News Flash

एका योगिनीची गान तपश्चर्या!

‘सूर-संगत’ हे पुस्तक प्रकाशित झालं, त्याच दिवसांत मी अमेरिकेहून परत आले होते. मी व संजय दीक्षित (धोंडूताईंचे शिष्य) आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की, खूप

| June 22, 2014 01:13 am

‘सूर-संगत’ हे पुस्तक प्रकाशित झालं, त्याच दिवसांत मी अमेरिकेहून परत आले होते. मी व संजय दीक्षित (धोंडूताईंचे शिष्य) आम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की, खूप मोठय़ा प्रमाणात हा पुस्तक प्रकाशन समारंभ मुंबईलाच करायचा. त्याप्रमाणे आम्ही सर्व शिष्यांना कळवणार होतो. त्याप्रमाणे तयारीलाही लागलो. जवळ जवळ नियोजन पण होत आलं होतं, पण काही अपरिहार्य कारणांमुळे हा समारंभ थोडा पुढे करायचं ठरवलं. पण कल्पनाही नव्हती की, असं काही अघटित घडेल.
एनसीपीएमध्ये एकदा त्यांच्या दुपारच्या कार्यक्रमाला आम्ही दोघं गेलो होतो. त्याला पु. ल. देशपांडे पण आले होते. आक्कांचं गाणं झाल्यावर पु.ल. जे बोलले ते ऐकून त्याच क्षणी मी ठरवलं की, आक्कांना त्यांचं आत्मचरित्र लिहायला सांगायचं. आणि मग मी त्यांच्या मागेच लागले की, ‘‘आक्का कधी लिहिणार तुम्ही?’’  तेव्हा त्या म्हणायच्या, ‘बघू, लिहू!’ स्वत:ची तारीफ करणं, बडेजाव करणं, प्रसिद्धीच्या झोतात मुद्दाम जाणं, त्यांना आवडायचं नाही. त्या फक्त त्यांच्या गाण्यातच रमायच्या व सदैव आनंदी असायच्या. हे त्यांच्या सहवासात राहून मला समजलं. तेव्हा मीच ठरवलं की आता त्या आत्मचरित्र लिहिणार नाहीत तर आपणच त्यांचं चरित्र म्हणजेच त्यांच्या सांगीतिक प्रवासांबद्दल लिहावं आणि जयपूर- अत्रौली घराण्याची व त्यांच्या चारही दिग्गज गुरूंची माहिती लोकांसमोर सादर करावी. संगीत महर्षी उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेबांचा प्रत्यक्ष सांगीतिक सहवास आक्कांना लाभला होता. म्हणून या घराण्याचा इतिहास जगासमोर यावा म्हणून हे पुस्तक लिहिण्याचं प्रयोजन! हे सर्व ठरवूनसुद्धा काही ना काही कारणांमुळे लिहिण्याला विलंब झाला.    
िहदुस्थानी घरंदाज गायकीमध्ये आक्कांचं स्वत:चं एक अद्वितीय स्थान आहे आणि त्याचं खरंखुरं दर्शन अभिजात संगीताच्या श्रोत्यांना घडलं आहेच. आक्कांचं जीवन हे प्रतिभेचा स्पर्श झालेल्या एका भाग्यवंत कलाकाराचं आहे. भाग्यवंत एवढय़ाचसाठी की, चारही दिग्गज गुरूंची विद्या त्यांना मिळाली. म्हणून त्यांचं गाणं चौफेर तर झालंच पण त्यामध्ये त्यांची स्वत:ची शैली झाली. आणि त्याचा श्रोत्यांनी अनुभव घेतलेला आहे.
