News Flash

अस्पर्शी द्वंद्वांची उकल

चित्रपटातील गुरू-शिष्य दोघेही पुरुषच आहेत; सवर्ण आहेत. परंतु दोघांपैकी एक निम्न जातीतील असता वा एक स्त्री असती तर त्याचं समीकरण बदललं असतं.

|| संध्या गोखले 

चैतन्य ताम्हाणेकृत ‘द डिसायपल’ या आगळावेगळा आशय आणि सादरीकरण असलेल्या तसेच अनेक प्रतिष्ठित पुरस्कारप्राप्त चित्रपटाचे आस्वादक रसग्रहण…

‘विचार संपला की उगाच ताणू नकोस. विचारपूर्वक मेहनत कर. नवीन जागा सुचत नाहीत म्हणजे काय? रियाज कमी पडतो.’

‘२४ तास मी फक्त रियाजच करतो.’

‘उपज कमी पडते आहे. अस्थिर आहे सगळं!’

गुरू-शिष्यामधला हा छोटासा संवाद. नुकत्याच झालेल्या बैठकीचं रेकॉर्डिंग लॅपटॉपवर दाखवून गुरूची प्रतिक्रिया घेऊ पाहणाऱ्या शिष्याला गुरूकडून मिळालेलं जीवनाचं सार! ‘उपज कमी पडते आहे.’ चित्रपटाच्या संदर्भात, भारतीय शास्त्रीय संगीताची आस असलेल्या आणि नसलेल्या दोहोंमध्ये वैश्विक नाळ साधणारं वाक्य!

उथळ-सखोल, अभिजात-उच्छृंखल, उल्लाट-सौम्य, उपासक-ढुढ्ढाचार्य, उणवट-शाश्वत हे आणि असेच दुभंग असलेल्या दोन प्रवृत्तींमधल्या द्वंद्वांची उकल करून देणारा चित्रपट… चैतन्य ताम्हाणेचा ‘द डिसायपल’! ती उकल विलक्षण ताकदीने करून दिली आहे त्याबद्दल लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि सर्व तंत्रज्ञांचं अभिनंदन.

उलगडत जाताना हा चित्रपट त्यात असलेली एक अंतर्भूत अस्वस्थता आपल्यात पेरत जातो. समोरच्या पडद्यावर जौनपुरी ऐकत असताना, किशोरीताई, अमीरखांसाहेबांचे आर्त सूर, तसंच कुमारांनी अलवार उलगडून दाखवलेल्या गंधार, निषाद आणि धैवताचं कोमल स्वरूप मनात उमटत राहतं. खरं तर चित्रपटाची पकड कमी झाली तर इकडचे तिकडचे विचार येत राहतात. मात्र, वर्षानुवर्षं मुळं रुजवलेल्या वटवृक्षाच्या ताकदीने ‘द डिसायपल’ वेगवेगळ्या अंगाने भिडत प्रवृत्तींचं कोलाज साकारत राहतो. त्यामध्ये अन्नपूर्णादेवी, मोगूबाई, रघुनंदन, कलापिनी-मुकुल असतात; महेश काळे आणि निलाद्री कुमारही असतात. कलेतील सौंदर्यशास्त्रामधल्या द्वंद्वाची सुरुवात मैफिलीच्या पहिल्याच static, long shot  मधून खाली बसून रियाज करणारा आणि गुरूची पाठ चेपणाऱ्या शिष्याच्या close-up कडे जातो तेव्हापासूनच होते.

समकालीन संदर्भांसहित चालू झालेला ताळमेळ अकस्मात थांबवून, शास्त्रीय संगीताची साधना करणाऱ्या २४ वर्षीय शरद नेरूळकरच्या भावविश्वात जाऊन पोहोचतो. रात्री फटफटीवरून जाताना तो निर्मनुष्य रस्ते मागे सोडत राहतो; पण कानात मात्र विदुषी माईंचे विचार दुमदुमत असतात. त्याच्या समकालीन वास्तवाची लय आणि त्या नामशेष होणाऱ्या विचारांची लय यामधील परस्परविरोध दाखवताना चैतन्यने वापरलेल्या स्लो-मोशन तंत्राचा वापर चित्रपटाला अप्रतिम अतिवास्तववादी परिमाण देऊन जातो.

