03 August 2020

News Flash

गांधी आडवा येतो!

अलीकडे स्वत:चाच संशय यायला लागला आहे. आपणही डुप्लिकेटच आहोत की काय, असले विचार डोक्यात येऊन झोप उडते. टीव्हीमुळे माणसं आपल्यासारखं न जगता टीव्हीतल्या माणसांसारखं जगू

| December 16, 2012 12:29 pm

अलीकडे स्वत:चाच संशय यायला लागला आहे. आपणही डुप्लिकेटच आहोत की काय, असले विचार डोक्यात येऊन झोप उडते. टीव्हीमुळे माणसं आपल्यासारखं न जगता टीव्हीतल्या माणसांसारखं जगू लागली आहेत. काही स्त्रिया टीव्ही सीरिअलमधल्या ग्लिसरीन लावून, मेकअप हलू न देता ढसाढसा रडणाऱ्या बायांची स्पॉन्सर्ड दु:खं जगू पाहतात. अनेकांनी आपलं घर ‘बिग बॉस’च्या घरासारखं केलं आहे. घरातली माणसं एकमेकांना शिव्या घालतात, ओरबाडतात, बडवतात. काहीजण त्यालाच खरं प्रेम समजतात.
परवाची गोष्ट. पाचशे रुपयांची नोट पुन:पुन्हा बघून घेतली. नोटेवरून हात फिरवला. नोट उलटसुलट केली. नोटेवरच्या गांधींना बघितलं. गांधी खरे वाटत होते. रिस्क नको म्हणून नोट उजेडावर धरली. पांढऱ्या, कोऱ्या जागेत नीट निरखून बघितलं. तिथे लपून माझ्याकडे बघत हसणारे गांधीजी दिसले. बरं वाटलं. खात्री पटल्यावर नोट खिशात टाकली. पुढे ती नोट बनावट असल्याचं कळलं आणि धक्का बसला. शेवटी कुणाच्या हसण्यावर विश्वास ठेवावा असे दिवस उरले नाहीत असं वाटून उदास व्हायला झालं. तक्रार करणार होतो; पण ‘आपल्या देशाचे कायदे फार कडक आहेत, तक्रार करणाराच खडी फोडायला जातो-’ असं कळल्यामुळं गप्प राहिलो. आता खऱ्या-खोटय़ातला फरकच कळेनासा झाला आहे. पाचशेची नोट पाण्यात टाकताना आता खरे गांधी समोर आले तरी विश्वास ठेवायचा नाही असं मी ठरवून टाकलं आहे.
अलीकडे मुंबईत सिग्नलला गाडी थांबली की काही तृतीयपंथी खिडकीपाशी गोळा होतात. कलकलाट करतात. आशीर्वाद देतात. आशीर्वादाचा स्टॉक करून ठेवावा म्हणून बरेचजण सिग्नलवर थांबतात. थोरामोठय़ांच्या आशीर्वादाने काही झालं नाही, या तृतीयपंथीयांच्या आशीर्वादाने तरी काही फरक पडेल असा विचार करून मी दहा रुपये दिले आणि थोडा आशीर्वाद विकत घेतला. दहा रुपये गेल्यावर कळलं की, तो तृतीयपंथी खरा नव्हता, डुप्लिकेट होता. पुरुषच म्हणे गुळगुळीत दाढी करून, फुलाफुलांची साडी नेसून सिग्नलवर उभे राहतात. आता असल्या डुप्लिकेटच्या आशीर्वादाने आपलं काही वाईट झालं नाही म्हणजे मिळवलं, असं मनात येऊन घाबरायला झालं. असो!
एवढय़ातच माझ्या नात्यातले एक गृहस्थ गेले. ते खूप पूर्वीच गेले असावेत असं समजून मी जगत होतो. परवा त्यांच्या मुलाचा फोन आला. मी धक्का बसल्यासारखी बातमी ऐकली. जरा जास्तच हळहळलो. रडक्या आवाजात- ‘आता असा माणूस होणे नाही,’ म्हणालो.
आमच्यात मेलेल्या माणसाला स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून काही विधी करावे लागतात. पाचपन्नास गरीब फकिरांना जेवू घालावं लागतं. गेलेल्या माणसाला पुण्याची किती गरज आहे आणि त्याने किती पैसा मागे ठेवला आहे, हे लक्षात घेऊन जेवणाऱ्या गरीबांचा आकडा ठरवावा लागतो. खूप चर्चेनंतर दहा फकीर लागतील असं ठरलं. मी उत्साह दाखवल्यामुळे दहा फकीर शोधण्याचं काम माझ्या अंगावर पडलं. काम सोपं होतं. आपल्या देशात दहा गरीब कुठेही सापडतील, ते पटकन् पोटभर जेवतील, ढेकर देतील आणि त्या आवाजाने स्वर्गाचे दरवाजे उघडतील असा विचार करून मी बाहेर पडलो.
