22 February 2020

News Flash

शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’चे अंतरंग

२३ एप्रिलच्या जागतिक ग्रंथ दिनानिमित्ताने ज्याच्या नाटकांविना जागतिक रंगभूमीचे चित्रच पूर्ण होऊ शकत नाही अशा शेक्सपिअरच्या सर्वाधिक चर्चित नाटकाचा.. 'हॅम्लेट'चा परामर्ष.ब्रिटिश नाटककार विल्यम शेक्सपिअर (१५६४-

| April 26, 2015 12:25 pm

२३ एप्रिलच्या जागतिक ग्रंथ दिनानिमित्ताने ज्याच्या नाटकांविना जागतिक रंगभूमीचे चित्रच पूर्ण होऊ शकत नाही अशा शेक्सपिअरच्या सर्वाधिक चर्चित नाटकाचा.. ‘हॅम्लेट’चा परामर्ष.
ब्रिटिश नाटककार विल्यम शेक्सपिअर (१५६४- १६१६) हा जगातल्या नाटय़क्षेत्रात सार्थपणे ‘नाटय़सम्राट’ म्हणून ओळखला जातो. या सर्वश्रेष्ठ नाटककाराचे ‘हॅम्लेट’ (१६०१) हे नाटक निर्विवादपणे सर्वश्रेष्ठ आहे. नाटक आणि साहित्य या दोन्ही जगात ‘हॅम्लेट’ला प्रचंड रसिकमान्यता मिळाली आहे. जगातील श्रेष्ठ नटांना रंगभूमीवर हॅम्लेटचे काम करावेसे वाटते, तर श्रेष्ठ समीक्षकांना ‘हॅम्लेट’वर समीक्षण लिहावेसे वाटते. शेक्सपिअरच्या नाटक कंपनीतील लोकप्रिय नट रिचर्ड बरबेजपासून तर आपल्या काळातील लॉरेन्स ऑलिव्हिएपर्यंत जगातील महान नटांनी विविध पद्धतीने हॅम्लेट रंगमंचावर उभा केला आहे; तर डॉ. जॉन्सनपासून सिग्मंड फ्रॉइडपर्यंत अनेक विचारवंतांनी या नाटकातील अंतरंगात दडलेल्या गूढतेचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. समीक्षकांनी नाटकातील नायक हॅम्लेटची केवळ सूडबुद्धी हॅम्लेट, भावनाविवश हॅम्लेट, अतिविचारी हॅम्लेट, तत्त्वज्ञ हॅम्लेट, विमनस्क हॅम्लेट, इडिपसगंड झालेला हॅम्लेट अशी त्याची विविध रूपे सादर केली आहेत. हॅम्लेटला खरोखरच वेड लागले की नाही कुणास ठाऊक, पण समीक्षकांची विविध आणि परस्पर विरोधी मते ऐकली म्हणजे वाचकालाच वेड लागण्याची वेळ येते.
नाटकाचे मुख्य सूत्र असे:  डेन्मार्कचे राजे, हॅम्लेटचे वडील बागेत झोपले असताना त्यांचा भाऊ त्यांच्या कानात विष ओतून त्यांचा खून करतो व देशाचा राजा होतो. वडिलांचा मृत्यू झाल्याने अतिदु:खी झालेला हॅम्लेट (चुलत्याच्या बोलावण्यावरून) आपला विद्यापीठीय अभ्यासक्रम सोडून राजधानी एल्सॅनॉरला येतो. वडिलांच्या मृत्यूमुळे, पण त्याहीपेक्षा आपल्या आईने महिनाभरात चुलत्याशी निषिद्ध, निलाजरा विवाह करावा या घटनेने हॅम्लेट पूर्णपणे उद्विग्न, विमनस्क होतो. एके दिवशी त्याचा परमस्नेही होरॅशियो सांगतो की, रात्री किल्ल्याभोवती मृत राजांसारखे दिसणारे पिशाच फिरताना दिसते. हॅम्लेट खात्री करून घेण्यासाठी स्वत: जातो. तेथे वडिलांसारखे दिसणारे पिशाच त्याला सांगते त्यावरून त्याला कळते की चुलत्याने आपल्या वडिलांचा खून केला. पिशाचाच्या सांगण्यावरून तो चुलत्यावर सूड घेण्याची शपथ घेतो; पण अनेक वेळा संधी मिळूनही हॅम्लेट आपली प्रतिज्ञा पार पाडू शकत नाही. हे पुढील सर्व अंकांचे सूत्र आहे. तो या धक्क्य़ांनी पुरा उद्ध्वस्त झालेला असतो. त्याची कृतिशून्यता त्याला आणि इतरांना अनर्थकारक ठरते. ही त्याला व इतरांना अनाकलनीय कृतिशून्यता पुढील नाटकात महत्त्वाचे सूत्र ठरते.
