आज मराठी माणसं जगभर वसली आहेत. त्यांच्या दृष्टीतून देशोदेशीच्या आगळ्या घटना, माणसे, संस्कृती व जगण्याचे नवे संदर्भ प्रतिबिंबित करणारे सदर..
अनेकदा नव्या व्यक्तीची ओळख होते, पण तिचे व्यक्तिमत्त्व उलगडण्यास, समजण्यास आणि ते lok04उमजण्यास वेळ लागतो. तसेच झाले अगदी. जागतिक शहर म्हणून दुबईची ओळख खरं तर मुंबईत राहत असल्यापासूनच होती. परंतु तिथे प्रत्यक्ष वास्तव्याची संधी मिळाल्यावर मात्र या शहराच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. दशकभरातील इथल्या मुक्कामात जाणवले, की आता हे शहर नव्हे, तर या शहराचे व्यक्तिमत्त्वही आपल्याला काहीसं उमजू लागलंय.. त्याचे कंगोरे लख्खपणे दिसताहेत. आणि कळत-नकळत त्याचे गुण आपल्यातही भिनताहेत..
‘भिनताहेत’ हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वकच! कारण व्यक्तिमत्त्वातून लख्खपणे दिसते अन् जाणवतो तो ‘अ‍ॅटिटय़ूड’! अन् नेमका हाच ‘अ‍ॅटिटय़ूड’ मला या शहराने दिलेली गिफ्ट आहे असं वाटतं. ‘अ‍ॅटिटय़ूड’ या शब्दाला व्यावहारिक भाषेत काहीशी नकारात्मक छटा आहे; पण शहराने दिलेल्या ‘अ‍ॅटिटय़ूड’मध्ये माझ्यातील भारतीयत्वाची, माझ्यातल्या व्यावसायिक दृष्टिकोनाची, अन् वेळ आली तर प्रखरतेने प्रकाशित होणारी अस्मिताही दडली आहे असं मला वाटतं. त्यामुळेच दहा वर्षांपूर्वी या शहरात आलेली मी आणि आजची मी यांतील फरक मला स्पष्टपणे जाणवतो. माझं करिअर किंवा अन्य गोष्टींपेक्षा या शहराने माझ्या व्यक्तिमत्त्वाला काय आणि कसे पैलू पाडले, याचाच खरं तर हा प्रवास आहे.
खरं तर हे शहर जेमतेम माझ्या वयाएवढंच. चाळिशीचं. पण अमेरिका आणि ब्रिटनपेक्षाही दुबई, सिंगापूर या शहरांच्या नावाचा उच्चार झाल्यावर भारतीय लोकांच्या डोळ्यांत जी एक कुतूहलमिश्रित सोनेरी चमक दिसते ना, तसंच माझंही व्हायचं. अर्थात परदेशात जाऊ, नोकरी करू, स्थिरावू असा काही आयुष्याचा रोडमॅप ठरलेला नव्हता. पण करिअरच्या प्रवासाने मला ट्रॅकऐवजी चक्क रन-वेवरच नेऊन ठेवलं. आणि मग मीही नव्या संधी व आव्हानांचा सामना करण्यासाठी पंख विस्तारले. माझ्यावर मुंबईचे संस्कार असले तरी दुबईत जायचे जेव्हा ठरले, तेव्हा अर्थातच एकदम नव्या सांस्कृतिक, आर्थिक सेटअप्मध्ये जाण्याचं दडपण होतंच. पण तिथं गेल्यावर दुबई म्हणजे मुंबईचीच पुढची आवृत्ती हे या शहराचं व्यक्तिमत्त्व चटकन् उलगडलं. कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून मुंबईचा लौकिक. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत येतात, स्थिरावतात. दुबई त्याचीच पुढची आवृत्ती. जगाच्या कानाकोपऱ्यांतून जागतिक व्यापार केंद्र असलेल्या या शहरात लोक येतात. जोपर्यंत हात चालू शकतात आणि संधी उपलब्ध आहेत तोवर इथे काम करतात आणि नव्या दमाच्या लोकांकरिता संधी उपलब्ध करून इथून पुन्हा माघारी वळतात. याचं कारण अर्थातच आपल्याला ठाऊक आहे. ते म्हणजे या शहरात जोवर नोकरी वा काही उद्योग आहे तोवरच कुणालाही राहता येतं. इथे नागरिकत्व मिळत नाही. त्यामुळे नोकरी लागली की इथूनच निवृत्ती- हा विचार दूरचीच बाब. याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फायदा असा, की प्रत्येकाला आपल्या कौशल्याला कायम नवी धार लावावी लागते. त्यामुळेच ‘चलता है, होईल रे, करू रे, बघू रे..’ या शब्दांचा पोकळपणा इथं उमगतो.
