19 February 2020

News Flash

अलिप्तता

वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या काही आत्महत्यांच्या वृत्तांनी मला धक्का बसला आहे. आईने आपल्या मुलांसह उंचावरून उडी मारणे, विष प्राशन करणे, प्रसंगी दहन करून घेण्याचा आततायी प्रयत्न

| November 18, 2012 04:14 am

वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या काही आत्महत्यांच्या वृत्तांनी मला धक्का बसला आहे. आईने आपल्या मुलांसह उंचावरून उडी मारणे, विष प्राशन करणे, प्रसंगी दहन करून घेण्याचा आततायी प्रयत्न करणे या साऱ्या बातम्या मला विचारमग्न करतात. कोणतीही आत्महत्या क्लेशकारकच. पण नैराश्य, भीती किंवा इतर कोणत्याही कारणास्तव मृत्यू जवळ करताना त्या अश्राप छोटय़ा जिवांचे काय? आपल्या माघारी त्यांचा छळ नको हा आईचा युक्तिवाद एकांगी नव्हे का? ज्यांनी अजून जीवन पूर्णपणे पाहिले, अनुभवलेलेही नाही, त्यांना कोणत्याही न केलेल्या गुन्ह्य़ाची शिक्षा का? ते तिच्यापोटी जन्मले हा काही त्यांचा गुन्हा नाही. पण अविचाराची शिक्षा अश्राप जिवांना भोगावी लागतेय हेच सत्य आहे.
या विचारांच्या गर्तेत असतानाच माझ्या भावाने एक ई-मेल पाठवली. आयुष्यातल्या अलिप्ततेवर बोट ठेवणारा संदेश होता. एखाद्या कसलेल्या नटाला भूमिका जगताना रंगमंचावर नाटक चालू असताना प्रेक्षागृहात वाजलेला मोबाईल ऐकू यावाच का? तो भूमिकेत शिरल्यावर स्वत:च्या वर्तमान वास्तवापासून अलिप्त व्हायला नको का? रंगमंचावर वावरताना ‘स्विच ऑन, स्विच ऑफ’ या पद्धतीची त्याची वागणूक नसावी का? त्याने अलिप्तता प्रयत्नपूर्वक अंगीकारायला हवी. जे नटाचे तेच गायकाचे. एखादा सूर, एखादी तान गळ्यातून निघावी, हृदयातून तारा झंकारल्या जाव्यात, पण मेंदू मात्र त्यापासून वेगळा रहावा. कारण विचार जर त्याच सुरा-स्वरात अडकले तर पुढची हरकत घेता येणार नाही. उत्तम गवई हा असा अलिप्त राहायला शिकतो.
कार्यालयात वरिष्ठ पदावर काम करताना भरताचा आदर्श पुन:पुन्हा आठविण्यासारखा. ‘इदं न मम् ।’ म्हणत प्रभू रामचंद्रांच्या पादुका सिंहासनावर ठेवून कारभार चालविणाऱ्या भरताने अलिप्त वृत्तीची परिसीमा गाठली आणि पुढच्या अनेक पिढय़ांना एक स्वच्छ दृष्टांत घालून दिला की, ‘खुर्चीवर बसल्यावर तुमच्यामुळे प्रगती होईल, तिला गती देणारे चाक बना, पण गतीत गुंतून पडू नका.’
आयुष्याचेही नेमके असेच आहे. खलील जिब्रानचा उँ्र’१िील्ल हा प्रसिद्ध उतारा मला आठवतोय. तुमची मुले तुमच्यापासून येतील, पण तरीही ती तुमची मालमत्ता नसतील. त्यांना स्वत:चा विचार अन् आचार असेल. त्यांना गृहीत धरू नका. आज मुले मोठी होताना अनेकदा आपल्याला आपल्या अपेक्षांना मोडता घालावा लागतो, हे कटु सत्य आहे. तेव्हा आपल्याला ही अलिप्तपणाची जाणीव विचारपूर्वक स्वीकारावी लागेल. ती एका दिवसात अंगीकारणे शक्य होणार नाही; तर प्रयत्नपूर्वक त्यासाठी मनाची तयारी करावी लागेल. त्यासाठी ‘गुंतुनि गुंत्यांत साऱ्या; पाय माझा मोकळा’ म्हणणाऱ्या सुरेश भटांची तरलता अंगी बाणवावी लागेल. छंद- जोपासावे लागतील; मग त्यात कधी बागकाम असेल तर कधी संगीत. पण हे छंद त्या मनाविरुद्ध घडणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला जमतील-जोपासतील. अलिप्तता ही ऐच्छिक असावी. ती आतला आवाज असावी. ती अपरिहार्य आणि अपारदर्शक नसावी. तिचे खुल्या मनाने स्वागत व्हावे. अलिप्तता म्हणजे मनाचे कवाड बंद करणे नव्हे तर इतरांना त्यांच्या इच्छेनुसार जगू देण्यासाठी उघडलेले हृदयाचे झाप होते. अलिप्तता तुम्हाला नवे मार्ग दाखवील; जीवनाची नवी क्षितिजे खुली होतील. नवे मैत्र लाभतील आणि जीवन संपवायचे कशाला? ते अशाही पद्धतीने जगता येते याचा साक्षात्कार होईल. अलिप्त व्यक्ती कुटुंबीयांना अधिक  हव्याहव्याशा वाटू लागतील आणि मग वर्तुळाचा न्याय पूर्ण होऊन ‘हरवले ते गवसले’ अशी अवस्था होईल.
..सणासुदीच्या आणि कौटुंबिक जिव्हाळ्याच्या दिवसांत मी हा असा विचार का करतो आहे, असा प्रश्न पडेल, पण प्रगल्भता प्रयत्नपूर्वक जोपासायची तर प्रतिपदेपासून शुभारंभ का नसावा?

First Published on November 18, 2012 4:14 am

Web Title: sanjayuvach
Next Stories
1 निर्मळ, प्रांजळ पण पसरट आत्मचरित्र
2 विक्राळ लेखकाची पहिली कादंबरी
3 इतिहास जपणारा कादंबरीकार
Just Now!
X