मनोहर पारनेरकर samdhun12@gmail.com

जमावाचा हिंसाचार म्हटला की बऱ्याच वेळा आपल्या डोळ्यासमोर येतो तो एखादा खेळाचा सामना.. सहसा फुटबॉलचा (या खेळाच्या बाबतीतली सर्वात वाईट दुर्घटना म्हणजे १९८९ साली हिल्सबरोमधला सामना- ज्यात ९६ लोक मृत्युमुखी पडले होते.), नाहीतर एखाद्या पॉप किंवा रॉक संगीताचा कार्यक्रम! (यासंदर्भात १९९९ सालचा रॉक संगीताचा ‘वूडस्टॉक महोत्सव’ आठवतो.) याचं कारण- अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये किंवा फेस्टिव्हल्समध्ये येणाऱ्या प्रेक्षक / श्रोत्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात असणारी हुल्लडबाज प्रवृत्तीच्या लोकांची उपस्थिती! याउलट, पाश्चात्य अभिजात संगीताच्या कॉन्सर्टला- विशेषकरून त्याच्या पहिल्या प्रयोगाला गर्दी करणारी मंडळी आढय़ताखोर असली तरी शिष्टाचारी असतात. प्रयोग त्यांच्या किती जरी नापसंतीचा असला तरी ते सहसा रानटीपणे दंगल वगैरे करणारे नसतात. पण २९ मे १९१३ च्या रात्री पॅरिसच्या Theatre des Champs- Elysees या सभागृहात नेमकं असंच घडलं.

या लेखात ज्या बॅलेची (‘बॅले’ म्हणजे शब्द न वापरता संगीताच्या आधारे कथा सांगणारे नृत्यनाटय़!) कथा मी सांगणार आहे, ती पूर्णत: सत्य असून तिचे व्यवस्थित दस्तावेजीकरण झालेले आहे.

ही मुख्य कथा स्ट्रॅव्हिन्स्कीच्या क्रांतिकारी ‘द राइट ऑफ स्प्रिंग’ (The Rite of  Spring) या बॅलेची आहे. पाश्चात्य शास्त्रीय संगीतातील अनेक संकेतांची मोडतोड करून नवीन वाट चोखाळणारा आणि रुजवणारा म्हणून प्रसिद्ध पावलेला असा हा विसाव्या शतकातला बॅले आहे. त्याचबरोबर या बॅलेच्या पॅरिसमधील प्रीमियरच्या वेळी १९१३ साली दंगलीची ठिणगी कशी पडली, ही त्याची चित्तथरारक उपकथा किंवा story within the Story पण आहे.

 

या अभिनव आणि कल्पक बॅलेमुळे विसाव्या शतकातील पाश्चात्य शास्त्रीय संगीताच्या जगात जणू भूकंपच झाला. आणि या बॅलेमुळे सांगीतिक जगातल्या चार गोष्टींमध्ये क्रांतिकारी बदल झालेले दिसून येतात. एक म्हणजे मेलडी, हार्मनी आणि ऱ्हिदम या तीन घटकांच्या संकल्पनेत आमूलाग्र बदल झाला. हे तीन घटक (ज्यांना आपण ‘building blocks’ म्हणू या.) पाश्चिमात्य संगीताचे आधारस्तंभ आहेत.. त्याचं रूप आहेत. दुसरं म्हणजे या बॅलेमुळे केवळ पाश्चात्य शास्त्रीय संगीतातच नव्हे, तर बॅले या नृत्यप्रकारातदेखील आधुनिकतावादाचं दणक्यात आगमन झालं. तिसरं म्हणजे यामुळे स्ट्रॅव्हिन्स्कीची आधुनिकतावादी चळवळीचा प्रणेता म्हणून स्थापना झाली. त्याचबरोबर त्याला या बॅलेनं रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. आणि चौथं म्हणजे- या बॅलेच्या १९१३ सालच्या प्रीमियरला दंगल झाली.