मूळ कथा शेक्सपिअरची नाही. त्या काळात हॅम्लेटची आख्यायिका प्रचलित होती. शेक्सपिअरचे नाटक ‘मूळ हॅम्लेट’ (ur Hamlet) नाटकाला साधारणत: समोर ठेवून लिहिलेले आहे. नाटकातील महत्त्वाचा, कूट आणि गूढ प्रश्न हा, की हॅम्लेट दुष्ट क्लॉडिअसवर वडिलांच्या खुनाबद्दल आणि आईशी अनैतिक विवाह केल्याबद्दल सूड घेण्याची रास्त प्रतिज्ञा घेतो, पण तो विचार कृतीत आणू शकत नाही; असे का? ही केवळ विलंबाची शोकात्मिका आहे असे म्हणून काहीच स्पष्ट होत नाही. जगातील श्रेष्ठ, विद्वान समीक्षकांनी नाटकाचे व नायकाचे केलेले संशोधन इथून सुरू होते. त्यातील काही श्रेष्ठींची मते जाणून घेणे उद्बोधक ठरेल. जगप्रसिद्ध जर्मन कवी गोएथेच्या मते हॅम्लेटचे मन एका संवेदनशील, हळव्या, भावनाविवश तरुणाचे मन आहे. त्याला हे कठोर, क्रूर कर्म करणे आवश्यक असले तरी शक्य नव्हते. हळवे मन आणि नैतिक आवश्यकता यांच्या संघर्षांत हॅम्लेट उद्ध्वस्त झाला आहे. ती त्याची शोकात्मिका आहे. गोएथेने हे एका सुंदर उपमेत सांगितले आहे. तो सांगतो, छानशी फुलझाडे फुलावीत म्हणून आणलेल्या कुंडीत ओकवृक्षाचे रोप लावले तर कुंडी जशी मोडून पडेल तशी हॅम्लेटची भग्नावस्था झाली. ही उपमा सुंदर असली तरी खरी नाही. हॅम्लेटच्या जबर कठोरपणाची, निर्घृणपणाची अनेक उदाहरणे सांगतात, की तो आवश्यक तेव्हा, आणि अनावश्यक तेव्हाही निर्दय होऊ शकतो. कोलरिज या श्रेष्ठ कवी समीक्षकाने प्रस्तुत सिद्धान्त नाकारून नवा सिद्धान्त मांडला. त्याच्या मते, हॅम्लेटची शोकात्मिका त्याच्या अतिविचारी स्वभावात आहे. हॅम्लेटच्या तिसऱ्या अंकातील (To be or not to be) स्वगतात- विचारशक्तीमुळे (Conscience) आपले निश्चय दुर्बल होतात, त्यांच्यावर विचारांची छाया पसरते आणि शेवटी कृती दुरावते, अशा तऱ्हेचे वक्तव्य हॅम्लेट करतो. गोएथेच्या भावविवश (Sentimental) हॅम्लेटपेक्षा कोलरिजचा अतिविचारी हॅम्लेट शेक्सपिअरच्या हॅम्लेटला जरी अधिक जवळचा असला तरी काही वेळा आपले अविचारच आपल्या कामी येतात, असे होरॅशिओला ठासून सांगणारा व दैवी शक्तीवर विश्वास ठेवणारा हॅम्लेट केवळ विचारवादी आहे असे सर्वमान्य होणे कठीण. म्हणून २० व्या शतकातील श्रेष्ठ समीक्षक ब्रॅडलेंच्या मते, हॅम्लेटमध्ये विचारशीलता अतिरेकाने असली तरी ते लक्षण आहे, कारण नव्हे. हॅम्लेटला, ब्रँडलेंच्या मते, एक गाढ विमनस्कता आली आहे का? त्याच्या नैतिक दृष्टिकोनातून सर्वत्र अनैतिकतेची भरभराट झाली असून जीवन जगण्यात अर्थच राहिला नाही. म्हणून तो कळवळून म्हणतो.
O, that this too too solid flesh would melt Thaw and resolve itself into a dew
How weary stale flat, unprofitable seem to me all the uses of this world!
Fie..on’t ! o,fie !
