गेल्या काही दिवसांत केवढं काय काय झालं! कुणी कोणाला भोसकला. कुणी मुलाबाळांसकट आत्महत्या केली. कुणी भल्या वाटणाऱ्या माणसाने खूपच पैसे खाल्ले.
मी हे सटर फटर का सांगत बसलोय. हे एवढं लिहून, जोक मारूनही माझी अस्वस्थता का जात नाही? मी काय लिहायला हवं? कळत नाही..
अस्वस्थता काही जात नाही. हल्ली ‘चलाखी, चापलुसी लाच प्रतिभा म्हणतात आणि काही सांगण्यासाठी लिहायचं नसतं, दडवण्यासाठी लिहायचं असतं’ हे कळायला जरा उशीरच झाला आहे.
मध्यंतरी अस्वस्थ व्हावं असं बरंच घडलं. चित्त थाऱ्यावर नाही अशी अवस्था झाली. अस्वस्थता वाढत गेली. लिहून स्टेशनरी वाया घालवू नये असे विचार मनात येऊ लागले. निपचित पडून राहिलो. टीव्ही लावला. तिथे विद्वानांनी गर्दी केली होती. कलकलाट सुरू होता. त्यामुळे अस्वस्थता खूपच वाढली. जातो की राहतो असं वाटू लागलं. कसलाच भरोसा वाटेनासा झाला. पॉझिटिव्ह विचार मनात आणले. रिकाम्या ग्लासाला भरलेला ग्लास असंही म्हणून पाहिलं. उपयोग झाला नाही. काही थोर लेखकांची चरित्रं चाळली. लिहिल्यामुळे अस्वस्थता जाईल असं वाचनात आलं. म्हणून पुन्हा लिहायला बसलो आहे. हात थरथरताहेत. काय लिहावं कळत नाही. प्रयत्न करतो. बहुधा खूप दिवसांपूर्वी मी एक बातमी वाचली होती.
रेल्वे ट्रॅकला लागून अनेक झोपडय़ा होत्या. चाळी होत्या. तिथली मुले रेल्वे ट्रॅकपाशी क्रिकेट खेळत होती. त्यात फजलू नावाचा एक छोटा मुलगा होता. खेळ रंगात आला होता. सिग्नल पडल्यामुळे एक दूरच्या गावी जाणारी ट्रेन तिथे येऊन थांबली. पोराने चेंडू फटकावला. चेंडू थांबलेल्या ट्रेनमध्ये जाऊन पडला. फजलू उत्साही होता, शिवाय ट्रेनजवळच फििल्डग करत होता. त्यामुळे चेंडू शोधायला तो ट्रेनमध्ये चढला. सिग्नल पडला आणि ट्रेन सुटली. छोटय़ा फजलूला उतरता आलं नाही. फजलू घाबरून काही बोलला नाही. फजलू दूरच्या गावी जाऊन पोहचला. तिथली भाषा वेगळी, माणसं वेगळी. फजलूला बोलता येईना. फजलू बिनपत्त्याच्या झोपडीत राहत होता. त्याला आपला पत्ताही सांगता येईना. फजलूचे आई-बाप आपल्या पोराला शोधत होते. फजलू दुसऱ्या टोकाला पोहचला होता. फजलू सापडत नव्हता. वर्षभराने फजलूचा पत्ता लागला. आई-बाप धावले. फझलूने आई-बापाला ओळखलं नाही. तो त्यांना घाबरला. त्यांची भाषा विसरला. फजलू जगापासून तुटला. फजलू कुणाचा? फजलूचं काय करायचं?
ही बिन महत्त्वाची गोष्ट मला का आठवते आहे? आज माझ्या अस्वस्थ होण्याशी फजलूचा काय संबंध? असो!
पुन्हा दहा-पंधरा वर्षांपूर्वी वाचलेली एक गोष्ट मला उगाचच आठवते आहे.
