News Flash

प्रखर बुद्धिवादाचा महामेरू

 माझ्या तरुण वयात ज्युनियर म्हणून सोली यांच्याशी विचारविनिमय करणे हा खरोखरच अनोखा अनुभव होता.

|| न्या. धनंजय चंद्रचूड

प्रख्यात विधिज्ञ सोली सोराबजी हे तत्त्वनिष्ठ, अत्यंत प्रामाणिक आणि नि:पक्ष कायदेतज्ज्ञ होते. त्यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या खटल्यांत आपल्या प्रखर बुद्धिवादाच्या जोरावर न्यायाची बाजू घेत इतिहास घडवला. त्यांच्या जाण्याने विधी क्षेत्राचा एक सच्चा आधारस्तंभ कोसळला आहे.

 

सोली सोराबजी यांचे निधन झाल्याची बातमी मन विदीर्ण करणारी आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मला व्यक्तिश: दु:ख होते आहे. गेली सात दशके सोली सोराबजी घटनात्मक न्यायशास्त्रातील (ज्युरिसप्रुडन्स) बदलांचे साक्षीदार राहिलेले आहेत. हाच कालखंड त्यांच्या एक वकील, विचारवंत आणि ‘ओपिनियन मेकर’ म्हणून झालेल्या वाटचालीशीही संबंधित आहे. या कालावधीत भारताने स्वातंत्र्य व समानता यांच्या औपचारिक ते खऱ्याखुऱ्या कल्पनांच्या योग्य व तर्कसंगत अभिव्यक्तीकडे वाटचाल केली आहे. देशातील काही महनीय वकिलांच्या कायदेविषयक जाणकारीमुळे समकालीन समाजाला आकार देणाऱ्या बदलांशी एकरूप होणे आपल्या न्यायप्रणालीला शक्य झाले आहे. काही तात्त्विक भूमिकांच्या उत्क्रांतीमध्ये वकिलांचे जे योगदान होते, त्यात सोली सोराबजी यांच्या अंतर्मनाचा स्वर आणि त्यांची विद्वत्ता व व्यासंग यांनी त्यांना आघाडीचे स्थान मिळवून दिले. मानवाधिकारांच्या निकषांना स्वतंत्र आशय मिळवून देण्यात आणि प्रशासनिक संरचनांना घटनात्मक मूल्यांबद्दल उत्तरदायी बनवण्यात सोली सोराबजी हे मते व कल्पना यांचा प्रभावी स्रोत राहिले. कायदा आणि समाज संवेदनशील प्रश्नांशी झगडत असताना सोराबजी यांच्या लेखनाने यासंदर्भात यथार्थ आणि सखोल दृष्टिकोन मांडणारे योगदान दिले आहे.

‘सतवंत सिंग सहानी’ (१९६७)पासून ‘आर. आर. कोएलों’ (२००७)पर्यंत अनेक कठीण प्रकरणांत सोराबजी यांची कुशाग्र बुद्धी, तसेच त्यांची निर्भय अभिव्यक्ती यांचे प्रतिबिंब अनेक ‘लॉ रिपोर्ट्स’मध्ये पडलेले आहे. अशाच निर्र्भयपणे त्यांनी आणीबाणीच्या विरोधात मोहीम उघडली होती. केशवानंद भारती, मनेका गांधी, सुनील बत्रा, डी. सी. वाधवा आणि एस. आर. बोम्मई अशी नानाविध प्रकरणे हाताळत आपली कायदेविषयक कारकीर्द घडविणाऱ्या सोली यांनी कायद्याच्या शिकवणीत एकवाक्यता आणि स्थैर्य आणण्याचे सतत प्रयत्न केले.

