कॅलिफोर्निया

लांब दांडय़ाला सेलफोन अडकवून ‘सेल्(फ) फोटो’ काढणाऱ्याचा मुखडा पाहिला आहे? एकदम आनंदी आणि विजयाचं समाधानी हसू चमकणारा!

‘योसेमिटी’ नावाचं अमेरिकेतलं राष्ट्रीय उद्यान- म्हणजे नॅशनल पार्क पाहताना हे ‘स्वयं’ भेटतात, तसेच नॅशनल पार्कमध्ये काम करणारे ‘स्वयं’सेवकही ठिकठिकाणी भेटतात. त्यांना ‘पार्क रेंजर’ म्हणतात. या राष्ट्रीय संपत्तीचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सरकारच्या संपत्तीवर अवलंबून न राहता आपण होऊन स्वयंप्रेरणेने मदतीचा हात पुढे करणारे हे स्वयंसेवक! मदत केल्याचा आनंद, निसर्गाचा मनसोक्त सहवास आणि आपल्याला आवडणारं काम करण्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. अशा एका जोडप्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली.

माईक आणि जॅनिस हे सुमारे ८०-८५ वयाचे स्वयंसेवक! गेली पंधरा-वीस वर्षे ते स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. दोघे कॅलिफोर्नियातल्या सॅन्फ्रॅन्सिस्कोजवळील बे एरियात वाढले. जॅनिस दहा वर्षांची असल्यापासून जवळच्या योसेमिटी पार्कला भेटी देऊ लागली. दहाव्या वर्षीच तिने आई-वडिलांबरोबर योसेमिटी नॅशनल पार्कमधील ‘हाफ डोम’ या प्रसिद्ध शिखराचा सोळा मैलांचा साहसदौरा.. ‘ट्रेक’ सुमारे दहा तासांत पूर्ण केला. जॅनिसच्या निसर्गप्रेमाची ती पहिली पायरी! त्यानंतर हा ट्रेक तिने आणखी चार वेळा केला.

‘आता तर हा जीवच अवघा असा जखडला।

मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो॥’

अशी महानोरांच्या कवितेत भेटणारी ही जॅनिस! दुसऱ्या महायुद्धात जर्मनी व रशियात सैनिक म्हणून काम केलेला माईक तिला भेटला आणि १९५७ मध्ये त्यांनी विवाह केला. माईकने पत्रकार म्हणून काम सुरू केले, तर जॅनिस हायस्कुलात शिक्षिका म्हणून काम करू लागली.

ते दोघे आणि यथावकाश त्यांची तीन मुले यांचं निसर्गप्रेम त्यांना दरवर्षी योसेमिटीला ओढून नेतच राहिलं. योगायोगाने पुढे त्यांचा एक मुलगा जपानला गेला, तर दुसरा न्यूझीलंडला. अर्थातच माईक आणि जॅनिसने त्या दोन्ही देशांचा निसर्ग मनमुराद अनुभवला. माईकला सैन्यातल्या कामामुळे रशियन येते. त्यामुळे दोन वर्षे आपापल्या कामांतून सुट्टी घेऊन हे दोघे रशियातला निसर्ग अनुभवण्यासाठी गेले. क्रोएशिया, स्विस आल्पस्, पँटागोनिया, दक्षिण अमेरिका, स्पेन असे अनेक निसर्गरम्य प्रदेश या जोडीने पालथे घातले. Travel bug bites you. जॅनिसने आपल्या चिरप्रवासी वृत्तीचे हसत हसत वर्णन केले. खिशात फारसे पैसे नसताना आणि तीन मुलांचा संसार सांभाळून आपला प्रवासाचा छंद सांभाळायचा म्हणजे काही स्वस्त आणि मस्त युक्त्या कराव्याच लागतात. स्वयंसेवक म्हणून काम करण्याची युक्तीही अशीच सुचली. दोघांना जेवढा निसर्ग प्रिय, तेवढेच संगीतही! मग जॅनिसने सॅन्फ्रॅन्सिस्कोतील एका ऑपेरा थिएटरमध्ये संध्याकाळचे स्वयंसेवक म्हणून काम सुरू केले. थिएटरचे महागडे कार्यक्रम विनामूल्य ऐकण्याची सोय झाली. त्यातून काही दक्षिण अमेरिकन, काही स्पॅनिश मित्र मिळाले आणि त्या देशांत स्वस्त राहण्याच्या सोयी समजल्या. अशा तऱ्हेनं त्यांना निसर्गप्रेम, संगीतप्रेम, प्रवासप्रेम एकत्रच साधता आले.

१९७० च्या सुमाराला माईक आणि जॅनिस योसेमिटी असोसिएशनचे सभासद झाले आणि त्यांच्या प्रकल्पांत भाग घेऊ लागले. तिथला साठ मैलांचा सात दिवसांचा एक साहसदौरा (हाय सियारा लूप ट्रीप) या जोडप्याने केला. बरोबर तीस लोक होते. आणि त्यांचा नेता होता एक पार्क रेंजर स्वयंसेवक! त्यातून या जोडप्याला ‘पार्क रेंजर’ म्हणून स्वयंसेवकगिरी करण्याची प्रेरणा मिळाली. पत्रकार माईकच्या निसर्गप्रेमाच्या बहराने त्याला फुलांचं वेड लावलं आणि त्याने बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्राचे धडे गिरवले. तो त्याबद्दलचे लेख त्याच्या वृत्तपत्रात लिहू लागला.