एक शहेनाज नावाची बाई, पाकव्याप्त काश्मीरमधल्या मिरापूर जिल्ह्य़ात राहत होती. घरात सासू-सासरे होते. म्हातारपणी वेळ जात नाही म्हणून ते सुनेशी भांडत. एकदा खूपच जोरदार भांडण झालं. शहेनाजने झेलम नदीत उडी मारली आणि वाहत भारताच्या किनाऱ्याला लागली. देशात बेकायदेशीर घुसखोरी केली म्हणून पोलिसांनी तिला पकडलं. चौकशी सुरू केली. ‘योग्य कागदपत्रं घेऊन नदीत उडी मारली नाही.’ या गुन्ह्य़ासाठी तिला शिक्षा झाली. तिला पूँछच्या तुरुंगात ठेवलं. शहेनाज तुरुंगात दिवस ढकलू लागली. त्या तुरुंगाचा वॉर्डन मोहम्मद दिन हा दयाळू गृहस्थ होता. तो फावल्या वेळेत अडल्यानडल्यांना मदत करणे, गरिबांवर प्रेम करणे असली कामं करीत असे. अनेकांना प्रेम आणि बलात्कारातला फरक कळत नाही. भल्याभल्यांचा गोंधळ उडतो. वॉर्डनसाहेबांचाही गोंधळ उडाला. प्रेम करणाऱ्याला बलात्कार करण्याचाही अधिकार असतो असं वाटून वॉर्डनने शहेनाजवर बलात्कार केला. शहेनाजने तुरुंगातच एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव मुबिना. मुबिनाने गोंधळ उडवून दिला. सर्व म्हणाले, ‘शिक्षा भोगून झाल्यावर शहेनाजने पाकिस्तानला आपल्या घरी परत जावं.’ पण प्रश्न मुबिनाचा होता. तिने कुठे जायचं? तिचा देश कुठला? पुन्हा केस कोर्टात गेली.
आपल्याकडे एवढं घडत असताना मुबिनाची काळजी करत बसायचं कारण नाही. मग काहीच कारण नसताना आपल्याला ही गोष्ट मी का सांगत बसलोय. गोष्ट सांगून झाल्यावरही माझी सुटका का होत नाही. मला बरं का वाटत नाही?
गेल्या काही दिवसांत केवढं काय काय झालं! कुणी कोणाला भोसकला. कुणी मुलाबाळांसकट आत्महत्या केली. कुणी भल्या वाटणाऱ्या माणसाने खूपच पैसे खाल्ले. जंगलातल्या वाघाने मुलांना पळवून नेलं. शहरातल्या माणसाने नुकतीच जन्मलेली बाळं पळवून नेली. त्या बाळांची म्हणे आता विक्री होईल. त्यांना फुटपाथवर भीक मागायला बसवलं जाईल. पिढीच्या पिढी फुटपाथवर बसली आहे, असं मनात येऊन दचकायला होतं. पिढी पळवणारे सापडत नाहीत. सापडले तरी बोलता येत नाही.
परवा दिवाळीत पनवेलजवळ एका फार्महाऊसवर एक घटना घडली. वाघमारे नावाचा एक माणूस ‘धनबाबा’ या नावाने प्रसिद्ध आहे. तो म्हणे तंज्ञ-मंत्राच्या साहाय्याने पैशांचा पाऊस पडतो. आपल्याकडे पैशांचा पाऊस पडणारे खूप जण आहेत. काही नेते आपल्या कार्यकर्त्यांना व आमजनतेला पैशाच्या पावसात भिजवायच्या गोष्टी करतात. काहीच काम न करता आयतं भिजता येत असेल तर बघावं म्हणून अनेक जण गर्दी करतात. खूप गडगडाट होतो. विजा चमकल्याने डोळेही दिपतात. अंगावर शब्द कोसळतात पण पैशांचा पाऊस काही पडत नाही. पाऊस न – पडताही वरची काही माणसं भिजून चिंब कशी होतात हे कुणाला कळत नाही. असो.
तर ‘धनबाबा’च्या पावसात भिजायला पाटील, घरत, टोपले आणि जोशी असे चौघे गुपचूप गाडय़ा घेऊन पनवेलच्या फार्म हाऊसवर गेले. आता ढगफुटी होईल, धो धो पाऊस बरसेल म्हणून बॅगा उघडून बसले. बाबाने चौघांना गोळ्या घातल्या आणि पैसे घेऊन पळाला. पैसा कुणाला नको?
मी हे सटर फटर का सांगत बसलोय. हे एवढं लिहून, जोक मारूनही माझी अस्वस्थता का जात नाही? मी काय लिहायला हवं? कळत नाही..
