|| हेमा लेले

‘आक्का, मी, आणि…’ हे पुस्तक हाती पडलं आणि मुखपृष्ठावर असलेल्या इंदिरा संत (आक्का) यांच्या शांत, पण ठाम चेहरेपट्टीनं लक्ष वेधून घेतलं. कारण त्यांची आणि त्यांच्या कवितेची जातकुळीही अशीच आहे. शांत, प्रगल्भ आणि ठाम!

‘हवा झुकता काजवा काळ्याशार अंधारात

ब्रह्महृदय सुजाण हवे उभे खिडकीत

हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला

हवी चांदण्याची वाळू ओळीवरी शिंपायाला!’ असं लिहिणाऱ्या, पराकोटीच्या संवेदनशील, विचारी, हळव्या अन् सखोल व्यक्तिमत्त्वाला आठवणींतून साकार करून रसिकांसमोर ठेवणं ही गोष्ट सोपी नव्हेच! पण हे नाजूक आणि अवघड आव्हान इंदिराबाईंच्या स्नुषा वीणाताई संत यांनी स्वीकारलं आणि फार रसाळपणे आणि प्रामाणिकपणे वाचकांसमोर मांडलं आहे. इंदिरा संतांची कविता आवडते म्हणून हे पुस्तक आवडलं असं झालेलं नाही, तर उगीचच कसलंही उदात्तीकरण न करता ३५ वर्षांच्या सहवासातील आठवणींमधून फुलणाऱ्या अकृत्रिम शैलीने हे पुस्तक नटले आहे म्हणूनच ते भावलं.

इंदिरा संत या मराठी साहित्य क्षेत्रातील ‘रेनेसान्स’चा जो महत्त्वाचा कालखंड होता (१९५० ते १९८०) त्या काळातील कवयित्री! दुर्गाबाई भागवत, विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगांवकर, सुरेश भट, रणजित देसाई अशा मराठी भाषेला नवसंजीवनीचा जरतारी अध्याय बहाल करणाऱ्या दिग्गज साहित्यिकांच्या मांदियाळीत वेगळेपणानं मनात घर करणाऱ्या त्या एक महत्त्वाच्या शिलेदार होत्या. ‘कधी द्यावी, कधी नाही, रेघ अक्षरावरची’ अशा स्तिमित करणाऱ्या अनेक ओळी या क वयित्रीने लिहिल्या.

वीणा संत आणि इंदिरा संत यांचा ३५ वर्षांचा हृद्य सहवास आणि कौटुंबिक सहप्रवास विविध आठवणींमधून यात आपल्याला पानोपानी उलगडत गेलेला दिसतो. या पुस्तकाचं लगेच जाणवणारं स्वाभाविक वैशिष्ट्य असं की, इंदिराबाई आणि वीणाताई या दोघींच्याही आयुष्यातील घटना इथे रंजक रीतीने हातात हात गुंफून कथन केल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक इंदिराबाईंचं व्यक्तिचित्रण करता करता वीणाताईंच्या आत्मकथनाकडे वेळोवेळी वळताना दिसतं. असं झाल्यामुळे ते दुपेडी झालं आहे नि एकसुरी होण्यापासून वाचलं आहे.

आठवणींवर आधारित अनेक पुस्तकांमध्ये काहीसा कंटाळवाणेपणा जाणवतो. पण या पुस्तकात मात्र इंदिरा संतांच्या समकालीन अनेक लेखक-कवींचा चपखल उल्लेख झाल्यामुळे वाचकांची उत्सुकता कोमेजत नाही. इंदिरा संतांचं आयुष्य चढ-उतारांचं होतं. त्याकाळी अकाली पतिनिधनाची वीज कोसळलेली स्त्री किती असहाय होत असे हे जुन्याजाणत्यांना सांगायला नकोच. याही परिस्थितीवर मात करणाऱ्या अनेक सामान्य स्त्रिया त्याकाळी पाहायला मिळत. अशीच वैयक्तिक आयुष्यात एकाकी पडलेली एक सामान्य गृहिणी नि मनीमानसी असामान्य कवित्वाचा वेलू फुलवत राहणारी मनस्विनी कवयित्री या दोन टोकांचा समतोल इंदिराबाईंनी पेलला. हा तोल पेलताना त्यांना त्यांच्या कुटुंबाचा आधार कसा मिळाला, त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या कशा निभावल्या, हे जसे या आठवणींमधून समर्थपणे सांगितले गेले आहे, तसेच त्यांच्या या काळातील कवित्वाचेही अनेक तपशील नोंदवले गेले आहेत. पुस्तकात १२० ते १७० या पानांवर वाचकांना खिळवून ठेवणारा तपशील अधिक आहे. त्याकाळच्या काही प्रतिष्ठित लेखकांची आक्कांविषयीची मते, वागणूक, सहवास यांबद्दल त्यात महत्त्वाचे उल्लेख आहेतच, शिवाय आक्कांच्या सर्जनशील काव्यप्रपंचाही तपशील त्यात आला आहे.

आक्कांचं पतिनिधनामुळे आत्यंतिक दुखरं झालेलं मन, दुसरीकडे कुटुंबाचं पतिपश्चात पालनपोषण करणारं त्यांचं स्थिर व करारी मन, भावभोळेपणाला शरण न गेलेली त्यांची ठाम वैचारिक बैठक, सुहृदांविषयीचा प्रेमादर, कुटुंबावर असलेली निरपवाद माया, प्राणिमात्रांवरचं प्रेम, पंचमहाभूतांशी असलेली एकरूपता आणि रस, रंग, गंध या साऱ्यांना जपणारी रसिकता या साऱ्याचं दर्शन विविध घटना-प्रसंगांतून लेखिकेनं फार सुरेख पद्धतीनं, अकृत्रिम शैलीत घडवलं आहे. आणि हेच या पुस्तकाचं सर्वात मोठं श्रेय नि वैशिष्ट्य आहे.

