09 March 2021

News Flash

प्रेरणा लढवय्यांच्या! : ठाण्यातील ‘जाग’ता पहारा!

मुंबईलगत असल्याने ठाण्यातील जागेला सोन्याचा भाव आला आणि तिथली मैदाने, तलाव, डोंगर, खाडीकिनाऱ्याला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला.

| November 17, 2013 01:01 am

मुंबईलगत असल्याने ठाण्यातील जागेला सोन्याचा भाव आला आणि तिथली मैदाने, तलाव, डोंगर, खाडीकिनाऱ्याला  अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला. पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले गेले.  ठाण्याच्या या बकालीकरणास विरोध करणाऱ्या आणि सामान्यांचा आवाज बनून प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध लढा देणाऱ्या नितीन देशपांडे यांच्याविषयी..
माहितीचा अधिकार जनसामान्यांच्या हाती आल्यावर भारतात जणू एक क्रांतीच होऊ घातली आहे. या अधिकाराचा प्रभावीपणे वापर करून अनेक गैरव्यवहार उघडकीस येत आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. या लढय़ात उतरण्यामागच्या त्यांच्या नेमक्या प्रेरणा काय आहेत, लढय़ातले त्यांचे बरेवाईट अनुभव, त्यातील यशापयश आणि मिळालेले धडे यावर टाकलेला एक प्रकाशझोत..
‘शहरीकरणाची चाहूल लागलेले एक मोठे गाव’ अशी ओळख असणाऱ्या ठाण्याचे महानगर होईपर्यंतच्या स्थित्यंतराचे साक्षीदार असणारे नितीन देशपांडे त्या रम्य कालखंडाविषयी भरभरून बोलतात. कारण केवळ राज्यातीलच नव्हे तर देशातील एक मोठे आणि महत्त्वाचे महानगर बनण्याच्या नादात या शहराचे मूळ व्यक्तिमत्त्व कसे हळूहळू हरवत गेले, याचे ते एक प्रमुख साक्षीदार आहेत.
शहरातील ज्या चरई विभागात त्यांचे बालपण गेले, तिथे ४०-५० वर्षांपूर्वी वाडे आणि चाळी होत्या. सकाळी नऊवारी नेसलेल्या महिला दारासमोर उभे राहून सूर्याला नमस्कार करायच्या. विभागातील बहुतेक लोक एकमेकांना ओळखत होते. वेडंवाकडं वागायची सोयच नव्हती. कुण्या वडिलधाऱ्याने डोळे वटारले की व्रात्य मुलेही गप्प बसायची. शहरात भरपूर हिरवाई होती. पूर्वेकडे कळवा खाडी, पश्चिमेकडे मामा-भाचे डोंगर, उत्तरेकडे घोडबंदर रोडवरची गावे. भाजीपाला गावातूनच, तर खाडीतून मासे मिळायचे. तेव्हा ठाण्यात गॅझेटिअरमधील नोंदीनुसार एकंदर ६५ तलाव होते. त्या तळ्यांमधील पाणी पिण्याइतके शुद्ध होते. त्याशिवाय कितीही दुष्काळ पडला तरी पाण्याची हमी देणारी जोशी वाडय़ाजवळील सात रहाटी विहीर होती. मो. ह. विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, सेंट जॉन आदी मोजक्याच शाळा होत्या. नी. गो. पंडितराव, स. वा. कुलकर्णी, म. द. नाडकर्णी यांसारखे शिक्षक केवळ शाळेतील विद्यार्थ्यांचेच नव्हे तर साऱ्या शहराचे गुरुजन होते. घोडागाडी ही शहरातील परिवहन सेवा तेव्हा बाहेरगावाहून येणाऱ्या पाहुण्यांसाठी कुतुहलाचा आणि कौतुकाचा विषय होती. रिक्षा मोजून तीनच. त्यांची मनीषा, वर्षां आणि सगुण ही नावेही बहुतेकांना माहिती होती. शिवाजी, गावदेवी, सेंट्रल, पोलीस दल अशी अनेक विस्तीर्ण मैदाने होती. किशोरवयीन मुले एक तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात अथवा राष्ट्र सेवा दलाच्या. तिथे त्यांचे बौद्धिक तसेच शारीरिक पोषण होत असे. शारीरिक व्यायाम आणि खेळाची आवड असल्याने शालेय वयात नितीन देशपांडे संघाच्या शाखेत जाऊ लागले.