इगोर स्ट्रॅव्हिन्स्की (१८८२-१९७१)

स्ट्रॅव्हिन्स्कीचा जन्म रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात झाला. सुरुवातीला तो पॅरिसमध्ये कार्यरत होता. पण शेवटी १९३९ साली त्यानं अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं. चित्रकलेच्या क्षेत्रात २० व्या शतकातील आधुनिक चित्रकलेत पाब्लो पिकासोचं जे स्थान आहे, तेच स्थान २० व्या शतकातील पाश्चात्य शास्त्रीय संगीतात स्ट्रॅव्हिन्स्कीचं आहे. पुढील दोन गोष्टी आपल्या या हीरोला विसाव्या शतकातील इतर संगीतकारांपासून वेगळ्या करतात. एक म्हणजे त्यानं स्वत:चा आणि आधुनिक संगीताचा पुनर्शोध कधीही थांबवला नाही. आणि दुसरं म्हणजे विविध काळांतील विविध शैलींमध्ये तो सहजतेने संचार करू शकत होता. पिकासोचा आणि त्याचा हा गुण अगदी मिळताजुळता आहे. एका भाष्यकाराने स्ट्रॅव्हिन्स्कीचं इतिहासातील स्थान अतिशय योग्य शब्दांत सांगितलं आहे. तो म्हणतो- ‘‘दीर्घकालीन सर्जकता, अनेक शैलींत केलेला चमकदार, सहज संचार आणि जवळजवळ जागतिक कीर्ती या गोष्टींचा साकल्याने विचार करता विसाव्या शतकातील दुसरा कुणीही संगीतकार स्ट्रॅव्हिन्स्कीच्या जवळपास येऊ शकत नाही.’’

‘द राइट ऑफ स्प्रिंग’ हा बॅले नक्की काय आहे? ‘Pictures From Pagan Russial (‘पेगन रशियातील प्रतिमा’) हे या बॅलेचं एक उपशीर्षक आहे. (यासंदर्भात ‘पेगन रशिया’ म्हणजे ज्यावेळी कोणतेही महत्त्वाचे संघटित धर्म अस्तित्वात नसलेला मूर्तिपूजक रशिया!) एका निवडलेल्या तरुण स्त्रीचा वसंत ऋ तूच्या देवतांना बळी दिला जातो- अशा या पेगन रशियामधील एका रूढीचं चित्रण या बॅलेत आहे. इतिहासपूर्वकालीन रशियातल्या काही जमाती शेतात भरघोस पीक यावं म्हणून हा बळी देण्याचा विधी करत असत. या विधीचं अतिशय जोमदार, प्रभावशाली आणि बरंचसं भयावह चित्रण या बॅलेमध्ये केलेलं आहे. त्याचं संगीत मात्र पाश्चात्य, भारतीय किंवा इतर श्रोत्यांना विसंवादी आणि तापदायक वाटेल असं आहे.

या बॅलेत स्ट्रॅव्हिन्स्कीबरोबर काम केलेल्या तीन थोर कलाकारांपैकी निकोलाय रोअरिच (१८७४-१९४७) हा एक होता. (दुसरे दोघे म्हणजे सेरगी डिआगुलेफ आणि वास्लाव निजिन्स्की. यातला डिआगुलेफ हा ‘बॅलेस रूस’ या प्रसिद्ध बॅले कंपनीचा निर्माता-दिग्दर्शक होता. तर निजिन्स्की हा बॅलेच्या इतिहासातील एक महान नर्तक आणि कोरिओग्राफर होता.) निकोलाय रोअरिचने या बॅलेच्या निर्मितीत आणि संकल्पनेत स्ट्रॅव्हिन्स्कीला फार मोठी मदत केली होती. त्याचा पुढे भारताशी फारच जवळचा संबंध आला तो असा : रोअरिच हा चित्रकार, डिझायनर, मानवशास्त्राचा गाढा अभ्यासक आणि गूढवादी होता. मॉडर्न आर्ट आणि संस्कृतीच्या विकासाला त्याचे महत्त्वाचे योगदान आहे. त्याला मुळातच  mysticism आणि  orientalism चे प्रचंड आकर्षण असल्यामुळे आयुष्याचा शेवटचा काळ त्याने भारतात घालवला. १९२८ ते १९४७ पर्यंत कुलू खोऱ्यात असलेल्या हिमालयन रिसर्च सेंटरचा तो संचालक होता. आणि वाचकांना नक्कीच आवडेल अशी माहिती : निकोलायचा दुसरा मुलगा स्वेतलाव रोअरिच (१९०४-१९९३) हादेखील प्रख्यात चित्रकार होता. तो भारतात स्थायिक झाला आणि त्याने सिनेसृष्टीतील त्याकाळची अभिनेत्री देविकाराणी (१९०८-१९९४) बरोबर विवाह केला होता. देविकाराणी ही भारतीय चंदेरी पडद्यावरील पहिली नायिका होती. तिचा पहिला विवाह हिमांशू रॉय (१८९२-१९४०) यांच्याशी झाला होता. रॉय हे प्रसिद्ध ‘बॉम्बे टॉकीज’ या फिल्म कंपनीचे संस्थापक, संचालक, निर्माते व दिग्दर्शक होते.