चित्रपटातील गुरू-शिष्य दोघेही पुरुषच आहेत; सवर्ण आहेत. परंतु दोघांपैकी एक निम्न जातीतील असता वा एक स्त्री असती तर त्याचं समीकरण बदललं असतं. संगीत क्षेत्रातील वर्णभेद वा पुरुषसत्ताक मुजोरी हे मुद्दे या चित्रपटाच्या परिप्रेक्ष्यात येत नसल्याने त्यांचा विचार मी इथे करत नाही. या लेखापुरते तरी ‘गुरू आणि शिष्य’ दोन्ही शब्द लिंगभावनिरपेक्ष वापरले आहेत. पंडित विनायक प्रधान या वार्धक्याकडे झुकलेल्या गुरूची सेवा करत साधना करत असताना शरदने त्यांच्या नात्यामधलं वय/ अनुभव/ प्रतिभा यातलं अंतर मान्य केलंय. पण त्या नात्यातल्या अंतर्भूत उतरंडीचे पदर बाळबोधपणे दृष्टिआडच ठेवलेत. अंतरपाटापलीकडचं राजकारण (politics of pedagogy) ‘द डिसायपल’मधून आपल्यासमोर झिरपत राहतं… संयतपणे, वेगवेगळ्या प्रसंगांतून, व्यक्तिरेखांमधून! या अस्पर्शी विषयाला हाताळण्याचं आव्हान चैतन्यने समर्थपणे पेललं आहे.

आध्यात्मिकतेकडे नेणारा  esoteric pursuit असंच संगीताकडे आजवर बघितलं गेलंय. त्यामुळे हे नातं ‘सत्तास्थानावरील गुरूआणि अप्राप्य लाभेच्छुक शिष्य’ या असमानतेतून उपजलेल्या शोषणावर आधारित असतं, हे आपल्याला पटत नाही. ‘गुरू’ हे एक मिथक तयार होतं ते त्या अविभाज्य उतरंडीतून! गुरूचे माहात्म्य उगाळताना एकेका सुरावर, रागावर महिनोन् महिने तालीम करणे, आचारविचारांत बंडखोरी न करणे, पडेल ते काम, सांगतील ती सेवा करत राहणे अशी मूल्यं जोपासली जातात. शिष्यातल्या भक्तीची आणि अंधश्रद्धेची उपज होते. गुरूच्या प्रतिभेचं आणि देत असलेल्या विद्येचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन हा विचारही रुजवला जात नाही. किंबहुना ते पापच ठरतं. स्वरदिव्यत्वाच्या आख्यायिकांमुळे न्यूनगंड तयार होतो; त्याचं सृजन थांबतं. जोपर्यंत शिष्य मोठा होत नाही तोपर्यंत गुरूअढळ असतो. शिष्याचं अस्तित्व दखलपात्र झालं की त्याला स्वतंत्र बैठकीचे निमंत्रण न येऊ देण्याची खबरदारी घेणं, वा स्वतंत्र गाण्यासाठी तुझी तयारी आहे असा विश्वास न जोपासणं, इ. कोतेपणा गुरूकडून सुरू होतो. हातचं राखून विद्यादान हे त्याच कोतेपणाचं दुसरं रूप! तरीही पाया पडणे, ज्येष्ठांचे नाव घेताना कानाला हात लावणे, इ. दिखाऊ रिवाज चालूच राहतात.