संध्याकाळची वेळ. अनेक फकीर मेकअप करून बाहेर पडले होते. त्यातल्या त्यात गरीब व भुकेने कळवळणाऱ्यांचा शोध घेत मी फिरत होतो. खूप चौकशी केली. अनेकांनी डिनर घेऊनच बाहेर पडल्याचं सांगितलं. दोघा-चौघांनी तर- इतरांना पुण्य लाभावं म्हणून आपण तासाभरात चार वेळा जेवल्याचं सांगितलं. प्रकृतीच्या कारणामुळे पुन्हा जेवणं जमणार नाही, म्हणाले. मी दिसेल त्याच्या मागे धावत होतो. गर्दीची वेळ, धंद्याचा टाइम- त्यामुळे कुणी यायला तयार होईना. दोघे तयार झाले, पण बिल्डिंगला लिफ्ट नाही म्हणताच पळून गेले. आता गेलेल्या गृहस्थाचं पुढे कसं होणार, असं मनात येऊन मी घाबरून गेलो. दिसेल त्या फकिरासमोर पदर पसरून गयावया करू लागलो. दयेची भीक मागू लागलो. शेवटी दोन-चार वेळा जेवलेल्यांना ‘पुन्हा जेवलात तर पैसे देऊ,’ असं म्हटल्यावर ते तयार झाले. मी ‘पुण्यासाठी लाच दिली तर पाप लागत नाही,’ असं स्वत:ला बजावत फकिरांना घेऊन त्या गृहस्थांच्या घरी गेलो. ते अध्र्या रस्त्यातून पळून जाऊ नयेत म्हणून त्यांना पाप-पुण्याच्या गोष्टी ऐकवल्या. शेवटी एकदाचे फकीर खंगल्यासारखे उपाशी मुद्रेने पुन्हा जेवायला बसले, तेव्हा कुठे वर गेलेल्या गृहस्थांचा जीव भांडय़ात पडला. फकिरांची भूक खरी नव्हती हे कुणाच्याच लक्षात आलं नाही, याचा मला विशेष आनंद झाला. असो!
पारशी लोकांमध्ये मेल्यावर प्रेत जाळत नाहीत, पुरतही नाहीत. काही पारशी प्रेत गिधाडांना खाऊ घालतात. जाळण्या-पुरण्याची कटकट नसल्यामुळे फार गोंधळ होत नाही. आतापर्यंत पारश्यांचं सर्व व्यवस्थित चाललं होतं. पण अचानक गिधाडांची संख्या कमी झाली. त्यामुळे आता मेल्यावर काय करावं, असा म्हणे पारश्यांना प्रश्न पडला आहे.
गिधाडांची चिंता सर्वानाच वाटत होती. गिधाडांवर जोरदार संशोधन सुरू होतं. बऱ्याच वर्षांनंतर आता निष्कर्ष जाहीर झाले आहेत.
पारशी आजारी पडले की वेदना घालवायला गोळ्या खातात. त्या पेन-किलरमध्ये असलेल्या विशिष्ट ड्रगने म्हणे गिधाडांचा घात केला. आता पारश्यांनी पेन-किलर खाऊ नये असा फतवा निघाला आहे. आता ‘दुखलखुपलं तरी चालेल, आम्ही गोळ्या खाणार नाही, गिधाडांसाठी वेदना सोसू,’ असं पारशी म्हणू लागले आहेत. सरकारने आगामी निवडणुका लक्षात घेऊन पारश्यांसाठी गिधाडांच्या ‘पोल्ट्री फार्म’ची घोषणा केली आहे.
आता सर्वाना स्वर्गातच जायचं आहे. अप्सरांचा आयटम डान्स बघायचा आहे. त्यामुळे फक्त पारश्यांना सहानुभूती दाखविणाऱ्या सरकारला ‘आमच्या पुण्याचं काय?,’ असा संतप्त सवाल लोक विचारू लागले आहेत. त्यावर- ‘गरीबांचे पोल्ट्री फार्म देशभर सुरू आहेत. श्रीमंतांना दानधर्मासाठी मोठय़ा संख्येने गरीब उपलब्ध करून देण्याच्या नवीन योजना आखल्या जात आहेत,’ अशी माहिती सरकारतर्फे देण्यात आल्याचं कळलं. पुण्यासाठी सरकार सबसिडी देणार म्हटल्यावर लोकांना आनंद झाला आहे. असो!
