‘एक झुलता पूल’ची विद्यापीठातील तालीम संपवून जात असताना एक दिवस आमच्या बायोकेमिस्ट्रीचे प्रोफेसर डॉ. जोशीसरांनी मला बघून स्कूटर थांबवली आणि माझ्याकडे ते असे पाहत राहिले, की जणू मीच त्यांना थांबवलंय. दीर्घकाळ स्तब्धता पाळल्यावर आमच्यात पुढील संवाद घडला.

: अं? मग..? आंबे विकत घेऊन ठेवलेत का?

: हो सर!

: कुठले घेतले?

: हापूसचे सर!

: किती?

: दोन डझन.

: एक्सलंट! कुठे ठेवलेत?

: डीप फ्रिझरमध्ये सर.

: कुठल्या?

: व्हरांडय़ामधल्या सर!

: नीट रॅप केलेत?

: हो सर. पॅकिंगच्या जाड पॉलिथिनमध्ये.

: मधून मधून चेक करा. साल पूर्ण काळी पडली पाहिजे.

: हो सर..

: लिसन.. पल्पसाठी एक मिक्सर आणावा लागेल..
मी पुढचं काही म्हणेपर्यंत सर आले तसे एकदम गुल! आता हा वरचा संदर्भविरहित संवाद आमच्या नाटकात असंगत (absurd)म्हणून सहज खपेल. पण जर संदर्भ समजला तर हाच संवाद एकदम वास्तववादी (realistic) होईल. तर झालं होतं असं की, ७१-७२ हे आमचं एम. एस्सी.चं फायनल इयर. पुरुषोत्तम करंडक स्वीकारताना खरं तर मला समोर दिसत होते सालं काळी पडलेले डीप फ्रिझरमधले आंबे. शेवटच्या सेमिस्टरला- म्हणजे जानेवारी ते एप्रिल- आम्हाला लेखी परीक्षेऐवजी एक ‘रिसर्च प्रोजेक्ट’ असायचा. तो प्रयोगशाळेत प्रोफेसरांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून त्यावर प्रदीर्घ निबंध लिहून सादर करायचा असे आणि मग त्यावर तोंडी परीक्षा होत असे. त्यासाठी बाहेरच्या विद्यापीठातले तज्ज्ञ प्राध्यापक येत असत. जोशीसरांनी मला आंबे आणून ठेवायला मे-जूनमध्ये सांगितलं होतं. कारण आंब्यामधल्या प्रोटिन्सच्या पृथ:करणावर आधारित माझा संशोधन प्रकल्प असणार होता. जो मी सप्टेंबर ७१ अखेर सुरू करून प्रयोग, निरीक्षणं आणि त्यांचं लिखाण मार्च ७२ अखेर संपवणं हे टाइमबाऊंड होतं. त्याची आठवण जोशीसरांनी आमच्या तालमी ऐन रंगात आलेल्या असताना करून दिली होती. त्यामुळे पुरुषोत्तम करंडक घेताना मला हातात आमच्या बायोकेमिस्ट्री लॅबच्या मोठय़ा डीप फ्रिझरमधे उणे सत्तर अंश सेन्टीग्रेड तापमानात ठेवलेले, सालं काळी पडलेले आंबेच दिसत होते.

