News Flash

मुक्काम विद्यापीठ (भाग १)

७०-७१ च्या दरम्यान शनवार पेठेतून विद्यापीठात रोज सायकल मारत जाणे शक्य होत नसे. तसे शनवार पेठेतून दररोज सायकलवरून खडकीच्या अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीत आणि सीएमईमध्ये नोकरीसाठी जाणारे

| August 2, 2015 01:01 am

0014७०-७१ च्या दरम्यान शनवार पेठेतून विद्यापीठात रोज सायकल मारत जाणे शक्य होत नसे. तसे शनवार पेठेतून दररोज सायकलवरून खडकीच्या अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीत आणि सीएमईमध्ये नोकरीसाठी जाणारे अनेक होते. दोघं तर आमच्या वाडय़ातच होते. त्यात आमचे एक माधवकाका आणि दुसरे वाडय़ातच राहणारे पांडूभाऊ  कुलकर्णी. दोघे भल्या सकाळी डबा घेऊन निघायचे. सायकलच्या खूप ऑइल लावलेल्या चेनमध्ये पॅन्ट अडकू नये म्हणून त्याला क्लिपा लावलेल्या असायच्या. शनवार पेठ ते खडकी आणि परत असा रोजच सायकलचा प्रवास करायचा असल्याने दोघेही आपल्या वाहनाला खूप जपत. कुणीही सायकलीला हात लावलेलं त्यांना खपत नसे. ते दर रविवारी सायकल साफ करीत. टय़ूबची हवा नियमित चेक करीत. हवा भरण्यासाठी दोघांकडे स्वत:चे स्वतंत्र हातपंप होते. अगदी निवृत्त होईपर्यंत त्यांचा हा सायकलप्रवास अखंड सुरू होता. तरीही विद्यापीठापर्यंत सायकल चालवत जाणं हे प्रकरण काही आम्हाला झेपणारं नव्हतं.
विद्यापीठात त्यावेळी जाण्याचा मार्ग म्हणजे गणेशखिंड रोडच. कारण सेनापती बापट मार्गावरची खिंड अजून फोडलेली नव्हती. हनुमान टेकडी आणि लॉ कॉलेज टेकडी ही अखंडित होती. पण लवकरच ती फोडणार असे दिसत होते. त्यामुळे विद्यापीठात जाण्याचा मार्ग म्हणजे सायकलीने नारायण पेठेतल्या अष्टभुजा कॉजवेवरून डेक्कन टॉकिजच्या सायकल स्टॅन्डवर गाडी दिवसभराच्या बोलीने ठेवून सात नंबरच्या पीएमटी बसने विद्यापीठात मुख्य इमारतीसमोरच्या कारंज्याजवळ उतरणे. आमची बायोकेमिस्ट्रीची क्लासरूम १८६४ मध्ये बांधलेल्या मुख्य इमारतीमध्येच एका छोटय़ाशा खोलीत होती. खूप उंच, लाकडी, सोनेरी नक्षीचं छत. मोठय़ा फ्रेंच विंडो. एका बाजूला दगडी पोर्च. आत मुख्य दरबार हॉलमध्ये जाण्याच्या दाराच्या दुतर्फा ठेवलेले औंधच्या महाराजांनी भेट दिलेले इटालियन संगमरवरी पुतळे. बाहेरच्या बाजूला, शेजारी आणि इमारतीच्या मागील बाजूस सर्वत्र मस्त हिरवेगार लॉन. त्यापलीकडे केमिस्ट्री विभागाची दगडी इमारत. १९४९ मध्ये  विद्यापीठ स्थापन झाल्यावर या विभागाची उभारणी केली ती डॉ. एस. एस. जतकरांनी. १९७० पर्यंत केमिस्ट्री विभागाच्या ऑरगॅनिक, इन्ऑरगॅनिक, फिजिकल या उपशाखांची उभारणी पूर्ण झाली होती. तर न्यूक्लीयर आणि बायोकेमिस्ट्री हे उपविभाग नव्याने सुरू झाले होते. शेजारीच डॉ. मो. वा. चिपळोणकरांनी उभा केलेला फिजिक्सचा विभाग होता. त्यानंतर इंदौरहून आलेल्या डॉ. एम. आर. भिडे आणि मॉस्को विद्यापीठातून पीएच. डी. घेऊन आलेल्या डॉ. राम ताकवले यांनी हा विभाग अद्ययावत करून आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. एकेक दिग्गज प्राध्यापक सर्वत्र होते. गणित विभागात शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे वडील डॉ. व्ही. व्ही. नारळीकर हे लोकमान्य टिळक अध्यासनावर कार्यरत होते. त्याच विभागात नंतर ‘आयुका’चा संचालक झालेला नरेश दधिच हा पीएच. डी. करत होता. तर नंतर प्रसिद्ध झालेले