ऊसतोड मजुरांचं जगणं बेभवरशाचं. ऊसतोडणी हंगामातच दोन पैशाचं काम मिळून हातातोंडाची गाठ पडण्याची शक्यता. त्यात जर मुकादमाकडून आधीच उचल घेतलेली असेल तर ती फिटेपर्यंत जीव धोक्यात घालून काम करावं लागतं आणि तरीही कर्जाचा डोंगर फिटून एक नवा पैसा हातात येण्याची शाश्वती नाही. या दुष्टचक्रात पिचून निघणारे कामगार आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकत नाहीत. बऱ्याचदा आर्थिक चणचण एवढी असते की, शाळकरी मुलांना शिक्षणसोडून ऊसतोडणीचं काम करावं लागतं. स्थलांतरामुळे मुलांना एकाच ठिकाणी स्थिर होऊन शिक्षण घेणंही शक्य होत नाही. अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि टाटा ट्रस्टच्या सहयोगानं बारामतीमधील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ‘डिजिटल एज्युकेशन गॅरंटी कार्ड’ (आशा) हा प्रकल्प राबवला जात आहे. या कारखान्यावर मराठवाडय़ातून कामासाठी येणाऱ्या मजुरांच्या मुला-मुलींना जवळपासच्या जिल्हा परिषदेच्या तसंच अनुदानित खासगी शाळांमध्ये दाखल करण्याचं महत्त्वाचं काम आशा प्रकल्पाचे कार्यकर्ते करतात.

आर्थिक परिस्थितीमुळे अकाली प्रौढत्व आलेली ऊसतोड कामगारांची मुलं-मुली शिक्षणापासून, आनंदी बालपणापासून वंचित तर राहतातच, मात्र अनेकदा कुटुंबाला हातभार लावण्याकरता ती मजुरीनं कामालाही जातात. अशा स्थितीत या मुलांच्या शिक्षणहक्कासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अनेक पातळ्यांवर लढावे लागते. शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मुलांच्या पालकांशी संवाद साधणं, लहान बालकांना कामाला ठेवणाऱ्या लोकांना बालमजुरी, शिक्षणाचं महत्त्व याबद्दल समजावून सांगणं अशी अनेक आव्हानं पेलावी लागतात. या प्रश्नांचा आणि संभाव्य उत्तरांचा सांगोपांग वेध घेणारं ‘शिक्षणकोंडी’ हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं आहे. छोटय़ाछोटय़ा लेखांच्या स्वरूपात या पुस्तकातून दिलेली माहिती आपल्याला एका वेगळ्याच जगाचं दर्शन घडवते. ऊसतोड कामगारांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित ‘कोयता’, ‘घायटा उठणे’, ‘कोप्या’ असे शब्द व त्यांचे वेगळे अर्थही पुस्तकाच्या शेवटी दिले आहेत. त्यामुळे सामान्य वाचकाला ऊसतोड कामगारांचं जीवन समजून घेण्यास मदत होते. स्थलांतरित मुलांना शिक्षणहक्क मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांची ही पुस्तकरूपी डायरी आवर्जून वाचण्यासारखी आहे.

mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Inquiry into deterioration of health of police trainees Neelam Gorhes letter to Home Minister
पोलीस प्रशिक्षणार्थ्यांची प्रकृती बिघडल्याप्रकरणी चौकशी; विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे गृहमंत्र्यांना पत्र
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा

‘शिक्षणकोंडी’- परेश जयश्री मनोहर,

संतोष शेंडकर, रोहन प्रकाशन,

पृष्ठे- १०८, मूल्य-१२५ रुपये.