एकानं एकाला जरी हात देला तरी उभं राहता येईन. मानसं बराबर वाटलेत माहेरात अन् तिकडं (गाव-शहर). ह्य़ानिमतानं एक्या जाग्यावर येतेन. सुखात नाही, पण दु:खात मानसं एक होतेत. आज इकडून शिदोरी देलीस माहेरची, तर उद्या तिकडून ‘वानवळा’ नक्की येईन. देवानघेवान असती. चल, निघायची वेळ झाली. आपल्यात जायचं असंल तरी ‘येतो’ म्हणायची संस्कृती हाई.
ज्याकाळात लोक आडाणी होते, लिहिता वाचता येत नव्हतं, तव्हा संतांनी लिहिल्याल्या ग्रंथाला किंमत व्हती. संताचे विचार ऐकून मोक्ष मिळावा, म्हणून लोक तसंच वागत व्हते. पण जसं साक्षरतेचं प्रमाण वाढलं तसं त्याहय़ला कळलं, ग्रंथ आचरल्यानं नाही तर वाचल्यानं पुण्य मिळतं. तसं मंडप देऊन लाउडस्पीकर लावून हजारो लोक मांडी न मोडता एका बसनी तालासुरात पारायन करू लागले. पिकाला पाणी देताना दारूळ्याला काळ्या मातीतल भुंडं फुटल्यावर दांडात आडवं पडून बी पाणी थोपत नाही, तव्हा नुसतं कपाळावर मारून घ्यावा लागतू. संतांच्या ग्रंथांची तीच गत झाली. त्याहय़नंसुद्धा आज कपाळावरच हात मारून घेतला असता. ‘अरे, संतांच्या ग्रंथाचं असं तं तोही काय गत? त्याच्यात त्वा कितीक पावसाळे पाहिलेस? निम्मे तं कोरडे गेल्याले. तू कोन्हय़ा झाडाची मुळी?’
असं मव्हं मन मला वरीसभर म्हणीत व्हतं. मव्हं दुसरं मन म्हणीत व्हतं, ‘तू तोहं गऱ्हाणं मांड. त्याच्या हेटाळणीकडं लक्ष देऊ नकू. सासरहून बऱ्याच दिवसानं माहेरला आल्यावर रात्री माईच्या मांडीवर डोकं ठेवून रातभर केलेल गाऱ्हाणं हाई ते.’ (लोकसत्ता माहेर, वाचक माय, लोकरंग मंजी महय़ासाठी तिची मांडी अन् ‘शिवार’ मंजी गाऱ्हाणं!) माईच्या मांडीवर रातभर सुख-दु:खाचं, सासुरवासाचं, आप्तांचं कव्हा हसून तर कव्हा रडून सांगितलं. काही गोष्टी माईला कळल्या तर काही नाही कळल्या. ह्य़ाच्यात तिचा दोष नाही. मलाच त्या नीट सांगता येत नव्हत्या. तरी सांगितल्या. मही बोली बोबडी व्हती. वाकडी व्हती. खरं तर भाईरचं कोन्ही असतं तं त्याला काहीच कळलं नसतं. पण माय समजून घेत व्हती. आहो जव्हा मला भाषाच येत नव्हती, तव्हा ती मह्य़ा रडण्यात बी शब्द शोधायची. आता काही का व्हईना, चार अक्षरं बोलायचं वळण जिबीला पडलं.
खरं तर मायची आन मही सुरुवातीला वळख बी नव्हती.. पुढं हा दिवटा काय दिवा लावीन, घर उजळीन का जाळीन याची. लोक जरी म्हणीत असले की लेकराचे पाय पाळण्यात दिसतेत. पण तिचा त्याच्यावर भरोसा नाही (नाही तर निम्मे लेकरं पाळण्यातच मेले असते.) म्हणून तं ती वाढवीत जाती. म्हणूनच मला लिहिता आलं. नाही तर दुसऱ्याच खेपंला हे लेखन बंद झालं असतं.
