मध्यरात्री अन्वयाचा फोन आला तेव्हाच करणला काळजी वाटली.
‘डॉक्टर करण, मी  मिसेस अन्वया अपूर्व देशपांडे.’
‘बोला.. मिसेस देशपांडे.’
‘डॉक्टर, अपूर्वच्या नावाने झडतीचे वॉरंट निघालेय. मेंदूच्या झडतीचे.’
‘अहो, इतका सरळमार्गी आहे अपूर्व! फुकट वेळ घालवतात हे मेडीकॉप्स. काय झाले?’
‘सर, मागच्या महिन्यात अपूर्वचा एक सहकारी जस्टीन आजारी पडला. त्याच्या म्हणण्यानुसार, दुखण्याची सुरुवात तो ऑफिसमध्ये जखमी झाला तेव्हापासून झाली. तो कंपनीकडे लाखो डॉल्युरोची भरपाई मागतो आहे. ऑफिसातील कॅमेरे, जमिनीतील सेन्सर्स सगळ्यातील पुरावा त्याच्या विरुद्ध आहे. तो ऑफिसात जखमी झालाच नाही.’
‘अपूर्व कसा काय गुंतला या प्रकरणात मग?’
‘जस्टीनच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी तो जखमी झाला त्यावेळी अपूर्वने त्याला पाहिले. अपूर्वला काहीच लक्षात नाही. पण तो ऑफिसच्या लिफ्टमध्ये होता, हे कॅमेरात दिसले. जज्ने अपूर्वच्या मेंदूची झडती घेण्याची ऑर्डर दिलीय.’
‘ओह! त्याला त्याच्या न्यूरॉलॉजिस्टला सोबत घेऊन येण्याची परवानगी आहे का?’
‘हो सर, म्हणून तुम्हाला फोन केला.’
‘ठीक आहे. मेडीकॉप्सने दिलेला पत्ता पाठवा. मी येईन. काळजी करू नका. कधी नेले त्याला?’
‘पंधरा मिनिटे झाली असतील.’
‘त्याच्या इतर तपासण्या होईपर्यंत वेळ जाईल. कदाचित पहाटे पाचच्या आसपास झडती घेतील. मी येतो नक्की.’
मेडीकॉप्सना आरोपी किंवा साक्षीदाराच्या मेंदूची झडती घेण्याची परवानगी देणारा कायदा २१६० साली झाला आणि तेव्हापासून करणच्या व्यवसायाचे स्वरूपच बदलून गेले. लोकांना आधीच कायद्याची भीती! त्यात वर अशा पद्धतीने मेंदूच्या झडतीची भीती! कुणाच्या मेंदूत काय सापडेल याचा नेम नाही. कधी मूळ खटल्याला पूरक माहिती मिळत असे, तर क्वचित नवे खटले सुरू होतील अशी माहितीही हाताशी येत असे. रुग्ण भांबावून जात. म्हणून एखाद्या रुग्णाचे झडतीचे वॉरंट निघाले की वेळ-अवेळ असली तरी करण जातीने हजर राहत असे.
हा कायदा निघायच्या वेळी करणने त्याला विरोध केला. अनुभव ही किती वैयक्तिक, खाजगी बाब!  त्या अनुभवांच्या स्मृतींची अशी झडती व्हावी हे करणला मान्य नव्हते. मात्र, या तंत्रामुळे अनेक केसेसमध्ये आरोपीची मेंदू-झडती घेऊन आरोपींना शिक्षा झाली. मग आरोपींना आपला मेंदू साफ करण्यासाठी काही डॉक्टर सेवा पुरवू लागले. म्हणून मग मेडीकॉप्सतर्फे अचानक वॉरंट काढून साक्षीदारांच्या मेंदूची झडती घेतली जाऊ लागली. करण कायद्याला मदत होईल, साक्षीदारांचे हक्क शाबूत राहतील, या भावनेने शक्य ते सर्व करीत असे. तो मेडीकॉप्स सेंटर्सवर जात असे. त्या दिवशी इतर रुग्ण आणि हॉस्पिटलचा भार डॉक्टर मोहन सांभाळत असे. मोहनसाठी सूचना नोंदवून करण झोपी गेला.