वीणा संत या काही लेखनाची पार्श्वभूमी  असलेल्या व्यक्ती नाहीत. पण म्हणूनच की काय, सासूच्या रूपानं दैवयोगानं वाट्याला आलेल्या असामान्य आक्कांविषयी त्या कोणताही शाब्दिक आविर्भाव न आणता सहजसुंदर शैलीत लिहीत गेल्या आहेत. असामान्य आवाक्याची व्यक्ती कुटुंबातील इतर व्यक्तींना कशी तिच्याही नकळत उजळून टाकत असते याचा प्रत्यय वीणाताईंच्या या काहीशा आत्मकथनाच्या आसपास जाणाऱ्या, पण आक्कांच्या व्यक्तिचित्रणाचा धागा पक्का धरून ठेवणाऱ्या या पुस्तकात येतो.

या पुस्तकातून जसं आक्कांचं व्यक्तिचित्रण आहे, तशीच समकालीन लेखक, कवींची आणि कुटुंबातील व्यक्तींचीही व्यक्तिचित्रणंही आहेत. त्या व्यक्तींचं आणि आक्कांचं असलेलं नातंही थोडक्यात नि स्पष्टपणे त्यामुळे समजतं.

त्या काळात अत्यंत प्रसिद्ध साहित्यिक ना. सी. फडके हे आक्कांचे सख्खे मेहुणे. त्यांच्या पत्नी कमलाताई म्हणजे आक्कांची सख्खी बहीण. आक्कांच्या माहेरची- म्हणजे तवंदीच्या दीक्षितांची पार्श्वभूमी  यातून कळते. परंतु फडके आणि आक्का यांच्यात साहित्यिक विचारांची देवाणघेवाण, संवाद, विसंवाद होत असे का, या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नाही.

अनेक कवी, लेखकांच्या मनात आक्कांविषयी अपार आदर होता. पण आक्कांची एकूणच मराठी साहित्याबद्दल किंवा काव्यव्यवहाराबद्दल, साहित्य संमेलनांबद्दल, पारितोषिकांबद्दल काय भूमिका होती, हे फार तपशिलाने वाचायला मिळत नाही. कदाचित वीणाताईंनी ते लिहिणे महत्त्वाचे मानलेले नाही. कारण आक्कांचे व्यक्तिमत्त्व हे खूपच सहिष्णु व ऋजू होते. टोकाचे आग्रह धरणे, तसे विचार करणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच बसत नव्हते.

इंदिरा संतांची कविता ही कशी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या मुशीतूनच निघून प्रगल्भ झाली होती याचं दर्शन यात फार लख्खपणे घडलं आहे नि ते अनेक कवी, लेखकांना मार्गदर्शक ठरणारं आहे. हस्तिदंती शब्दकळा लाभलेली ही कवयित्री हस्तिदंती मनोऱ्यात न वावरता कशी आयुष्याच्या रिंगणात ठाम आश्वासकपणे पाय रोवून शेवटपर्यंत उभी होती, हे या पुस्तकातून फार छान पद्धतीने समोर येतं.

प्रत्येक प्रतिभावंताच्या वाट्याला कार्यक्षेत्रात नि खासगी आयुष्यात नेहमी सुखासमाधानाचंच वातावरण मिळतं असं नाही. पण दोन्ही ठिकाणचा योग्य समतोल ठेवून जेव्हा आक्कांसारखी व्यक्ती परिपूर्तीला गवसणी घालते तेव्हा एक प्रकारचं समाधान तिला लाभत असतं.

‘इथे रंगली पंगत

मिटक्यांची, भुख्यांची

साधासुधा माझा हात

बाळजीभ अमृताची’

आपल्या कमालीच्या सर्जनशील हातांना ‘साधंसुधं’ म्हणत सारं श्रेय समोरच्याच्या रसिकतेला बहाल करणं हे वाचायला सोपं, पण तसं आचरण करणं खरोखर कठीण! ते आक्कांना साधलं होतं.

अनेक फोटो आणि आक्कांच्या मूळ हस्ताक्षरातील वेगवेगळ्या साहित्यिकांशी झालेला त्यांचा पत्रव्यवहार याचा समावेश असलेलं जवळजवळ ३०० पानी असं हे घवघवीत पुस्तक देवा घाणेकर यांनी शांत, समंजस रंगसंगतीच्या मुखपृष्ठाने सजवले आहे.

‘जन्मामागून जन्माचा मला कधी न कंटाळा

नवे नवे विश्वरूप, त्याचा नवाच जिव्हाळा

एका जन्मी मात्र व्हावे शीळ पाखरू सावळे

कालिदासाच्या सृष्टीत ज्याचे पूर्वज खेळले’

अशी विलक्षण इच्छा व्यक्त करणाऱ्या या कवयित्रीचे अनेक चाहते या पुस्तकामुळे आक्कांच्या कवितेशी जास्तच एकरूप होतील याची खात्री वाटते.

‘आक्का, मी, आणि…’ – वीणा संत, बुकगंगा पब्लिकेशन्स, पृष्ठे-३१६, मूल्य-३१४ रुपये.

hemalele@gmail.com