भटनागर पुरस्कारप्राप्त श्रीधर गद्रे, दिलीप कान्हेरे हे तेव्हा आमच्यासारखे विद्यार्थी होते. अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातून पीएच. डी. मिळालेले पहिले भारतीय विद्यार्थी डॉ. एस. नागराजन (१९२९- २०१४) हे पुणे विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे हेड होते. त्यांच्या विद्वत्तेची कीर्ती सर्वदूर होती. ते शेक्सपियर आणि त्याच्या नाटकांचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ म्हणून ओळखले जात. त्यांनी संपादित केलेली ‘मेजर फॉर मेजर’ या नाटकाची विख्यात ‘सिग्नेट क्लासिक्स’ प्रकाशित आवृत्ती गेली ४०-५० वर्षे जगन्मान्य आहे. नागराजनसर अत्यंत विद्यार्थीप्रिय. विद्यापीठात ते ७७ पर्यंत होते. त्यांनी १९७५ मध्ये एका तौलनिक साहित्याच्या परिसंवादाच्या निमित्ताने आमच्या थिएटर अ‍ॅकॅडेमीच्या ‘महानिर्वाण’ आणि ‘महापूर’ या दोन नाटकांचे प्रयोग विद्यापीठात आर्ट्स फॅकल्टीमधल्या मोकळ्या जागेत मांडव घालून आयोजित केले होते. या नाटकांवर चर्चाही घडवून आणली. त्या चर्चेचे अध्यक्ष होते कवी निस्सीम इझिकेल. ७० मध्ये त्यांच्या विद्यार्थीवर्गात विनय हर्डीकर, अजित पारसनीस हे होते. हिंदी साहित्याचे विख्यात समीक्षक डॉ. आनंदप्रसाद दीक्षित हे हिंदीचे हेड होते. ते आज नव्वदीच्या पुढे आहेत. त्यांची मुलगी मधुरिमा आमच्याबरोबर एम. एस्सी.च्या वर्गात होती. पॉलिटिक्सला डॉ. व्ही. एम. सिरसीकर आणि राम बापट होते आणि त्यांच्या विद्याथीवर्गात उल्हास बापट होता. तर समाजशास्त्र विभागात प्रसिद्ध कथाकार विद्याधर पुंडलिक आणि मराठी विभागात डॉ. मु. श्री. कानडे होते. झुऑलॉजीला रजिस्ट्रार व. ह. गोळे यांच्या पत्नी- विख्यात एम्ब्रिओलॉजिस्ट डॉ. लीला मुल्हेकर या होत्या, तर बॉटनी विभागात डॉ. डेव्हिड हे हेड होते. आमच्या दृष्टीने ते आमचे बॉस. कारण विद्यार्थ्यांचे खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्या अखत्यारीत होते. विद्यापीठात ही अशी विद्वान माणसं येता-जाता हिंडताना दिसायची. त्यामुळे अभ्यास हा महत्त्वाचा; खेळ आणि नाटकं वगैरे दुय्यम महत्त्वाचे आहेत, हे आपोआपच अधोरेखित होत असे. बहुतेकांचं ध्येय असायचं एम. एस्सी. होऊन पुढे आयआयटीमध्ये, परदेशात, सीएसआयआर अथवा आयसीएमआरच्या मोठय़ा प्रयोगशाळेत जाऊन पीएच. डी. करणे किंवा औषधनिर्माण कंपन्यांत नोकरी! पुणे विद्यापीठात तेव्हादेखील संपूर्ण भारतातून विद्यार्थी येत असत. राज्याच्या ग्रामीण भागातून जास्त. कारण विद्यापीठाच्या प्रत्येक विभागात असलेली ही सगळी परदेशातून शिकून आलेली प्रोफेसर मंडळी! विद्यापीठाचा शैक्षणिक विभाग ओळखला जायचा तो शिकविणाऱ्या या दिग्गज शिक्षकांमुळे. विभागातल्या प्रयोगशाळांना काळ-वेळ नसे. कोणत्याही विभागात रात्र-रात्र दिवा लागलेला दिसे. कारण अनेकांची प्रॅक्टिकल्स रात्रभर चालत. सिक्युरिटीचं तेव्हा काही प्रस्थ नव्हतं. बरेचसे प्रोफेसर हे कॅम्पसवरच राहत असल्याने तेही विभागात रात्री उशिरापर्यंत असायचे. सायन्स आणि आर्ट्स विषयांच्या सीमा पुसट व्हायला लागल्या होत्या. अनिकेत कॅन्टीनमध्ये तर सिगारेटी, चहा, मिसळ, कॅरम बोर्ड, टेबल टेनिस तसेच बुद्धिबळ यामुळे या सीमा एकजीवच व्हायच्या. अनेकांच्या प्रेमाच्या आणाभाका आणि ताटातुटी अनिकेत कॅन्टीनच्या साक्षीनेच व्हायच्या.
