|| मकरंद देशपांडे

तांत्रिक अडचणींमुळे ‘दानव’ फिल्म शेवटी ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल- २००३’चा भाग होऊ  शकली नाही. दंतकथेची ही दंतशोकांतिका झाली. असो. सदर ‘नाटकवाला’ असल्याने आता २००१ साल.. नाटक लिहिलं गेलं- ‘सर सर सरला’!

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
economy of engineering sector marathi news
अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र

सगळ्यांना समजेल असं आणि ज्यात काव्यही असेल असं नाटक लिहायचा मानस करून लिहिलेलं नाटक. पहिलं वाचन मला ‘सरला’साठी माझ्या मनानं ठरवलेल्या सोनाली कुलकर्णीला द्यायचं ठरलं. काही वेळा एखाद्या नट किंवा नटीबरोबर लेखक-दिग्दर्शक म्हणून काम केल्यावर असं वाटतं की यापुढच्या आपल्या सगळ्या नाटकांत तीच व्यक्ती हवी. तसं काहीसं सोनालीच्या बाबतीत झालं. मी तिला सांगितलं की, ‘‘एक कोरं करकरीत नाटक लिहिलं आहे. आणि तूच सरला आहेस!’’ वाचनाची वेळ संध्याकाळची ठरली.

त्याआधी सवयीप्रमाणे मी ‘पृथ्वी’ला गेलो. चहा पीत उगाचच बदामाच्या झाडाखाली उभा राहून ओल्या पानांना पाहत होतो, तेव्हा ओळखीची हाक ऐकू आली. राजींदर गुप्ताजींचा आवाज. एका कसलेल्या अनुभवी नटाचा आणि व्हॉइस कल्चर केलेला, स्पष्ट उच्चार असलेला आवाज. ‘‘मकरंद, तुम्हारा पिछला नाटक देखना रह गया. आगे शो कब है?’’ मी म्हणालो, ‘‘सर, नया नाटक लिखा है, तो हो सकता है की अब उसी का शो करूंगा. आप अभी फ्री हो?’’ गुप्ताजी म्हणाले, ‘‘हां, बताओ, क्या है नया नाटक?’’ मी म्हणालो, ‘‘सर, आप मेरे साथ चलीए ना! मैं सोनाली कुलकर्णी को पढकर सुना रहा हूं, आप भी सून लीजिए.’’ त्यांनी पुढे काहीच विचारलं नाही. ते माझ्याबरोबर आले. सोनालीला सुखद धक्का बसला. आणि सोनालीच्या अगत्याच्या पाहुणचारात ‘सर सर सरला’ नाटकाचं पहिलं वाचन झालं. सोनाली पटकन् ‘ग्रेट’ वगैरे म्हणत नाही, पण तिला नाटक आवडलं. गुप्ताजी म्हणाले, ‘‘नाटक अच्छा तो लिखा है! अब कैसे करोगे?’’ मी म्हणालो, ‘‘आपके साथ! आपके सहयोग से मंचन अच्छाही होगा. आप ‘सर’ की भूमिका कीजिएगा.’’ ते ऐकून त्यांचे डोळे घराच्या छताला जाऊन भिडले. की मला आज आठवताना असं वाटतंय? पण ते म्हणाले की, करते हैं!

त्या पहिल्या वाचनातच मला तीन पात्रांपैकी दोन पात्रं मिळाली. ‘सर’ या भूमिकेसाठी अनुभवी गुप्ताजी आणि ‘सरला’च्या भूमिकेसाठी सुंदर नटी सोनालीनं होकार दिला. आता उरलं होतं तिसरं, पण महत्त्वाचं पात्र- ‘फणिधर’! नाटकामधील सरांचा आणखी एक विद्यार्थी आणि सरलाचा जवळचा मित्र.

‘जंगल’ फिल्म करताना राजपाल यादवची ओळख झाली होती. तो पृथ्वी कॅफेत भेटायला आला. पण मला तो खूप कुठेतरी अडकलेला वाटला. वेळेनं आणि मनानंही. ‘जंगल’ फिल्मनंतर त्याला चित्रपटांत कामं मिळायला सुरुवात झाली होती. मला असंही वाटलं, की हा अतिशय इंटेन्स आहे, प्रभावी आहे; पण ‘फणिधर’ नसावा.

फणिधर या पात्रानं आपल्यासाठी शोधून आणलेला नट म्हणजे अनुराग कश्यप! त्यानं माझ्याबरोबर दोन नाटकांत अभिनय केला होता. त्यानंतर तो लेखक झाला. त्यानं फिल्म ‘सत्या’ लिहिली. ‘शूल’मध्ये ई. निवासला दिग्दर्शनात मदतही केली. मग ‘पाँच’ नावाची फिल्म त्यानं बनवली. पण सेन्सॉर बोर्डमध्ये ती काही कारणास्तव अडकली. त्यामुळे तो चिडचिडा झाला होता. मी त्याला म्हटलं, ‘‘तुला आपला राग बाहेर काढायचा असेल तर फणिधर कर.’’ अनुराग सहसा मला कधीच नाही म्हणत नसे. त्यामुळे तशाही मनोवस्थेत तो तालमीला यायला तयार झाला.