संगीताचे समकालीन बाजारू रूप बघत असणारा शरद माईंचे व्याख्यान आवर्जून ऐकत राहतो. ‘ज्याचं मन स्थिर नाही ती व्यक्ती ख्यालसंगीत सखोलतेने गाऊ शकत नाही. प्रत्येक स्वराची, श्रुतीची पूजा जर करायची असेल तर मन निर्मळ आणि स्वच्छ पाहिजे. राग मांडत असताना मनात असत्य, लोभ आणि अपवित्रता यांना जागा नाही. तांत्रिक प्रभुत्वाने सत्याचा शोध लागणार नाही…’ अशा मिथकांचं अस्तित्व माईंच्या आवाजाच्या background  ठेवल्याने वास्तवाशी असलेली अंतव्र्यस्तता ठळक होत राहते. त्या मिथकांच्या दडपणाखाली शरदचं घरंगळत राहणं स्लो-मोशन तंत्राने टिपलं गेलंय. ख्यालसंगीत ही एक अप्राप्य  commodity करण्यामागे स्पर्धेचे दमन करणे हा सरळ हेतू असू शकत नाही का? ‘टीडीएस कापू नका, कॅशमध्ये पैसे द्या’ अशा गरीब मागण्या करणारे उत्तम ख्याल गात नाहीत का? उत्कृष्ट ताना घेताना कानातले झुमके नीट हलत आहेत ना, विग नीट बसलाय ना, असले विचार येत नसतील? कोणाचं मन एवढं निर्मळ आणि स्वच्छ असतं? आपल्या आधीच्या वा नंतरच्या कलाकाराच्या सादरीकरणाला विंगेतूनसुद्धा हजेरी लावायची नाही, हा अलिखित नियम अपवित्रच नाही का?

‘रागसंगीतातून परमेश्वरापर्यंत पोचण्याची वाट दाखवली आहे. मार्गी संगीताची वाट धरताना त्याग हा करावाच लागणार. एकटं आणि उपाशी राहणं याला पर्याय नाही…’ माई संगीतातील शुचिर्भूतता सांगत राहतात. प्रसिद्धी, पैसा यांचं प्रलोभन न ठेवता आलेल्या संधीला डावलणारा शिष्य तोच सच्चा, घराण्याच्या परंपरेला साजेसा! त्याची पात्रता नसली तरी तोच घराण्याचा वारसदारही ठरू शकतो. लाखो रुपयांची बिदागी, पंचतारांकित निवास इत्यादी अटी हक्काने मागणाऱ्या गुरूंना काय नैतिक अधिकार आहे शिष्यांना त्यागाचे धडे द्यायचा? तसंच वासना, लग्न, प्रापंचिक जबाबदाऱ्या यांचा त्याग करणं हेसुद्धा शिष्याकडून अभिप्रेत असायचं. लीन होऊन गुरूचे पाय चेपणारा वा तानपुऱ्यावर स्वर लावणारा शरद- त्याच हातांनी तल्लीन होऊन हस्तमैथुन करतो तेव्हा आपल्यात रुजलेल्या सांगीतिक आध्यात्मिकतेला नकोसा वाटणारा छेद जातो. भावगीते वा चित्रपटातली गाणी गाणे, ही संगीताची अवहेलना वाटते ती याच purist वृत्तीपायी!

शरदला गुरूचं असं रूप अनुभवायला येत नाही. गुरूप्रती अपार आदर, निष्ठा जपून ठेवणारा शरद आपल्या गुरूचा, माईंचा अपमान करणाऱ्या राजन जोशीच्या तोंडावर पाणी फेकतो. एका महिला गायिकेला गुजराती व्यापाऱ्याने ठेवलं होतं, ती वेश्या होती, इ. उद्गार त्याला सहन होत नाहीत. बाईच्या अंगीभूत कलेला लैंगिक दास्य पत्करायला लागल्याचा इतिहास फार दूरचा नाही. बीभत्स रूपापेक्षा काहीतरी अद्भुत, दैवी देऊ पाहणाऱ्या गुरू-विभूतीही होत्याच ना! अशी शक्यताही नाकारण्याएवढा अश्रद्ध चैतन्य नाही, ही फार मोठी जमेची बाब. खरं तर गुरू-शिष्य परंपरेतल्या रूढींचे अवडंबर माजवले नसते तर ते बंध अधिक काळ जिवंत राहिले असते. गुरूच्या छायेतून बाहेर येऊनसुद्धा गुरुचरणी नतमस्तक असणारे शिष्य आजही दिसतात. स्वत:च्या प्रतिभेच्या मर्यादा लक्षात आलेला शरद माईंच्या व्याख्यानाच्या टेप्स लायब्ररीला भेट देतो ते याच लीनतेने… याच प्रसंगी संगीतातल्या exclusiveness विषयीही भाष्य केलेलं आहे. डस्रील्ल Open source च्या जमान्यात कलेतील सौंदर्यविचार सर्वदूर पसरेल याचं शरदला समाधान वाटतं.