आमच्या बायोकेमिस्ट्रीचे हेड होते डॉ. पी. एन. जोशी. त्यांची एक तऱ्हाच होती. ते वागायला विक्षिप्त. कायम त्यांची तंद्री लागलेली असे. स्वत:शीच हसत ते पुटपुटत असत. अंगावर कायम चुरगळलेले कपडे. शर्ट नीट कधी खोचलेला नसे. टायही व्यवस्थित बांधलेला नसे. अत्यंत बुद्धिमान. पण राहणी अजागळ. अमेरिकेत काही वर्षे राहून आलेले. त्यांची पीएच. डी. ही विस्कॉनसीन विद्यापीठाची होती. त्यांना भेटायचं म्हणजे जयकर ग्रंथालयात शोधत जावे लागे. जुन्या जाड पुस्तकांच्या ढिगाऱ्यात ते वाचनात मग्न असत. त्यांच्या पत्नीही तशाच. त्याही आम्हाला शिकवायला होत्या. त्यांचा तास असला की जोशीसर त्यांना स्कूटरवरून वर्गात आणून सोडायचे. तास झाला की त्यांची स्कूटर हजर! मग जोशी मॅडम टुण्णकन् उडी मारून स्कूटरवर बसायच्या. दोन वर्षांत आम्ही त्या दोघांना कधीही एकमेकांशी बोलताना पाहिलं नाही. जोशी मॅडम कायम ताजी फुलं माळून यायच्या. या मजेशीर जोडप्याच्या कहाण्या विद्यापीठ परिसरात कायम चर्चेत असत. पुढच्याच वर्षी म्हणजे ७२ मध्ये ‘मिकी आणि मेमसाहेब’ हे माझं पहिलं, फक्त आठ प्रयोग झालेलं नाटक लिहिताना जोशीसरांच्या अनेक लकबींचा मला उपयोग झाला.
७० च्या नोव्हेंबरमध्ये पीडीए निर्मित ‘अशी पाखरे येती’चे प्रयोग सुरू झाले. राज्य नाटय़स्पर्धेत अंतिम फेरीत ते पहिले आल्यावर त्याचे तडाखेबंद प्रयोग सुरू झाले. मी त्याचे बॅकस्टेज बघत असे. कधी कधी प्रकाशयोजनादेखील बघायला लागायची. दर शनिवार-रविवार मुंबईला प्रयोग व्हायचे. कारण हे नाटक हौशी कलाकारांचे असूनही मुंबईत जास्त लोकप्रिय झाले होते. त्यामुळे दर शनिवारी माझ्या तासांना आणि प्रॅक्टिकलला दांडय़ा पडायच्या. रविवारी रात्रीचा प्रयोग करून पुण्यात यायला सकाळ व्हायची. कारण घाट कायम जाम असायचा. कधी कधी तर आम्ही लोणावळ्यापर्यंत येऊन नंतर ट्रॅफिक जामला कंटाळून पहिल्या लोकलनेसुद्धा पुण्याला आलेलो आहोत. त्यामुळे सोमवार सगळा झोपेतच जायचा. त्यात एम. एस्सी.च्या परीक्षा सेमिस्टरच्या असल्याने सतत टेस्ट्स चालू असायच्या. परत आता आपली अभ्यासाची बोंब होणार की काय? पुन्हा नाटक करतो म्हणावं, तर या नाटकात मी काही स्टेजवर दिसत नव्हतोच. मग मी नाटक करतो म्हणजे नेमकं काय करतो, असा प्रश्न विद्यापीठात सगळे विचारीत. त्यामुळे मनात कायम ‘अभ्यास की नाटक?’ याची सतत ओढाताण सुरू असे. पण अभ्यासाच्या वह्य़ांत सत्यकथेकडून परत आलेल्या ‘एक झुलता पूल’चे स्क्रिप्ट मात्र सतत असे. त्यावर माझ्या रेघोटय़ा मारणं सुरू असे. त्यात बातमी आली होती की, दोन वर्षे बंद पडलेली पुरुषोत्तम करंडक स्पर्धा १९७१ च्या गणपतीनंतर सुरू  होणार. त्यात मात्र आपलं स्वत:चं असं काहीतरी करावं, हा विचार मनात प्रबळ झाला होता.