एखादं नाटक राजस असतं.. म्हणजे तालमीसाठी गुप्ताजींनी आपला बंगलाच (आराम नगरमधील कॉटेज) दिला. तिथं आम्हाला त्यांच्या बायकोच्या- वीणाच्या हातचा चहा-नाश्ता जवळ जवळ रोजच मिळायचा. सुरुवातीला मी नाटकाचं वाचन खूप दिवस केलं. मग ब्लॉकिंग (पात्रांच्या हालचाली, एन्ट्री-एक्झिट, नेपथ्यमांडणी) सुरू केलं. इतर वेळी मी शक्यतो दहा दिवसांत ब्लॉकिंग सुरू करायचो; पण या नाटकाचं वाचन इतके दिवस केलं, याचाच अर्थ हे नाटक बंदिस्त लिहिलं गेलंय. पं. सत्यदेव दुबेजी म्हणायचे, ‘मकरंद, इस नाटक का कथ्य बंधा हुआ है. उठाए गये सवाल सीधे तीर की तरह भोंकते हैं, छेदते हैं आपको!’

नाटकाचं कथानक खरं तर लिहू नये. कारण नाटकात कथानकापेक्षाही त्याचा आशय ज्या पद्धतीनं संवादात मांडला जातो आणि मग नट व तांत्रिक अंगांची मदत घेऊन दिग्दर्शक त्याचा प्रेक्षकांवर जो परिणाम साधतो, त्यात अगदी काळं आणि पांढरं इतकं अंतर असतं. खासकरून या नाटकात सुरुवातीच्या पहिल्या ओळीपासून..

(रात्रीचा प्रसंग: सर झोपलेले असतात. फणिधर अंधारात हाका मारतो- ‘सरऽऽ’ सर उत्तर देतात..)

सर : फणी, मुर्गे ने बांग नहीं दी, घडी का अलार्म नहीं बजा, क्या आनेवाली सुबह को किसी भी चेतावनी की जारूरत नहीं? नींद अभी भी घनी नींद सो रही है, लगता है रात ने.. शृंगार में भीगी रात ने आनेवाली सुबह को ही धर रख्खा है! कहीं तो कुछ काला है फणिधर! ओ कविमन फणिधर, कोई कविता सुनाओ.. लहराओं.. लहराओं मेरी नागात्मक कविताओं.. वटशाखाओं पर द्रुततर सर सर चढ जाओ!

फणिधर : सरला का पता क्या है सर?

सर झोपेतून खाडकन् जागे होतात आणि ‘काव्या’च्या काळजात ‘गद्य’ आपल्या वास्तवाची वाघनखं खुपसतं. पुढचे दोन तास सर, सरला आणि फणिधर यांच्या स्मृती आणि वास्तवातलं- प्रसंगी हळवं करणारं, प्रसंगी हतबलतेतली भीषणता दाखवणारं, प्रसंगी करुणरसात हसवणारं नाटय़ प्रेक्षक अनुभवतात.

पहिल्या प्रसंगात फणिधर सरांना चाकूनं मारून टाकतो. कारण- सरला. दुसऱ्या प्रवेशात कळतं, की ते स्वप्न होतं. फणिधर हा सकाळी सरांच्या घरात झाडूनं साफसफाई करत असतो आणि सर पडलेल्या दु:स्वप्नातून जागे होतात. त्यांना प्रश्न पडतो की असं स्वप्न आपण का पाहिलं?

पुढच्या प्रवेशातल्या घटना आपल्याला त्या स्वप्नातल्या मृत्यूपर्यंत घेऊन जातात. तिथंही एक ट्विस्ट आहे. फणिधर हा सरांवर नाही, तर सरलावर रागावलेला असतो आणि त्याला सरलाला मारायचं असतं.

अशा वातावरणात सरला पाच वर्षांनी सरांना भेटायला येते. इथे मध्यांतर होतो.

दुसऱ्या अंकात सर सरलाला फणिधरच्या रागापासून दूर ठेवायचा प्रयत्न करतात; पण सगळंच फसत जातं. कारण सरला फणिधरवरच सर त्याला न समजल्याचा आरोप करते. पण पुढे फणिधरच्या बाजूनंही बोलते. सर एक आणि सरला व फणिधर दुसरा असे दोन पक्ष तयार होतात.  नाटय़ शिगेला पोहोचतं आणि त्या तिघांतलं जगणं हतबल झालेलं दिसतं. या हतबलतेमुळे प्रेक्षक कुणालाच जबाबदार धरू शकत नाहीत. प्रेक्षक हसतात. रडतात. आपल्या मनातल्या काही वैयक्तिक प्रश्नांची उत्तरं घेऊन जातात.