बघता बघता वर्ष संपून ७२ साल सुरू झालं. आता मे महिन्यात एम. एस्सी. झाल्यावर सगळंच संपणार. मग नोकरी की पीएच. डी.? आणि मग नाटक? अशी परत घालमेल सुरू. फग्र्युसनमधून बी. जे. मेडिकलला गेलेले आमचे मित्र एमबीबीएस संपून इंटर्नशिपसाठी सहा-सहा महिने पुण्यापासून ६०-७० कि.मी.वर असलेल्या शिरूरमधल्या बी. जे. मेडिकल आणि राज्य आरोग्यसेवेच्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात पोस्टिंगवर होते. त्याला ‘शिरूर मंगल कार्यालय’ म्हणत असत. कारण अनेकांची लग्नं या इंटर्नशिपच्या काळात या परिसरात जमत असत. प्रेमात पडण्यासाठी शिरूर आरोग्य केंद्राची परिस्थिती अत्यंत अनुकूल होती. बऱ्याचजणांना कवितादेखील इथे  होत असत. आमचा एक डॉक्टर मित्र.. त्याची मराठी भाषा उत्तम होती. तो अत्यंत शिवराळ आणि चावट कविता मंदाक्रांता, भुजंगप्रयात, शार्दुलविक्रीडित, मंदारमाला, वसंततिलका अशा वृत्तांत चोख बसवून ऐकवत असे. गावाबाहेर असणारा सुसज्ज आरोग्य केंद्राचा परिसर. मस्त होस्टेल. त्याची मेस विद्यार्थी स्वत: चालवीत असत. त्यामुळे चमचमीत पदार्थाची चंगळ. शेजारीच टेकडी. आणि जवळच दुष्काळ नसल्यास वाहणारी नदी.. असा सगळा रोमँटिक सीन.
इकडे ७२ मे’मध्ये आमची एम. एस्सी.ची शेवटची सेमिस्टर एकदाची संपली. आमच्या वर्गात एकंदर १५-१६ विद्यार्थी होते. सगळ्यांना नोकरी, पीएच.डी., परदेशी विद्यापीठात जाण्याचे वेध लागले. मी नाटक सांभाळून नोकरी कशी करता येईल, या विचारात. आमची विचार करण्याची जागा होती मुठा नदीवरचा ओंकारेश्वर मंदिरापलीकडच्या काठावरचा वृद्धेश्वर मंदिराचा दगडी घाट. पानशेत पुरानंतर या घाटाची पडझड झालेली असली तरी संध्याकाळी निवांत बसायला त्यावेळी तरी ती बऱ्यापैकी शांत आणि हो- स्वच्छही जागा होती. माझा शेवटच्या सेमिस्टरचा अभ्यासही बऱ्याचदा या घाटावरच चाले. सोबत माझा वर्गमित्र असायचा. विक्रम घोले. ही जागा आम्हाला सोयीची जायची, कारण मी शनवारातून कॉजवेवरून घाटावर जायचो आणि विक्रम घोले हा बालगंधर्व रंगमंदिरासमोरून घोले रोडवरून यायचा. विक्रम घोले हा- ज्यांच्यावरून ‘घोले रोड’ नाव दिलं गेलं ते सत्यशोधक समाजाचे एक संस्थापक, महात्मा जोतिबा फुले यांचे महत्त्वाचे सहकारी, निष्णात सर्जन डॉ. विश्राम रामजी घोले (१८३३- १९००) यांचा थेट पणतू! घोल्यांची बालगंधर्व रंगमंदिरासमोर चार मजली मोठी चाळ होती. नुकतीच ती बिल्डरने पाडली. तळमजल्यावर बरीच दुकानं. त्यामधूनच अंधाऱ्या व्हरांडय़ातून वर जाणारे अत्यंत चिंचोळे जिने. ते मूळचे सरळ; पण इमारतीच्या वृद्धापकाळाने वाकलेले. एका मजल्यावरचा जिना संपला की एक अंधारा पॅसेज आणि त्यामधून चालत गेलं की दुसरा जिना. एकदम वरच्या अख्ख्या मजल्यावर विक्रमचं घर होतं. नाटकवाल्यांचा लाडका ‘राजहंस’ नावाचा बारही चाळीच्या तळमजल्यावरच रस्त्याला लागून होता. आता या जिन्याचं एवढं वर्णन करण्याचं कारण म्हणजे- पुढे ७८ मध्ये ‘बेगम बर्वे’ हे नाटक लिहिताना माझ्यासमोर असलेला जिना आणि जिन्याखालचा अंधार हा याच चाळीतला होता.असेच घाटावर बसलेलो असताना एक दिवस विक्रम म्हणाला की, बी. जे. मेडिकल कॉलेजच्या बायोकेमिस्ट्री विभागात एका रिसर्च प्रोजेक्टसाठी एम. एस्सी. बायोकेम झालेले विद्यार्थी पाहिजेत. आपण जाऊन येऊ. तो लगेचच गेला आणि ससूनच्या बायोकेमिस्ट्रीचे हेड डॉ. डी. बी. देसाई यांच्या लॅबमध्ये रुजू झाला. काही दिवसांनी मी आपला तो काय करतोय बघावं म्हणून बी. जे.ला गेलो. विक्रम म्हणाला की, तुझं काही ठरेपर्यंत इथंच काम सुरू तर कर. त्याने माझी डॉ. देसाईंशी गाठ घालून दिली आणि मीपण त्याच्याबरोबर लॅबमध्ये रुजू झालो.

