आजकाल स्मार्टफोनने आपलं सबंध आयुष्य व्यापलं आहे. एकेकाळी केवळ दूरसंपर्कासाठी जन्माला आलेल्या या यंत्राने आज माणसाच्या आरोग्याची काळजी वाहण्यापासून ते त्याच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक आदी असंख्य गरजांची पूर्तता करण्यापर्यंत मजल मारली आहे. किंबहुना, माणसाच्या विचारप्रक्रियेवर, त्याच्या मत-मतांतरावरही त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसतो आहे. अलीकडच्या काळात जगभरात घडलेल्या अनेक महत्त्वाच्या राजकीय- सामाजिक घटनांतून याचं रोखठोक प्रत्यंतर येतं.
१० सप्टेंबर रोजी जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये आणि अनेक भाषांमधील वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी अग्रक्रमाने झळकली. सर्व जगाला अप्रूप असणारी ही बातमी ना राजकीय होती, ना जागतिक अर्थव्यवस्थेशी निगडित होती. एका कंपनीने बाजारात आणलेल्या नवीन उत्पादनासंबंधीची ती बातमी होती. अॅपल कंपनीचा सीईओ टिम कुकने आयफोन- ६, आयफोन- ६+ व अॅपल वॉचच्या केलेल्या सादरीकरणाच्या घोषणेविषयीची ती बातमी होती. एका कंपनीच्या उत्पादनाबद्दल एवढे कुतूहल जगभर असणे ही अतिशय विलक्षण बाब आहे. मोबाइल उपकरणांनी आपल्या आयुष्यात निर्माण केलेल्या महत्त्वाच्या स्थानाचे हे द्योतक म्हणावे लागेल.
भारतासारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत गूगलतर्फे अँड्रॉइड-वन फोन नुकताच दाखल झाला आहे. भारतीय कंपन्यांच्या भागीदारीतून हे फोन ग्राहकांना उपलब्ध होत आहेत.
ज्या मोबाइल फोनमध्ये संगणकाची शक्ती, प्रोग्राम्स- म्हणजेच विविध अॅप्स चालविण्याची क्षमता, इंटरनेट, ब्लू-टूथ अशा विविध प्रकारे संपर्क करण्याची क्षमता असते, अशा फोन्सना स्मार्टफोन संबोधले जाते. संगणकाप्रमाणे ऑपरेटिंग सिस्टीम हा स्मार्टफोनचा आत्मा असतो. अॅपल कंपनीचे आयओएस, गूगलने विकसित केलेले अँड्रॉइड, ब्लॅकबेरी व मायक्रोसॉफ्ट विंडोज या स्मार्टफोनच्या प्रमुख ऑपरेटिंग सिस्टीम्स आहेत. आजच्या घडीला साधारणपणे ८५ टक्के स्मार्टफोन अँड्रॉइडचा वापर करतात. १२ टक्के फोन आयओएस वापरतात, तर तीन टक्के स्मार्टफोन विंडोज वापरतात.
स्मार्टफोन कोणताही असो- त्याच्या सामर्थ्यांचा विनियोग विविध अॅप्सद्वारे होतो. अॅप म्हणजे स्मार्टफोनवर असलेले संगणकीय प्रोग्राम. विविध कामांसाठी अनेक प्रकारचे अॅप्स उपलब्ध आहेत. हजारोंच्या संख्येने अस्तित्वात आलेल्या अॅप्सपैकी काही अॅप्स मोफत उपलब्ध आहेत, तर काही अॅप्स खरेदी करावे लागतात.
आजच्या जगात स्मार्टफोनने मिळविलेल्या स्थानाचे महत्त्व जाणून घ्यायचे झाल्यास माहिती तंत्रज्ञानाशी निगडित स्थित्यंतरे जाणून घेणे आवश्यक आहे. सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. लालकिल्ल्यावरून भाषण करताना आपल्या पंतप्रधानांनी याची विशेष दखल घेतली. ‘डिजिटल इंडिया’चा नारा नरेंद्र मोदी यांनी दिला. आपल्या जगात बाराशे एक्झाबाइट माहिती अस्तित्वात आहे असे समजले जाते. ही माहिती सीडीमध्ये साठवल्यास चंद्रापर्यंत पाच ढीग रचता येतील, इतक्या सीडींची आवश्यकता भासेल. आपल्या जगात ९५ टक्के माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. डिजिटल युगात माहिती तंत्रज्ञानाच्या वापराचे चार प्रमुख उपयोग वा ट्रेंड दिसून येत आहेत. यात- सोशल (र), मोबाइल (ट), अॅनालिटिक्स (अ) व क्लाऊड (उ)- रटअउ उदयास आले आहेत.