‘द राइट ऑफ स्प्रिंग’ या बॅलेचा प्रीमियर २९ मे १९१३ रोजी पॅरिसच्या Theatre des Champs- Elysees मध्ये झाला. हे थिएटर त्यावेळी नुकतंच काही आठवडय़ापूर्वी- नेमकं सांगायचं तर २ एप्रिल १९१३ रोजी सुरू झालं होतं. त्यावेळी हा बॅले बघायला आलेल्या उच्चभ्रू प्रेक्षकवर्गाला चायकॉवस्कीच्या ‘स्वान लेक’, ‘स्लीपिंग ब्युटी’ आणि ‘नटक्रॅकर’ यासारखे गुळगुळीत, आकर्षक, मोहक, अभिरुचीसंपन्न बॅले बघण्याची सवय होती. साहजिकच या बॅलेमध्ये असलेला युरेशियातल्या पेगन संस्कृतीतला बळी देण्याचा विधी हे प्रकरण त्यांच्यासाठी धक्कादायकच होतं. इतकंच नव्हे तर स्ट्रॅव्हिन्स्कीचं तिरकस, कर्णकटू आणि अत्यंत गुंतागुंतीचा ऱ्हिदम असलेलं संगीत त्यांना अस झालं. त्यात भर पडली निजिन्स्कीची कोरियोग्राफी आणि रोआरिचचं अपिरिचित व चमत्कारिक नेपथ्य आणि वेशभूषेची. थोडक्यात.. समोर जे चाललं होतं ते प्रेक्षकांच्या सहनशक्तीची परिसीमा गाठणारं आणि जणू त्यांच्यावर जुलूम केला जातोय असं वाटायला लावणारं होतं.

‘त्या’ दंगलीची कथा..

मे २९ च्या रात्री नक्की काय घडलं याचा  ‘आँखो देखा हाल’ वृत्तान्त पुढे देत आहे. या वृत्तान्ताच्या खरेपणावर फारच कमी प्रश्नचिन्हं उठविली गेली असल्यामुळे हा त्यातल्या त्यात खरा वृत्तान्त मानला गेला आहे.

‘बॅले’चा खेळ चालू असताना तो सुरू राहावा आणि तो बंद करावा असं मत असलेल्या दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि ती वाढतच गेली. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. ते मध्यंतराच्या वेळेला आले आणि शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वीही झाले. परंतु मध्यंतरानंतर जेव्हा खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा पुन्हा गडबड, गोंगाट आणि आरडाओरडा सुरू झाला आणि त्याचं रूपांतर जोरदार धुमश्चक्रीत झालं. त्यावर नियंत्रण मिळवण्यात मात्र पोलीस अयशस्वी ठरले. स्वत: स्ट्रॅव्हिन्स्कीला तेथून पळ काढावा लागला. ‘एक्सपोझिशन अँड डेव्हलपमेंट’ या आपल्या पुस्तकात या घटनेचं वर्णन करताना तो लिहितो.. ‘‘इतका राग मला कधीच आला नव्हता. हे संगीत माझ्या माहितीचं होतं. माझं आवडतं होतं. आणि ते न ऐकताच लोकांना त्याला विरोध करावासा का वाटावा, हेच मला कळत नव्हतं.’’

