18 November 2019

News Flash

बाभळीतला चंद्र

शाळेचा दिवस असूनही सकाळीच सर्जा रानात आल्यानं एक-दोघांनी त्याला हटकलंदेखील.

|| समीर गायकवाड

शाळेचा दिवस असूनही सकाळीच सर्जा रानात आल्यानं एक-दोघांनी त्याला हटकलंदेखील. पण त्यानं ताकास तूर लागू दिला नाही. टिवल्याबावल्या करून तो थेट साहेब्यापाशी आला. चोरटय़ा नजरेनं सगळीकडं बघत खुंटीला बांधलेलं दावं सोडून साहेब्याला त्यानं मोकळं केलं. त्यासरशी मंगी ओरडू लागताच त्यानं मंगीच्या गळ्यातलं दावंही सोडलं. ते दोघं मोकळे होताच शांत पहुडलेला पाडशा उडय़ा मारत पुढे आला. त्यांचा एकच कालवा सुरू झाला. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न तो करू लागला. दुरून पाहणाऱ्या मक्याला काहीतरी वेगळंच घडत असल्याचा संशय एव्हाना आला होता. त्यानं विव्हळत कुईकुई करायला सुरुवात केली तसं सर्जानं त्याला चुचकारून जवळ बोलावलं. मग ते सगळे गप्प होताच सर्जाचा जीव भांडय़ात पडला. केवळ साहेब्याला नेता येणार नाही, हे लक्षात आल्यावर वेळ न दवडता त्यानं येवतीच्या टेकडीच्या दिशेची वाट पकडली. आता मक्या सगळ्यात पुढं होता, त्याच्या मागं गळ्यातली घंटा हलवत चाललेला साहेब्या आणि मंगी होते. पाडशाला खांद्यावर घेऊन चालणारा किशोरवयीन सर्जा सर्वात शेवटी होता. फुफुटा उडवत, सकाळच्या प्रसन्न वातावरणाचा आस्वाद घेत त्यांचं मार्गक्रमण सुरू होतं. गणाच्या बदली येणारा जगदाळ्यांचा रवू जेव्हा कधी हजेरीवर यायचा तेव्हा येवतीच्या टेकडीकडं न येता पाझर तलावाजवळच्या हाळावर गुरं न्यायचा. त्यामुळं सर्जा निर्धास्त होता. त्याच वेळी आपल्या मागं काय होईल याचे अनेक विचार त्याच्या मनात येत होते. पाडशाचा लुसलुशीत स्पर्श होताच सगळं जग विसरायला होई.

गावातली सकाळ सरताच सगळ्यांच्या लक्षात आलं की सर्जा घरात नाही. तो कुठं गेला असंल या चिंतेनं आबासाहेब जरा लवकरच शेतात आले. वाटेत श्रीपतीच्या वस्तीवर थांबत त्यांनी सर्जा तिथं कुठं नजरेस पडतो का याचा अंदाज घेतला. शेतात आल्याबरोबर त्यांना गडय़ांकडून कळलं की रामपारीच आलेला सर्जा शेरडासंगट खेळत खालच्या अंगाला जाऊन वाढूळ वक्त झालाय. हे ऐकून आबांना हायसं वाटलं. किरकोळ कामं करून त्यांची शिवारफेरी पुरी झाली. दरम्यान, रवूनं गुरं चरायला नेली. उन्हं डोईवर आली तसे आबासाहेब गोठय़ापाशी परतले. सर्जा अजून परतला नसल्यानं ते चिंताक्रांत झाले. त्याला हाळ्या दिल्या, पण प्रतिसाद आला नाही. अखेर सर्जाला लवकर आणण्याचा निरोप गडय़ांपाशी देऊन ते घराकडं रवाना झाले.

घरी परतल्यावर राऊआज्जीनं सर्जाबद्दल विचारणा केली. आबांनी शेतातला वृत्तान्त सांगताच तिला बरंही वाटलं आणि काळजीही वाढली. सर्जाच्या बापासह चुलते, सख्खी चुलत भावंडं एकेक करून सगळे शेतात येत राहिले. त्यांना हळूहळू उलगडा होत गेला.