(1.II.130-33)
नाटकातील अतिशय महत्त्वाचे, अतिशय अर्थपूर्ण आणि प्रभावी अशा या स्वगतात हॅम्लेट म्हणतो, की निसर्गातील स्वाभाविक, रानटी, गलिच्छ गोष्टींचे सध्या सर्वत्र राज्य आहे. या तीव्र, धारदार शब्दात त्याची संतप्त निराशा आणि स्वाभाविक नैतिकता स्पष्टपणे दिसते. इथपर्यंत ब्रॅडलेंचे म्हणणे खरे आहे. पण त्याला नैतिक आदर्शवाद प्रेरक आहे असे म्हणता येणार नाही. हॅम्लेटची विमनस्कता (Melancholia) खरी असली तरी सूड घ्यावा की नाही याबद्दल त्याला तिळमात्र संदेह नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची ऑफेलियाशी वागणूक, आईला कठोर बोलणे, रोझँक्रॅट्झ व गिल्डरस्टन यांच्या वधाचे कारस्थान करणे यात ना विमनस्कता, ना नैतिकता आहे. जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिंग्मंड फ्रॉइड व त्याचे शिष्य अर्नेस्ट जोन्स यांनी हॅम्लेटच्या वर्तनाची मनोविश्लेषणात्मक मांडणी केली आहे. फ्रॉइडच्या मते, प्रत्येकाच्या मनात बालपणी वडिलांना मारून आईचा आपण सर्वस्वी ताबा घ्यावा अशी इच्छा असते. या इच्छेला तो ‘इडिएस गंड’ असे नाव देतो. हॅम्लेटच्या मनात ती इच्छा जागृत होते. आपण जे करावे, असे वाटते तेच चुलत्याने केल्याने तो क्लॉडियसला मारू शकत नाही. ही झाली नेणिवेची (Sub- conscious) धारणा. मात्र जाणिवेच्या  (consciousnes) क्षेत्रात क्लॉडियसला मारून सूड घेणे ही नैतिक आवश्यकता होती. नेणीव व जाणीव एकमेकांशी कधीच बोलू शकत नाही, पण मनावर प्रभाव टाकू शकतात.जाणिवेचे कार्य प्रकट तर नेणिवेचे कार्य प्रछन्न असते. हॅम्लेटच्या मनाची या परस्पर विरोधी धारणांमुळे फरफट झाली असे फ्रॉइडवादी मानतात. (मात्र, अर्नेस्ट जोन्सनी वेगळे आणि मार्मिक विश्लेषण केले आहे)
या विविध विश्लेषणातून संविधानकाचा नायक संविधानकातून बाहेर काढून आपल्या समीक्षेच्या ऑपरेशन टेबलवर टाकण्याचा अधिकच आग्रह दिसतो. उपरोक्त समीक्षा अतिशय मोलाची असून तिचे योगदान प्रचंड आहे. पण नाटय़नायक आपल्या भोवतालची संस्कृती, भोवतालचे एकूण वास्तव, विचार, भावना, प्रवृत्ती या सर्वाचा एक अविभाज्य भाग असतो. त्या सर्वाना तो प्रतिक्रिया देत असतो आणि त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेत असतो. हॅम्लेटचाही तसाच विचार करणे, म्हणजे नायकापेक्षा नाटकाचा विचार करणे आवश्यक आहे. या दृष्टीने ‘हॅम्लेट’ या नाटकाची अविस्मरणीय वैशिष्टय़े काय आहेत?
‘हॅम्लेट’ नाटकाभोवती एक गूढतेचे आकर्षक आवरण आहे. पिशाच, हॅम्लेटचे ऑफेलियाला कठोर बोलणे, तिची आत्महत्या, त्याचे वेड, त्याच्या आईचा अशोभनीय विवाह आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हॅम्लेटचा विलंब. या सर्वच गोष्टींचा येथे ऊहापोह शक्य नाही, पण काहींची चर्चा उपयुक्त ठरेल. नाटकाच्या पहिल्याच अंकात पिशाचचा अंतर्भाव आहे. ते हॅम्लेटला त्याच्या ऐहिक जीवनाच्या अंताचे रहस्य सांगून हॅम्लेटला व आपल्याला अचंबित तर करतेच पण त्याच्या संविधानकातील सहभागामुळे आणि नायकाच्या वागण्याची सूत्रे हातात घेतल्यामुळे हे व्यवहारी, नाशवंत वास्तव (To be असणे)  त्यापलीकडे असलेले अंतिम, चिरंतन (not to be) जग वास्तवाशी संलग्न होते आणि नाटकाचा गूढतेच्या गुहेतील प्रवास सुरू होतो. पिशाच विश्वातील अंतिम शक्तीचा प्रतिनिधी आहे का? सांध्यातून निखळलेल्या काळाला हॅम्लेटतर्फे व्यवस्थित करण्याच्या ते प्रयत्नात आहे का? काहीही असो, पण नाटकातील या अतिभौतिक (अतितात्म) चेतनेच्या समावेशामुळे नाटकात आयुष्यविषयक मूलभूत प्रश्नांचा सहज प्रवेश होतो, जे आपल्याही मनात खोलवर दडलेले किंवा दडविलेले असतात. एकूणच पिशाचामुळे ऐहिकता आणि वैश्विकता यांची सांगड घातली जाते.