माझ्या मनातून पारश्यांचा प्रश्न जात नाही. आता गिधाडांची संख्या वाढायला वेळ लागेल. तोपर्यंत पारश्यांनी काय करावं? डुप्लिकेट गिधाडांचा वापर करता येईल काय? आपल्याकडे डुप्लिकेट गिधाडांची कमतरता नाही. त्यांच्यावर कसल्याही ड्रगचा परिणामही होत नाही. खरी गिधाडं जिवंत माणसांच्या वाटेला जात नाहीत. डुप्लिकेट गिधाडांची गॅरेंटी कुणी घ्यावी?
मुंबईत गोरेगावच्या जंगलात काही खरे वाघ राहतात. परवा खऱ्या वाघाने वॉचमनला खाल्ला. त्यावर उत्साही लोक वाघाला गोळ्या घाला म्हणू लागले. माणसाने खऱ्या वाघाचं जंगल पळवलं, पाणी तोडलं, अन्न संपवलं. आता पोटात अन्नाचा कण नसलेल्या वाघाने काय करावं? प्रश्न खऱ्या वाघांचा नाही. खोटे वाघही असतात. ते भूक नसताना माणसं मारतात. त्यांचं काय करावं?
खूप पूर्वी मी खोटी वाटेल अशी एक सत्य घटना वाचली होती. जंगलाच्या जवळपास एक आश्रम होता. एक खरा वाघ म्हणे त्या आश्रमात येऊन बसायचा. वाघाला भजनाची चटक लागली. वाघ रोज तिथं येऊ लागला. संस्काराने तो बदलला. त्याने मांसाहार सोडला. तो दूध पिऊ लागला. त्याने डरकाळ्या बंद केल्या. यातलं खरं-खोटं काय, ते माहीत नाही. पण मला अधूनमधून त्या वाघाची आठवण येते. आता तो चरख्यावर बसून सुतकताई करत असेल.. शेळीचं दूध काढत असेल, असे चमत्कारिक विचार मनात येऊन आनंदल्यासारखं होतं. बरं वाटतं. आता आनंद देणाऱ्या बऱ्या गोष्टींना खोटं तरी कसं म्हणावं?
खऱ्या-खोटय़ाचं काही कळत नाही. मनाचा गोंधळ उडतो.
आमच्या समोर एक डॉक्टर होता. हात लावताच रोगी बरे होतात अशी त्याची ख्याती होती. त्याच्याकडे गेलेला माणूस दोन-चार दिवसांत ठणठणीत बरा होत असे. पुढे- तो डॉक्टर कधीही शाळेत गेला नव्हता अशी बातमी कळली. आता त्याचे पेशंट मोठय़ा डॉक्टरांकडे जातात, पण गुण येत नाही.
टीव्हीवर मागच्या दंगलीत पराक्रम केलेल्या एका मोठय़ा नेत्याची प्रचार सभा सतत दाखवली जात आहे. त्यात डोक्यावर गोल, जाळीदार पांढरी टोपी घातल्यामुळे मुसलमान वाटणारे काही लोक टाळ्या वाजवत त्याचा जयजयकार करत उभे आहेत. ते डुप्लिकेट आहेत असं म्हणतात. निवडणुकीच्या काळात डुप्लिकेट मुसलमानांना फार मागणी असते असं कळलं.
मध्यंतरी मी गावी गेलो होतो. तिथे एक जुने नाटय़रसिक भेटले. ते जुन्या संगीत रंगभूमीच्या आठवणी काढून रडू लागले. पूर्वी संगीत नाटकांत नायिकेचं काम करणारे पुरुष घट्ट शालू नेसायचे. चार पुरुष लुगडय़ाला लटकले तरी म्हणे काष्टा इंचभरही सरकायचा नाही. वादळ आलं तर नाटकाचे पडदे उडून जायचे, पण पुरुष नायिकेचा पदर ढळायचा नाही. ती शालीनता, कुलीनता आता उरली नाही, असं म्हणून ते कळवळू लागले. खऱ्या स्त्रिया नाटकात काम करायला लागल्यापासून नाटकातली गंमतच गेली, ते सौंदर्य आता उरलं नाही म्हणून ते टिपं गाळू लागले. खऱ्यात काही दम नाही, म्हणू लागले.
मला पिकासोची गोष्ट आठवली. पिकासो म्हणजे बाप चित्रकार! तर त्याचा एजंट चित्र विकण्यापूर्वी चित्राच्या अस्सलपणाची खात्री करून घेण्यासाठी त्याच्याकडे गेला. चित्र दाखवून म्हणाला, ‘हे पेंटिंग खरं आहे ना?’ पिकासो म्हणाला, ‘नाही. हे पेंटिंग फेक आहे.’ पुन्हा काही दिवसांनी तोच एजंट दुसरं चित्र घेऊन पिकासोकडे गेला. म्हणाला, ‘हे चित्र तुम्हीच रंगवलेलं आहे ना?’ पिकासो म्हणाले, ‘नाही. हेदेखील फेक पेंटिंग आहे.’ एजंट गडबडला. म्हणाला, ‘तुम्ही हे पेंटिंग करत असताना मी डोळ्यांनी बघितलं आहे.’ पिकासो म्हणाला, ‘मी अनेकदा फेक पेंटिंग्ज करतो.’