सोशल म्हणजे सोशल मीडिया. फेसबुक, ट्विटरसारखे याचे अवतार सर्वाना परिचित आहेतच. मित्रपरिवार व आप्तेष्टांशी संपर्कात राहणे, त्यांच्याशी निरनिराळय़ा माहितीची देवाणघेवाण करणे, हा याचा मूळ उद्देश. परंतु यापलीकडे सोशल मीडिया पोहोचला आहे. एक स्वतंत्र असे सबलीकरणाचे व्यासपीठ म्हणून अनेकजण त्याकडे पाहत आहेत. आपले विचार जगासमोर मुक्तपणे मांडण्याचा सोशल मीडिया हा एक उत्तम मार्ग बनला आहे.
मोबाइल म्हणजे आपल्यासोबत कायम फिरू शकणारे तंत्रज्ञान. स्मार्टफोन, टॅब्लेट, फॅब्लेट इत्यादी म्हणजे मोबाइलचे आविष्कार. अॅप व विविध सॉफ्टवेअरच्या मदतीने जगाच्या पाठीवर कोठेही कॅल्क्युलेटरपासून होकायंत्रापर्यंत व हार्टबीट मॉनिटरपासून कँडी क्रशपर्यंत अनंत सुविधा देणारा असा हा सेवक.
अॅनालिटिक्स म्हणजे अनेक प्रकारची आणि अचंबित करणाऱ्या अजस्र प्रमाणात असलेल्या माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता. डिजिटल युगामुळे माहितीची उपलब्धता आणि त्या  माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता हे अॅनालिटिक्सच्या यशाचे कारण ठरते आहे.
क्लाऊड म्हणजे इंटरनेटद्वारा हवी तेव्हा, हव्या असलेल्या कालावधीसाठी सेवा उपलब्ध करून घेण्याची सोय. संगणक व त्याच्याशी निगडित तंत्रज्ञान विकत न घेता संगणक पुरवत असलेली सेवा विकत घेण्याचा पर्याय म्हणजे क्लाऊड. या पर्यायाचा अवलंब  केल्याने वेळ व पैसा दोन्हीही वाचतात.
या रटअउ च्या चौकडीशी स्मार्टफोनचा खूप जवळचा संबंध आहे. सोशल मीडियाच्या वापरामध्ये आणि त्याच्या यशामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. आपण आहोत त्या ठिकाणावरून माहिती क्षणार्धात सर्वांपर्यंत पोहोचवणे, हे स्मार्टफोनमुळे आज सहज शक्य झाले आहे. स्मार्टफोन स्वत: मोबाइल असल्यामुळे मोबिलिटी हा तर त्याचा आत्माच! अॅनालिटिक्ससाठी स्मार्टफोनद्वारा क्षणार्धात माहिती उपलब्ध करून दिली जाते. छोटय़ाशा स्मार्टफोनला सर्वच गोष्टी शक्य नसल्यामुळे क्लाऊडचा वापर गरजेचा ठरतो.
स्मार्टफोन अनेक रूढ समजांना बदलतो आहे. ओसामा बिन लादेनवरील अमेरिकेने केलेल्या कारवाईची बातमी प्रसारमाध्यमांकडे पोहोचण्याआधी ट्विटरवर त्याचे संकेत उपलब्ध होते. शोएब अथार या व्यक्तीने मध्यरात्री फिरणाऱ्या हेलिकॉप्टर व स्फोटाविषयी अजाणतेपणी ट्विट केले होते. म्हणजेच ब्रेकिंग न्यूजही आता सामान्य नागरिकांमार्फत जगाला प्रथम समजू लागल्या आहेत.