मोठे खाँसाहेब म्हणायचे, ‘‘अभिजात गायकाच्या अंगी तीन ठिकाणं असावी लागतात आणि तिन्ही एकाच वेळी म्हणजे गळ्यात, हृदयात आणि डोक्यात! हे तारतम्य जपलं तरच तो उच्च दर्जाचा गायक होऊ शकतो. म्हणजे काही गायक फक्त डोक्यानं गातात. म्हणजे तंत्रशुद्ध, शास्त्रोक्त आणि बंदिस्त! अशा गायकाचं गाणं सीमित असतं, कारण त्यात भाव (हृदयापासून) व्यक्त करणारे सूर कमी लागतात. त्यामुळे ते गळ्यांतूनही निघत नाहीत. काही गायक फक्त हृदयांतून गातात- भावविवश होऊन! आणि काही गायक फक्त गळ्यानं गातात. गळा जाईल त्याप्रमाणे!’’ गाण्यांतील फिरत- चमत्कृतीपूर्ण- गमक या तीनही गोष्टी सूरश्री केसरबाईंजवळ होत्या. तरीही त्या परत मोठय़ा खाँसाहेबांकडे शिकायला गेल्या. मोठय़ा खाँसाहेबांकडे या तीनही गोष्टी होत्याच, पण त्या व्यतिरिक्त ते रागाचा अभ्यास करून मनन, चिंतन करून गायचे. अभ्यास म्हटलं की नावीन्य आलंच! आणि या अभ्यासाचं मार्गदर्शन सूरश्रींनी घेतलं. ‘‘त्या त्या रागाचा अभ्यास करताना त्या रागाची खोली लक्षात यायला लागते. त्या त्या रागाच्या स्वरांच्या श्रुतींवर प्रभुत्व, विवादी स्वर लावूनही रागाचे सौंदर्य वाढवता येतं वगरे अनेक गोष्टींवर अभ्यास करतो, तेव्हा ते गाणं नावीन्यपूर्ण होतं. बुद्धिजन्य तर आहेच! खऱ्या अर्थानं सूरश्रींचं गाणं समृद्ध झालं आणि तेच सूरश्रींनी माझ्याकडून घोटून घेतलं. माझ्या तीनही गुरूंनी याचं शिक्षण दिलंच, पण सूरश्रींनी त्यावर मोहोर लावली असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही. म्हणूनच माझं गाणं खऱ्या अर्थानं समृद्ध झालं.’’ असं बाबा उत्साद अजिजुद्दीन खाँसाहेब म्हणायचे. एकदा एका मफिलीनंतर एक जाणकार धोंडूताईंना म्हणाला, ‘‘बाईजी तुमचं गाणं ‘त्रिविध’ जागृती बाळगून ऐकावं लागतं. तुम्ही या तीनही गोष्टींनी गाता म्हणूनच बौद्धिक शीण येऊनही गाण्याची समरसता अनुभवता येते.’’ यापेक्षा दुसरी दाद ती काय असेल?  
जयपूर- अत्रौली घराण्याचं गाणं हे ‘बुद्धिजनक’ गाणं आहे, हे श्रोत्यांना समजतं. यातच लक्षात येतं की, या घराण्याच्या गायकीला सर्वागसुंदर गायकी का म्हटलं आहे!     
(पान १ वरून) एकदा मी धोंडूताईंना विचारलं, ‘‘आक्का, भारतीय शास्त्रीय संगीताचं वैशिष्टय़ काय?’’ आक्का म्हणाल्या, ‘‘राग एक, बंदिश एक, आणि तोच राग जर दहा कलाकार गातील तर प्रत्येकाची राग सादर करण्याची अदा वेगवेगळी असते. ज्याची जशी प्रतिभा असेल तसे तो गायील. प्रत्येक घराण्याची आपापली वैशिष्टय़ं आहेत आणि त्याप्रमाणे त्या त्या घराण्याचे कलाकार ते पेश करतात. आमच्या घराण्याच्या वैशिष्टय़ांमधलं एक वैशिष्टय़ म्हणजे ताना! एकदा मोठय़ा खाँसाहेबांनी नट-कामोद या रागाची एक तान गायली. तार सप्तकाच्या मध्यमपर्यंत पोहचल्यावर आता फक्त दोन मात्रा राहिल्या होत्या. इतक्या कमी वेळात आता खाँसाहेब कसे समेवर येतात, इकडे सर्वच जाणकार मंडळींचे कान होते. सर्वानी श्वास रोखले होते. ते दोन क्षण निरव शांतता होती आणि त्याच लयीत खाँसाहेब शानदारपणे समेवर आले. सुन्न झालेला श्रोता अवाक् झाला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.’’ मुख्य सांगायचं म्हणजे हीच तान आक्कांनी पुण्याच्या ‘भारत गायन समाज’मध्ये गाऊन सर्वाची वाहवा घेतली. उत्साद भूर्जी खाँसाहेबांनी हयाची तरकीब शिकवली (सांगितली) होती व ‘त्यांच्या’कडून अशा तानेची मेहनत पण करून घेतली होती. जोड रागांच्या तानेत ज्या (हिशोबांनी) लयीत तान चाललेली असेल, तीच लय, तोच वेग, तोच झपाटा कायम ठेवून आक्का समेला येत. जोड-रागांची ही जयपूर-अत्रौली घराण्याची खासियत आणि आक्कांचं त्यावर प्रभुत्व होतं! त्यात आवेश, तडफ आणि ओज प्रत्ययास येतात म्हणूनच आक्कांच्या गायनांत (गाण्यात) गानसौदर्याचं उत्कृष्ट वक्तृत्व प्रत्ययास येत असे.
