‘लोकरंग’ पुरवणीच्या वर्धापनदिनानिमित्ताने महाराष्ट्र आज विविध क्षेत्रांमध्ये नेमका कोणत्या टप्प्यावर आहे, मराठी माणसाची संगीत, चित्रपट, वाचनाची अभिरुची आज काय आहे, या साऱ्याचा साकल्यानं धांडोळा घ्यावा असे आम्ही ठरविले. आणि यासंदर्भात मूलभूत विचार मांडले जावेत याकरता त्या- त्या क्षेत्राशी संबंधित चिंतनशील मंडळींना लिहावयास सांगितले. मुळात महाराष्ट्राची म्हणून या प्रत्येक क्षेत्रात नेमकी काय ओळख आहे, की तशी काही स्वतंत्र ओळखच नाहीए, इथपासून ते त्या- त्या क्षेत्रात आजवर जे योगदान झाले आहे त्याचा परामर्श घेणं.. आणि आज त्या गतरम्यतेतच आपण मश्गुल आहोत, की त्या सुवर्णेतिहासाचं निव्वळ ओझं आपण वाहतो आहोत, की त्याही पुढे गेलो आहोत, याचा क्षणभर थांबून एकदा विचार करावा, हे आम्हाला इथे अपेक्षित होतं.  
महाराष्ट्राला समाजसुधारक आणि विचारवंतांची प्रदीर्घ वैभवशाली परंपरा लाभली आहे. शिवाजीमहाराजांच्या जन्मापूर्वी काही शतके संतमहात्म्यांपासून ते पुढच्या काळात गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, न्या. रानडे, गाडगेमहाराज, र. धों. कर्वे, इरावती कर्वे ते अलीकडच्या काळात दुर्गाबाई भागवत, नरहर कुरुंदकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पुं. रेगे इथवर ही विचारवंत व सुधारकी परंपरा ठळकपणे आढळून येते. साहित्य, कला, समाजसेवा, पत्रकारिता, डॉक्टरी तसेच वकिली पेशा अशा निरनिराळ्या क्षेत्रांतील व्यक्तींनीही समाजातील ‘जागल्या’ची भूमिका वेळोवेळी आपल्या शिरावर घेतल्याचे दिसून येते. त्यांच्या आवाजाला नैतिकतेची धार असल्यानं समाज, शासनकर्ते, राजकारणी  अशा सर्वानाच त्यांचा आदरयुक्त धाक वाटे. त्यामुळे समाजहितविरोधी वा समाजाला मागे लोटणारी कोणतीही कृती करताना त्यांना या समाजधुरिणांची त्यासंदर्भातील भूमिका, मतं विचारात घ्यावी लागत. परंतु आज मात्र प्रचलित समाजमानसाविरोधात जाणारी, परंतु समाजाच्या भल्यासाठीची काहीएक ठोस वैचारिक-सामाजिक भूमिका मांडण्याचे आणि त्याचे होणारे बरे-वाईट परिणाम पचविण्याचे विचारशील मंडळींचे प्रमाण घटत चालले आहे. किंबहुना, आज सरकारपुरस्कृत किंवा समाज ज्यांना ‘विचारवंत’ म्हणवतो, अशांची संख्या पैशाला पासरी असली तरी ते खरोखर ‘विचारवंत’ आहेत का, हे साक्षेपानं तपासण्याची वेळ आली आहे. त्यातही जी संवेदनशील मंडळी समाजातील अनिष्ट गोष्टींनी अस्वस्थ होतात, तीही हल्ली त्याविरोधात व्यक्त व्हायला घाबरतात. म्हणूनच महाराष्ट्राची आज वैचारिकतेत जी कमालीची पीछेहाट झालेली आहे त्याची नेमकी कारणं काय, याचा सांगोपांग मागोवा यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांनी घेतला आहे.   
त्याचबरोबर महाराष्ट्रातील निरनिराळ्या कलांसंदर्भातही आपण गतेतिहासतच रमताना दिसतो. पण तो झाला भूतकाळ! आज आपण या कलांच्या बाबतीत कुठल्या टप्प्यावर आहोत? त्यात नवं काही घडतंय का? त्यात नवसृजनाचं प्रमाण किती आहे? आणि जुनीत री ओढलेली किती आढळते? या कलांच्या चाहत्यांच्या अभिरुचीत, आस्वादक्षमतेत काही बदल घडले आहेत का? घडले असतील, तर ते कोणते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधणारे वैभव आबनावे आणि डॉ. आशुतोष जावडेकर यांचे लेख..  
मराठी साहित्याचा मोठा आधार असलेला रसिक वाचक आज हरवत चाललाय, अशी खंत अनेकदा हल्ली व्यक्त होत असते. त्यामुळे यापुढच्या काळात मराठी पुस्तकांना वाचक असेल का, अशी चिंता समाजचिंतकांना भेडसावते आहे. मराठी वाचक काळानुसार बदलत गेला. पण मग त्याची अभिरुचीही बदलली का? शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार, सुशिक्षितांचे वाढते प्रमाण आणि जागतिकीकरणाने आलेले आर्थिक स्थैर्य यामुळे वाचकावर काय परिणाम झाले? त्याच्या रुंदावलेल्या जीवनकक्षांमुळे त्याच्या अभिरुचीत कोणते बदल झाले? की झालेच नाहीत? ‘ग्लोबल’ दृष्टी प्राप्त झालेल्या आजच्या मराठी वाचकाला मराठी साहित्यातलं काय भावतं, काय नाही, याचा वस्तुनिष्ठ शोध-बोध घेणारा शशिकांत भगत यांचा लेख.
     एकुणात, आजच्या मराठी समाजमानसाचा वेध घेण्याचा प्रयत्न आम्ही या ‘लोकरंग’ वर्धापनदिन पुरवणीत घेत आहोत.  महाराष्ट्राला स्वत:ची अशी निबंधलेखनाची एक परंपरा होती; जिचा आता लोप झाला आहे. परंतु त्या परंपरेची आठवण या वैचारिक लेखांच्या निमित्ताने व्हायला हरकत नाही.
आजचा महाराष्ट्र आणि वैचारिकता
टोकावर उभं असलेलं मराठी गाणं!
स्वैर.. मराठी सिनेमा अन् अभिरुचीही!
टांग मारून गेलेली वाचनाभिरुची!
गणिती विश्वातील तेजस्वी तारा
द्रष्टेपणा.. सैद्धांतिक गणितज्ञांचा!