७०-७१ च्या दरम्यान पुण्याला नव्याने बांधलेल्या बालगंधर्व नाटय़मंदिरात प्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर यांची तीन व्याख्याने त्यांचे प्रकाशक देशमुख आणि कंपनीने आयोजित केली होती. त्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातून शे-सव्वाशे साहित्यिक पुण्याला रा. ज. देशमुखांचे पाहुणे म्हणून आलेले. ते सुवर्ण स्मृती मंगल कार्यालयात मुक्कामाला होते. राम पटवर्धन यांचे आलेले कार्ड आणि एकांकिकेचे स्क्रिप्ट घेऊन मी तिथे गेलो. तिथं प्रथमच मी त्यांना पाहिलं. त्यांनी माझी ओळख सगळ्यांशी करून दिली. कोण कोण आलेले होते? समस्त मराठी सारस्वतांची मांदियाळीच तिथे जमलेली होती. मला तोपर्यंत साहित्यिक असे माहीत होते ते म्हणजे व्यंकटेश माडगूळकर. कारण त्यांची मुलगी ज्ञानदा आमच्याबरोबर फग्र्युसनमध्ये होती. दुसरे विजय तेंडुलकर. ते मात्र तिथे नव्हते. पण श्री. पु. भागवत, श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर, जयवंत दळवी, विंदा करंदीकर, जया दडकर, चिं. त्र्यं. खानोलकर, वा. ल. कुलकर्णी, नारायण सुर्वे, मंगेश पाडगांवकर, शांता शेळके, माधव आचवल, सरिता पत्की, पद्मजा गोळे, अनुराधा पोतदार, विद्याधर पुंडलिक, पु. भा. भावे असे सगळे होते. राम पटवर्धनांनी आणि आमचे स. शी. भावेसर यांनी या सर्वाशी माझी ओळख करून दिली. विनय हर्डीकर तिथे स्वयंसेवकाच्या भूमिकेत होता.
राम पटवर्धन मग मला घेऊन जरा बाजूला होत म्हणाले की, ‘काय, एकांकिका परत लिहून काढलीत की नाही? काय काय बदल केलेत?’ मी म्हणालो की, ‘काही विशेष बदल केले नाहीत.’ अशी आमची चर्चा सुरू झाली. त्यांचा मुख्य आक्षेप होता तो म्हणजे संहितेमधल्या व्यक्तिरेखा या ठाशीव हव्यात. त्यांना इतिहास हवा. वाक्ये सलग हवीत. कुकरचे प्रतीक फार बटबटीत आहे. त्यातली सत्यनारायणाची कथा फार लांबलेली आहे. त्याभोवती संहिता घोटाळू नये. मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो की, हे नाटक आहे. सगळं खोटं खोटं आहे. व्यक्तिरेखा या पात्रं तर आहेतच, पण ते मुळात नट आहेत. व्यक्तिरेखा अंगावर घेऊन अभिनय करणारे आहेत. अभिनयाने त्यांचे पात्र ठाशीव होत जाणार आहे. ते पूर्णपणे संहितेचा साहित्यिक अंगाने विचार करत होते आणि मी माझ्या संहितेचा ‘प्रयोग’ मनात बघून बोलत होतो. त्यांची परिभाषा मला समजत नव्हती. कारण मी तसा विचारच कधी केलेला नव्हता. मी त्यांना म्हटलं की, ‘तुम्ही याचा प्रयोग बघायला या, म्हणजे मी जे काही म्हणतोय त्याचा उलगडा होईल. त्या लांब वाटणाऱ्या कथेला टाळ्या मिळतील. कारण ती विशिष्ट पद्धतीने म्हणायची आहे. जे संवाद तुटक वाटतायत, त्यांच्या मधल्या स्तब्धतेमधून प्रेक्षकांचे हशे येतील अशी माझी खात्री आहे. हे सगळं प्रेक्षकांसाठी आहे, वाचकांसाठी नाही. आणि मीच संहिता दिग्दर्शित करणार आहे.’ एकूण त्या भेटीत त्यांचा नि माझ्या लिखाणाचा सूर काही जमलाय असं वाटलं नाही. पण याअगोदर मी लिहिलेल्या ‘मेमरी’, ‘भजन’, ‘सामना’ या एकांकिका तर त्यांनीच सत्यकथेत छापल्या होत्या. यावेळी काय बिनसलं, कोण जाणे.