आपापल्या पोटापाण्याच्या कामातून जरा सवड झाल्यावर आणि मुलांची जबाबदारी कमी झाल्यावर माईक आणि जॅनिसने पार्क रेंजर म्हणून कामाला सुरुवात केली. महिन्यातून १२ ते २० दिवसपर्यंतही ते काम करतात. पार्कमध्ये स्वत:चा तंबू ठोकायचा. ‘आठवडय़ाची पाच जेवणे, रोज विनामूल्य स्नानाची सोय आणि दिवसाला दहा डॉलरचे मानधन यावर मजेत राहता येते..’ असे माईकने सांगितले. ‘मग तुम्हाला प्रशिक्षण वगैरे मिळतं का?’- ‘प्रशिक्षण? छे! फक्त एक तासाचं. बाकी सर्व ‘On job!’  जॅनिस हसत हसत म्हणाली. ‘उदा. हायकिंगची माहिती देण्याची कामगिरी असली तर माणसांचे पाय पाहावेत आणि ते कोणत्या वेळेला उगवले ते पाहावं. पायात चपला असल्या अणि वेळ दुपारची- तर अध्र्या मैलाच्या चिमुकल्या साहस -सफरीचा सल्ला द्यायचा, हे सुचतंच आपोआप. हेच डल्ल On job Traingl!

तेव्हा हे ‘सेल्फ लर्नेड’ ‘सेल्फी : स्वयंसेवक’ प्रवास मार्गदर्शन केंद्रात, कलादालनात, ‘नेचर वॉक’ मार्गदर्शक म्हणून ‘रानझुडपांचे संरक्षण किती महत्त्वाचे!’ याबद्दल लोक जागृती करणारा व्याख्याता म्हणून अशी विविध प्रकारची स्वयंसेवा करतात. हे करत असतानाच लोकांना काय ऐकायला आवडतं, काय नाही, याचा अंदाज येतो. त्यांना काय जमतं, हे माहिती नसल्याने सूचना देताना काळजी घ्यावी लागते. म्हणजे हायकिंगचे मार्गदर्शन करताना kI recommend you this traill  असं म्हटलं तर त्यांना आवडत नाही. त्याऐवजी kl like to do this trail- you will like it! असं म्हणायचं- म्हणजे उगाच ‘तुला हे जमणार नाही’ असा सपकारा मारण्याऐवजी  ‘याच्याऐवजी ती वाट घेतलीस तर तुला छान छान फुलं भेटतील..’ असं गोड हसून सांगायचं.

योसेमिटीशिवाय आणखीन काही राज्य उद्यानांतही (state parks) माईक आणि जॅनिस काम करतात. तिथे प्रशिक्षण जास्त मिळतं. ९० तास प्रशिक्षण, ट्रेकिंगसाठी फिल्ड ट्रिप्स- म्हणजे अभ्यास सहली, दरवर्षी उजळणी वर्ग, महिन्यातून एकदा स्वयंसेवक मेळावा अशा शिकण्याच्या अनेक संधी मिळतात.

हे सर्व शिक्षण उत्साहाने घेणाऱ्या माईक आणि जॅनिसचा आणखी एक छंद समजला, तो म्हणजे नवं काही शिकण्याचा! स्वयंसेवक म्हणून काम करताना आपल्याला ‘नित्यनवा दिवस जागृतीचा’ अशी संधी मिळते आणि आपलं जीवन केवढं समृद्ध होऊ शकतं, हे माईकशी बोलताना पुन्हा एकदा मनात अधोरेखित झालं. एवढय़ा सगळ्या वर्षांत जॅनिसला एकच वाईट असा अनुभव आला.. ‘बोरेगा स्प्रिंगज्’ या स्टेट पार्कमध्ये! एक बाई तणतणत तिला म्हणाली, ‘इथे ‘झरा’ कुठेच नाही. मग याचं नाव ‘बोरेगा स्पिं्रग’ कशाला ठेवलंत? नाव बदला! उग्गाच तडमडत आलो आम्ही इथे!’ इ. इ. ‘स्वयंसेवकाची विनोदबुद्धी चांगली असावी लागते’ हे माझं प्रशिक्षण करणारी तिची ही आठवण!’ जॅनिस सांगत होती. ऐंशी वर्षे उलटून गेल्यावरही जॅनिसची तब्येत खणखणीत असण्याचं तिचं रहस्य म्हणजे तिची (आयुष्यभर मुलांच्या हायस्कुलात शिकवूनही!) सणसणीत विनोदबुद्धी, निसर्गाशी नातं, संगीताचं प्रेम आणि नवीन शिकण्याचं परकऱ्या पोरीचं औत्सुक्य! स्वयंसेवक म्हणून काम करताना कधी लोकांना आपण खूप काही आश्वासनं देऊन बसतो. मग ती पुरी करताना चांगलीच तारांबळ उडते. ‘नाही’ कसं म्हणायचं, ते समजत नाही. (How to say ‘no’ is an art after all’’) हे सगळं मान्य करूनही या दाम्पत्यानं ‘स्वयं’ हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग असतो हे ओळखून, स्वत:ला काय आवडतं ते समजून घेऊन स्वत:साठी जगण्याचे हे प्रयोग केले आहेत. ‘सेल्फी’ला हेतूची चौकट दिली आहे. ‘हेतूचं भान असलं की खारीच्या (पाठीला चिकटलेल्या) वाळूच्या कणालाही अर्थ येतो..’ हे तर साक्षात् बाबा आमटे म्हणून गेलेत! ‘स्वयं’सेवक होण्याचा माईक आणि जॅनिसचा निर्णय स्वयंप्रज्ञेतून आलेला; म्हणूनच तर दिसली त्यांच्या छबीवर न ढळणारी प्रसन्नता आणि विजिगीषू समाधान!
-vidyahardikar@gmail.com