सकाळीच शेतात आलेला सर्जा काही वेळ गोठय़ापाशी रेंगाळून कुठंतरी निघून गेला होता यावर त्यांचं दुमत नव्हतं. पण तो कुठे गेला असेल यावर एकमत होत नव्हतं. ‘सगळी शेरडं जागेवर आहेत. पण साहेब्या, मंगी आणि पाडशाचा पत्ता नव्हता. खेरीज सकाळपासून मक्याचा आवाजही कानी पडला नाही..’ असं गडय़ांनी सांगताच सगळेच बेचन झाले. चहुदिशेला माणसं पांगली. एक-दोघं तर थेट रवूनं गुरं जिथं नेली होती तिथंपर्यंत जाऊन आली. दोन दिवसावर घरात सागुतीचा कार्यक्रम ठेवलेला आणि आपला मुलगा जागेवर नाही. शिवाय निवदासाठीचा बळी साहेब्याही जागेवर नसल्याने सर्जाचा बाप दीनानाथ हैराण झाला. त्याचा अस्वस्थ निरोप मिळताच आबासाहेब मिळेल त्या वाहनाने वस्तीवर आले. आपली चाहूल लागताच शेपटाचा गोंडा घोळणारा मक्या जागेवर नसल्याचं आपल्या लक्षात कसं आलं नाही याचं त्यांना नवल वाटलं. मक्याचा साथीदार टिकल्या उदास बसून होता. ते पाहून त्यांना आणखीनच कसंतरी वाटलं. काहीतरी गडबड आहे हे त्यांनी ओळखलं. मक्या, साहेब्या, मंगी, पाडशा आणि सर्जा हे सगळे एकत्रित कुठंतरी गेले असावेत. नाही तर मग काही आपल्या वाईटावर असलेल्यानं काही भलंबुरं केलं असावं असं त्यांना वाटू लागलं. दरम्यान, सगळेजण शोधमोहिमेत गुंतले. शेतं, विहिरी, बांध, माळराने, झाडं, झुडपं, आडोसे, घळी सगळीकडं शोधाशोध सुरू झाली..

शिंकाळ्यात ठेवलेल्या भाकरी जागेवर नसल्याचं जेव्हा घरातल्या बायकांच्या ध्यानात आलं तेव्हा त्या घाबरूनच गेल्या. एव्हाना सर्जा बेपत्ता झाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. जिकडं तिकडं त्यावर चर्चा सुरू झाल्या. लोक हरतऱ्हेच्या शंकाकुशंका व्यक्त करू लागले. इकडं सर्जाचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. बघता  बघता संध्याकाळ उलटून गेली, अंधार दाटू लागला तसे सगळेच काळजीत बुडाले. आजूबाजूची गावंदेखील धुंडाळली तरी काहीच खबर येत नव्हती.

ती रात्र आबासाहेबांच्या कुटुंबास फार जड गेली. दुसरा दिवस उजाडला. पोलीस पाटलाकडे तक्रार दिली गेली. जोमानं शोध सुरू झाला. सर्जावरचं संकट दूर होऊन तो सुखरूप परत यावा म्हणून मंदिरात नामस्मरण सुरू झालं. कुडमुडय़ाकडं जाऊन कवडय़ाची गणितं मांडून झाली. देवीचा कौल घेऊन झाला. जो-तो आपल्या परीनं साकडं घालू लागला. हा-हा म्हणता अख्खं गाव सर्जात गुंगलं. दुसरा दिवसही रिकामाच गेला..

रविवारची पहाट उजाडली. गावाबाहेरल्या बोराटीच्या माळावर राहणाऱ्या राणूबाईच्या घराचं दार सकाळीच वाजलं. दारात नातू गणा होता. एसटीतून उतरताच शेरडाकुत्र्यासह सर्जा बेपत्ता असल्याची चर्चा त्याच्या कानी पडल्याने तो कमालीचा अस्वस्थ होता. राणूबाईनं दार उघडताच त्यानं तिला सर्जाबद्दल विचारलं. ती एकटीच घरात असल्यानं आणि घरात कुणाची ये-जा नसल्यानं तिला सर्जा बेपत्ता झाल्याची बातमीच कळली नव्हती. कामावर खाडा करून गणा गावाला जाणार आहे, हे माहिती असल्यानं सर्जाबद्दल विचारपूस करायलाही कुणी आलं नव्हतं. सर्जाची बातमी कळताच राणूबाईला धक्का बसला. कारण गायब झालेल्या दिवशीच सकाळी गणा घरी असल्याची चौकशी करायला सर्जा आला होता. राणूबाईनं ही माहिती सांगताच गणानं कपाळाला हात लावला. दुसऱ्याच क्षणी त्यानं राणूआजीला कवटाळलं. सर्जाला घेऊनच परततो, असं सांगत तो दाराबाहेर पडलादेखील. चकित नजरेनं राणूबाई दाराकडं बघत त्याला हाका मारत राहिली, पण तो निघून गेला होता.