बहुतकरून हिरोचं पात्र हे सर्वगुणसंपन्न असतं. पण या चित्रपटातला हिरो अडखळणारा, वास्तव आणि आदर्श यांच्यातल्या दरीने भांबावून गेलेला, स्वत:च्या सुमारपणाचं भान असलेला आहे. तरीही तो संपूर्ण मालकंस गाताना गुरूला तळमळीने साथ देण्याचा प्रयत्न करणारा, माघार न घेणारा, तडजोड करताना स्वत्व न गमावणारा असा आहे. बैठकीमध्ये हमीरमधली पारंपरिक बंदिश गात असताना कुरघोडी करू पाहणाऱ्या तबलजीला बोटं मोकळी करू देतो, तेव्हा शरदच भाव खाऊन जातो. जीवाच्या आकांताने साधना करूनही ‘जीव नाहीये संगीतात तुझा…’ असं गुरूकडून ऐकून घ्यावं लागणाऱ्या शरदच्या खांद्यावर हात ठेवावा वाटतो. तुटपुंजी आमदनी असूनसुद्धा घराण्याचा २०० वर्षांचा वारसा तो digitize  करून लोकार्पण करतो. शरद आपल्यातलाच एक वाटतो तो त्याच्या सुपरमॅन नसण्यामुळे!

कथाबीजामध्ये कोणताही पूर्वग्रह न ठेवता, मोजक्या पात्रांमधून, विशेषत: ‘राजन जोशी’च्या व्यक्तिरेखेतून विचारभेद तापता ठेवण्यात चैतन्य यशस्वी झाला आहे. त्यामुळेच चित्रपटातील प्रसंग, पात्रांमधले ताण, उद्रेक, शरदची घालमेल भारतीय संगीतापुरतीच मर्यादित राहत नाहीत, तर वैश्विक अनुभव पदरात घालून अस्वस्थ करते. शरदच्या survival चा प्रश्न फक्त वैयक्तिक न राहता कोणीही त्याच्याशी तादात्म्य पावू  शकतं. अनुभवांच्या व्यामिश्रतेची आडकाठी न येता वैश्विक सत्याकडे आपला प्रवास सुरू होतो.

अप्रतिम छायालेखन, संकलन,  ध्वनिसंयोजन, उत्कृष्ट नेपथ्य-वेशभूषा, तितकीच यथोचित कलाकारांची निवड अशी खास भट्टी जमल्यामुळे ही समृद्ध कलाकृती जगन्मान्य झाली आहे. जयपूर घराण्याची तालीम घेतलेल्या अरुण द्रविडांनी साकारलेला सरत्या दिवसांमधला गुरू ‘त्याची सम तोच’ आहे. कोरिस्मोस्कीच्या dead pan  शैलीच्या जवळ जाणारा अभिनय करण्याचं फार मोठं शिवधनुष्य आदित्य मोडकने समर्थपणे पेललं आहे.

***

हे लिहून हातावेगळं करत असतानाच संगीतातल्या एका दर्दी मित्राचा त्रासिक होऊन फोन आला.

‘हेतू काय आहे या चित्रपटाचा? दिग्दर्शकाला काय मांडायचंय हेच कळत नाही. किती विस्कळीत आहे. त्यापेक्षा ‘शंकराभरणम्’ कसा ठसठशीत होता.’

‘तीच तर ताकद आहे या चित्रपटाची

Subtlety is its virtue. Its abstraction is so poetic.l ‘शंकरभरणम् काय पोएटिक नव्हता?’

‘अरे, पण पाडगावकरांची कविता वेगळी, आरती प्रभूंची वेगळी; ग्रेसपण कवीच! प्रवृत्तींमधल्या भिन्नत्वाची उकल होत नसेल तर खरंच सगळं गंडलंय. कृपा करून ‘बंदिश बँडिट’ नामक थोर कलाकृतीबरोबर या चित्रपटाची तुलना करू नकोस, ही कळकळीची विनंती!’

sandhyago@gmail.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 12:01 am

Web Title: short dialogue between guru and disciple akp 94
Next Stories
1 बहरू कळियांसि…?
2 उद्यमशीलतेत कमी नाहीच…
3 प्रागतिक चळवळींच्या देशा…
Just Now!
X