आमचं काम उमेदवारीचंच म्हणजे फुकट करायचं होतं. बी-१२ व्हिटामिनसंदर्भातील ते प्रोजेक्ट होतं. लॅबमधलं पहिलं उमेदवारीचं काम म्हणजे एप्रन घालून शेकडो टेस्ट-टय़ुब्ज (परीक्षानळ्या) डिर्टजटनी धुणं. त्या ओव्हनमध्ये कोरडय़ा करणं. गार झाल्यावर एकेक करीत कागदात रॅप करून र्निजतुक करण्यासाठी परत हॉट एअर ओव्हनमध्ये विशिष्ट तापमानात ठेवणं. दिवसभर हेच काम सुरूझालं. आमची लॅब बी. जे. मेडिकलच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर होती. शेजारी पॅथॉलॉजी विभाग. तळमजल्यावर कॉलेजचं ऑफिस होतं आणि शेजारी एक विभाग होता. त्याचं नाव दणदणीत होतं- ‘रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध विभाग’ . पण हा विभाग ‘पीएसएम’ या नावाने जास्त प्रचलित होता. मात्र, मेडिकलच्या इतर विषयांप्रमाणे या विषयाला ग्लॅमर नव्हतं. कारण हा विषय सार्वजनिक आरोग्यासंदर्भात होता. या विषयाचं सखोल मंथन ब्रिटिश राजवटीत १९४३-४६ दरम्यान नेमलेल्या सर जोसेफ भोर समितीच्या अहवालात केलं गेलं आहे. जोसेफ भोर (१८७८- १९६०) या केरळी सनदी अधिकाऱ्याने हा अहवाल संकलित करून भारतात प्रथमच सार्वजनिक आरोग्याच्या मूलभूत धोरणाची तत्त्वं निश्चित केली. स्वतंत्र भारतातातील सार्वजनिक आणि ग्रामीण आरोग्याची धोरणं याच अहवालावर आधारलेली आहेत. मेडिकल कॉलेजच्या अभ्यासक्रमात ‘पीएसएम’ या स्वतंत्र विषयाचा अंतर्भाव होण्यासही हाच भोर समितीचा अहवाल बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहे. हा अहवाल तयार करताना ब्रिटन आणि सोव्हिएत रशियामधल्या आरोग्यसेवा भोर समितीसमोर होत्या. ग्रामीण भागातली प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शहरांमधील झोपडपट्टय़ांनजीक असलेली नागरी आरोग्य केंद्रे ही या समितीचीच संकल्पना. ६० सालानंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यावर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य संकल्पनेला ठळक करण्यास ज्यांचा हातभार लागला त्यांपैकी प्रमुख म्हणजे बी. जे. मेडिकलच्या पीएसएम या नव्याने स्थापित झालेल्या विभागातील दोन प्रोफेसर- एक डॉ. न. शं. देवधर आणि दुसरे डॉ. प. वि. साठे! या दोघांनी सार्वजनिक आणि ग्रामीण आरोग्याच्या अनेक योजना तयार करण्यास राज्य व केंद्र शासनाला मदत केली. अनेक महत्त्वाच्या शासकीय पदांवर त्यांना वेळोवेळी नेमले गेले. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आरोग्य समित्यांवर त्यांनी कामं केली. डॉ. देवधर पुढे केंद्राच्या कोलकात्यातील राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्थेचे संचालक झाले, केंद्राच्या सार्वजनिक आरोग्यसेवेचे महासंचालकही झाले. तर डॉ. साठे राज्य वैद्यकीय शिक्षणाचे तसेच नंतर राज्य सार्वजनिक आरोग्यसेवेचे संचालक झाले. ख्यातनाम एपिडेमीऑलॉजिस्ट (साथीच्या रोगांचे तज्ज्ञ) म्हणून देशात, परदेशांत प्रसिद्ध झाले. ‘साथीच्या