|| समीर गायकवाड

थोडासा पाऊस पडून गेला तरी गावाकडचं वातावरण बदलतं. वातावरण कुंद करणारे काळसर ढग आणि मधूनच येणारी शिरवळ यांचा खेळ सुरू होतो. अखिल चराचरांत नवनिर्मितीचे बदल घडू लागतात. सगळे सजीव-निर्जीव आपापल्या नव्या विश्वात दंग होऊन जातात. परिपूर्ण झालेलं नसलं, तरी सृष्टीचं हे अर्धोन्मिलित रूपडं मनाला भावतं. या पावसात भिजायला कुणाला आवडणार नाही? या पावसाचा गावोगावचा प्रवास भिन्न असतो. त्याची अनुभूतीही आगळीच असते. अध्र्याओल्या पावसात भिजलेल्या शब्दांची पखरण करायची असेल तर काळ्या मातीच्या चिखलात पाय रुतायला हवेतच.

गावाकडं आता नाही म्हटलं तरी पाऊस काहीसा सुरू झालाय. भरभरून पडावं की पडू नये, हा त्याचा गुंता मात्र अजून पुरता सुटलेला नाही. जेवढा पाऊस पडून झालाय तेव्हढय़ावरच काळ्या आईनं कोवळ्या बियांना आपल्या कुशीत जागा मिळण्यासाठी बळीराजाच्या मनावर गारुड करायला सुरुवात केलीय. शेतातल्या बांधाजवळून पुढच्या आडरानात जाणारा बलगाडीचा रस्ता आता हिरवा होऊ लागलाय. रस्त्याच्या दोन्ही कडेला चौफेर तण माजलंय. तर झाडांची पालवी हिरवीकंच झालीय. पाऊलवाटेतल्या ज्या भागातून बलगाडीची चाकं जातात, तो भाग अजूनही टणक मातीचाच आहे. त्यामधून आता एक नागमोडी हिरवाई त्या चाकांच्या साथसोबतीला आहे. खांद्यावर जू असणारे बल मात्र या रानटी गवताला तोंड न लावता आपल्याच एका तंद्रीत पुढे जाताहेत. बलांच्या गळ्यातल्या घंटांचा लयबद्ध आवाज झाडातल्या पाखरांना मोहून टाकतोय. पावसाचे थेंब पानापानावर हलकंसं ओझं टाकून गेलेत. त्यावरची नक्षी आता जास्त गडद जांभळी झालीय. निरनिराळ्या रंगाच्या, वाणाच्या बारीक किडय़ा-अळ्यांना म्हणावा तसा जोम अजून आलेला नाही. एव्हाना म्हशीच्या पाठीपासून वडाच्या शेंडय़ापर्यंत त्यांची मफल भरलेली असायची. नाकतोडे पानामागे निवांत दडून अंग मोडून पडलेत. पिचकलेल्या ओल्या लिंबोळ्यांचा खच पडवीत पडलाय. त्यावर माश्या घोंगावतायत. परसातलं सारवण ओल्या- कोरडय़ा चिखलात मिसळून गेलंय. शेणानं सारवल्याच्या खाणाखुणा शेणकुटाच्या खपल्यांतून कुठे कुठे नजरेस पडतात. गोठय़ाभवतालच्या दगडी कुंबीतनं ओलसर ओशट वास येऊ लागलाय. भिंतींवर वेगवेगळे वाटोळे आकार काढणारी ओलही आता हळूहळू नजरेस येईल. छताच्या पत्र्यातून गळणाऱ्या थेंबांचे एकसुरी संगीत मात्र सुरू झालंय. पूर्वी दरवर्षी येणारा आणि ‘पेत्रे व्हा, पेत्रे व्हा’ असे सांगणारा पावशा मात्र आता आडसाली येतोय. यंदा तो आलेला नाही. टिटव्या आणि भोरडय़ांना मात्र ऊत आलाय. आभाळाकडं तोंड वर करून पडलेली ढेकळं हिरमुसून मान आत खुपसून बसलीत. थोडय़ाशा पावसानं त्यांची धग मात्र चांगलीच वाढलीय. ओढय़ातले लहान-मोठे खडक अजूनही कोरडे खडंग आहेत. त्यांच्या तळाशी थोडी ओल आहे. पण कधीकाळी खेकडे असायचे ते दिसत नाहीत. दयाळ आणि वटवटे अख्ख्या माळावर दिसत नाहीत.