इहवादी अस्तित्व आणि आध्यात्मिक अस्तित्व (To be and not to be) यांना एकत्रित आणणारी ही एक जागतिक साहित्यातील असाधारण झेप आहे. पहिल्या अंकात पडलेली गूढतेची ही कृष्णछाया पुढील दोन अंकात अधिकाधिक घनदाट होत जाते.
नाटकात माणसाच्या जगण्यातील अनिश्चिततेचे, अनाकलनीयनतेचे मोठे भेदक तरीही वेधक चित्रण आहे. या प्रवासात एक पाऊलही पुढे टाकणे कठीण होते. पिशाच खरे की निव्वळ कल्पना? खरे असले तर ते खरेच आपल्या वडिलांचे की तो सैतानाचा निव्वळ दुष्ट खेळ? आई अपराधी की निरपराध? चुलत्याचा वध करणे योग्य? हॅम्लेटला हे आणि इतर अनेक प्रश्न पडले आहेत. हॅम्लेटचे वेड खरे का खोटे? तो असा विचित्र का वागतो, असे राजा, राणी, पोलोनियस यांना प्रश्न पडतात. हॅम्लेट ऑफेलियाला ‘मठात जाऊन राहा..’ (3.I) इ. असे कठोर बोलला ते का, असा तिला पडलेला प्रश्न. नाटकाची सुरुवात एका मामुली प्रश्नाने होते; तर तिसऱ्या अंकात (3.I) हॅम्लेटला आयुष्याच्या मुळाशी असलेला प्रश्न पडतो. जगणे श्रेयस्कर की मरणे? जगण्यातील वेदना, दु:खे, अपमान, अवहेलना ही सारी का सहन करावीत? त्याऐवजी पोटात कटय़ार खुपसून आत्मघात का करू नये? मरण का स्वीकारू नये? पण आपण मरणानंतर काही प्रचंड भयप्रद परिस्थितीत पडणार असलो तर? या सर्वोच्च प्रश्नाचे उत्तर हॅम्लेटला निदान तत्काल तरी मिळत नाही.
‘हॅम्लेट’ नाटकातील स्वगते ही नाटकाच्या गळ्यातील रत्नमालाच आहेत, वर उल्लेखिलेली (To be or not to be अंक ३, प्रवेश १) हे आणि (Oh, that this too solid flesh would …..) (अंक १, प्रवेश २; १३० -१५८) हे स्वगत शेक्सपिअरची कल्पनाशक्ती, भाषा प्रभुत्व आणि विचारांची गंभीरता यांच्या एकत्रित आविष्काराने अनमोल रत्ने झाली आहेत. काही समीक्षकांच्या मते, ही स्वगते संविधानकाशी बांधलेली नाहीत. ती काढली तरी काही बिघडत नाही. पण समीक्षक हे विसरतात, की सूडकथेतील सामान्य नायक आणि हॅम्लेट यात फरक हा आहे, की हॅम्लेटचे मन मुळापासून ढवळून निघाले आहे. नको त्या वेळी जीवनाची नैतिक मूल्ये त्याच्या सदसद्विवेक बुद्धीची उलटतपासणी करू लागली. त्यामुळे म्हणजे मनातील नैतिक वादळामुळे हॅम्लेट हतबल होतो.
तो म्हणतो,
Thus conscience does make cowards of us all; and thus the native hue of resolution Is sickked over with the pale cast of thought.
(3.I.83-85)
शेवटच्या अंकात हॅम्लेटच्या दृष्टिकोनात बदल झालेला दिसतो. अंतरआत्म्याच्या मार्गदर्शनातून स्पष्ट दिग्दर्शन होत नसल्याने तो नियतीवादी होतो. विचारशक्ती क्रियाशीलतेकडून (action) क्रियाशून्यतेकडे  (inaction) तो सरकला जातो. पण स्वत:चे नैतिक सामथ्र्य संपत आल्यानंतर विचारव्यवस्थेला आधार कशाचा? कुणाचा? तो आधार हॅम्लेट दैवीशक्तीत शोधतो. दैव जे ठरवी ते करण्यास आपण सिद्ध रहावे हेच खरे.