रोगांचे शास्त्र’ या विषयावर त्यांनी लिहिलेलं पाठय़पुस्तक प्रसिद्ध आहे. मुख्य म्हणजे या दोघांनी विद्यार्थ्यांच्या अनेक पिढय़ा घडवल्या. त्यांच्या संशोधनाला मार्गदर्शन केलं. अनेक हुशार डॉक्टरांना ७० ते ८० दरम्यान सार्वजनिक आणि ग्रामीण आरोग्य या क्षेत्रात येण्यास उद्युक्त केलं. चेन्नईच्या  भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या (आयसीएमआर)ोष्ट्रीय जानपदिक रोगविज्ञान संस्थेचा (‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ एपिडेमीऑलॉजी’) संस्थापक आणि संचालक झालेला डॉ. मोहन गुप्ते, जागतिक आरोग्य संघटनेच्या सेवेत गेलेला डॉ. सुभाष साळुंके, दिल्लीच्या आयसीएमआरच्या सेवेत गेलेले व आता निवर्तलेले डॉ. सी. आर. रामचंद्रन, भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजची संपूर्ण निगराणी करणारे डॉ. विजय करंदीकर, औरंगाबादहून आलेले डॉ. मधुकर दंडारे, एकत्रित बालविकास सेवा प्रकल्पाच्या (आयसीडीएस) तज्ज्ञ डॉ. आशा प्रतिनिधी, पीएसएम विषयाचे उत्कृष्ट शिक्षक डॉ. नसरीन शेख आणि डॉ. जयंत कृ. जोशी, निष्णात वैद्यकीय प्रशासक डॉ. श्रीकांत सापत्नेकर, बजाज ऑटोचा वैद्यकीय प्रमुख डॉ. मोहन अकोलकर, पुण्याच्या ‘नारी’ या एड्सविषयक संशोधन संस्थेचा संचालक झालेला डॉ. संजय मेहेंदळे असे अनेक. एमडी आणि एमएस अशा दोन्ही पदव्या असणारे, अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्सची सार्वजनिक आरोग्य विषयाची पदवी मिळवलेले डॉ. देवधरसर आज ८७ च्या पुढे, तर डॉ. साठेसर आता ७८-७९ च्या जवळ आहेत. या क्षेत्रात काम करणारा जॉन्स हॉपकिन्सचाच पदवीधर असणारा आमचा गडचिरोलीचा मित्र डॉ. अभय बंग त्याच्या पुण्यातील मुकामात डॉ. देवधरांची गाठ आवर्जून आजही घेतोच. दुर्दैवाने ९० नंतरच्या आर्थिक उदारीकरणाच्या वातावरणात सार्वजनिक व ग्रामीण आरोग्यसेवेच्या धोरणाबाबत सार्वत्रिक अनास्था दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्य शहरी आणि ग्रामीण रुग्णांचं आयुष्य हॉस्पिटल बिलाच्या धक्क्यानेच कमी होण्याची परिस्थिती आपण निर्माण करून ठेवली आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आज हे चाललंय काय? हे आरोग्याचं गुऱ्हाळ घालण्याचं कारण काय बरं असावं? अहो, कारण असं की, ‘पीएसएम’ या दणदणीत नाव असलेल्या विभागात माझी ७२ ते ९६ अशी २३-२४ र्वष नोकरी झाली ना! वर उल्लेख केलेल्या प्रत्येकाने, नंतर विभागप्रमुख म्हणून आलेल्या डॉ. उषा शहा, डॉ. माया नातू अशा सगळ्यांनी २४ र्वष आमची तशी लोकप्रिय नसलेली नाटकं आणि विभागातलं माझं ‘ऑन डय़ुटी’ असणं सहन केलं. ६७ साली काँग्रेसचा प्रचार केला म्हणून मेडिकलची अ‍ॅडमिशन गेली. पण नशिबाचा फेरा असा की, त्याच कॉलेजमध्ये २४ र्वष मला नोकरी करावी लागली. त्याचं असं झालं की, बी. जे. मेडिकल आणि ससून हॉस्पिटल हे राज्य शासनाचं आस्थापन. सर्व सरकारी खाक्या. सरकारी कागदही