या शहराचा मुख्य गुण म्हणजे वेग आणि स्पर्धा. मूळ मुंबईकर असल्यामुळे वेगाचा संस्कार माझ्यावर जन्मजात होताच. पण इथल्या स्पर्धेत गुणात्मक फरक आहे. तो असा की, २० लाख लोकसंख्या असलेल्या दुबईत साडेनऊ  लाखांच्या आसपास परदेशी नागरिक आहेत. तब्बल २५ ते ३० देशांतील लोकांचं इथं वास्तव्य आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूचे स्पर्धक विविध देशांतले असतात. कार्यालयात अमेरिकी, युरोपियन, रशियन, लेबनीज, चिनी, पाकिस्तानी असे सहकारी असतात. आपल्या देशातून बेस पक्का करून कौशल्य जोखण्यासाठी इथे आलेले असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत एखाद्या प्रकल्पावर काम करताना ‘मागील पानावरून पुढे’ हा अ‍ॅप्रोच न ठेवता वेळोवेळी आपल्या कौशल्याला नव्या अभ्यासाची धार लावणे अपरिहार्य ठरते. पण त्यातूनच आपल्याला ताजं, नवं ज्ञान मिळवण्याची संधी मिळते.
शाळेत असताना पाचव्या-सहाव्या इयत्तेत नवा कम्पास बॉक्स दप्तरात आला होता. कर्कटक व दोन-चार प्रकारच्या स्केल्स त्यात होत्या. एक स्केल फारशी वापरली गेली नाही अन् उमगलीही नाही. ती होती- कोनाच्या अंशांची. पण कोनाच्या अंशांची स्केल इथे मला सहकाऱ्यांमध्ये उमगली. एखाद्या प्रकल्पावर काम करताना आपण जो विचार करतो (बहुतेक वेळा आपल्याला आपलाच विचार बरोबर आहे असं वाटत असतं.) त्याच्या अगदी ३६० अंश कोनातून दुसऱ्या देशातील सहकारी विचार करत असल्याचं जाणवतं. विशेषत: एखादं सॉफ्टवेअर डिझाइन करताना आपण एखादी संकल्पना मांडून फ्लो-चार्ट मांडावा अन् चिनी सहकाऱ्याने तोच उलट बाजूने तर्काच्या आधारे मांडून दाखवावा- असं व्हायचं. राग यायचा. गंमतही वाटायची. पण र्सवकष विचार स्वीकारण्याची सवय झाली. किंबहुना, या परदेशी सहकाऱ्यांच्या विचारसरणीतून त्यांची संस्कृती उमगण्यास मदत व्हायची. चिकाटी, अचूकपणा आणि जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत त्या विषयाचा ध्यास हे चिनी माणसाचे अंगभूत गुण मनाला भावून जातात. किंवा, तंत्रज्ञानाच्या समजेच्या बाबतीत थोडी ढिलाई असली, तरी तो तंत्राविष्कार तयार झाल्यानंतर त्याच्या १०० टक्के वापराचे कौशल्य एखाद्या लेबनीज माणसाला जितके जमेल तितके कदाचित एखाद्या उत्कृष्ट तंत्रज्ञालाही जमेल का, असा प्रश्न अनेकदा मला पडलाय. मला आठवतंय, स्मार्ट फोन नवे नवे आले होते. फोन करणे, एसएमएस यापलीकडे फार तर वापर म्हणजे फोटो काढून एमएमएस करणे. याचीच मजा लुटण्यात आम्ही दंग असताना माझ्या लेबनीज सहकारी मैत्रिणीने त्यावर ई-मेल कॉन्फिगरेशन कसे केले जाऊ  शकते याचा ‘युरेका’ ऑफिसमध्येच दाखवला. परिणाम व्हायचा तोच झाला. सर्वाधिक आनंद बॉसला झाला, अन् ‘आता तुम्ही २४ तास उपलब्ध असाल!’ याचा मनमुराद आनंद त्याने लुटला. यातला गमतीचा भाग बाजूला ठेवला तरी विविध देशांचे नागरिक, त्यांची जडणघडण यांचा संस्कार आपल्यावरही होतोच. अन् हाच संस्कार आपल्याला ‘ग्लोबल सिटिझन’ बनवतो.
विविध देशांतील नागरिक, त्यांची कौशल्ये, जडणघडण यांचा एकीकडे अभ्यास जेव्हा मनानं करण्यास सुरुवात केली तेव्हा जसे आपण इतरांना जोखतो, तपासतो तसंच आपल्यालाही असंच जोखलं जात असेल, ही भावना मनाला कायम स्पर्शून जाते. अस्मितेचे राजकारण बाजूला ठेवले तर मुंबई ही तशी सर्वाचीच. त्यामुळे कोण कुठल्या प्रदेशातला, गावातला हा भेद जसा आपल्या डोक्यात नसतो, तसंच इथंही आहे. अर्थात् आजूबाजूच्या व्यक्तींचा सहकारी म्हणून स्वीकार केला तरी त्यांचं नागरिकत्व डोक्यातून चटकन् जात नाही. दुबई शहर हा जागतिक संधींचा पट असल्याने आपल्या प्रत्येक कृतीचा अर्थ, संबंध किंवा एखाद्यानं आपल्याला जोखणं, याचा संबंध हा थेट आपल्या देशापर्यंत लागू होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण ‘भारताचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ आहोत याचं पक्कं भान बाळगावं लागतं.
शिल्पा कुलकर्णी-मोहिते