त्या रात्री प्रेक्षकांमध्ये अनेक मान्यवर उपस्थित होते. १९०३ पासून पॅरिसमध्ये स्थायिक झालेली प्रख्यात अमेरिकन लेखिका गटर्र्ड स्टाईन (Gertrude stein), जाँ कुक्तू (Jean cocteau.. हा पुढे सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध झाला. त्यावेळी त्याचे वय २३ वर्षांचे होते.), तसंच केमिल सेसाँ (Camille saint-saens), क्लॉड देबुसी (Claude Debussy) आणि मोरीस रावेल (Maurice Ravel) हे फ्रान्समधले तीन प्रख्यात संगीत रचनाकार या खेळाला उपस्थित होते. त्यातला केमिल सेसाँ हा थिएटरमधून बाहेर पडला, तर देबुसी आणि रावेल शेवटपर्यंत होते.

२०१३ साल हे या बॅलेचं शताब्दी वर्ष! २९ मे २०१३ रोजी या बॅलेचा शताब्दी वर्षांच्या निमित्ताने पुन्हा शो झाला आणि तो अखंडपणे, कुठलाही व्यत्यय न येता सादर केला गेला.

या बॅलेच्या आरंभाला अपशकून झाला होता. मात्र त्यानंतर अडखळत, टक्कटोणपे खात त्याची वाटचाल झाली आणि स्ट्रॅव्हिन्स्कीची ही क्रांतिकारी कलाकृती २१ व्या शतकात दिमाखदार रीतीने प्रवेश करती झाली. पण वैयक्तिकरीत्या व्हालेरी गेरगेव्हने (हा सेंट पीटर्सबर्गमधील जागतिक कीर्तीच्या मारिन्स्की थिएटरचा दीर्घकाळ कला-दिग्दर्शक आणि कंडक्टर आहे. स्ट्रॅव्हिन्स्कीचा जन्मदेखील पीटर्सबर्गमधलाच.) एकामागोमाग केलेले या बॅलेचे दोन शो ऐतिहासिकदृष्टय़ा दोन कारणांसाठी मला सर्वात जास्त महत्त्वाचे वाटतात. एक म्हणजे गेरगेव्हने शंभर वर्षांपूर्वी ज्या पॅरिसमधल्या थिएटरमध्ये या बॅलेचा प्रीमियर झाला होता त्याच थिएटरमध्ये ही कॉन्सर्ट सादर केली. आणि दुसरं म्हणजे फ्रेंच लोकांनी व्हालेरी गेरगेव्हला हा मान देऊन एक प्रकारे या बॅलेच्या रशियन संबंधावर ठामपणे शिक्कामोर्तब केले. (स्ट्रॅव्हिन्स्की आणि गेरगेव्ह हे दोघेही रशियन आहेत. पण दोघांचा सोव्हिएत युनियनशी संबंध आला नाही. स्ट्रॅव्हिन्स्की हा झारशाहीतला, तर गेरगेव्ह हा पुतीनकाली रशियातला.)

जाता जाता..

सोपान सदाशिव पेठकर या माझ्या मित्राला मी ‘द राइट ऑफ स्प्रिंग’चं संपूर्ण पुराण ऐकवलं, पण त्याच्यावर ढिम्मदेखील परिणाम झाला नाही. तो शांतपणे एवढंच म्हणाला, ‘‘त्यात काय आहे एवढं? मला तर हे पाश्चात्य मंडळींचं ‘घाशीराम कोतवाल’च आहे असं वाटलं.’’ सोपानला मी जे उत्तर दिलं ते मी राखून ठेवतो.. कारण त्यासाठी मला ‘सांगतो ऐका’ सदरात कदाचित आणखी एक लेख लिहावा लागेल.

शब्दांकन : आनंद थत्ते

(ता. क. : या लेखातील फ्रेंच नावांच्या उच्चारांबद्दल मतभिन्नता असू शकते.)