मोबाइल फोन ही आता माणसाची ‘गरज’ बनली आहे. अरब जगतातील जनतेच्या उठावांच्या काळात इजिप्तमधील होस्नी मुबारक राजवटीने इंटरनेट व मोबाइल सेवांवर र्निबध लादले होते. आपल्या राजवटीला होत असलेला विरोध दळणवळण बंद करून रोखता येईल असा त्यामागे त्यांचा होरा होता. परंतु याचा परिणाम मात्र उलटाच झाला. इंटरनेट आणि मोबाइल बंद केल्याने नागरिक व विशेषकरून तरुणवर्ग अधिकच पेटून उठला. ज्या व्यक्ती कदाचित या आंदोलनापासून दूर राहिल्या असत्या, त्यादेखील तहरीर चौकातील आंदोलनात सहभागी झाल्या.
संपर्क यंत्रणा कार्यरत नसल्यास काय होते, याचे दुर्दैवी प्रत्यंतरही काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या जलप्रलयामध्ये दिसून आले. या अस्मानी आपत्तीच्या वेळी तिथली टेलिफोन व मोबाइल सेवा खंडित झाल्याने काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दांत- ‘छत्तीस तास सरकारचे अस्तित्वच नव्हते.’ मोबाइल सेवा खंडित झाली नसती तर सरकारचे अस्तित्व काही प्रमाणात तरी शाबूत राहू शकले असते.
थोडक्यात काय, तर मोबाइल आणि स्मार्टफोन व त्याद्वारे उपलब्ध होणाऱ्या सेवा हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. जगात सुमारे साडेचार कोटी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. त्यात आणखीन दिवसागणिक नवनवीन अॅप्स उपलब्ध होत आहेत. सध्या प्रत्येक कामासाठी अॅप्स उपलब्ध आहेत. मोठय़ा समूहाशी, परंतु अधूनमधून संवाद साधण्यासाठी फेसबुक उपलब्ध आहे. लहान समूहाशी सतत संपर्क ठेवायला व्हॉट्सअॅप आहे. मर्यादित कालावधीसाठी फोटो शेअर करण्यासाठी स्नॅप-चॅट उपलब्ध आहे. टॅक्सी बोलवायची झाल्यास ऊबर (वुी१) चे अ‍ॅप व नावीन्यपूर्ण असे व्यावसायिक मॉडेल उपलब्ध आहे. ओएलएक्स व क्विकरसारख्या ‘छोटय़ा जाहिराती’ची सेवा उपलब्ध आहे. योग्य व कमी गर्दीच्या रस्त्याने गाडी चालवत जायचे असेल तर मार्गदर्शनासाठी वेझचे (हं९ी) अ‍ॅप आहे. हृदयाचे ठोके मोजणारी आणि दिवसभरात आपण किती कॅलरीज् खर्ची घातल्या, हे सांगणारे व आपल्या प्रकृतीवर कायम लक्ष ठेवणारे अ‍ॅप्स आले आहेत.
जगभरात उपलब्ध असलेली माहिती कोणत्या ना कोणत्या प्रकारे इंटरनेटने उपलब्ध करून दिली गेली आहे. टाइप करून, अपलोड करून, बारकोड स्कॅन करून किंवा अशा विविध प्रकारे मानवामार्फत ही माहिती इंटरनेटवर पोहोचली आहे. परंतु आता स्थिती बदलते आहे. माणसाकडे असलेला मर्यादित वेळ व क्षमता यामुळे सर्वच माहिती काही इंटरनेटपर्यंत पोहोचत नाही. या पाश्र्वभूमीवर उपकरणे, मशीन अशा निर्जीव वस्तूंकडून माहिती इंटरनेटवर पाठविली जात आहे. यालाच ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ असे म्हणतात. आजकाल मोठय़ा शहरांमध्ये पार्किंग शोधणे हे अतिशय अवघड काम बनले आहे. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ची कल्पना वापरल्यास कठीण काम सोपे करता येऊ शकते. प्रत्येक पार्किंग स्लॉट इंटरनेटवर स्वत:च्या उपलब्धतेची माहिती देऊ शकतो. या माहितीच्या आधारे तुमचा स्मार्टफोन जवळ व उपलब्ध लॉट शोधू शकतो. या कल्पकतेमुळे एक जटिल समस्या काही अंशी सोपी होते. स्मार्टफोन अ‍ॅपमुळे तुम्ही पार्किंग न शोधता, तुम्हालाच पार्किंग शोधून घेते.