सोनाली कुलकर्णीनं पहिल्या अंकातील आठवणीतील, कॉलेजमधील सरला तरुणीच्या जोशानं आणि बुद्धीच्या तल्लखतेनं साकार केली. मुळात सोनालीला कवितांची आणि संगीताची आवड व अंग असल्यानं पहिल्या अंकातलं काव्य तिनं खूपच लाघवी करून टाकलं. दुसऱ्या अंकातली विवाहित सरला- फणिधर व सर यांच्यातल्या वादानं निसरडी झालेली ओळख, पण हक्कानं पुन्हा त्यावर समजुतीनं अधिकार मिळवायचा तिचा प्रयत्न दाखवताना सोनालीनं ती किती संवेदनशील नटी आहे हे दाखवून दिलं.

राजींदर गुप्ताजींनी साकारलेला ‘सर’ हा शब्द-विचारांचा धनी वाटला. प्रसंगी रागावरचा त्यांचा ताबाही सुटतो; पण सरांचा राग कधीच व्यक्तिगत वाटला नाही. तो सर आणि विद्यार्थी यांच्यातल्या नात्यासंबंधी होता हे सतत जाणवत ठेवण्याचं सामथ्र्य एक अनुभवी नट म्हणून गुप्ताजींनी दाखवलं.

अनुरागचा फणिधर पाहणं हा तसा विलक्षण अनुभव होता. नाटय़जगतात सर्वश्रेष्ठ स्थानी असलेल्या, विश्वातल्या मोजक्या लेखकांपैकी एक असलेल्या आपल्या विजय तेंडुलकरांनी जेव्हा हे नाटक पाहिलं (सोनालीमुळे ते आले.) तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मला माहीत नाही, ही तुझ्या लेखनाची ताकद आहे की अनुरागच्या अभिनयाची; पण गेल्या १७ वर्षांत मी असं पात्र पाहिलं नाही.’’ मी तेव्हा सगळं क्रेडिट अनुरागला दिलं. कारण मला असं वाटलं होतं, की त्याच्या जीवनातला राग नक्कीच त्याच्या अभिनयाला धारदार बनवून गेला.

राम गोपाल वर्मा (सत्या, शूल), विधू विनोद चोप्रा (मिशन कश्मीर) या चित्रपटांवर अनुरागने या दिग्गज्जांबरोबर काम केलं होतं आणि भांडणही केलं होतं. असो. दोघांनी वेगवेगळे प्रयोग पाहिले. पण दोघंही एकच वाक्य म्हणाले, ‘‘मकरंद, वो सर मैं हूं, जिसे अनुराग (फणिधर) मारना चाह रहा था.’’ आम्ही सगळे हसलो. पण खरंच नाटकात अनुरागचं रागानं धुमसत चालणं आणि संवादफेक वादळी शांतता निर्माण करायची किंवा हास्याचं कारंजं!

नाटकाची एक सर्वात जमेची बाजू म्हणजे संगीत. शैलेन्द्र-स्वप्नील हे दोघं तरुण दोन की-बोर्ड घेऊन तालमीला बसायचे. त्यांच्यातला कोण मेलडी बनवतो, कोण प्रोग्रॅमिंग करतो आम्हाला कळायचं नाही. त्यांच्यातलं ‘म्युझिकल अंडरस्टॅंडिंग’ हे माझं आवडतं दृश्य असायचं. त्यांच्यामुळे तालमीतच नाटकाचा प्रयोग करतोय असं वाटायचं. त्यांच्या चाली चांगल्याच होत्या; पण त्यांना असलेलं साऊंडचं ज्ञान (म्युझिकल इन्स्ट्रमेंट्स) फारच आजचं होतं. त्यांनी संगीत जरी तयार करून ठेवलं असलं तरी दर प्रयोगाला ते दोघं येऊन ‘लाइव्ह’ वाजवायचे. शैलेन्द्र बर्वे आणि स्वप्नील नाचणे हे ‘सर सर सरला’च्या निमित्ताने मला मिळालेले दोन हिरे आहेत. दोघांच्या क्षमता वेगळ्या! शैलेन्द्रमध्ये ऐकायची, समजायची आणि त्या विचाराला पुढे न्यायची गुणवत्ता आहे. आणि स्वप्नील हा तसा अस्वस्थ, पण काहीतरी वेगळं करण्याचं लक्ष्य ठेवणारा.

दिग्गज फिल्म कॅमेरामन, दिग्दर्शक आणि नाटय़प्रेमी गोविंद निहलानी नाटक पाहून मला म्हणाले, ‘‘मकरंद, नाटक का ड्रामा इस उंचाई पर पहुँचने के बाद मैं सोच रहा था, अब इसे मकरंद समेटेगा कैसे? how will he conclude with similar poetry and you came with a masterstroke. सरला सरांना जाता जाता म्हणते, ‘‘सर, मला तुमच्याबरोबर एक मिनिट शांत बसायचंय.’’ आणि ते एक मिनिट रंगमंचावर कोणीही बोललं नाही. फक्त नाटकाचं थीम म्युझिक, त्यावर बदलणारा प्रकाश, पात्रं जागच्या जागी. जणू काही रंगमंचावरचं नाटक प्रेक्षकांच्या  मनात जाऊन बसलं आणि अंधारात  त्यांच्या घरी गेलं.

जय राग! जय अनुराग!

जय सोनाली! जय गुप्ताजी!

mvd248@gmail.com