असे. आडावर पाणी भरायला येणाऱ्या बायकांशी त्याचं कधीच भांडण झालं नाही. उजव्या हातानं खांद्यावर मोठी घागर अन् डाव्या हातात कळशी राही. ऊन, वारा, पाऊस.. कशाचीही तमा न करता बारमाही हे काम करायचा. घागरी उचलून त्याच्या दंडात बेंडकुळ्या आलेल्या. पाण्याचं ओझं घेऊन झपाझप ढांगा टाकून त्याच्या पिंडऱ्यात टणक वायगोळे तयार झालेले. पहिल्यांदा त्याला पाहणाऱ्याचं लक्ष त्याच्या पिंडऱ्यावर आणि दंडावर जायचंच, इतकं त्याचं अंग घडीव झालं होतं. कधी कधी तिथं कुणी पोटुशी सासुरवाशीण आली, की हा मनानंच तिचं पाणी शेंदून देई. आजारी पोक्त बाई आली, की तिचं धुणं पिळून देई. एखादी पोरसवदा किशोरी आली, की तिला आडापासून दूर उभं करी अन् आपल्या हातानं तिची कळशी भरून देई.

दत्तूला गावातल्या वीसेक घरांची वर्दी होती. त्या घरात पाणी ओतताना त्याचा वावर फक्त उंबरठय़ापासून हौदापर्यंत असायचा. गावातल्या विठ्ठलमंदिरात पाणी भरायला गेला, की तिथली काही मंडळी गळ्यातली वीणा त्याच्या गळ्यात अडकवत. कुठं ओटय़ावरची पोती मागंपुढं करावी लागत, सरपण फोडून द्यावं लागे, ओझं उचलावं लागे. दुपारच्या वेळी काही भोचक बायका आपलं लेकरू त्याच्या बखोटय़ास मारत. मग त्याचा ‘दत्तूमामा’ होई. गावातली कित्येक पोरं त्याच्या खांद्यावर झोपी गेलेली, कित्येकांनी त्याचा गंजीफ्रॉक ओला केलेला आणि कित्येकांनी त्याचा शेवंचा पुडा खाल्लेला! जगन्नाथ वाण्याकडून त्याला रोज दुपारच्याला एक शेवपुडा ठरलेला असे. नेमकं शेव-फरसाण खाताना कोणाचं तरी लेकरू त्याच्या बोकांडी मारलेलं असे आणि त्याचा तो घासही हिरावला जाई.

विठ्ठलाच्या मंदिरातच त्याचा मुक्काम असे. रात्री कीर्तनास येणाऱ्या टाळकुटय़ा लोकांच्या शेजारी बसून तो मान हलवत राही. कोणताच अभंग, कुठलीही ओवी त्याला येत नव्हती, तरी तो मुकेपणानं ओठ हलवे. एका पावसाळ्यात मंदिराची ओसरी पाण्याने गच्च भरली. निष्पाप, भाबडा दत्तू विठ्ठल-रुखमाईच्या कट्टय़ावर जाऊन निजला. पहाटे गुरवानं त्याला तिथं बघितलं आणि गहजब झाला. वेशीत उभं करून त्याला चाबकाच्या वादीनं फोडून काढलं गेलं.

एका वर्षी गणू रावताच्या थोरल्या पोराचं- गजाचं लग्न झालं. नवी सून बाजिंदी होती. तिला सगळ्या घराची सूत्रं आपल्या ताब्यात हवी होती. त्यातून तिनं चोरीचं षडयंत्र रचलं. पण त्यात तिची नणंद फसायच्या ऐवजी भोळासांब दत्तूच फसला. गणू रावतानं चोरीच्या संशयावरून त्याला चावडीत उभं केलं. थरथर कापत होता तो. हातापाया पडत होता. पण मस्तकात संशयाचं भूत स्वार झालेल्या रावतानं पायातला व्हन्ना काढून त्याला खटाखट मारायला सुरुवात केली. तो वेदनेनं किंचाळत होता. मध्ये पडायची कुणाची बिशाद झाली नाही. कारण गणू राऊत म्हणजे डोक्याचं मेंटल भडकलेला माणूस. ‘हालगटाच्या अंगाचा अन् मेंढराच्या बुद्धीचा’ म्हणून त्याची ख्याती होती. शेवटी चोर त्यांच्याच घरातला निघाला, तेव्हा सगळं गाव हळहळलं होतं. रावताच्या बायकोनं- पारूबाईनं दत्तूला घरी नेऊन त्याच्या वळांवर हळद लावली. त्या दिवसापासून तो पारूबाईचा मानसपुत्र झालेला.