परवा ऐन दिवाळीच्या तोंडावर, माणसं गंमतजंमत करायची म्हणत असतानाच दिल्लीत गडबड झाली. लोकप्रिय उद्योगपती, दारूसम्राट पॉन्टी छड्डा मारला गेला. या बातमीने सर्व हळहळले. राजकारणी, कलावंत, साहित्यिक, खेळाडू  सर्वावरच दुखाचा डोंगर कोसळला. दिल्ली, पंजाब, उत्तरप्रदेश इथे अचानक अंधारल्यासारखं झालं. पॉन्टीची कहाणी स्फूर्ती देणारी आहे. शाळेतून शिकवावं, असं जीवन पॉन्टी जगला.
सर्व थोरा मोठय़ांसारखे, पॉन्टीचेही बालपण खूप हालअपेष्टेत गेले. पाँटीचे वडील एका दारूच्या गुत्त्यासमोर चरवणा विकायचे काम करीत छोटा पाँटी वडलांना त्यांच्या व्यवसायात मदत करीत असे. पाँटी दारू पिणाऱ्या, भुकेल्या टाईट गोरगरिबांची सेवा करीत असे. टाईट गरिबांच्या दुखाने पाँटीला रडू येत असे.
पाँटीला साहित्याची आवड होती. कागदात चरवणा बांधताना तो अनेकदा थांबून कागद वाचत असे. कागदावर कविता छापलेली असे. तो कविता वाचून गलबले. अनेकदा एखाद्या कथेचा अर्धवट तुकडाही असे. अध्र्या तुकडय़ावरून तो गोष्ट पूर्ण करे. त्याला साहित्याची चटक लागली. त्याने मनात आणलं असतं तर तो मोठा लेखक होऊ शकला असता, पण लेखनासारख्या फालतू कामात त्याला वेळ घालवायचा नव्हता. त्याने गरिबांच्या उद्दाराचा वसा घेतला होता.
गांधी जयंती किंवा इतर काही प्रसंगी ‘ड्राय डे’ असला की त्याला थोडी फुरसत मिळत असे. त्याला खेळण्याचा शौक होता. कुणी बॅट आणली तर तो क्रिकेट खेळे. नाहीतर चेंडूला लाथा मारून फुटबॉल खेळे. सगळेच खेळ त्याला जमत. दिल्लीचे लोक म्हणत- ‘मोठा होऊन पाँटी ऑलिम्पिकला जाईल. भारतावर पदकांचा वर्षांव होईल.’
पाँटीला मात्र पतंग उडवायला आवडे. वारा नसतानाही त्याचा पतंग उंच उडे. पाँटी काटाकाटीचा खेळ खेळे, एकदा पतंग उडवताना त्याला शॉक लागला. हिंदी सिनेमात हिरोला शॉक लागला की त्याची स्मरणशक्ती जाते. पण सुदैवाने इथे तसं काही झालं नाही. स्मरणशक्ती राहिली पण हातातली शक्ती गेली. ग्लासही उचलता येईना अशी स्थिती झाली. पण पाँटी हिंमत हरला नाही.
पाँटीने तोंडाने माणसं जोडली. पाँटीने प्रेमाचा वर्षांव करून सर्वाना आपलंस केलं. सर्वाना प्रेमाचा चरवणा वाटला. तोंडी लावायला प्रेम म्हटल्यावर व्हिस्कीचे दोन घोट जास्त जाऊ लागले. सर्वानांच प्रेमाची नशा चढली. सर्वत्र आनंदी आनंद झाला. पाँटी मोठा झाला. पाँटीचं साम्राज्य वाढू लागलं.
पाँटी हजारो कोटींचा दारूचा व्यवसाय सांभाळू लागला. यू.पी.च्या चार हजार दुकानांना दारू पुरवू लागला. पाँटी दारूचे भाव ठरवू लागला. त्याने साखरेचा व्यवसाय सुरू केला. मल्टीप्लेक्स बांधले. जमिनीचे व्यवहार करू लागला. तो सिनेमांना पैसा पुरवू लागला.
सगळ्या पक्षाने लहान-थोर नेते भांडण व विचार बाजूला ठेवून पाँटीवर प्रेम करू लागले. मोठमोठे कलावंत मार्गदर्शन घेण्यासाठी घरी येऊ लागले. पाँटी सिनेमासाठी गोष्ट कशी रचायची, हे लेखकांना सांगू लागला. लेखक थक्क झाले. आशीर्वादासाठी गर्दी जमू लागली. पाँटीच्या भलेपणाच्या गोष्टी बोलू लागले.