खाकीच असायचे. किंवा भारी म्हणजे पिवळट पडलेले तरी असायचे. पीएसएम विभागात नव्या काही गॅझेटेड पोस्टस् (राजपत्रित अधिकारी दर्जाच्या जागा) झाल्याचा शासन आदेश आला. त्यातल्या काही ‘नॉन-मेडिकल’ होत्या. पैकी एका जागेवर मी पात्र ठरू शकत होतो. कामाचं स्वरूप विभागातील लॅब सांभाळणं, पीएसएम या विषयासंदर्भात एमडी करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना लॅबमधील संशोधनाला मदत करणं, रोगांची साथ कुठे आली की शोधपथकाबरोबर जाऊन रक्ताचे नमुने गोळा करणं, लेक्चर्स देणं. हे सगळं मला सांगायला त्या विभागात लेक्चरर म्हणून नुकताच रुजू झालेला आमचा नाटकवाला फोटोग्राफर मित्र डॉ. मोहन अकोलकर वर आमच्या लॅबमध्ये आला. मला खाली नेऊन त्याने माझा अर्ज टाईप करून दिला. तो घेऊन मी पीएसएमचे विभागप्रमुख डॉ. न. शं. देवधर यांच्या खोलीत गेलो. अर्ज पाहत ते म्हणाले की, ‘वसंतराव आळेकर तुमचे कोण?’ मी चकित! कारण माझ्या वडिलांचे डॉ. देवधर परिचित असतील याची मला पुसटशीदेखील कल्पना नव्हती. वडिलांच्याच ग्रुपमध्ये ते जिमखान्यावर टेनिस खेळत असत.
तर नोकरीची ऑर्डर मिळाली! पण राज्य शासन सेवेच्या कटकटी अनेक. परस्पर अविश्वासावर सगळी यंत्रणा उभी. सरकारी कागद महत्त्वाचा. मिळालेली ऑर्डर तीन महिन्यांपुरती. नंतर कागदपत्रं मुंबईला आधी आरोग्य शिक्षण संचालनालयात जाणार. मग मंत्रालयात त्यानंतर रीतसर आदेश निघणार. पण तो फक्त एक वर्षांचा. मग एमपीएससीमार्फत पदाची जाहिरात येणार. मग पुन्हा अर्ज करायचा. मग एमपीएससीमार्फत मुलाखत होणार. त्यात निवडलं गेलं तर मग खरी कायमची नोकरी मिळाली असं समजायचं. यासाठी तीन-चार र्वष.. कितीही र्वष लागायची. तोपर्यंत तात्पुरते आदेश येत राहायचे. त्यामुळे पगार मिळण्यात अडचणी यायच्या. तीन-चार महिन्यांनी पे-स्लिप आल्यावर एकदम पगार व्हायचा. अशा अनिश्चिततेमुळे  कॉलेजमधल्या सगळ्या तरुण नोकरदारांची अस्वस्थता आणि चीडचीड होत असायची. पण शेवटी ही सरकारी नोकरी! आणि ७० सालामध्ये तरी सरकारी नोकरीचं एक आकर्षण असायचं. मुख्य म्हणजे मध्यमवर्गीय आई-बापांना मोठा दिलासा असायचा.
पण मग आता नाटक?
७१ च्या शेवटी ‘अशी पाखरे येती’चे प्रयोग आवरते घेतले होते. कारण जब्बार पुणे सोडून दौंडला वैद्यकीय व्यवसायासाठी स्थायिक झालेला होता. जब्बार आणि त्याची पत्नी मणी यांनी पुण्याजवळ दौंड या गावी ७१ च्या शेवटी त्यांचा दवाखाना सुरू केला होता. कारण त्याचा डी. सी. एच. (बालरोगतज्ज्ञ) हा डिप्लोमा पूर्ण झाला होता. त्याचे वडील रेल्वेमधून निवृत्त झाले होते. तर जब्बारची पत्नी मणी ही पुण्याच्या केईएम हॉस्पिटलमधून डी. जी. ओ. (स्त्री-रोगतज्ज्ञ) झाली होती. दोघांचा पुढे दौंडला हॉस्पिटल काढण्याचा विचार होता. मोहन आगाशे, विद्याधर वाटवे हे एमबीबीएस होऊन पुढच्या शिक्षणाच्या तयारीत होते. मोहन आगाशे ससून हॉस्पिटलमध्ये आरएमओ (निवासी वैद्यकीय अधिकारी) म्हणून तात्पुरता रुजू झालेला होता.