रानातून ओढय़ात खळाळत पाणी वाहत येण्याइतका धुंवाधार पाऊस अजून झालेला नाही. त्यामुळं वाफसाच नसल्यानं पुढं तिफण कशाची धरायची, हा नेहमीचा प्रश्न यंदाही ठाण मांडून आहे! शेतात औतं लावून पाळी घालून कुळकुळीत झालेलं रान अजून म्हणावं तसं भिजलेलं नाही, हे तेच तेच गाऱ्हाणं जन्माला लागेल की काय अशी भीती आता वाटतेय. पावसाची वाट पाहताना काढून ठेवलेली ईरली, घोंगडी कोनाडय़ात पडून आहेत. कारण एकसलग आभाळ येतच नाही. त्यामुळं बोडक्या डोक्यानंच येणं-जाणं सुरू आहे. ओढय़ाला पाणी येऊन त्यात जागोजागी ‘येरुळे’ दिसू लागतील तेव्हाच खरा पावसाळा आला असं गावातलं सर्वमान्य सूत्र! आता पडणारं हे असलं भूरंगट किती जरी पडलं तरी त्याचा काही उपयोग नाही, हे गावकऱ्यांचे पावसाचे आडाखे. त्याला अजून तरी कोणी छेद देऊ शकलेले नाही. पाझर तलावाच्या अंगाला असलेलं मुरमाड रान मात्र अजून थोडेफार तापत्या अंगाचेच आहे. गावाच्या पांदीत असलेली वडापिंपळाची झाडं एकमेकाला विळखा घालून सदैव झिम्मा खेळत असतात. पण दरसाली कमी होत चाललेल्या पावसानं त्यांचे चेहरे पिवळट होताहेत. त्यांच्या बुंध्यावरनं पळणाऱ्या खारुताई आजकाल थोडय़ा बावरल्याहेत. असमान पावसानं झाडावरची साल निम्मीअर्धी ओलीसुकी झालीय. त्यांच्या सालीवरती सूरपारंब्या खेळणारे तिखट मुंगळे अजूनही एकाच रांगेत चालताहेत. मान ताठ करून बसलेले हिरवे-पिवळे सरडे भक्ष्यासाठी केव्हाचे दबा धरून आहेत. बेडकांचे घसे अजून ओले झालेले नाहीत. सुगरणींचे विहिरीतले खोपे अध्रे बांधून झालेत. मात्र त्यापुढची तयारी तिनं बंद केलीय. काही विहिरी अध्र्यामुध्र्या भरल्यात, तर काही विहिरींतल्या कडय़ाकपाऱ्या काहीशा ओसाड झाल्यात. तळाला गेलेलं तिथलं पाणी मात्र बरंचसं वर आलंय. उनाड साळुंख्यांना कळेनासं झालंय, की पावसाची वीण उसवलीय का त्याचा हंगाम चुकलाय? कावळ्यानं बांधलेलं घरटं मात्र अजून शाबूत आहे. तर बाभळींनी माना टाकल्यात. चिलारीची मात्र चंगळ झालीय. धोतरासुद्धा दरदरून फुटलाय. बिनकामाचं तण जागोजागी आलंय. अर्धवट वाफसा होऊन आलेलं पीक अजून िपडरीतच अडकलंय. उंदरांची बिळं मात्र पहिल्यांदाच बांधाच्या कानाकोपऱ्यांत झालीत. पूर्वी शेतात घुबडं यायची. आता दिसतही नाहीत. पण त्यामुळे उंदरांचा सुकाळ झालाय.