माईचं खरं बी हाई. लहानपणी लेकरू पायाची बोटं तोंडात घालतं. मोठेपणी काही जण दुसऱ्याला तोंडात बोटं घालायला लावतेत तर काहीजण नकू त्याच्यात बोटं घालतेत. तसा माईनं दुजाभाव न ठूता वरिसभर वाढवलं.
खरं तर हे गाऱ्हाणं करतानी एकलगट आठवत नव्हतं. मंग जसं जसं सुचं तसं तसं सांगू लागलो. आयुष्य सांगायला रात कशी पुरंन, तरी मी एकटाच बोलत होतो. चांगलं पण खूप काही घडलं आयुष्यात. पण ते सगळ्या समुर सांगायचं असतं. दु:खं मातर असंच एकटीलाच सांगावं म्हणलं. ते सगळ्यात सांगून चव्हाटय़ावर कसं आनू? ह्य़ा गोष्टी अस्या अंधारातच सांगायच्या असत्यात. तिथं ती-मी अन् अंधारच पाहिजी. माझ्या डोळ्यातलं पाणी दिसनार नाही. याच्यासाठी मनातून सांगू? तुला जे काही सांगितलं ना ते तुला दु:खात लोटण्यासाठी, की हे जग किती उदास हाई, भंपक हाई याच्यासाठी नाही, तर तू पाहिलेले चार उन्हाळे-पावसाळे मला अशा परिस्थितीत जिवनाचं भान देतेन. जगायचं कसं ते शिकवितेन. नाही तर आम्हाला सारखी टोचणी ऐकावी लागती. माईनं हेच शिकीलं का याची?
आठ जानेवारीच्या दिवे लागणीपासून तर आज २३ चं तांबड फूटुस्तर २४ गोष्टी सांगितल्या. महाभारतात धर्मानं तरी खोटय़ासाठी कानावर हात ठूले म्हणतात. म्हणूनश्यान चुकून बी तोह्य़ा कानावर खोटा शब्द पडू देला नाय म्या. खरं तर अजून लई गोष्टी हायीत सांगायच्या, पण मुक्काम बी संपत आलाय. पाय वढत नाही जायला. पण तू म्हणशीन दुसरं काही बोलायचं तं गाऱ्हाण्यातच रात गेली. मनातली खदखद इथं नाही तर कुठं सांगणार? उद्या जरी राहण्यात आलं ना तरी हेच गाऱ्हाणं आसंन.. मंग तुलाच त्याचा कंटाळा येईन. म्हणशीन गाऱ्हाण्याच्या पलीकडं काहीच येत नाही. पुन्हा माहेरची पण वाट बंद होईल.
माझं इथं येणं मंजी गाऱ्हाणं असा दचूक बसंन, भीती बसंन. पाव्हण्यासारखं रातची रात राहून गेलं तर आपुलकी राहाती. आता जावा लागंन. संसाराची ओढ लागली. इथं आल्यामुळं बरीच कामं तशीच पडलीत.  घरातल्या घरात माणूस मानसाला धड बोलायना. तात्या म्हणतेत ‘तंगी आली की जंगी येती’. पण ही तंगी आयुष्यालाच पुरणारी आसंन तं जगायचं कसं?
मह्य़ा बोलण्यातून तुला हे जाणोलं असंन आवंदा दुष्काळ हाई. जगणं बीकट झालंय. अस्या दुस्काळातच तुकारामाचं संतपद जन्माला आलं. कर्ज, वह्य़ा बुडील्या. धान्याचा गोदाम फोडून वाटला. आता काळ बदलला, परीक्षा पहानारे पांडुरंगच उरलेत, तुकाराम नाही. नुसता मसनवाटा झालाय. बाजार वस पडलेत. जनावराची पोटं पाठीला चिकटलेत. हातावरच्या पोटावाल्यांचे पाय देसोधडीकडं वळालेत. तीनतीनशे-चारचारशे फुट खोल पाताळापस्तोरं भोकं पाडून बी पाण्याचा थेंब नाही. नुस्ता धुरूळा उडायलाय. पाखरं देस सोडायच्या तयारीत हेत. त्याहय़चं घर काय चोचीत असतं, ना व्हिसा ना पासपोर्ट. मानसाचं अवघड झालंय. रस्त्यावर, वट्टय़ांवर रात रात चिंतेत बैठका बसत्यात.. न चुकताबी चिंतन बैठक. बैठकीत मव्हं कसं होईन आसं कोन्हीच म्हणीत नाही. फक्त म्हणतेत, ढोरा-बैलाचं कसं होईन?