माझ्या तरुण वयात ज्युनियर म्हणून सोली यांच्याशी विचारविनिमय करणे हा खरोखरच अनोखा अनुभव होता. त्यांचे प्रश्न संक्षिप्त आणि नेमके असत. टिपणांच्या अखेरीस विशिष्ट अशा हस्ताक्षरातील नोट्स या त्यांच्या बुद्धीला साजेलशा विश्लेषणात्मक आणि मुद्देसूद असत. औपचारिक चर्चा किंवा मतांचे आदानप्रदान ते थोडक्यात आटोपत असत. त्यामध्ये त्यांच्या उपरोधिक विनोदबुद्धीची पखरण असे. आपल्या ज्युनियरने तयारी न करता येणे सोली खपवून घेत नसत. ‘ब्रीफिंग कॉन्सेल’ असो की कुणी वजनदार अशील असो- त्याला सर्दी-खोकला असेल तर त्याला परत पाठवण्यास ते मागेपुढे पाहत नसत. गंभीर स्वरूपाची चर्चा करताना मानवी संपर्कातून विषाणूंचा प्रसार होऊ शकतो याची त्यांना कायम जाणीव असे. त्यांच्या ज्युनिअर्सचाही याबाबतीत अपवाद केला जात नसे.

डी. सी. वाधवा खटल्यात एक घटनापीठापुढे मी त्यांचा ज्युनियर होतो. जमीन वहिवाटीबाबत संशोधन करणाऱ्या गोखले इन्स्टिट्यूटमधील एका अर्थशास्त्रज्ञाला बिहारमध्ये अनेक वर्षे या मुद्द्यावर अध्यादेश प्रसृत होण्याचा आणि मुदत संपल्यानंतर पुन्हा प्रसृत होण्याचा एक ‘पॅटर्न’ असल्याचे लक्षात आले, तेव्हा त्याचे या विषयाबाबतचे कुतूहल वाढले. या संशोधनाने नंतर पुस्तकाचे रूप घेतले आणि तोच पुढे सर्वोच्च न्यायालयापुढील एका याचिकेचा आधारही ठरला. वैयक्तिकरीत्या माझ्या बाबतीत सांगायचे तर या याचिकेच्या संबंधात सकाळी ६ वाजता सोलींसोबत विचारविनिमयासाठी बसणे हे माझ्याकरता आयुष्यभरासाठी पुरणारे अध्ययन होते. यावेळी ते घटनात्मक विचारसरणीची शिकवण अगदी सहजतेने स्पष्ट करून सांगत असत. या चर्चांनी आपल्या ‘सीनियर’च्या श्रवणभक्तीचे आणि ते त्यांच्या घटनात्मक पदाचा कसा विकास करत आहेत ते ऐकत राहण्याचे रूप घेतले. त्यांच्या विचारांची स्पष्टता आणि भाषिक संरचनेसह वाक्पटुता या गोष्टी अतुलनीय होत्या.

१९९८ च्या मध्यात मला सोली यांचा दूरध्वनी आला. मला ‘ज्येष्ठ वकील’ (सीनिअर कौन्सेल) म्हणून नेमण्यात आले आहे काय, अशी विचारणा त्यांनी केली. ही चौकशी करण्याचे कारण असे होते, की सोली सोराबजी (त्यावेळी भारताचे अ‍ॅटर्नी जनरल या नात्याने) माझ्या नावाची शिफारस भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल या पदावर नियुक्तीसाठी करू इच्छित होते. ज्या कालावधीत सोली अ‍ॅटर्नी जनरल होते, त्यावेळी मी मुंबईबाहेर स्थित असलेला अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होतो. एकमेकांशी संवाद साधण्याच्या अनेक संधी त्यावेळी मला मिळाल्या. एक विधी अधिकारी (लॉ ऑफिसर) म्हणून सोली यांनी त्यांच्या कामात उच्चकोटीची वस्तुनिष्ठता, नि:पक्षपातीपणा व प्रामाणिकपणा कायम राखला. किंबहुना, वस्तुनिष्ठता आणि प्रामाणिकपणा ही सोली यांच्या न्यायाबाबतच्या बांधिलकीची विविक्षित अशी वैशिष्ट्ये राहिलेली आहेत.