शेरडांच्या केसांत अडकणारे केचवे वाढलेत. गायी-म्हशींच्या अंगावर गोचिडांचा आटय़ापाटय़ाचा खेळ सुरू आहे. डोबीतल्या चिखलातून जेव्हा म्हशी बाहेर यायच्या तेव्हा हळूच येऊ न त्यांच्या अंगावर बसणारे बगळे यंदा गतसालापेक्षा घटलेत. श्रावणात बेफाम उगवणारं हिरवंकंच कमालीचं कोवळं घास अजूनही तगून आहे. दग्र्याच्या घुमटाभोवती, मिनाराभोवती फिरणारे पारवे अजून अबोलच आहेत. शिवाराच्या वाटेला असलेले चिरे निसटलेत. विजनवासातलं नागोबाचं एकाकी देऊळ मस्तकावर अविरत पडणाऱ्या पावसाच्या सलग धारा अजून कशा बरसल्या नाहीत म्हणून फणा काढून ताठून गेलंय. तिथल्या अरुंद, अंधाऱ्या गाभाऱ्यातल्या पाकोळ्या कधीच निघून गेल्यात, त्या फिरून परतलेल्याच नाहीत. रातसारी विहिरीजवळच्या रानात फिरणारे काजवेही अजून फिरकले नाहीत. रातकिडय़ांनी मात्र विश्रांती घेतलेली नाही. साप-विंचूकाटय़ांना उधाण यायचंय. पहाटेचे िपगळे थोडे नरम पडलेत. मला खात्री आहे की यंदाच्या मोसमात एक तरी दिवस असा येईल की मन लावून पाऊस पडेल. अगदी आलाप लावून गाणाऱ्या पट्टीच्या गवयासारखा तोदेखील जलधारांचा सूर धरेल; ज्यावर वसुंधरा नृत्य करेल. असं पाहुण्यागत अधूनमधून पडणाऱ्या या पावसाचं नेमकं काय दुखणं आहे ते तोवर निदान सर्वाच्या कानीकपाळी होईल. त्यालासुद्धा काहीतरी सांगायचंय. तो अजूनही शिवाराच्या मधोमध ढगांची जमवाजमव करतो. क्षणात अंधारून आणतो. पाने शहारून उठतात. पाखरं कल्ला करतात. गाई-म्हशी कातडी थरथरवून उभ्या राहतात. बांधाबांधातून सुसाट वाहणारं वारंसुद्धा त्याच्यासाठी चिडीचूप होतं. सगळ्यांच्या नजरा वर खिळतात. अन् तो चेष्टा केल्यागत भुरूभुरू पडून जातो. पावसाच्या भेटीसाठी आतुर झालेलं कडकडीत ऊन मुकाटपणे निघून जातं. मान खाली घातलेली निस्तेज शिरवळ तशीच राहते.

हे असंच चालू आहे. गावातली म्हातारी माणसं म्हणतात, ‘‘माणसाची नियत बदलली. मग परमेश्वराने तरी का बदलू नये? पेराल तेच उगवणार!’’ ते असं बोलले की सगळे कासावीस होतात. ढेकळात उगवलेले अध्रेमुध्रे कोंब हिरमुसून पिवळे होऊन जातात. माणसांची मात्र पावसाळी सूर्यफुलं होतात. जिकडं आभाळ गोळा होईल तिकडं तोंड करून बसतात!

शेतात अंधारून येताना माझे काका मावळतीकडं तोंड करून बसत. बहुधा ते त्यांच्या जन्मदात्यांचे स्मरण करत असायचे. अंधार अंगावर येताच ते मन लावून कंदिलाची काच पुसून लख्ख करून ठेवत. तुळशीच्या देवळीत कृष्णाई मंद वातीचा दिवा लावायची. गोठय़ातली हालचाल हळूहळू मंदावत जायची. आता ती अनुभूती उरली नाही. आता सगळं अर्धवट वाटतं. बाजेवर पडून आभाळातल्या चांदण्या मोजताना नक्षत्रंसुद्धा आता तुटक दिसतात. पहाटेचं स्वप्न आता मध्यरात्रीच डोळ्यापुढं येतं. काळ्या ढेकळांत पांडुरंग मूच्र्छा येऊन पडलाय आणि काकडआरतीला उधाण आलंय! काय करावं काही सुचत नाहीये. अध्र्याकच्च्या.. अध्र्यापिकल्या, थोडय़ा गाभूळल्या.. थोडय़ा सुकल्या, थोडय़ा गोड.. थोडय़ा आंबट चिंचेसारखं आयुष्य झालंय. सगळंच बेभरवशाचं! अशा वेळेस दिगंतात तरळत असणाऱ्या तांबूस-काळ्या आभाळात स्वर्गस्थ वडिलांची छबी दिसते. चेहऱ्यावर नकळत समाधान पाझरते. झोप कधी लागते, कळत नाही. उद्याचा दिवस काय घेऊन उगवणार आहे हे विज्ञानाला अजून कळलं नाही हे बरेच आहे. कारण आशेच्या लाटांवर तरंगून वैफल्याचे किनारे पार करणं अजूनही शक्य आहे..

sameerbapu@gmail.com