कुजबूज कानावर आली. तिकडं समुद्राला पाणी हाई म्हणतेत पण ते बी पेत नाहीत जणू. पण भुकेला कोंडा अन् निजेला धोंडा. सगळं जमतं. पुन्हा ऐकलंय, कारखान्यातून सांडपाणी भाईर पडतंय. त्याचं झाल्यावर देलं तं बघू माघुन. देलं तं गाळून फाळून पेता येईन. डोंगर पोखरून इकडून तिकडं रस्ते आनता येतात. पाणी नाही ना. रस्त्याची गरज हाई, इकडचा माल तिकडं न्याहावा लागतू.. माणसं भुके कसे जमतेन.. माल नसला तं कारखाने बंद पडतेत. पण तिकडंच पाणी कसं आनायचं? त्याचा काय उपयोग? आजून ढग येऊ देतेत तीच मेहेरबानी. सगळ्यायचं म्हणनं हाई, समीद्राच्या काटालाच जाऊ, पण तिथं बी भाईरच्यायला येऊ देतेत का नाही माहीत नाही. त्याहय़च्या जवळ पोलीस हाईत, मिल्ट्री हाई, बंदुका हाईत..पण आम्ही ठरीलंय की त्यांच्या जवळ माणुसकी असली तरच जायचं. आज आपल्यावर तं उद्या त्याहय़च्यावर बारी हाई. अस्या काळात माणसानं मानसाला नाही वळखायचं तं काय भूतं वळखितेन?
माय, तू पुन्हा म्हणशीन केलं गाऱ्हाणं सुरू, पण काय करू, दु:खाची माय येडी असती. वाटतं कोन्हाकोन्हाला सांगू? कोन्ही तरी ईलाज करीनच ना! अन् तू तं माऊली. तुलाचं सांगावं लागंन. मला माहिती हाई तोहय़ा हातात ईलाज नाही.
पहिल्यासारख्या संसाराच्या किल्ल्या तोह्य़ा हातात नाही. पण तळमळ तं हाईना. एकानं एकाला जरी हात देला तरी उभं राहता येईन. मानसं बराबर वाटलेत माहेरात अन् तिकडं (गाव-शहर). ह्य़ा निमतानं एक्या जाग्यावर येतेन. सुखात नाही पण दु:खात मानसं एक होतेत. आज इकडून शिदोरी देलीस माहेरची तर उद्या तिकडून ‘वानवळा’ नक्की येईन. देवान-घेवान असती. चल, निघायची वेळ झाली. आपल्यात जायचं असंल तरी ‘येतो’ म्हणायची संस्कृती हाई. येन्याचं माहीत नाही. आलो तेव्हा ओळख नव्हती. थव्यातल्या पाखराला स्वत:चं नाव-गाव नसतं. तुझ्या अंगणातल्या डहाळीवर होतो, तोवर स्वतंत्र ओळख. आता थव्यात जाईन तव्हा ती पुसनारच. आता निघायचंय, पण दारात थांबू नको. मी परत वळून पहानार नाही. डोळे भरून यायची भीती वाटते. पाणी वाया जाईल ना! आलीस कधी तर आयुष्याच्या वाटेवर माझं गाव लागतं. नक्की ये. येताना तुझ्या हृदयातल्या प्रेरणेची शिदोरी घेऊन ये. माझ्या जगण्याला बळ देण्यासाठी..    
(समाप्त)