‘सूर-संगत’ हे पुस्तक लिहिताना मी धोंडूताईंना विचारलं, ‘‘आक्का जोड-रागांविषयी थोडं सांगा ना.’’ त्या म्हणाल्या, ‘‘सगळ्या घराण्यांमध्ये जोड राग गायले जातात. काही गायक एक राग आरोहीमध्ये सा ते सा व दुसरा राग अवरोहीमध्ये सा ते सा गातात. काही गायक आरोहीमध्ये सा ते प एक राग व प ते सा दुसरा राग गातात. पण जयपूर-अत्रौली घराण्यांमध्ये दोन किंवा कितीही रागांचं मिश्रण असलं तरी ते सगळे राग मिळून एकच राग वाटला पाहिजे इतकं बेमालूम मिश्रण करून गातात. उदा. त्रिवेणी म्हणजे तीन रागांचे मिश्रण. मंजिऱ्या म्हणजे पाच रागांचं मिश्रण. षट् – खट् म्हणजे सहा रागांचं (सुहा – सुगराई) मिश्रण. ‘सागर’ या रागांमध्ये कमीत कमी दहा राग असले पाहिजेत. सागर हा फारसा कोणाकडून ऐकीवात नाही. फार वर्षांपूर्वी रामपूरचे मुस्ताक हुसेन यांनी अखिल भारतीय विक्रमादित्य संगीत संमेलनामध्ये गायला होता.’’ आक्का रंगात येऊन पुढे म्हणाल्या, ‘‘आमच्या घराण्यांमध्ये नटांचे प्रकारही खूप गायले जातात. आणि ‘नट’ म्हणजे जोड रागांचेच प्रकार! आता या प्रकारामध्ये ‘नट’ रागाची एक बंदिश बांधली गेलेली आहे आणि त्या रागांतील निरनिराळ्या सुरावटींचे तुकडे इतर रागांना जोडले गेलेले आहेत. उदा. भरव-नट, छाया-नट, भूप-नट, केदार-नट इत्यादी. कामोद-नटांतील ‘नेवर-बाजू रे’ ही बंदिश ‘टप्पा’ अंगाचा ख्याल म्हणून प्रसिद्धच आहे.’’ आक्का पुढे जोड रागांविषयीच बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘उत्तरा, अगं, काफी- कानडा हा राग बरेच जण गातात. दोन्ही रागांत कोमल गंधार आहे, पण दरबारीचा गंधार किती ‘श्रुतींचा’ आहे हे गाऊन दाखवणं अत्यंत अवघड आहे. दोन्ही गंधारांचे आपापलं अस्तित्व स्पष्ट  गाऊन दाखवता आला तरच तो काफी- कानडा! नसता मंद्र सप्तकात कानडा दाखवला की झालं असं नाही.’’
 श्रुतींचा विषय निघाला म्हणून त्या ओघानं म्हणाल्या, ‘‘माझी एक मफल कोलकात्याला आयटीसीने आयोजित केली होती. मी ‘फुलश्री’ राग गायला घेतला होता. त्यामधील कोमल रिषभाची श्रुती हार्मोनियममध्ये नाही म्हणून मी त्या साथीदार बाईंना हा फुलश्रीमधील कोमल रिषभ वाजवू नका म्हणून सांगितलं. आणि हा रिषभ जेव्हा मी श्रोत्यांना ऐकवला तेव्हा ते म्हणाले, ‘किती दिवसांनी हा श्री चा कोमल रिषभ ऐकायला मिळाला.’ ’’ हीच श्रुती संगीताची खासीयत आहे. जयपूर-अत्रौली घराण्याचा पाया म्हणजे प्रत्येक रागांतील श्रुतीचे सूर व दमसास. श्रुतींसंबंधी कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे, कारण ते गाऊनच दाखवायला पाहिजे आणि तसं आक्कांनी गाऊनही दाखवलं.