१९८०च्या दशकात ठाणे नगरपालिकेची महानगरपालिका झाली आणि शुद्ध, सात्त्विक आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या शहरावर चहूबाजूंनी अर्निबध नागरीकरणाचे आक्रमण होऊ लागले. नगरपालिका असताना ३२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असणाऱ्या स्थानिक प्रशासनाचा जमाखर्च महापालिका झाल्यानंतर थेट साडेपाचशे कोटी रुपयांपर्यंत गेला. टुमदार वाडे आणि चाळींच्या अपार्टमेंट होऊ लागल्या. (आता त्याही पाडून त्याचे टॉवर होऊ लागले आहेत.) त्या नादात जुन्या बारमाही पाणी देणाऱ्या विहिरींच्या देखभालीकडे एकतर दुर्लक्ष करण्यात आले अथवा त्या बुजवून टाकण्यात आल्या. तलावांचे शहर अशी या शहराची ख्याती. शहरातील ६५ तलावांपैकी आता केवळ २९ तलाव शिल्लक आहेत. उर्वरित तलाव एकतर बुजवून टाकण्यात आले वा शहराचे सांडपाणी पिऊन त्यांची गटारे झाली. आहेत त्यांचे पाणीही पूर्वीसारखे नितळ राहिलेले नाही. अनधिकृत झोपडपट्टय़ांच्या विळख्याने त्यांचे सौंदर्य लोप पावले आहे. मुंबईलगत असल्याने ठाण्यातील जागेला सोन्याचा भाव आला. त्यामुळे मिळेल ती जागा ताब्यात घेऊन त्यावर अनधिकृत घरे बांधली जाऊ लागली. शहराची वेस मानल्या गेलेल्या मुंब्रा-कळवा दरम्यानचा पारसिक तसेच येऊरच्या डोंगररांगांवरही वस्त्या झाल्या. अनेक मैदाने एक तर गायब झाली अथवा त्यांचा आकार कमी करण्यात आला. खाडीकिनारी भराव टाकून अथवा खारफुटी तोडून नव्या वसाहती उभ्या राहू लागल्या. संवेदनशील मनाच्या नितीन देशपांडेंना हे सर्व पाहून गप्प बसून राहणे शक्यच नव्हते. त्यांनी आपल्या परीने कायदेशीर मार्गाने विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या भकासीकरणास विरोध करण्यास सुरुवात केली.
नितीन देशपांडे हे बांदोडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी. ते विज्ञान शाखेचे द्विपदवीधर आहेत. माझगाव डॉकमधील नोकरीत गुणवत्ता नियंत्रण विभागात त्यांचे काम अभियांत्रिकी स्वरूपाचे आहे. तसेच अत्यंत तर्कशुद्ध विचार आणि सखोल अभ्यास ही त्यांची खासियत आहे. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना सामाजिक कार्याचे बाळकडू मिळाले. त्या काळातील मुंबई परिसरातील बहुतेक मराठी तरुण नुकत्याच जन्मलेल्या शिवसेनेच्या प्रभावाखाली होते. नितीन देशपांडेही त्यापैकी एक. मुंबई विद्यापीठात कोकण विभागातून ते भारतीय विद्यार्थी सेनेचे एकमेव विद्यार्थी प्रतिनिधी होते. दिलीप हाटे त्यावेळी भाविसेनेचे प्रमुख होते आणि नितीन देशपांडे हे आनंद दिघे यांच्यासोबत ठाण्यात कार्यरत होते. उल्हासनगर येथे असणारे ठाणे जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज मुंबईला हलवू नये म्हणून त्यांनी आंदोलन केले. पुढे भाविसेनेला रामराम ठोकून दिलीप हाटेंसोबत ते ‘ऑल इंडिया स्टुडंट ऑर्गनायझेशन’मध्ये गेले. या संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी भारतात विविध ठिकाणी प्रवास करून देशभरातील विद्यार्थिजीवन अनुभवले. विशेषत: उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश तर त्यांनी अक्षरश: पालथा घातला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे अनेक सहकारी राजकीय पक्षात गेले. नितीन देशपांडे यांनी सुरुवातीला तसे करण्यास नकार दिला. नंतर मात्र मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी युवक काँग्रेसचे ठाणे शहर उपाध्यक्षपद स्वीकारले. १९८५ मध्ये त्यांनी चरईतून अपक्ष म्हणून महापालिकेची निवडणूकही लढवली, पण त्यात त्यांना पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर त्यांनी राजकारणाचा नाद सोडून दिला. त्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या सोडविण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले.
ठाणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयास त्यांनी विरोध केला. यासंदर्भात १९९२ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. कर्जत ते ठाणे परिसरात एकही मोठे रुग्णालय नाही. त्यामुळे आपत्तीकाळात येथील रुग्णांना मुंबईत हलविण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. ठाण्यात वैद्यकीय महाविद्यालय असेल तर अनेक रुग्णांना सेवा मिळू शकेल, अशी महापालिका प्रशासनाची भूमिका होती. नितीन देशपांडेंचा त्याला विरोध नव्हता. मात्र, वैद्यकीय महाविद्यालय उभारणे हे महापालिकेचे काम नाही. शासनाने हे काम करावे, इतकीच त्यांची भूमिका होती. खूप दबाव येऊनही नितीन देशपांडेंनी याबाबतीत माघार घेतली नाही. एवढेच नव्हे, तर न्यायालयाचा निर्णय त्यांच्या विरोधात जाऊनही ते निराश झाले नाहीत. कारण पोलीस आणि न्यायालय ही लोकशाही व्यवस्थेत न्याय मिळण्याची मंदिरे आहेत, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्याआधारे सातत्याने अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पुढे वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पाबाबत महापालिकेच्या लेखा परीक्षणात घेण्यात आलेले आक्षेप नितीन देशपांडेंच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करून गेले. हळूहळू समविचारी मंडळींचीही त्यांना साथ मिळू लागली. मनोहर पणशीकर, प्रमोद भागवत, वसंत केळकर, कॅ. बाबा चव्हाण अशी दक्ष नागरिकांची फळी ठाण्यात तयार होऊ लागली. १९९६ मध्ये तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी थेट मासुंदा तलावात झुणका भाकर केंद्र उभारले, तेव्हा आपल्या या एकेकाळच्या सहकाऱ्याविरुद्ध तक्रार करण्यास ते कचरले नाहीत. त्यांनी न्यायालयात दाद मागितली. अखेर आनंद दिघे यांनी ते केंद्र बंद केले.
मासुंदा तलावास पडलेला फेरीवाल्यांचा वेढा हटविण्यासाठीही त्यांनी आवाज उठविला. यासंदर्भात सातत्याने अर्ज-निवेदने देऊनही महापालिका प्रशासन त्याची फारशी दाद घेत नाही, हे पाहून त्यांनी अखेर न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. शहरातील नामांकित १२ वकील याप्रकरणी त्यांच्या बाजूने उभे राहिले. मासुंदा तलावाभोवतीच्या खाद्य विक्रेत्यांमुळे शहर सौंदर्यास बाधा येते. नागरिकांना ये-जा करताना अडथळे येतात. १९९५ मध्ये ‘जिज्ञासा’च्या वतीने विद्यार्थ्यांनी केलेल्या एका सर्वेक्षणातून फेरीवाल्यांच्या खाद्यपदार्थामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झाले होते. न्यायालयात या सर्वेक्षणाचा अहवाल पुरावा म्हणून उपयुक्त ठरला आणि या प्रकरणाचा निकाल नितीन देशपांडे यांच्या बाजूने लागला. या आंदोलनाच्या यशाने त्यांना आत्मविश्वास मिळाला. सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्याने महापालिका प्रशासन, पोलीस तसेच दस्तूरखुद्द न्यायालयाच्या न्यायमूर्तीविरुद्ध याचिका दाखल करण्याची हिंमत त्यांनी दाखवली. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात शहरातील महत्त्वाच्या दूरध्वनी क्रमांकांमध्ये काही बार आणि रेस्टॉरंटचे नंबर होते. त्यांनी त्यास आक्षेप घेतला. पोलीस दलातील वरिष्ठांनी ही गफलत मान्य केल्यानंतर ते दूरध्वनी क्रमांक फलकावरून पुसून टाकण्यात आले. शहरातील अनधिकृत बार बंद करण्यात यावेत यासाठी १९९६ पासून त्यांनी पाठपुरावा केला.
सायकलस्वारी       
सायकल हे नितीन देशपांडे यांचे आवडते वाहन. अजूनही ते सायकल चालवितात. कारण सायकल चालविणे अनेक दृष्टींनी उपयुक्त आहे. त्यामुळे व्यायामासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. एकाच वेळी आपले काम आणि आरोग्याचे रक्षण होते. महागडय़ा इंधनासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. शिवाय शहरातील पर्यावरणाचेही रक्षण होते. सायकल चालविणे सर्वात सुरक्षित असूनही आताच्या पिढीला त्याची लाज का वाटते, असा त्यांचा सवाल आहे. सध्या मंदीच्या काळात रुपया डॉलरच्या तुलनेत अधिकाधिक दीनवाणा होत असताना सायकल चालविणे देशहितकारक ठरेल, हे ते ठामपणे सांगतात. मध्यंतरी लागोपाठ त्यांच्या तीन सायकली चोरीस गेल्या. पोलीस स्थानकात मात्र सायकल चोरीची तक्रार घेतली जात नसे. फारच आग्रह केला तर पोलीस वेगळ्या रजिस्टरमध्ये त्याची नोंद करून तक्रारकर्त्यांचे समाधान करीत. नितीन देशपांडे यांनी त्यास तीव्र आक्षेप घेतला. कोणताही चोर सुरुवातीला छोटी चोरी करतो. त्यामुळे वस्तूची किंमत कमी असली तरी चोरीच्या गुन्ह्य़ाचे गांभीर्य कमी होत नाही, अशी त्यांची याबाबतीत भूमिका होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका प्रशासनाने रस्त्याच्या कडेला खास सायकलसाठी मार्ग राखून ठेवण्याची योजना जाहीर केली. मात्र, पुढे ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. डिझेल आणि पेट्रोलचे भाव अक्षरश: काही दिवसांच्या अंतराने वाढत जाण्याच्या आताच्या काळात तरी लोकांना जाग येऊन ते शक्य तो जास्तीत जास्त चालण्याचा आणि आवश्यक तेव्हा सायकल चालविण्याचा मार्ग पत्करतील, अशी आशा ते बाळगून आहेत.
सनदशीर मार्गाने लढाई
नवीन कळवा पुलाचे कंत्राट अव्यवहार्य असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या सोडिअम व्हेम्पर दिव्यांच्या खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराप्रकरणी त्यांनी यशस्वीपणे लढत दिली. याप्रकरणी चौकशी करणाऱ्या नंदलाल समितीने संबंधित नगरसेवकांवर ठपका ठेवून पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ठाणे शहरात वाढणाऱ्या नवनव्या वस्त्यांमध्ये आपला प्रभाव पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी थाटलेली कार्यालयेही अनधिकृत आहेत. नितीन देशपांडे यांनी त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. न्यायालयाने पालिकेला ती सर्व अनधिकृत कार्यालये तोडण्याचे आदेश दिले. मात्र, अद्याप त्या आदेशाचे पालन झालेले नाही.
