कॅलिफोर्नियाच्या प्रथमदर्शनाने प्रत्येक माणूस दिपून जातो. मैलच्या मैल मुक्तमार्ग (फ्री वे) आणि त्यांच्या मध्यभागी बहरलेले फुलांचे ताटवे, त्यांच्यावर पाण्याचे शिडकावे करणारे स्प्रिंकलर्स, हिरवीगार गोल्फची मैदाने, बदाम, संत्री, मोसंबीच्या वनराया. सुबत्ता, मुबलकता आणि ऐश्वर्याची किनार. संपूर्ण राज्याला सुंदर lok03समुद्रकिनारा लाभलेला सुवर्णमय (गोल्डन स्टेट) कॅलिफोर्निया! पंधरा-वीस इंच वार्षिक पाऊस पडला की सारे खूश! आणखी पाऊस पडून करायचे काय? हवाईचं काही कौतुक नाही. उंच, दाट झाडांचं घनदाट जंगल तर नकोच नको! हॉलीवूडचं रेड कार्पेट आणि गोल्फसाठी असलेली मनुष्यनिर्मित ग्रीन कार्पेट यामुळे सारेच मजेत! त्यामुळे चार-पाच वर्षांपूर्वी या राज्यात पाऊस कमी पडला तेव्हा आम्ही चक्क छत्र्याबित्र्या अडगळीत टाकल्या. आणि गव्हर्नरने सांगितलं- ‘पाणी जपून वापरा यंदा!’ तर सगळं हसण्यावारी नेलं! कोणी विचारलं तर थट्टेच्या स्वरात ‘अहो, आमच्याकडे कसली पाणीटंचाई? म्हणजे रोज गाडय़ा धूत असाल तर आता आठवडय़ातून चारदा धुवा फक्त!’ असं म्हणून उडवून लावलं जायचं. त्यानंतरच्या वर्षीही पाऊस कमी पडला तेव्हा पावसाची थट्टा सुरू केली. ‘अहो, कॅलिफोर्नियाचा पाऊस ना? धो-धो पडेल सांगतात तेव्हा उगाच झिरमिळतो. बोलूनचालून हे मूळचं वाळवंट! पाणी घालून घालून इथे हिरवे मळे बहरतात. पण क्या बात है! अहो, अख्ख्या देशाला बदाम पुरवतो आम्ही! आणि आमच्या संत्र्यांच्या झाडांना बहर येतो तेव्हा सबंध कॅलिफोर्निया घमघमतो.’  त्यामुळे पाऊस कमी झाला तरी लोक मजेत होते. फुलं बहरत होती. वणवे लागून जंगलं भस्मसात होत होती. फळांच्या बहराने फांद्या वाकत होत्या. धरणातील पाण्याची पातळी वेगानं कमी होत होती. एक-दोन ठिकाणचे ‘डिसॅलिनेशन प्लँटस्’- म्हणजे समुद्रजलापासून उपयुक्त पाणी तयार करण्याचे कारखाने छत्र्यांसारखेच दुर्लक्षित होते.
तीन वर्षे उलटून गेली. बातम्यांवरून कळू लागलं, की कॅलिफोर्नियात दुष्काळ पडतो आहे! चर्चा सुरू झाल्या. वर्तमानपत्रे रकाने भरू लागली. शास्त्रज्ञ, राजकारणी, अर्थतज्ज्ञ सर्वाच्या दुर्बिणी कॅलिफोर्नियाकडे वळल्या. कोणी तज्ज्ञ म्हणाले, ‘‘कॅलिफोर्निया हे जगातलं सर्वात मोठं जिओ-इंजिनीयरिंग प्रोजेक्ट. पण त्यात एक जीवघेणी फट आहे. इथलं पाण्याचं चक्र कसं चालतं त्याची कल्पना कुणाला नाही. पाणी पडतं ते वाहून समुद्राला मिळतं. आता तुमची आशा आहे ती म्हणजे समुद्रच! तेव्हा उघडा ही डिसॅलिनेशन प्लँट्स. बांधा नवीन काही; नाहीतर आणखी काही वर्षांनी कॅलिफोर्निया कसा दिसेल? आता मंगळावरचा फोटो दिसतो तसा!’’