आक्का म्हणायच्या- ‘‘सूरश्रींकडे भरपूर कला होती, त्यामुळे न पटणारी तडजोड त्यांनी कधीच केली नाही. हे सूरश्रींनी मोठय़ा खाँसाहेबांकडून शिकलं होतं आणि तेच संस्कार माझ्यावर झाल्यामुळे मीही माझ्या आयुष्यात कधी तडजोड केली नाही. ‘मागणी तसा पुरवठा’ हे मला कधीच मान्य नव्हतं. गायन साधनेच्या दज्र्याला साजेसे जे जे कार्यक्रम आले, तिथे मी अगत्यानं गायले. आणि अशा ठिकाणी जाऊन गायला मी नेहमीच उत्सुक असायची.’’ संगीत क्षेत्रात कसल्याही प्रकारच्या तडजोडी न करण्याचं व्रत आक्कांच्या सर्वच गुरूंनी घेतलं होतं.
मोठय़ा खाँसाहेबांबद्दल बोलताना आक्का म्हणाल्या- ‘‘पारंपरिकतेचा डोळस अभ्यास, अभिमान त्या परंपरेतील, सूक्ष्म सौंदर्यस्थळांची जाणीव, दर्जेदार गायन हेच जीवन प्रयोजन समजणारे खाँसाहेब स्थितप्रज्ञच होते. जणू गाण्याचं व्रत घेतलेले! गाणं म्हणजे नुसता आवाज नव्हे, नुसती तान फिरतही नव्हे, तर आवाजाच्या बाजाप्रमाणे विद्य्ोचाही एक बाज असतो व आवाजाच्या स्वाभाविक माधुर्याप्रमाणेच मेहनतीनं आणि गायकीच्या उंचीनं पदा होणाऱ्या आवाजात एक प्रकारचं विशेष माधुर्य असतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं.’’ याचं मर्म सूरश्रींनी धोंडूताईंना सांगितलं आणि हेच धोंडूताईंनी शेवटपर्यंत सांभाळलं. म्हणूनच घराणेदार बंदिशीचा घाट जरासुद्धा न बदलण्याबाबत धोंडूताई कमालीच्या आग्रही होत्या.
‘गानयोगिनी’ ही एवढीच पदवी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कमीच असं सगळे म्हणतात. जयपूर घराण्याच्या गायकीच्या सर्वही लकबी वैशिष्टय़ं आत्मसात करून त्या त्यांनी गाऊनही दाखवल्या होत्या. म्हणून वाटतं ‘स्वरसम्राज्ञी’ ही पदवी त्यांच्यासाठीच आहे. आयुष्यभर त्यांनी गानतपश्चर्याच केली. सांसारिक कोणत्याही बंधनात त्या अडकल्या नव्हत्या. म्हणून वाटतं त्यांना ‘स्वरराधिका’ म्हणावं. हा उल्लेख काशी-बनारसच्या पंडितांनी आक्कांना मिळालेल्या मानपत्रात आहे.
भारतीय संगीताचे नादब्रह्म जोपर्यंत आहे तोपर्यंत जयपूर- अत्रौली घराण्याचं नाव टिकून राहीलच. संगीत महर्षी उस्ताद अल्लादियाँ खाँसाहेबांपासून ते गानयोगिनी धोंडूताईंपर्यंत या गायकीतील अद्वितीयता लोकांनी ऐकलेलीच आहे, अनुभवलेलीही आहे. पुढेही हा प्रवाह असाच चालू राहावा ही त्यांची इच्छा होती. सामान्यत: ६० वर्षांनंतर गवय्यांच्या आवाजाला कंप येतो, पण धोंडूताईंच्या आवाजाला शेवटपर्यंत कंप नव्हता. त्यांच्या आवाजाला वार्धक्याचा स्पर्शही नव्हता. धोंडूताई आजारी पडल्या तेव्हा म्हणाल्या होत्या, ‘‘उत्तरा, जेव्हा माझे सूर संपतील तेव्हा मी या जगात राहणार नाही.’’ तसंच झालं. शेवटपर्यंत हातांनी ताल धरत होत्या, अगदी आयसीयूमध्येही! सूर संपले आणि त्याही अनंतात विलीन झाल्या. घरंदाज घराण्याच्या गायकीचं गायनाचं एक पर्व संपलं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2014 1:13 am

Web Title: singer dhondutai kulkarni
टॅग : Loksatta
Next Stories
1 पाटणा संग्रहालय समृद्ध सांस्कृतिक संचित
2 मन झिम्माड झालं..
3 ..पणती जपून ठेवा
Just Now!
X