इकडे पीडीएमध्ये भालबा केळकर ७२ च्या राज्य नाटय़स्पर्धेसाठी नव्या नाटकाच्या शोधात होते. ते जब्बारच्या आदल्या वर्षीच्या ‘अशी पाखरे येती’वर खूश होते. कारण नाटक अंतिम स्पर्धेत पहिलं आलेलं होतं आणि वर्षांत त्याचे शंभरच्या वर हाऊसफुल्ल प्रयोग झाले होते. त्याने संस्थेला थोडा आर्थिक लाभ झाला होता. हौशी कलाकार असल्याने नोकऱ्या सांभाळून सगळे फुकट काम करीत होते आणि होणारा आर्थिक लाभ संस्थेत जमा होत होता. असं संस्थेचं १९५२ पासून चालू होतं. त्यामुळे ७२ च्या स्पर्धेत नवीन नाटक जब्बारनेच बसवावं असा सर्वाचा सूर होता. पण नवीन कुठलं नाटक घ्यायचं, आणि जब्बारने दौंडला नुकतीच प्रॅक्टिस सुरू केल्याने तो पुण्याला येऊन नाटक कसा बसवणार, हा प्रश्न होताच. कारण स्पर्धेचं नाटक म्हणजे टाइमबाऊंड प्रोग्रॅम! गणपती संपताना तालमी सुरू आणि डिसेंबरला प्रयोग. अंतिम स्पर्धेत निवडलं गेलं तर मुंबईत मार्चच्या आत प्रयोग.
तोच मुंबईहून तातडीचा निरोप आला म्हणून जब्बार आणि अनिल जोगळेकर तेंडुलकरांना भेटायला गेले. तेंडुलकरांनी लिहिलेली पहिली नऊ  पानं जब्बारला वाचायला दिली. पुण्याला ते दोघे परत आले ते एकदम चाज्र्ड होऊनच. त्यांचं आणि भालबांचं बोलणं झालं आणि ते नाटक पूर्ण झाल्यावर स्पर्धेत बसवायचं असं ठरलं.
नाटकाच्या पहिल्या पानाची सुरुवात अशी होती-
(रांगेने उभे राहून बाराजण नमन म्हणतात. ‘पहिलेऽऽ नमन’ इ. गणपती येतो.)
सारे : (एकदा इकडे व एकदा तिकडे एकावेळी झुलत)
‘श्री गणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामन हरी।। ’
(हेच म्हणत राहतात. गणपती नाचत राहतो..)
नऊ  पानांनंतर काय होणार आहे याची माहिती जब्बारला पूर्णपणे नव्हती. तेंडुलकरांनी त्याचा फक्त तोंडी अंदाज दिला होता. जब्बारला ती नऊ  पानं वाचून नाटकाच्या मोठेपणाची जाणीव झालेली स्पष्ट दिसत होती. नाटक म्युझिकल ढाच्यातलं असणार होतं. त्यात नृत्य असणार होतं. कलाकार अंदाजे ४०-४५ लागणार होते. पीडीएने संगीत नाटक पूर्वी कधी केलेलं नव्हतं. तसं भालबांनी स्पर्धेत देवलांचं ‘शारदा’ केलं होतं; पण ते संगीतविरहित, वेगळ्या स्वरूपात. प्रत्यक्ष वादकांना घेऊन अस्सल संगीत नाटक असं कुणी केलं नव्हतं. म्हणजे आता संगीत दिग्दर्शक शोधणं आलं. त्यात जब्बार दौंडला स्थायिक झालेला. एकूण प्रकार जरा ट्रिकीच वाटत होता. ७२ साली पहिली नऊ  पानं हाती आलेलं ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक पुढील वीस र्वष आमच्या चाळीसजणांच्या जगण्याचा अविभाज्य भाग होणार आहे याचा अंदाज मात्र कोणालाच नव्हता.
एक प्रश्न सारखा सतावत होता, की पहिल्या पानांत तेंडुलकरांनी ‘श्री गणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामन हरी’ असं का बरं लिहिलं असावं? ‘आम्ही पुण्याचे ब्राह्मण हरी’ असं का नाही लिहिलं?
असो. आता पुढची पानं आल्यावर उलगडा होईलच की!
satish.alekar@gmail.com