पिकासोसारख्या जीनिअसची ही कथा; मग आपल्याकडच्यांचं काय? .. विचार मनात आला तरी घाबरायला होतं. आपण फक्त ‘फेक’च लिहितो, बोलतो, हे अनेकांच्या लक्षातही येत नाही. असो!
अलीकडे स्वत:चाच संशय यायला लागला आहे. आपणही डुप्लिकेटच आहोत की काय, असले विचार डोक्यात येऊन झोप उडते.
टीव्हीमुळे माणसं आपल्यासारखं न जगता टीव्हीतल्या माणसांसारखं जगू लागली आहेत. काही स्त्रिया टीव्ही सीरिअलमधल्या ग्लिसरीन लावून, मेकअप हलू न देता ढसाढसा रडणाऱ्या बायांची स्पॉन्सर्ड दु:खं जगू पाहतात. अनेकांनी आपलं घर ‘बिग बॉस’च्या घरासारखं केलं आहे. घरातली माणसं एकमेकांना शिव्या घालतात, ओरबाडतात, बडवतात. काहीजण त्यालाच खरं प्रेम समजतात.
काही समंजस आई-वडील आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना फक्त डिस्कव्हरी चॅनल दाखवतात. तिथे एक वाघ सतत दुबळ्या हरणांचा पाठलाग करत असतो. तो हरणाच्या नरडीचा घोट घेतो, त्याचे पोट फाडतो, कोथळा बाहेर काढतो. मुलांना हा वाघ फार आवडतो. बलवानाने अशक्तांना चिरडणे हे नैसर्गिक आहे, हे सतत बालमनावर बिंबवलं जातं. त्यांना मग जंगलचा कायदाच खरा वाटायला लागतो. परवा डोंबिवलीत काही अल्पवयीन मुलांनी असाच एका तरुणाला घेरून त्याचा कोथळा काढला. याप्रसंगी म्हणे आसपास ३५-४० माणसं ‘सचिन बॅट उचलत नाही, सोडतही नाही,’ अशी चर्चा करत उभी होती. पण त्यावेळी कुणी काही ऐकलं नाही, की फार कुणी मधेही पडलं नाही. वाघ हरणाला फाडत असताना इतर हरणं तरी कुठे मधे पडतात? ती पळून तरी जातात किंवा शांतपणे चरत उभी राहतात. असो!
मी ठरवतो, पण मला माझ्यासारखं वागता येत नाही. मला स्वयंपाकाची फार आवड आहे. पण हे चारचौघांत बोलता येत नाही. कुणी खास पाहुणे येणार असतील तर मी दिवसभर राबून जेवण  बनवतो. दारावर बेल वाजताच मी काम टाकून हॉलच्या दिशेने धावत सुटतो. पुस्तक घेऊन पंख्याखाली वारा खात बसतो. पाहुणे घरात प्रवेश करतात तेव्हा बायको हातात चमचा घेऊन किचनमध्ये लगबग करत असते. न आलेला घाम पुसत असते. पाहुणे बायकोला सहानुभूती दाखवतात. हॉलमध्ये आरामाचं नाटक करत बसलेल्या मला खवचटपणे ‘काय आराम चाललाय वाटतं?’ असं विचारतात. मी ते सहन करतो. पाहुणे जेवणाचं कौतुक करतात. बायको चुकीची रेसिपी सांगते. मी ‘बायकोचं शोषण करणाऱ्या ऐतखाऊ नवऱ्या’च्या भूमिकेत असल्यामुळे काही बोलू शकत नाही. त्यांना अडवताही येत नाही. पाहुण्यांना आमच्या या भूमिका खूप आवडतात. एरवी आम्ही घरात बरे असतो. पण पाहुण्यांसाठी हा असा खेळ सादर करावा लागतो. असो!
पुढे खूप कोरी जागा आहे, पण आता थांबतो. कोऱ्या जागेत दडून गांधी माझ्याकडे बघत असताना खोटं लिहायचं तरी कसं?
रेटावं म्हटलं तर  गांधी आडवा येतो. काय करावं, कळत नाही.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2012 12:29 pm

Web Title: satayar fatayar
Next Stories
1 काँग्रेसची ‘विचारप्रणाली’ केवळ सत्ताकारणाची!
2 लाजीरवाणी गोष्ट
3 अ‍ॅलेक्झँडरच्या इच्छा!’
Just Now!
X