अन्याबाची सायकल घेऊन गणानं घाईनंच मान्यांची वस्ती गाठली. चाऱ्याची पेंडी कॅरीअरला बांधली, तोवर टिकल्या तिथं आलाच. त्याला चाऱ्याच्या पेंडीवर बसवून हँडलला दावं अडकवलं. बाकीच्या गडय़ांनी हाकारे द्यायच्या आधी तो तिथून निघूनही गेला. भराभरा पायडल मारत तासात त्यानं येवतीची टेकडी गाठली. त्यानं मक्याच्या परिचयाची शिटी वाजवली, पण प्रतिसाद आला नाही. मग तिथंच सायकल लावून त्यानं शोधाशोध सुरू केली तर काही अंतरावर चिलारीच्या बेचक्यात साहेब्याच्या गळ्यातली घंटी बांधलेली दिसली. बारकाईनं माती निरखली तसं त्याला कोल्ह्यची पावलं दिसली. त्यानं टिकल्याला खाली सोडलं. माती हुंगताच तो धावतच कर्दळीच्या जंगलाच्या दिशेनं सुसाटला. गणा त्याच्या मागोमाग धावत सुटला. तासभर ती दोघं धावत होती. जंगलाच्या अखेरीस असलेल्या टेकाडापाशीच टिकल्या थांबला. खाली बघत त्यानं भुंकायला सुरुवात करताच पलीकडून भुंकण्याचा प्रतिसाद आला. धाप लागलेल्या अवस्थेत गणाही तिथं आला. त्यानं नेहमीची शिटी वाजवताच झाडांच्या दाटीतून मक्या बाहेर आला. तो बऱ्यापैकी जखमी होता. त्याच्यामागोमाग एकेक करून थकलेल्या अवस्थेत सगळेच बाहेर आले. सर्जाने तर गणाला घट्ट मिठीच मारली. त्याचे अश्रू पुसत गणाने सगळी हकीकत जाणून घेतली.

शेतातून निघाल्यानंतर दिवसभर ते येवतीच्या टेकडीपाशी झाडीत बसून होते. मध्यरात्री कोल्ह्य़ाची चाहूल लागताच मक्या भुंकू लागला. सावध असलेल्या कोल्ह्यने हल्ला केला. त्यात साहेब्या जखमी झाला. पण आडदांड मक्याच्या प्रतिहल्ल्यानं कोल्हा पळून गेला. तरीही मक्या वेडय़ासारखा त्याच्या मागं धावत सुटला. इच्छा असूनही शेरडांच्या काळजीपायी सर्जा त्याच्या मागं धावू शकला नाही. सकाळ होताच साहेब्याच्या गळ्यातली घंटा झाडास बांधून ते मक्याच्या शोधात निघाले ते थेट सांजेलाच भेटले. रस्ता चुकल्यामुळे रात्रभर टेकाडाखालच्या झाडीत बसून राहिले. ऐतवारी उन्हं डोक्यावर यायच्या बेतास असताना टिकल्याच्या आवाजानं त्यांच्या जिवात जीव आलेला..

त्या दिवशी मान्यांच्या घरी सागुती झाली. जेवण गोडाचंच झालं. या घटनेला आता काही दशकं लोटलीत. प्रौढत्वाकडे झुकलेला सर्जा आता बिनघोरी ‘नळ्या फोडतो.’ साहेब्या, मंगी, पाडशा, मक्या, टिकल्या सगळेच काळाच्या पडद्याआड गेलेत. सर्जा जेव्हाही शेतात मुक्कामास असतो तेव्हा त्याच बाभळीखाली झोपतो- जिथं कधीकाळी बालपणी तो त्याच्या मुक्या सवंगडय़ांना घेऊन निजत असे. आता अस्सल काहीच उरलेलं नाही. निष्पर्ण झालेल्या बाभळीत तेव्हाच्या रात्रींत अडकलेला चंद्र मात्र अजूनही तिथंच आहे. गतकाळातील त्या निरागस क्षणांचे थिजलेले प्रतिबिंब त्यात स्पष्ट दिसते!

(उत्तरार्ध)

sameerbapu@gmail.com

First Published on July 7, 2019 12:02 am

Web Title: sameer gaikwad story 2
Just Now!
X