अशाच प्रकारचा कल्पक वापर वैद्यकीय सुविधा, शिक्षण आणि बँकिंग क्षेत्रामध्ये शक्य आहे. ज्या समाजाला आणि ज्या वर्गाला एखाद्या गोष्टीची उपलब्धता, ती मिळवण्यासाठी कापावे लागणारे अंतर अशा अडथळ्यांमुळे अनेक सुविधांना मुकावे लागले आहे, त्यांना आज स्मार्टफोनच्या नावीन्यपूर्ण वापरामुळे निश्चितच फायदा होऊ शकतो.
स्मार्टफोनच्या या जगात ज्याप्रमाणे फायदा आहे, त्याचप्रमाणे जोखीमदेखील आहे. सुटलेल्या बाणाप्रमाणे उपलब्ध करून दिलेली माहिती, मांडलेले विचार हे परत माघारी फिरवता येत नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केलेला विचार ‘चिरंजीव’ ठरतो. तुम्ही तो पुसला, तरी त्याची प्रत कुठे ना कुठे साठलेली असतेच.
स्मार्टफोनवर पाळत ठेवल्यास एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवण्यासम माहिती उपलब्ध होते. २००९ साली एका अरब राष्ट्रातील सर्व ब्लॅकबेरी ग्राहकांना मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या मार्फत एक फाइल अपडेट देण्यात आली. दिसायला साध्या भासणाऱ्या या अपडेटमध्ये ग्राहकाच्या ब्लॅकबेरीवरील माहिती चोरण्याची क्षमता होती. हे प्रकरण बरेच गाजले आणि अनेकांच्या डोळय़ांत या घटनेने चांगलेच अंजन घातले.
स्मार्टफोनमुळे अनाहूत माहिती दिली जाते. यासंदर्भात जॉन मॅकॅफीचे उदाहरण तर फारच रंजक आहे. एकेकाळी एका अग्रगण्य कंपनीचा मालक असलेला जॉन फरार होता. त्याच्यावर खुनाचा संशय होता आणि तो पोलिसांपासून लपून राहत होता. यादरम्यान एके दिवशी जॉनने आपल्या गुप्तस्थळी एका पत्रकाराला मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान काढण्यात आलेले फोटो मुलाखतीसमवेत इंटरनेटवर प्रसिद्ध करण्यात आले. हे फोटो आयफोन फोर-एस वापरून काढले गेले होते. त्या फोटोमध्ये जीपीएस कोऑर्डिनेट्स- म्हणजेच ज्या ठिकाणी हा फोटो काढला आहे तिथले अक्षांश व रेखांश यासारखी माहिती दडलेली असते. एका चाणाक्ष वाचकाच्या ध्यानात ही गोष्ट येताच जॉनचे गुप्त ठिकाण ज्ञात झाले.
स्मार्टफोन आणि माहितीच्या या डिजिटल युगात सर्वसामान्यांच्या हाती आज अमाप शक्ती व क्षमता आलेली आहे. तंत्रज्ञानाचा त्यात मोठा वाटा आहे. हे सर्व जरी खरे असले, तरीही तंत्रज्ञान म्हणजे सर्वस्व नव्हे. मानवी समाजाला विचार, खऱ्या-खोटय़ाची ओळख, नीतिमूल्ये यांसाठी योग्य दिशा आणि नेतृत्वाची गरज आहे. तथापि या गोष्टी अद्याप तरी तंत्रज्ञानाच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. यासंबंधात अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांचे विचार अतिशय बोलके आहेत. ते म्हणतात, ‘आजच्या सजग नागरिकाला मैदानात माणसे जमवणे अवगत झाले आहे. परंतु माणसे जमल्यावर त्यांचे काय करायचे, हे त्यास माहीत नाही. याहून अधिक म्हणजे जमलेल्या माणसांमुळे विजय प्राप्त झाल्यावर पुढे काय करायचे, याविषयी तो पूर्णपणे अनभिज्ञ आहे.’
आजच्या या डिजिटल विश्वात स्मार्टफोन आणि अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मानव समाजाचा फायदा निश्चित झालेला आहे; परंतु सर्व मानवजातीला याचा सम प्रमाणात फायदा होईल असे मात्र नाही. तंत्रज्ञान ही सर्व समस्यांवरील गुरुकिल्ली नसली तरी उत्तरापर्यंत नेण्याचे सामथ्र्य त्यात निश्चितच आहे.