दत्तूचं लग्न काही झालं नाही. त्यानं कोणत्या बाईकडे नजर वाकडी करूनही बघितलं नाही. त्यावरून काही मंडळी टिंगल करत, टोमणे मारत. दत्तूला त्याचं काही वाटत नसे. तारुण्याच्या उंबरठय़ावरच्या वयात दत्तू गावात आलेला, तेव्हा आडाला मोकार पाणी होतं. चार रहाट चौदिशेने चालत, पण पाणी तळाला कधी गेलं नव्हतं. सत्तरीपार थकल्यानंतरही हार न मानलेल्या दत्तूनं पाणी भरणं बंद केलं नव्हतं. एके दिवशी विठ्ठलाच्या ओटय़ावर पाण्याची घागर ओतताना त्याला चक्कर आली, तो खाली पडला. सगळीकडे पाणीपाणी झालं. त्यात पाय घसरून पायऱ्यावरून घरंगळत खाली आला. मानेवरचं गळू फुटलं. त्याला लकवा मारल्यागत झालं. वर्षभर खिळून होता तो. दत्तूचे श्वास जड झाले. त्या रात्रीचं चांदणं लिंबाच्या झाडाआड लपून ओक्साबोक्शी रडलं. आडातल्या पाण्याला हुंदके अनावर झाले. शेतशिवारातल्या गायींच्या डोळ्यांना झरे फुटले. मंदिराचा कळस काळ्याजांभळ्या आभाळात गुदमरून गेला. आयुष्यभर त्यानं खांद्यावर वागवलेल्या घागरी- कळशांना कंठ फुटले. तांबडफुटी व्हायच्या सुमारास त्याचं प्राणपाखरू उडून गेलं.

दत्तू गेला आणि गावाचं पाणी घटत गेलं. गावात असलेलं तळं फक्त पावसाळ्यातच जेमतेम भरू लागलं. आड आटून कोरडा खडंग झाला. लोकांनी बोअर मारून घेण्यास सुरुवात केली. ग्रामपंचायतीनं हापसे मारून दिले. पाणवठा कोरडा पडला. सणावारांचं धुणं धुवायला शेताचा रस्ता धरावा लागला. मागच्या वर्षी पंचायतीनं आड बुजवायचा ठरवलं. बुजण्याआधी एकदा आडात डोकावून बघावं म्हणून कंबरेत वाकलेला गणू रावताचा लेक- गजा आडापाशी गेला. रहाट मोडून पडले होते. कडेची फरसबंदी निघाली होती. वेडय़ा बाभळी माजल्या होत्या. हिम्मत करून आडात त्यानं वाकून बघितलं. तळाशी लहान-मोठे धोंडे पडले होते. रोखून बघितलं तर त्याला दत्तूच्या भोळसट चेहऱ्यापाठोपाठ मंदिरातल्या विठ्ठलमूर्तीचा डोळे पाणावलेला चेहराही दिसला. गजाचं काळीज भरून आलं. मायबापासह दत्तूच्या अनेक आठवणींनी त्याच्या उरात कोलाहल केला. नकळत त्याच्याही डोळ्यांतून दोन-चार थेंब आडाच्या तळाशी पडले. तळाशी पुन्हा एकदा दत्तूचा चेहरा तरळला. या खेपेस दत्तूच्या डोळ्यांत अश्रू होते आणि जाडय़ाभरडय़ा काळ्या ओठांवर मंदस्मित होतं..

sameerbapu@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2019 12:02 am

Web Title: sameer gaikwad loksatta story
Next Stories
1 ‘सेल्फी’चा अतिरेक
2 ..सहर होने तक
3 संघर्षसेतू
Just Now!
X