गेल्या वर्षांपासूनच घराघरात या चर्चा पोहोचू लागल्या आणि नकळत पाण्याचे नळ सोडताना बारीक धार पडू लागली. नवी घरे बांधताना बाथरूममधल्या फ्लशमध्ये कपात करण्याची तंत्रे वापरली जाऊ लागली. हिरवळीला पाणी घालण्याचे स्प्रिंकलर्स बारीक होऊ लागले. ठिबक सिंचन- म्हणजे ड्रिप इरिगेशनचे तंत्र वापरले जाऊ लागले. सांडपाणी पुनर्वापराच्या तंत्रांचा विचार होऊ लागला. काही ठिकाणी नवी घरे बांधण्यावरच बंधने घातली गेली. प्रत्येकाने रोज लिटरभर पाणी वाचवलं तरी ३९ दशलक्ष लिटर पाण्याची बचत होते! काहींनी शॉवरसमोर घडय़ाळं लावून पाणी कमी कसे वापरावे, याचे प्रयोग करून पाहिले. रेस्टॉरंटमध्ये पाण्याचे मोठ्ठाले ग्लास भरले जात. आता विचारल्याशिवाय पाणी समोर येत नाही असेही काही ठिकाणी होऊ लागले. ‘चला, पाण्याऐवजी बीअर पिऊ,’ असा उपाय आमच्या एका शेजाऱ्याने सुचविल्याचे ऐकले. दुसऱ्या शेजाऱ्याने पाण्याचे पेले इतके छोटे केले, की त्यात एका वेळी घोटभरच पाणी मावते! आमच्या गृहसंकुलातले काही बहाद्दर सोसायटीच्या सार्वजनिक हमामखान्यात जाऊन स्नान करू लागले. म्हणजे आपल्या घरचं पाणी वाचवलं की झालं, हा सोयीस्कर विचार! ‘अहो, असं करून कॅलिफोर्नियातलं पाणी कसं वाचणार?’ असं म्हणणाऱ्या लोकांना ‘त्यापेक्षा तू न्यू जर्सीत जाऊन अंघोळ कर ना!’ असा सल्ला देऊन त्यांची खिल्ली उडवण्यात आली. एकंदरीत प्रत्येकाने आपापल्या परीने पाणीबचतीची जबाबदारी अंगावर घेऊन पाणीटंचाईवर उपाय सुरू केले.
दुष्काळ केवळ पाऊस कमी पडल्यामुळे येत नाही. नैसर्गिक आपत्ती आणि पाण्याच्या गैरव्यवस्थापनाची मानवी प्रवृत्ती यातून दुष्काळ उद्भवतो. दुष्काळाचे विश्लेषण प्रत्येकजण आपापल्या परीने करतो. हवामान खात्याचे तज्ज्ञ ओलेपणाचा अभाव आणि कोरडेपणा किती काळ राहतो याचा अभ्यास करून निष्कर्ष काढतात. शेतीतज्ज्ञांना पाण्याच्या कमतरतेने शेतीवर होणारे परिणाम, जमिनीवर होणारे परिणाम (मृद्संधारण, इ.), तलावांची घसरणारी पातळी दिसू लागते. अर्थतज्ज्ञांना शेतीचे नुकसान, त्यातून समृद्धीवर होणारे परिणाम असे गुंतागुंतीचे प्रश्न भेडसावू लागतात.
यावर्षीच्या प्रारंभीच गव्हर्नरने कॅलिफोर्निया हे दुष्काळी राज्य असल्याचे घोषित कले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राज्यपातळीवर प्रयत्न सुरू झाले. पाण्याच्या वाहतुकीसाठी पाइप्स टाकणे, इस्रायलकडून डिसॅलिनेशन प्लँटची नवी तंत्रे शिकणे, नवीन प्लँट्स बांधणे आणि राज्यातल्या सुमारे ३९ दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचून पाण्याच्या कपातीचे आवाहन करणे, असे विविध मार्ग! १ जूनपासून राज्यात २५ % पाणीकपात जाहीर झाली. गावोगावी ग्रामसभा बोलावून लोकांना या प्रश्नाचे गांभीर्य समजावून सांगितले गेले. यात ‘स्पेसशिप अ‍ॅप्रोच’ आणि ‘प्रॉब्लेम सॉल्व्हिग अ‍ॅप्रोच’ही आला. पृथ्वी (वा कॅलिफोर्निया म्हणा!) ही एक अवकाशयान समजा. अवकाशयानात तेच पाणी पुन:पुन: वापरण्याची तंत्रे असतात. तसे पाणी ‘रिसायकल’ करा, पावसाचे पाणी अडवा आणि त्याचा वापर करा- हा विचार म्हणजे अवकाशयान तंत्राने पाणीटंचाईच्या प्रश्नाला हात घालणे!