मेडीकॉप्स मेन सेंटरवर करण पोहोचला तेव्हा देशपांडे काकू (अपूर्वची आई), अपूर्व आणि अन्वया तिथे होते. आपल्या बाजूचे डॉक्टर करण सिन्हा आले म्हटल्यावर आईचा जीव भांडय़ात पडला, हे अपूर्वला जाणवले.
‘डॉक्टर, ते नक्की काय करणार आहेत? अपूर्वला याचा त्रास होईल का? म्हणजे केसचा नाही, या मेंदूझडतीचा. तुम्ही काही सर्टिफिकेट देऊन रद्द नाही का करू शकणार हे?’
‘आई, किती प्रश्न!’ अन्वया म्हणाली. तिच्याही चेहऱ्यावर काळजी होतीच.
‘आंटी, काळजी करू नका. यात वैद्यकीय रिस्क फार नाही. मी स्वत: हजर आहेच. हे तपासणीचे तंत्र तसे जुने आहे. २१ व्या शतकात डॉक्टर क्रिमन (ङ१ी्रेंल्ल) वारंवार फेफरे येणाऱ्या एपिलेप्सीच्या रुग्णांचा इलाज करीत असत. मेंदूच्या तळाशी स्मरणशक्तीशी निगडित ‘हिप्पोकॅम्पस’ भाग असतो. त्यात इलेक्ट्रोड घालून तेथील पेशींचे कार्य डॉक्टर तपासत होते. ‘फ्रेंड्स’ नावाच्या टीव्ही शोमध्ये जेनिफर अ‍ॅनिस्टन ही प्रसिद्ध नटी होती. माहिती आहे?’
‘हो डॉक्टर.  फिल्म संग्रहालयात मी पाहिला आहे तो शो. तिचं काय?’
‘तिचा फोटो दाखवला की रुग्णाच्या हिप्पोकॅम्पसमधील एक विशिष्ट पेशी कार्यान्वित होत असे. तिचे नाव, तिचा व्हिडीओ- काहीही दाखवले तरी एक विशिष्ट न्यूरोन कार्यान्वित होत असे. त्यांनी त्याला विनोदाने ‘जेनिफर न्यूरॉन’ असे नाव दिले. तत्कालीन इतर लोक- जसे हॅली बेरी किंवा ओप्राह विनफ्रे यांची चित्रेही दाखवली गेली.  एक व्यक्ती- एक विशिष्ट न्यूरोन अशा स्वरूपात लोकांच्या मेंदूत साठवलेली आढळली. त्या शोधातून पुढे दीडशे वर्षे स्मृती कशा साठवल्या जातात व त्याची तपासणी कशी करावी, याचे तंत्र विकसित झाले. अपूर्वच्या मेंदूत इलेक्ट्रोड्स घालतील. त्याला जस्टीन व ऑफिसातील विविध चित्रे दाखवली जातील. जर त्याने ती चित्रे आधी अनुभवली असतील तर एक-दोन विशिष्ट न्यूरोन कार्यान्वित होतील.’
‘पण डॉक्टर, त्याने जस्टीनला आधी कधी जखमी पाहिले असेल तर?’ आईने प्रश्न विचारला.
‘हो, अशी गल्लत होणे शक्य आहे. मात्र, आपल्या हल्लीच्या तंत्रामुळे एखादी स्मृती लोकेट केली की दुसऱ्या न्यूरोनवर ती कधी साठवली गेली असावी, ते तपासता येते. त्यावरून त्या स्मृतीची तारीख नक्की केली जाईल.’
तेवढय़ात रोबोहेल्पर अपूर्व आणि करणला तपासणी खोलीत घेऊन जायला आली.