There is a special providence in the fall of a sparrow …. the readiness is all
(5.II.207-210)
चिमणी पडते त्यामागे किंवा राजा मरतो त्यामागे काय देवाचा हात असतो? केव्हातरी क्लॉडिअसचा वध ही दैवगती आहे. आपण तयार असणे आवश्यक आहे, ही हॅम्लेटची नवी विचारसरणी आहे. तत्पूर्वी तो हेच स्पष्टपणे सांगतो.
+Our indiscretion sometimes serves us well when our deep plots do pall and that
Should learn (teach) us
There is a divinity that shapes our ends,
Rough-hew  them how we will,-
(Act v sc.ii 8-11)
आपल्या उद्दिष्टांचा काळ, वेळ, आकार हे सर्व दैवीशक्तीच्या हातात आहे, असे म्हणणारा हॅम्लेट आता अंतर्यामी न बघता वर दैवावर विश्वसून शांत झाला आहे. ‘हॅम्लेट’ ही शोकांतिका, अतिविचारांची शोकात्मिका नसून ती पराभूत विचारांची शोकात्मिका आहे,’ असे डी. जी. जेम्स म्हणतात ते खोटे नाही.
शेक्सपिअरच्या इतर महान शोकात्मिकांप्रमाणे ‘हॅम्लेट’ नाटक व नायक सकारात्मक स्वरात संपत नाही. शेक्सपिअरच्या सर्व नाटकात हॅम्लेटच अस्तित्वाच्या अर्थाचा चौफेर आणि खोलवर विचार करतो. त्याच्या प्रगाढ चिंतनाने तो कधी विचारांच्या वादळात सापडतो, तर कधी भावनांच्या भोवऱ्यात अडकतो. विचार आणि व्यवहार यांची सांगड घालणे त्याला जमत नाही- पण कुणाला जमले आहे? वडिलांचा दृष्ट, निर्घृण खून आणि आईचा खुन्याशीच घाईघाईने अशोभनीय विवाह यामुळे आतून बाहेरून उद्ध्वस्त झालेल्या हॅम्लेटची स्थिती, सांतायनांनी म्हटल्याप्रमाणे, काचेच्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्याप्रमाणे झाली आहे. तो आतून बाहेरून उद्ध्वस्त झालेला आहे. कवी येट्स यांच्या शब्दात
The center cannot hold
The things fall apart
अशी त्याची अवस्था झाली आहे. विचारांचे हौतात्म्य पत्करणाऱ्या या वीराला Good night Sweet Prince म्हणून आपण
निरोप देऊ शकतो, एवढेच.    
******
जागतिक ग्रंथदिनीच्या मुहूर्तावर दै. ‘लोकसत्ता’ने समाजातील वाचनसंस्कृती वाढीस लागावी तसेच आतबट्टय़ाच्या ग्रंथव्यवहाराला मदतीचा हात पुढे करावा याकरिता ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या lr18योजनेची घोषणा केली आहे. प्रकाशक आणि वाचक यांच्यामधला सुसंवादी दुवा असे याचे स्वरूप असेल. उत्तम लेखकांची उत्तमोत्तम पुस्तके या योजनेंतर्गत अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावीत, त्यांना परवडण्यायोग्य किमतीत ती उपलब्ध व्हावीत, तसेच प्रकाशकांनाही या व्यवहारात लाभ व्हावा असा आमचा प्रयत्न राहणार आहे.
 विख्यात संगीतशास्त्री कै. अशोक दा. रानडे यांचा ‘पाश्चात्य संगीत संज्ञा कोश’ आणि पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे ‘उत्क्रांतियात्रा’ हे या योजनेतील पहिले मानकरी असतील. ही पुस्तके अनुक्रमे पॉप्युलर आणि राजहंस यांची प्रकाशने आहेत.
या योजनेनुसार ‘लोकसत्ता’ काही निवडक उत्तम पुस्तकांच्या प्रसाराची आणि प्रचाराची जबाबदारी घेणार असून, त्यात ‘लेखक-वाचक संवाद’, आगामी पुस्तकातील निवडक भागाचे लेखकाकडून वाचन आदी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश असेल. ही पुस्तके महाजालात ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावरूनदेखील विक्रीस उपलब्ध केली जातील. तसेच ‘लोकसत्ता’च्या वाचकांना या योजनेतील पुस्तकांवर विशेष सवलत दिली जाईल.

First Published on April 26, 2015 12:25 pm

Web Title: shakespeares hamlet
Next Stories
1 काऊ बेल्स
2 नृसिंह मंदिरे : एक शोध
3 .. प्रादेशिक बातम्या देत आहेत!