अमेरिकेत एखादा प्रश्न सोडवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जातात. जसे- प्रश्नांचा सर्वागीण अभ्यास, लोकांकडून, तज्ज्ञांकडून सूचना मागवणे, लोकशिक्षण, त्यासाठी प्रथम लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे.. नंतर सामुदायिकरीत्या प्रश्न सोडवण्यासाठी मदत आणि प्रशिक्षण दिलं जातं. आर्थिक सवलत जाहीर केली जाते. हे सर्व झाल्यावर नियम करून ते न पाळणाऱ्यांना साम-दाम- दंड.. अशा पायऱ्या. यात तसे नवीन काही नाही; पण अशाने कार्यक्षमता नक्की वाढते. लोक नियम पाळतात की नाही, हे पाहण्यासाठी दंडुकेशाही न वापरता लोकांच्या सवयी कशा बदलता येतील, हे पाहिले जाते.
आम्ही आवर्जून आमच्या गावच्या ग्रामसभेस गेलो होतो. सभेला खच्चून गर्दी होती. पाणी खात्याच्या प्रमुखांनी सुरुवात केली- ‘हे पाहा, पाणीकपातीचा नियम तुम्हाला कदाचित आवडला नसेल. मलाही तो आवडला नाही. पण सर्वानी तो पाळू या..’ अशा गोड शब्दांतल्या आवाहनाने सुरुवातीलाच त्यांनी सर्वाना आपलेसे केले. लोकांची सहानुभूती मिळवली. एक मात्र आहे- व्यक्तिश: एखादा कायदा मान्य नसला तरी तो पाळण्यासाठी स्वत:च स्वत:वर पहारा ठेवण्याची वृत्ती इथे बहुसंख्य लोकांमध्ये दिसते. मागे जेव्हा ‘ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणी सिगरेट ओढायची नाही, धूम्रपानासाठी राखीव जागेत जाऊन ओढायची-’ असा नियम गावात झाला तेव्हा तो फतवा आमची कंपनीप्रमुख तोंडात सिगरेट धरून तो वाटत होती. तिला हा कायदा मान्य नव्हता, हे तिने न बोलता सांगितले. पण दुसऱ्या दिवसापासून तिने कामाच्या ठिकाणी सिगरेट ओढणे बंदही केले. हळूहळू सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे आपोआप बंद झाले. लोकांना तशी सवय लागली. तर या पाण्याच्या ग्रामसभेतही लोकांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन केले गेले. मग पाण्याच्या वापरासंबंधी सरकारी कार्यक्रमांची माहिती दिली गेली.
*कोणी घराभोवतीची हिरवळ कमी केली तर मदत.
*कोणी कमी पाणी वापरणारे कपडेधुवक- म्हणजे ‘वॉशर्स’ नवे घेतले तर सवलत.
* ‘हाय एफिशियन्सी टॉयलेट्स’ बसवण्यासाठी सवलत.
*पाण्याचा वापर कसा कार्यक्षम करावा यासाठी मोफत सल्ला देण्याची सोय.
ी नव्या स्प्रिंकलर्ससाठी योजना. प्रत्येकाला पहिले २५  स्प्रिंकलर्स मोफत.
*दुष्काळात तगणारी झाडे लावण्यासाठी मदत.
*पाण्याचा कमी वापर करणाऱ्यांना आयकर सवलत देण्याचा विचार.
*पाणीपट्टीत वाढ.
*पाणी वाया घालवताना कोणी दिसले तर दिवसाला ५०० डॉलपर्यंत दंड!
या आणि अशा योजनांची माहिती सांगून घरी जाताना प्रत्येकाला एक पाण्याची बादली भेट दिली गेली.
अजूनही आमच्या राज्यात नळाचे पाणी २४ तास येते. ‘पाणी आले, पाणी गेले’ अशी धावाधाव नाही. बादल्या घेऊन रांगा नाहीत की टँकरची वाट पाहणे नाही. बदामाचे नि संत्र्याचे उत्पादन कमी न करता पाणीकपात कशी करावी, यावर विचार होतो. आम्ही तसे मजेत आहोत. पण ‘पाणी हा माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे’ असे म्हणताना आम्हा कॅलिफोर्नियाकरांना पाणीवापराच्या जबाबदारीची आता जाणीव झाली आहे.

विद्या हर्डीकर-सप्रे – vidyahardikar@gmail.com