रोबोहेल्परने अपूर्वला ड्रेसिंग रूममध्ये सोडले. आत सीनियर मॅनेजर अल्बर्ट वांगला बघून त्याला आश्चर्य वाटले. त्याने विचारले, ‘अल्बर्ट, तुझीपण झडती घेणार आहेत?’
अल्बर्ट फिके हसून म्हणाला, ‘अजून तरी नाही. तुला काही नाही आठवत? तुला जस्टीन जखमी दिसला असेल तर तुझ्यापायी कंपनीचे किती नुकसान होईल!’
‘अल्बर्ट, कंपनीचे नुकसान व्हावे अशी माझी अजिबात इच्छा नाहीए. पण जस्टीनचे वाईट होऊ नये. झडतीत जे निघेल ते निघेल.’ अपूर्व गंभीरपणे उत्तरला.
‘त्यात तुझा काय फायदा?’ अल्बर्टने थंडपणे विचारले.
‘अरे, जस्टीन आयुष्यभर अपंग राहील. माझी झडती होणे गरजेचे आहे. त्यात कसला फायदा बघायचा?’ अपूर्व चक्रावला.
‘माझी चीफबरोबर काल भेट झाली. तुझ्यासारख्या दक्ष एम्प्लॉईचा फायदा व्हावा असे त्यांना मनापासून वाटते. या झडतीत इलेक्ट्रोड्सची दिशाभूल करणारा हा सिग्नल इमिटिंग स्टिकर. पटकन् लाव टाळ्याला. बोनस तुझी वाट बघतो आहे.’
अपूर्वला काय बोलावे सुचेना.
‘वाटल्यास तुझ्या डॉक्टरला आत बोलावून विचार. एकदम सेफ आहे हा स्टिकर. लवकर कर- तो रोबोहेल्पर यायच्या आत. लगेचच  १२ लाख डोल्युरो ट्रान्स्फर करू.’
आकडा ऐकून अपूर्व थबकला!

करण गंभीर चेहऱ्याने बाहेर आला तेव्हा आईने घाईघाईनं विचारले, ‘डॉक्टर, कसा आहे अपूर्व? काय झाले?’ अन्वया उठून पटकन् तपासणी खोलीत जायला निघाली. करण म्हणाला, ‘ मिसेस देशपांडे, जाऊ  शकता तुम्ही आत. तो शुद्धीत आहे. व्यवस्थित झाले सारे. मात्र, त्याला फार जोराची कसलीही हालचाल करू देऊ नका.’ अन्वया गेल्यावर करण आईला सांगू लागला, ‘आंटी, अपूर्वची साक्ष म्हणजे त्याची मेंदूझडती महत्त्वाची ठरेल. जस्टीनचे म्हणणे बरोबर निघाले. तो ऑफिसमध्येच जखमी झाला होता. लिफ्टमधून जाताना ओझरते पाहिल्याने अपूर्व मौखिक साक्षीत ठामपणे काही सांगू शकत नव्हता. या तपासणीने अचूक माहिती मिळाली.’
‘बरे झाले. जस्टीनलाही योग्य उपचार मिळू दे आता कंपनीतर्फे.’ आई समाधानाने म्हणाली.
‘आंटी, जस्टीनला न्याय मिळेल; मात्र अपूर्वचे काय होईल, याची थोडी काळजी वाटते.’ करण म्हणाला.
‘का डॉक्टर?’
‘अपूर्वने स्मृती पुसण्याचा प्रयत्न केला नाही.. खरी साक्ष दिली. त्यामुळे कंपनीचे लाखो डॉल्युरोचे नुकसान होईल. कदाचित इतर काही कारण काढून कंपनी आकसापोटी अपूर्ववरच कारवाई करेल.’ करण म्हणाला.
आई क्षणभर स्तब्ध राहिली. मग सावकाश म्हणाली, ‘डॉक्टर, नोकरी एक गेली तर दुसरी मिळवेल माझा मुलगा. मात्र, त्याच्यापायी कुणी आयुष्यातून उठले तर तो सहन करू शकणार नाही. झाले ते योग्यच झाले.’ आई तपासणी खोलीत जायला उठली.
अपूर्वमध्ये इतके खंबीरपण कुठून आले, ते करणला उमजले. समाधानाने करण हॉस्पिटलला जायला निघाला.
aditi.draditi@gmail.com

 

shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
married woman murder her son
सोलापूर : लग्नापूर्वीचे प्रेमप्रकरण उजेडात येऊ नये म्हणून विवाहितेने केला मुलाचा खून अन् स्वतः केले विषप्राशन
aam aadmi party protest kolhapur marathi news
ईडीच्या नावाने बोंब मारून कोल्हापुरात केजरीवालांच्या अटकेचा निषेध; आपची प्रतीकात्मक होळी