प्रशंसा आणि सन्मान यांचे सोलींना नावीन्य नव्हते. १९९७ साली ते नायजेरियातील मानवाधिकारांबाबतच्या परिस्थितीसंबंधात संयुक्त राष्ट्रांचे ‘रॅपोर्टिअर (संवाददूत) होते. (त्या देशातील मानवाधिकारांबाबतच्या परिस्थितीचा तपास करून उपाय सुचवण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आली होती.) १९९८ ते २००४ या काळात मानवाधिकारांची जोपासना व संरक्षण याबाबतच्या संयुक्त राष्ट्रांच्या उप-आयोगाचे ते आधी सदस्य व नंतर अध्यक्ष होते. अल्पसंख्याकांबाबत होणारा पक्षपात व त्यांचे संरक्षण यावरील संयुक्त राष्ट्रांच्या उपआयोगाचे ते सदस्य होते. २००० ते २००६ या कालावधीत सोली हे लवादविषयक कायम न्यायालयाचे (पर्मनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन) सदस्य होते. २००२ साली मिळालेला ‘पद्माविभूषण’ पुरस्कार हा त्यांच्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कारकीर्दीचा झालेला सन्मान होता.

सोली यांच्या ज्युनिअर्सकरता या सगळ्यापेक्षा महत्त्वाचे काही असेल, तर शिकण्याच्या ध्येयाबाबत असलेली त्यांची बांधिलकी,  साहित्याबद्दल त्यांना असलेले प्रेम आणि न्यायतत्त्वाचा ठाम पाठपुरावा यांचे निरीक्षण करण्याची संधी या गोष्टी होत्या. त्यांच्या कायद्याबाबतच्या गंभीर चर्चांच्या अधेमधे कधीतरी एखाद्या निष्ठुर न्यायाधीशाचा किंवा बेसावध प्रतिस्पर्ध्याचा क्वचित् प्रसंगी केलेला उपहास डोकावून जाई. परिपूर्णतेचे अनुकरण करण्याचे कौशल्यही त्यांच्यापाशी होते. सोली यांच्या छत्रछायेखाली आपले आयुष्य आणि भवितव्यही घडवण्याचे भाग्य ज्यांना लाभले, अशा सर्वांना त्यांच्या सान्निध्यात त्यांची आत्मीयता आणि काळजी अनुभवता आली.

त्यांचे जाणे मला कायम जाणवणार आहे. गतकालीन कवी लॉर्ड टेनिसन याने ‘युलिसिस’ या कवितेत ‘हिंस्र प्रजेसाठी असमान कायदे’ अशा अर्थाचा (‘अनइक्वल लॉज अन्टु अ सॅव्हेज रेस’) उल्लेख येतो.  सोली सोराबजी यांची निष्ठा कायद्याच्या समानतेवर होती. कायदे समान असावेत, त्यांची अमलबजावणी समन्यायीपणे व्हावी आणि यातून आपण एक समाज म्हणून स्वातंत्र्याच्या आपल्या परंपरेपासून कदापिही ढळू नये यासाठी सोलींनी जीवन वेचले. सोली यांची उणीव नेहमीच जाणवत राहणारी आहे.

 (लेखक सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश आहेत.)

अनुवाद : मनोज जोशी

(वरील मजकुरास ‘डाउन मेमरी लेन’ या सोली सोराबजी गौरवग्रंथासाठी न्या. चंद्रचूड यांनी पाठविलेल्या संदेशाचा आधार असून, लेखकाच्या अनुमतीने तो अनुवादित करण्यात आला आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 12:07 am

Web Title: soli sorabjee intense rationalism impartial lawyer jurisprudence akp 94
Next Stories
1 रफ स्केचेस : चेहरे
2 अरतें ना परतें… : वेशीबाहेरच्या सात बहिणींची गोष्ट
3 मोकळे आकाश… : फ्युज्ड बल्ब
Just Now!
X