रेल्वेने देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने कोपरी पुलावरील पाइपलाइन पडून अपघात झाला. काही प्रवासी मृत्युमुखी पडले. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडे रीतसर नुकसान भरपाई मागणारे नितीन देशपांडे हे एकमेव प्रवासी होते. मासुंदाप्रमाणेच सिद्धेश्वर,  मखमली, आंबेघोसाळे आदी तलावांचे जतन आणि सौंदर्यीकरण करण्याबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत ते सर्वाशी थेट पत्रव्यवहार करतात. सिद्धेश्वर आणि अंबा तलाव बुजवून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याच्या ठाणे महापालिका प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यामुळे ते तलाव वाचले. ठाण्यातील कोलबाड तलावाच्या संवर्धनाबाबत त्यांनी राष्ट्रपतींना पाठविलेले पत्र कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बोलावून घेतले. त्यावेळी त्यांची ठाणे जिल्हा पर्यावरण वाहिनीच्या कार्यकारिणीत सदस्य म्हणून दोन वर्षांसाठी नियुक्ती झाली. या नेमणुकीमुळे त्यांना पर्यावरणाच्या विविध पैलूंचा अभ्यास करता आला. ठाणे किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेली सहाशे एकर खार जमीन खासगी विकासकांना खुली करून देण्यात आली. त्याविरुद्ध लढताना त्यांना या अभ्यासाचा उपयोग झाला. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळेच येऊर परिसर पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील जाहीर होऊन पर्यटन विकास योजनांच्या आक्रमणापासून वाचला.
कधी व्यक्तिगत तर कधी संघटनेच्या माध्यमातून त्यांची आंदोलने सुरू असतात. ‘दक्ष नागरिक मंच’, ‘ठाणेकरांचा आवाज’ या संघटनांनंतर ‘हरियाली’च्या पूनम सिंगवी यांच्या सूचनेवरून त्यांनी ‘जाग’ अर्थात ‘जॉइंट अॅक्शन अँड अवेअरनेस ग्रुप’ या संस्थेची स्थापना केली. डॉ. नागेश टेकाळे आणि प्रा. विजय दप्तरदार यांच्यासोबत ‘थिंक फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी नाशिक, वाडा, विक्रमगड आदी परिसरातील आदिवासी भागात काम केले. अर्थात़, प्रत्येक वेळी आंदोलनात सर्व स्वयंसेवी संघटनांनी साथ दिली नाही. कारण प्रत्येकाची काम करण्याची पद्धत निराळी होती. उद्देश वेगळे होते. ‘फंडिंग’मुळे भल्या भल्या स्वयंसेवी संस्था फितविल्या जातात. त्यांच्या आंदोलनातील हवा काढून घेतली जाते. विरोधाची धार बोथट केली जाते, हेही नितीन देशपांडे यांनी अनुभवले. मात्र, यासंदर्भात ते कोणा एकाला दोष देत नाहीत. कारण राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेची घडी विस्कटण्यास मध्यमवर्गाची उदासीनता प्रामुख्याने कारणीभूत ठरली, असे त्यांचे निरीक्षण आहे. पूर्वी समाजाचा कणा असलेला हा मध्यमवर्ग दिवसेंदिवस अधिकाधिक कमालीचा संकुचित आणि आत्ममग्न झाल्याबद्दल त्यांना खंत वाटते. आता हा वर्ग केवळ प्रॉपर्टी गोळा करून श्रीमंत होण्याच्या मागे लागला आहे. एक सदनिका पुरत नाही, मग दुसरी घेतली जाते. त्यासाठी भरमसाट कर्ज काढायचे आणि ते फेडण्यासाठी रात्रंदिवस काम करायचे या चाकोरीत हा वर्ग गुरफटून गेला आहे. राष्ट्रीय कर्तव्याची कोणतीही कृती न