लहान-थोर सगळेच पाँटीच्या पदराखाली घुसले. गर्दी झाली. पदर काही घुसमटून मेले. पदर अपुरा पडू लागला. पाँटीने पदराचा तंबू केला. हजारो कोटींचं साम्राज्य उभे केलं.
माणूस श्रीमंत झाला की बंदुका घेतो. स्वत:ची मिल्रिटी उभी करतो. जाड भिंतींच्या घरात राहतो. एकदम निर्भय होऊन जातो. गरिबांना निर्भय होणं परवडत नाही. ते घाबरत जगतात. आडोशासाठी पाँटींचे पदर शोधत फिरतात. पाँटी सर्वत्र असतात. असो!
मध्यंतरी पाँटी आणि त्याच्या धाकटय़ा भावात देण्या घेण्यावरून काहीतरी झालं. भाऊ फार्महाऊस मागत होता. मनात आणलं असतं तर पाँटी भावाला अर्धा देश देऊ शकला असता. पण पाँटी तत्त्वाचा माणूस! नाही म्हणाला. भाऊ कोर्टात गेला. धाकटय़ाच्या बाजूने निर्णय झाला. पाँटी कोर्टाला जुमानत नसे. ‘किचकट कायदे आणि नियमांमुळे देशाची वाट लागली’ असं म्हणे. सर्वानाच हे पटे.
पर्वा ऐन दिवाळीत फार्महाऊसवर धाकटय़ाने गोळीबार केला. पाँटी शहीद झाला. एक विचार संपला. धाकटाही गेला. सर्व संपलं. अनेकांना पोरकं झाल्यासारखं वाटलं. असो!
पालघरच्या एका मुलीने आपल्याला विचार स्वातंत्र्य व आविष्कार स्वातंत्र्य आहे, अशा गैरसमजातून फेसबुकवर काहीतरी लिहिण्याचा पोरकटपणा केला. लोक भडकले. हाताशी पटकन हॉस्पिटल लागलं. लोकांनी तिच्या काकाचं हॉस्पिटल फोडलं. आता घराघरातून आई-वडील मुलांना हात जोडून ‘काही लिहू नका’ अशा विनवण्या करू लागले आहेत. देशातल्या समस्त काकांनी तर धसकाच घेतला आहे.
टीव्हीवर चर्चा सुरूच आहे. ‘कॉमेडी एक्सप्रेस’ आणि चर्चा यातला फरक कळेनासा झाला आहे. कॅमेरा बघितला की काही विद्वान घुमायला लागतात. थांबत नाहीत. अचानक शॉक बसल्यामुळे अनेकांची अवस्था हिंदी सिनेमातल्या हिरोसारखी झाली आहे. स्मरणशक्ती गेली आहे. मानसशास्त्रज्ञ डॉ. आर. डी. लँग म्हणतात. ‘आपण विसरतो आणि मग विसरलो हेच विसरून जातो.’ असो!
अस्वस्थता काही जात नाही. हल्ली ‘चलाखी, चापलुसी लाच प्रतिभा म्हणतात आणि काही सांगण्यासाठी लिहायचं नसतं, दडवण्यासाठी लिहायचं असतं’ हे कळायला जरा उशीरच झाला आहे.
शेवटी अर्धी सोडलेली गोष्ट पूर्ण करतो.
हायकोर्टने शहेनाज आणि मुबिनाची सुटका केली. मुबिनाला भारतीय नागरिकत्व आणि सरकारी घर देण्याचे आदेश दिले.
सगळच संपलेलं नाही. पाव ग्लास भरलेला आहे.
चिअर्स!

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Shadashtak Yog 2024 and Impact on Rashi in Marathi
Shadashtak Yog: १८ वर्षांनंतर केतू- गुरुचा विनाशकारी ‘षडाष्टक योग’, ‘या’ राशीच्या लोकांवर कोसळणार संकट?
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
kolhapur raju shetty marathi news, raju shetty latest news in marathi, raju shetty telescope marathi news, raju shetty durbin marathi news
“दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा