|| सुरेश चांदवणकर

युरोप आणि आशियातील ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि अभ्यासकांचा एक परिसंवाद (सिंपोझियम) अलीकडेच चीनमधील शांघाय विद्यापीठात पार पडला. त्यानिमित्ताने..

मेच्या शेवटच्या आठवडय़ात शांघाय विद्यापीठातल्या फिल्म आणि टी. व्ही. आर्ट कॉलेजमध्ये ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि अभ्यासकांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. युरोपातील ‘सोसायटी फॉर हिस्टॉरिकल रेकॉडिंग्ज’ ही संस्था सहआयोजक होती. रीतसर निमंत्रण मिळालं होतं, पण मी काहीसा साशंक होतो. कारण चीनचा पोलादी पडदा, न समजणारी लिपी, भाषा आणि माझा शाकाहार. तरीही चार दिवस का होईना, पण जायचं असं ठरवलं.

प्रासादतुल्य, पण परवडेल अशा तीस मजली हॉटेलमध्ये रात्री पोहोचलो. सतराव्या मजल्यावर खोलीत आल्याबरोबर सरावाप्रमाणे मोबाइलवर वायफायचा कोड टाकला. चायना नेट दिसायला लागले. गुगल, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक सगळंच ब्लॉक झालेलं. त्याविषयी वाचलं होतं खरं; पण विसरलो होतो. पुढचे चार दिवस मोबाइलशिवाय काढायचे असं ठरवलं. आगळाच अनुभव.

‘शांघाय’चा शब्दश: अर्थ समुद्रावर वसलेलं शहर. साडेपाच हजार मलांचा प्रवास करून यांगझी नदीचं गोडं पाणी इथं सागराला मिळतं. मासेमारीचं हे छोटं गाव चीनबरोबरच्या अफूच्या युद्धातील तहामुळे ब्रिटिशांच्या ताब्यात आलं व त्यांच्या वसाहतीमध्ये चिनी कायदेकानू चालणार नाहीत हेही मान्य करून घेण्यात आलं. तेव्हापासून हे शहर हळूहळू व्यापाराचं केंद्र बनलं. पाठोपाठ फ्रेंच, जर्मन व अमेरिकन आले. त्यांनीही विशेष सवलती मिळवल्या व शांघाय हे आंतरराष्ट्रीय उलाढाली व आíथक सत्तेचं प्रमुख केंद्र बनलं. काही काळातच ‘पूर्वेकडचं पॅरिस’ अशी शहराची ओळख होऊ लागली. सांस्कृतिक क्रांतीची दहा वर्षे (१९६६ ते ७६) सोडली तर शहराचा हा लौकिक अबाधित राहिला. आज अनेक देशांतले लोक नोकरी-उद्योगासाठी इथं येऊन राहिले आहेत. मोठाल्या यंत्रांद्वारे रस्तेसफाई, बॅटरीवर धावणाऱ्या छोटय़ा स्कूटर्स व सायकली रस्त्याच्या कडेनं, तर मोटारी मध्यातून अशी वाहतूक व्यवस्था. मेट्रोत लगबगीनं शिरणारी शिडशिडीत, हसतमुख माणसं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मॅकडोनाल्ड, स्टारबक्स कॉफी, केएफसी, सबवे तसेच स्थानिक पदार्थाची दुकानं.

सिंपोझियममध्ये ऑस्ट्रिया, जर्मनी, डेन्मार्क व भारतातून मी असे बाहेरचे, तर चीनमधील स्कॉलर्स व खासगी संग्राहक मोठय़ा संख्येनं आले होते. काहींना मी ओळखत होतो. चिनी मंडळींशी ओळख करून देताच एकानं ‘आवारा हूं’ गाणं गायला सुरुवात केली व त्या रेकॉर्डची मागणी केली. असाच अनुभव १९९७ मध्ये महिनाभर रशियात असताना आला होता. या गाण्याची मूळ चाल ही रशियातली अ‍ॅकॉíडयन या वाद्यावरची आहे, हे ऐकून चिनी संग्राहकांना नवल वाटलं.

संपूर्ण कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्रालयाची पूर्वपरवानगी घेण्याचं बंधन असल्यानं थोडक्या वेळात आम्हाला बरंच सादरीकरण करायचं होतं. शिवाय प्रत्येक वाक्यानंतर दुभाष्यासाठी थांबायचं होतं. हे अवघड खरंच; पण तीन मिनिटं वाजणाऱ्या ध्वनिमुद्रिका जमवणाऱ्यांनी हे आव्हान सहजगत्या पेललं व पूर्ण परिसंवाद आखल्याप्रमाणे पार पडला. चिन्यांचं आदरातिथ्य अगदी आपल्यासारखंच. प्रेमानं व आपुलकीनं. मी एकुलता एक शाकाहारी प्रतिनिधी. पण सॅलड, उकडलेल्या भाज्या, फळं व गोड पदार्थ असं बरंच काही अगत्यानं मिळालं. परिसंवाद चालू असताना प्रत्येकाच्या समोर गरमागरम हिरव्या चहाचा मग कायम भरलेला असेल याची काळजी घेतलेली.

प्रतिनिधींपैकी बहुतेकांचा गाण्यांच्या रेकॉर्ड्स जमवणं हा आवडीचा छंद. पोटापाण्याचा व्यवसाय निराळा. निवृत्तीनंतर छंद अधिकच बहरलेला. जर्मनीतले ८२ वर्षांचे डॉ. लोटझ हे पेशानं बँकर; पण ध्वनिमुद्रिकांसंबंधीचं त्यांचं काम अफाट. अगदी ग्रॅमी अ‍ॅवार्डच्या शिफारशीपर्यंत त्यांचं लिखाण पोहोचलेलं. दळणवळणाची साधनं फार जिकिरीची असताना ग्रामोफोन कंपनीच्या तंत्रज्ञांनी आशियात येऊन १९०५ च्या सुमारास ब्रिटिशकालीन भारत आणि चीनमध्ये कसं काम केलं व रेकॉर्ड्स बनवल्या, ते त्यांनी वीस मिनिटांत सांगितलं. मुंबईच्या चोरबाजारात फुटपाथवर मिळालेल्या चिनी लेबलच्या रेकॉर्ड्सविषयी मी बोललो. डेन्मार्कच्या अभ्यासकानं शांघायमधील रेकॉर्ड कंपनी व फॅक्टरीविषयीची माहिती दिली. ती चिनी प्रतिनिधींनाही नवी होती. चिनी संशोधक व संग्राहकांकडून आम्हालाही बरीच माहिती मिळाली. बीजिंगच्या राष्ट्रीय अर्काइव्हमधून आलेल्या बाईंनी दिलेली माहिती तर पहिल्यांदाच बाहेर येत असावी. त्यामुळेच चिनी मंडळीही त्यांच्या स्लाइड्सचे फोटो घेत होती.

दुसऱ्या दिवशी शांघायच्या लायब्ररीला भेट होती. तिथला खजिना शांघायमधील संग्राहकांनाही प्रथमच बघायला मिळाला. त्यामुळे पुढचा कार्यक्रम राष्ट्रीय संग्रहालयात त्यांच्याच सहकार्यानं घ्यावा अशी सूचना सर्वानी केली. देशोदेशीच्या ज्येष्ठ संग्राहकांना त्यांचे तरुणपणीचे दिवस आठवले. पदरचे अफाट पसे खर्च करून, प्रसंगी कुटुंबीयांचा रोष पत्करून गोळा केलेल्या व जिवापाड जपलेल्या ध्वनिमुद्रिका आयुष्याच्या संध्याकाळी अशा उपयोगाला येतील अशी पुसटशी कल्पनाही त्या वेडेपणाच्या काळात कुणाला नव्हती. इंटरनेटच्या आगमनानंतर बरीच तरुण मंडळी या छंदाकडं वळताहेत, महागडे प्लेयर्स विकत घेत आहेत. पुन्हा ध्वनिमुद्रिकांचं युग येतंय याचा आनंद सर्वानीच बोलून दाखवला.

त्या संध्याकाळी यजमानांतर्फे भोजन होतं. त्यानंतर अगदी अकल्पित अशी भेट मिळाली ती यांगझी नदीतून बोटीतल्या सफरीची. या नदीच्या दोन्ही काठांवर मलभर लांब पादचारी मार्ग आहे. त्याला ‘बंड’ असं म्हणतात. संध्याकाळी या नदीतून बोटीनं सफर ही एक वेगळीच चन होती. माणशी तिकीट सुमारे तीन हजार रुपये. सगळे जण बोटीवर पोहोचलो तेव्हा संधिप्रकाश होता. रंगीबेरंगी कपडय़ांतले पर्यटक मोठय़ा उत्साहानं सफरीचा आनंद घेत होते. प्रत्येकाच्या हातातल्या मोबाइलवर फोटो, सेल्फी व व्हिडीयो उतरवणं सुरू होतं. काळोख पसरला तशी दोन्ही तीरांवरची रोषणाई उठून दिसू लागली. एका तीरावर उंच इमारती व त्यावरची हलणारी रोषणाई, तर विरुद्ध बाजूला युरोपियन शैलीच्या डौलदार प्रासादांची रांग. माफक रोषणाईनं उठून दिसणारी. बरोबरचे वयस्कर चिनी संग्राहक म्हणाले, ही सगळी किमया अलीकडची. पूर्वी त्या बाजूला व्यापारी गलबतांचे धक्के होते. आज यांगझीच्या मध्यावरून बोट जाते तेव्हा वाटतं की, एका बाजूला सीएन नदी वाहते आहे, त्या तीरावर पॅरिस आहे. तर दुसऱ्या बाजूला हडसन वाहते आहे, त्या तीरावर न्यूयॉर्क आहे. तिथली रोषणाई टाइम्स स्क्वेअरची आठवण करून देणारी. युरोपियन व अमेरिकनांनी ज्या सवलती चीनकडून तहात मिळवल्या त्यांना ही फळं आली आहेत. ही अविस्मरणीय सफर आटोपून हॉटेलवर पोहोचलो तेव्हा दहा वाजून गेले होते.

परिसंवाद आटोपला होता, पण आमच्या चिनी मित्रानं जवळच्या हँगझाऊ या ऐतिहासिक शहरात जायचा खास बेत आखला होता. ट्रेननं दीडेक तास प्रवास करून तिथं जायचं होतं. रेल्वे स्टेशन व गावातला विमानतळ एकाच ठिकाणी. तिथून समुद्राकाठच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी मेट्रोची सोय. प्रचंड मोठं आवार व वेटिंग रूमचा भलाथोरला हॉल. प्रवाशांना गाडीच्या वेळेआधी काही मिनिटंच प्लॅटफॉर्मवर जायला मिळतं. अगदी अमेरिकेतल्यासारखी व्यवस्था. पिण्याच्या पाण्याची मोफत सोय. ते पण गरम व गार. एअरपोर्टवर व ट्रेनमध्येसुद्धा. काचेच्या बाटलीत खास हिरव्या चहाची पानं टाकायची व उकळतं पाणी भरून घ्यायचं. प्रवासासाठीचं खास राष्ट्रीय चिनी पेय तयार. ताशी दोनशे मैल वेगानं धावणारी बुलेट ट्रेन. शहर सोडलं आणि ट्रेन उपनगरांकडं धावू लागली तशा उंचच उंच इमारती नाहीशा झाल्या. आधुनिक बांधणीच्या आठ-दहा मजली इमारतींच्या रांगा दिसू लागल्या. काही ५०-६० वर्षे जुन्या काळातील तीन-चार मजली इमारती. सगळ्या एकाच छापाच्या. साच्यातनं काढल्यासारख्या. या कामगार वस्त्या. बीजिंग-शांघायसारख्या मोठय़ा शहरांमध्ये सकाळी कामाला जाऊन सायंकाळी परतणाऱ्यांसाठी वसवलेल्या. रशियातही अशा साचेबंद इमारती पाहिल्या होत्या. त्यांची आठवण झाली. हँगझाऊला पोहोचेतो संध्याकाळ झाली होती. सगळे जण ‘हॉटेल र्मचट मार्को’त उतरलो. जगविख्यात व्यापारी व पर्यटक मार्को पोलो याचं नाव. त्याचा पुतळाही हॉटेलच्या स्वागतकक्षापाशी उभा केलेला. तो या शहरात १२७२  ते ७६ अशी चार वर्षे होता. या शहराला तो ‘स्वर्गतुल्य शहर’ म्हणत असे. आठव्या मजल्यावर माझ्या खोलीत आलो. बाल्कनीतनं लांबवर उंचच उंच इमारतींचं जंगल दिसत होतं. इथं कशासाठी आलो असं वाटून गेलं. ताजातवाना होऊन लॉबीमध्ये आलो. सर्वासह फिरायला बाहेर पडलो. शांघायसारखीच गजबजलेली दुकानं, रस्ते, वाहनं, गर्दी. चार ब्लॉक ओलांडून गेलो मात्र- अन् एकदम ट्रान्सफर सीन. समोर भलंमोठं तळं. लांबवर डोंगरांच्या रांगा. एका बाजूला थोडय़ा उंचीवरचा पॅगोडा. एकदम बाराव्या शतकातच पोहोचलो. पर्यटकांची ही गर्दी उसळलेली. तळ्याकाठी खुच्र्या मांडलेल्या. प्रेक्षक जागा पकडून बसलेले. अंधार पडला. पाण्यात दूरवर काही नौका आल्या. त्यांची आरास जुन्या चिनी प्रासादांची. त्यात दिवे लागले. संगीत सुरू झालं अन् अचानक पाण्यातून शेकडो कारंजी उडू लागली. संगीताच्या लयीबरोबर डुलू लागली. रंगीत प्रकाशझोतातला ‘लाइट अँड साऊंड’चा खेळ अर्धा तास चालू होता. अक्षरश: डोळ्यांचं पारणं फिटलं. नंतर तळ्याकाठी थोडं फिरून परतलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता उरकून पुन्हा सगळे तळ्याकाठी आलो. वाहनांना मज्जाव होता. पाचेक मल तरी चाललो. मग तासभर खास चिनी चहापानाचा साग्रसंगीत कार्यक्रम झाला. इथल्या तळ्यात बोटीतून फिरणं हेच स्वर्गीय सुख असं मार्को पोलोनं लिहून ठेवलंय. तो आनंद आम्ही लुटला. एका बेटावरून दुसरीकडं जाऊन तळ्याची विविध रूपं बघितली. एक बेट तर चीनमधल्या फिल्म्ससाठी प्रसिद्ध आहे. तिथं चित्रण झालेल्या सिनेमांची यादीच पाहायला मिळाली. पॅगोडाच्या आतून वपर्यंत जायला लिफ्ट आहे. तिथून दूरवरचा परिसर पाहिला. परिसरात अनेक जोडपी पारंपरिक वेशात धार्मिक विधी व पूजा करताना बघितली. श्रद्धा दंडुक्यानं मारता येत नाही, हेच खरं.

परतीच्या प्रवासात शेजारी साधारण माझ्याच वयाचे गृहस्थ बसले होते. भारतात येऊन गेले होते. डॉ. कोटणीसांचा विषय त्यांनी आपणहून काढल्यानं आमचं छान जमलं. आत्ता जाऊन आलात त्याच पद्धतीची पर्यटनस्थळं सगळीकडं बनताहेत म्हणाले. शांघाय खूपच वेगळं आहे. खरा चीन बीजिंगमध्ये व ग्रामीण भागात आहे. पण तो कसा आहे हे आम्हालाच कळू देत नाहीत, तर इतरांची बातच सोडा. कितीही दडपलं तरी इंटरनेटच्या माध्यमातून आक्रमण जबरदस्त झालेलं आहे. तरुणाईला सगळा इतिहास ठाऊक आहे, पण त्यांना त्याचं ओझं वाहायचं नाहीए. त्यांना संपन्न व सुरक्षित जीवन हवं आहे. डोक्याला ताप नको आहे. शासकांना ते हवंच आहे. राजकीय आकांक्षा निर्माणच होऊ नयेत अशी चोख व्यवस्था आहे. बोलता बोलता खिडकीबाहेर येताना पाहिलेल्या साच्यातल्या इमारती दिसू लागल्या. त्याविषयी विचारता म्हणाले, ही कामगारांसाठीची उपनगरं आहेत. आधुनिक इतकी, की तुम्हाला शहरात राहायचा मोहच होऊ नये. तुमच्याकडं येऊ घातलेल्या स्मार्ट सिटीज्सारखी.

एका भारतीय मित्राबरोबर दिवसाउजेडी यांगझी नदीच्या काठावर पुन्हा काही तास घालवले. रात्री बोटीतून लांबून पाहिलेल्या विविध आकारांच्या उंचच उंच इमारती आता काहीशा अंगावर येत असल्याचा भास होत होता. सुट्टी असल्यानं गर्दी उसळली होती. एक अनोखा उत्साह व आनंद सर्वत्र पसरला होता. खाणंपिणं व मज्जामस्ती चालली होती. अ‍ॅपल फोनच्या शोरूम्स तरुणाईनं भरून गेल्या होत्या. मॉल्स मालानं व खरेदीदारांनी ओसंडत होते. इथला सर्वात पहिला मॉल एका मलेशियन माणसाचा. त्यात फिरून आलो. त्याच्या प्रवेशद्वारापाशी दोन्ही बाजूला सागवानाचे देखणे मोठे हत्ती उभे होते. बाहेर रस्त्याच्या कडेला फूटपाथवर चौथरा व त्यावर पितळेच्या मखरात तीन शिरांची बुद्धमूर्ती विराजमान होती. धम्म, संघ व बुद्ध अशी शिरांची नावं. देव्हाऱ्याच्या पायथ्याला अनेक लाकडी हत्ती मांडून ठेवलेले. प्लास्टिकच्या रंगीत फुलांची सजावट. दक्षिण आशियाला अनेक शतकं बांधून ठेवणारा गौतम बुद्ध खरा; पण बरेच ‘आहे रे’ व ‘नाही रे’ गटातले संपन्न आणि गरीब चिनी कन्फ्युशियसच्या शिकवणीकडं पुन्हा वळू लागलेत असं मित्राच्या बोलण्यातून समजलं. परतीची वेळ झाली होती. मित्राचा निरोप घेऊन सबवेत शिरलो. एअरपोर्टचं तिकीट काढण्यासाठी खिशातून शंभर युवानची नोट काढली. नोटेवरच शिल्लक राहिलेला फोटोतला माओ किंचित विषादानं हसल्याचा क्षणभर भास झाला.

chandvankar.suresh@gmail.com