करता केवळ बाता मारण्यात हा वर्ग मश्गुल आहे. मात्र, दुसऱ्याकडे एक बोट दाखविताना चार बोटे आपल्याकडे वळलेली असतात. तसेच पैसा विश्वासाने मिळत असला तरी पैशाने विश्वास मिळत नाही, या वास्तवाचा त्यांना विसर पडला आहे. पूर्वी सण, उत्सव आनंद आणि उत्साहाची प्रतीके होती. आता सार्वजनिक उत्सव आयोजित करणाऱ्या बहुतेक संस्था आणि मित्रमंडळे राजकीय पक्षांनी आपल्या पंखाखाली घेतली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन लोकवर्गणी काढण्याची प्रथा बंद झाली आहे. स्थानिक राजकीय महंत अथवा रॉबीनहूड सर्व उत्सवच प्रायोजित करतात. त्यातून प्रबोधन कधीच मागे पडून केवळ पैसा आणि शक्तीचे ओंगळवाणे दर्शन घडत आहे. त्यातून सादर होणाऱ्या मनोरंजनपर कार्यक्रमांचा क्लोरोफॉर्म इतका जबरदस्त आहे की, त्यासाठी आपल्याला किती वेठीस धरले जातेय, त्याचीही सर्वसामान्य नागरिकांना जाणीव होईनाशी झाली आहे.  
सर्वत्र असे निराशाजनक चित्र असले तरी नितीन देशपांडेंचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. नवे नवे प्रश्न घेऊन प्रशासन आणि न्यायालयात दाद मागण्यासाठी ते सदैव दक्ष असतात. ठाणे शहराच्या विकास आराखडय़ातील १९ रस्ते अद्याप होऊ शकलेले नाहीत. खाडी, तलाव आणि नद्या जमीन नोंदणी आराखडय़ानुसार असाव्यात, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याच्या तयारीत ते आहेत.
अनेकदा विरोधकांनी केलेल्या बुद्धिभेदामुळे त्यांना सर्वसामान्य नागरिकांचा रोषही पत्करावा लागला आहे. त्यांच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले. त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. मात्र, या लढाईत त्यांच्या कुटुंबानेही त्यांना तितकीच तोलामोलाची साथ दिली. त्यांच्या पत्नी रिया बँकेत नोकरी करतात. मुलगी निकिता अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असून मुलगा निहीर अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षांला आहे. ‘तुला दहावीला ९० टक्के गुण मिळाले तर मी नेत्रदान करेन,’ असे वचन त्यांनी मुलीला दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी नेत्रदान करून आपला शब्द पाळला. शिवाय, विविध ठिकाणी नेत्रदान चळवळीचा प्रसार करण्याचे कामही सुरू केले. मिळणाऱ्या मिळकतीतून आपल्या चौकोनी कुटुंबाचा चरितार्थ भागवून दर महिन्याला ठरावीक रक्कम वेगळी काढून ते समाज उपयोगी उपक्रमांसाठी देतात. रूढार्थाने ते देव मानत नाहीत, मात्र दुसऱ्याच्या श्रद्धेच्या आड कधीच येत नाहीत. घटनेनुसार प्रत्येकाला उपासना स्वातंत्र्य असल्याची त्यांना जाणीव आहे. आपल्यावर गौतम बुद्ध, कौंटिल्य आणि भगतसिंग यांच्या विचारांचा प्रभाव असल्याचे ते आवर्जून सांगतात.
गेल्या चार दशकांत काळानुरूप बदललेल्या आणि वाढलेल्या ठाणे शहरातील बिघडलेपणाची सातत्याने जाणीव करून देत संबंधित न्यायव्यवस्थेकडे ते न्याय मागत आहेत…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2013 1:01 am

Web Title: social worker nitin deshpande
Next Stories
1 सरदार पटेल काही समज व गैरसमज
2 मंडेलांचा देश
3 अर्थसाक्षरक व्हीटीजी
Just Now!
X