रेडिओवरच्या जाहिराती ऐकणे हा प्रवासातला एक  विरंगुळाच म्हणायला हवा. गाण्यांपेक्षा निवेदकाची अर्थशून्य, तर्कविसंगत बडबड ही आता नित्याचीच झाली आहे. आपली सारी संस्कृतीच सध्या आपल्याला ‘व्हॉटस् अप्’ प्रश्न विचारती झाली आहे. या पाश्र्वभूमीवर विमा कंपनीची नवी जाहिरात ऐकली आणि आत काहीतरी हलल्याचा भास झाला.  ‘‘बचपन में माँ कहा करती थी, बेटा सँभलके। अब काम के लिए निकलते हो तो पत्नी कहती है, अपना खयाल रखना। दरवाजे तक पहुँचे तो बेटा कह देता है, पपा मत जाओ ना।’’ पदोपदी अनपेक्षित धक्क्यांनी भरलेल्या आणि भारलेल्या या रोजच्या आयुष्यात कोणीतरी तुमच्यासाठी काळजी करते आहे, या आश्वासक स्वरांनीच डोळे भरून येतात. जाहिरात संपते.. विमा करण्याचा निरोप देऊन; पण माझे विचारचक्र मात्र चालू होते.
आजच्या शॉर्टफॉम्र्सच्या जमान्यात ‘टी. सी.’ म्हणजे ‘तिकीट कलेक्टर’ नसून  Take care आहे, हे कळायला मला चिरंजीवांची शिकवणी घ्यावी लागली. त्याच्या तोंडात ‘Amazing, Awesome’ ही ‘अ’ची बाराखडी सतत सुरू असते. ही नवी पिढी कशाला काय म्हणेल याचा भरोसा नाही. ‘पकवणे’ हे माझ्या पिढीत स्वयंपाकगृहाशी निगडित होते. आता ‘कॉलनीतले अमुक अमुक अंकल फार पकवतात..’ हे ऐकल्यावर मी ‘त्या अंकलने केटिरगची एजन्सी घेतलीय का?’ असा साधा प्रश्न विचारल्यावर बाबा ‘झम्प्या’ ठरतो. ‘मंजन’ हा शब्द दात घासणे या क्रियेशी आमच्या पिढीने जोडला होता. पण तो आमच्या के. ई. एम.च्या संस्कृतीत एखाद्या रुग्णावरून घोळ झाला की वापरायचा, हे समस्त ‘रेसिडेंट’ जमातीला ज्ञात आहे. हे असे शब्दार्थ कधी तर्खडकर, वेब्स्टर किंवा इतर सन्माननीय शब्दनामावलीत तुम्हाला सापडणार नाहीत. पण ज्या वर्तुळात ते फिरतात, तेथे योग्य तो अर्थ पोहोचविण्याचे आपले काम ते चोख बजावतात, हे खरे.  
तरुणाईने आमच्यावर लादलेल्या अशा गोष्टींपकी एक म्हणजे एफ. एम. रेडिओ मिर्ची. मिरची ही आजवर खायची (खरं तर लागल्यावर बोंबलायची!) बाब;  पण आता ती ऐकायची गोष्ट होऊन तिखट न लागता मधुर संगीत ऐकवते, हे पचनी पडले आहे. ‘अ‍ॅपल’, ‘ऑरेंज’ या गोष्टी आपण जिभेपेक्षा कर्णेंद्रियांनी वापरायला शिकलो आहोत.
या साऱ्या बदलणाऱ्या इन्स्टंट जमान्यात ‘‘बेटा, सँभलके जाना..’’ हे मात्र बदलले नाही.  शब्द बदलले, भाषा बदलली; पण भाव मात्र तोच राहिला. खरे तर आज आयुष्य इतके धकाधकीचे आणि अनिश्चिततेचे झाले आहे, की त्या शब्दांना अधिकच अर्थ प्राप्त झाला आहे. सकाळी घरातून बाहेर पडलेला बाबा लोकलला लटकल्यावर, बसमागे धावल्यावर, बस स्टॉपवर उभा राहिल्यावर संध्याकाळी वन-पीसमध्ये घरी परतेल याची शाश्वती उरलेली नाही. आम्ही मणामणाने मरायला अन् कणाकणाने जगायला शिकलो आणि मग ‘टेक केअर’ला विशेष अर्थ प्राप्त झाला.
शेवटी काळजी ही प्रत्येकाने आपली आपणच घ्यायची गोष्ट उरली. आई-वडील, समाज, भाऊबंद, सरकार किती म्हणून पुरे पडणार? जगायचे तुम्हाला आहे नं, मग सांभाळायचे कामही तुमचे तुम्हीच करायला हवे. काय काय सांभाळायचे? तुमचे शरीर.. कपडे.. चप्पल.. जोडे.. ऑफिसची बॅग.. जेवणाचा लंच बॉक्स.. फाइल्स.. लॅपटॉप.. मोबाइल्स.. आयपॅड.. आयपॉड.. टॅब्लेटस्.. यादी संपतच नाही. पण याहून महत्त्वाचे सांभाळायचे ते तुमचे शब्द.. त्यांचा आवेश.. प्रकटीकरण.. स्वर.. तुमचा अवतार अन् तुमचा चढणारा आवाज. सांभाळायचे स्वत:ला त्या सहा कुप्रसिद्ध षड्रिपूंपासून. सांभाळायचे स्वत:ला दुर्गुणांपासून अन् दुर्गतीपासून.  
इन्स्टंट प्रेम, इन्स्टंट प्रमोशन अन् इन्स्टंट पे-राइझ हे परवलीचे शब्द झाल्यावरही आयुष्यात काही गोष्टी इन्स्टंट नसतात.. त्या हळूहळू फुलतात.. त्यांना सांभाळायचे असते.. हे कळण्यासाठी वयाची पन्नाशी गाठावीच लागते.
माझा नव्या तरुणाईवर विलक्षण लोभ आहे. त्यांचे प्रकट करण्याचे मार्ग भिन्न आहेत, पण भावार्थ तोच आहे. ‘‘बाबा, ऑफिसला जाऊ नकोस नं..’’ म्हणून बाबाच्या पायाला घातलेली घट्ट मिठीही अजून तशीच आहे. ती अदृश्य आहे, इतकेच काय ते. तेव्हा जमाना बदलेल, कालचे रांगणारे उद्या काठी टेकायला लागतील, नवी आयुधे येतील, शब्दार्थ व्यक्त करण्याच्या पद्धती बदलतील; पण शब्द मात्र तेच राहतील.. Take care.
.. हा लेख लिहून झाल्यावर का कोण जाणे, चिरंजीवांना ऐकवावा असे वाटले. तो चटकन् म्हणाला, ‘स्कॅन करून PDF मेल कर.’ मी पडत्या फळाची आज्ञा पाळली. थोडय़ा वेळाने उत्तर आले. मी फीस्र्’Reply file उघडली. एकच शब्द लिहिलेला होता.. ‘सही!’