अखेर आमच्या दोन सेमिस्टर संपून ७१ चा जून आला. पुन्हा मनात दुविधा- की हे एम. एस्सी.चं शेवटचं वर्ष; तेव्हा आता नाटक करावं की अभ्यास? शेवटी ठरवलं, की स्पर्धेत एकांकिका करायची. महिनाभरात सगळं संपेल. मग मात्र फक्त अभ्यास! पण कलाकार कसे मिळणार? सगळे अभ्यासात मग्न. मला चार पात्रं हवी होती. एक मी. आणखी तीनजण शोधायचे. त्यातले दोन पुरुष.. तरुणाचे वडील आणि दुसरे मुलीचे वडील. आणि मुख्य म्हणजे ती व्हायोलीनवाली तरुणी! शोधाशोध करायची म्हणजे एकेका विभागात जायचं. अगोदर कॅन्टीनमध्ये शोधून ठेवलेली मुलगी जर तिथे दिसली, तर धीर करून तिच्याकडे नाटकाचा विषय काढायचा. दोन तरुणांना मी विनंती करकरून भरीस पाडलं होतंच. पैकी एक तरुणीचा बाप म्हणून पोलिटिकल सायन्सचा उंच, गोरा, हॅन्डसम उल्हास बापट. तो म्हणाला, ‘हे बघ-माझ्या काही अटी आहेत. मी कधीही स्टेजवर काम केलेलं नाही. तुझ्यासाठी करतोय. पण मी जर संवाद विसरलो, किंवा प्रयोगातील माझ्या अन्य कोणत्याही चुकीस मी जबाबदार नाही. नाटक पडलं, फजिती झाली, तर तुझी होईल. कोणत्याही क्षणी मला तू घरी जा म्हणू शकतोस. हे पटत असल्यास बघ.’ मी अर्थातच त्याच्या सगळ्या अटी मान्य केल्या. दुसरा तरुण म्हणजे इन्ऑर्गेनिक केमिस्ट्रीचा स्कॉलर धनंजय देशपांडे. हा तरुणाचा बाप. तो सतत लॅबमध्ये असायचा. मी येताना दिसलो की तो लपून बसत असे. त्याला तालमींसाठी शोधावा लागे.
आता ती तरुणी. तिला शोधण्यासाठी मोहीमच आखली. त्याकरता कॅन्टीनमध्ये सतत दबा धरून बसावं लागे. बॉटनी, झूऑलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्रीच्या लॅब्ज् आणि सर्व भाषा विभाग पालथे घालायचे. विचारायला गेलं तर सगळ्यांना वाटायचं, की कोणतीतरी स्पोर्ट्सची टीम निवडणं चालू आहे. कारण खेळांची पण बोंबच होती. पुरेसे खेळाडू मिळत नसत. मग टीम पुरी करण्यासाठी स्पोर्ट्स सेक्रेटरीदेखील माझ्यासारखाच हिंडत असे. त्यामुळे नाटकात कधीही कामं न केलेला विद्यार्थी अभिनय करायचा, आणि मैदानात कधीही न पाऊल टाकलेला चक्क व्हॉलीबॉल, बास्केटबॉल असे खेळ खेळायचा. बॉिक्सगची टीम अशी जमवत नसत हे नशीब.
माझ्याबद्दल जरा सहानुभूती असलेले दोघंच होते. पण ते कॅम्पसवरचे विद्यार्थी नव्हते. एक म्हणजे समर नखाते. त्याला एफटीआयआयच्या अ‍ॅडमिशनचे वेध लागले होते. आणि दुसरा अनंत कान्हो (कुलकर्णी). तो फग्र्युसनमध्ये बी. एस्सी. करत होता. दिवसभरच्या माझ्या शोधमोहिमेचा वृत्तान्त मी त्यांना संध्याकाळी त्यावेळच्या ‘मद्रास हेल्थ होम’मध्ये- म्हणजे आत्ताच्या ‘वैशाली’वर देत असे.
