भलं होऊ दे रे देवा भलं होऊ दे
मोडलेली खेडीपाडी उभी राहू दे
कोरडय़ा भुईला मेघुराया पाणी दे
जोंधळ्या रानाला र्हिव गाणं गाऊ दे।

मोहरू दे आंबेराई
फुलाफळांच्या या राई
वाहत्या नदीचं पाणी तीर्थ होऊ दे
जोंधळ्या रानाला र्हिव गाणं गाऊ दे।

धस्कटांना जाळोनिया
नवी सृष्टी उभाराया
बळीवंतांच्या हातांना तुझे हात दे
जोंधळ्या रानाला र्हिव गाणं गाऊ दे।

नकाराला मूठमाती
हजारोंचे हात हाती
बांधू जिव्हाळ्याची नाती आशीर्वाद दे
जोंधळ्या रानाला र्हिव गाणं गाऊ दे।

समष्टीच्या विचारांचा
ध्यास नव्या समाजाचा
वेदनेच्या आसवांची फुलं होऊ  दे
जोंधळ्या रानाला र्हिव गाणं गाऊ दे।

भलं होऊ देगा देवा भलं होऊ दे
काळोखाचे दिस चांदण्यात न्हाऊ द।े
ना. धों. महानोर