अखेर तो दिवस आला. अनिकेत कॅन्टीनमध्ये मी आणि माझा एम. एस्सी.चा वर्गमित्र विक्रम घोले बसलो होतो. पलीकडल्या टेबलावर एक मुलींचा लॉट आला. त्यात एक मुलगी दिसली. शेलाटी, गोरी आणि गालाला खळी. म्हटलं, हीच आपली व्हायोलीनवाली. तो लॉट कधी एकदा उठून मार्गस्थ होतो असं झालं. त्या मुली उठल्यावर त्यांच्या मागे मी आणि विक्रम. त्या बॉटनीच्या मुली होत्या. बॉटनीच्या इमारतीच्या पोर्चमध्ये धीर करून तिला विचारलं की, ‘एकांकिकेत काम करणार का?’ तिनं हाताची घडी घालून आमच्याकडे बघितलं आणि म्हणाली, ‘घरी विचारून सांगते.’ हाताच्या घडीत धरलेल्या वहीवर नाव होतं- जयलक्ष्मी के. कुलकर्णी. (आताची अमेरिकास्थित जयू वाघ!) मराठी नाटक आदी एकूणच कलांच्या विकासाच्या मार्गावर ‘घरी विचारून सांगते’ हा फार मोठा अशास्त्रीय पद्धतीचा स्पीडब्रेकर त्यावेळी असे. अत्यंत विचारपूर्वक आपलं वाहन त्यावरून न्यावं लागे. मनातून कितीही म्हणावंसं वाटलं की, ‘फाटय़ावर मार घरच्यांना!’- तरी ते वाटणं मनातच गिळून, अत्यंत उचित अशा गांभीर्याने ‘घरी विचारून सांगते’ हे विधान घेतल्याचं चेहऱ्यावरून समोरच्या पार्टीला दाखवावं लागे. चालू पिढीच्या ‘घरच्यांनी’ हे स्पीडब्रेकर जरा सुसह्य केलेले असावेत, किंवा सध्याच्या तरुण-तरुणींनी ते संगनमताने अनधिकृतपणे काढले असावेत. पण कळविण्यास आनंद होतो की, जयलक्ष्मीच्या घरच्यांनी कलेला उत्तेजन देण्याचा निर्णय घेतला.
तर कुलकर्णी, देशपांडे आणि बापट यांना घेऊन एकांकिकेचे पहिले वाचन झाले. त्यानंतर पसरलेली शांतता इतकी तीव्र होती, की जणू मी मृत्युपत्रच वाचून दाखवलंय. जयू एकदम उठत म्हणाली की, ‘मी चालले. कारण मला व्हायोलीन येत नाही.’ धनंजय म्हणाला की, ‘संवाद पाठ होणे अशक्य आहेत. नाही तरी हे सगळं अ‍ॅब्सर्ड आहे. तेव्हा तू तिच्या बापाला केमिस्ट्रीचा मास्तर कर- म्हणजे मी निदान मधून मधून केमिस्ट्रीचे फॉम्र्युले तरी पाठ म्हणीन.’ उल्हास फक्त गप्प होता. खूप विचारात पडला होता. त्याच्या मते- ‘हे काहीतरी नवं, पण न कळणारं वाटतंय.’ म्हणजे वळलं तर सूत, नाहीतर भूत- असा प्रकार.
अखेर मी आणि माझे दोन निष्णात वकील समर आणि अनंत कान्हो यांनी सगळ्यांना समजावलं की, व्हायोलीन खरं नाही, नुसता अभिनय आहे. मुख्य विषय म्हणजे कनिष्ठ मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग यांच्या बदलत्या संवेदनांचा आणि त्यांच्यातल्या तणावांचा वगैरे! अशा रीतीने जुलै-ऑगस्टच्या पावसाळी कच्च ओल्या, हिरव्या दिवसांत, गणेशखिंडीत
प्रॅक्टिकलच्या वेळा सांभाळत आमच्या तालमी तर जोरात सुरू झाल्या..
सतीश आळेकर- satish.alekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 1:01 am

Web Title: savitribai phule pune university
Next Stories
1 गणेशखिंड व्हाया अहमदनगर
2 संहिता ते प्रयोग
3 सीडलेस थॉम्पसन
Just Now!
X