सानिया यांनी त्यांच्या ‘ओमियागे’ या सुंदर आणि गंभीर कथेमध्ये एके ठिकाणी म्हटलंय- ‘‘..सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला.’’ गाणी ऐकतानाही असंच होतं, नाही का? कानात हेडफोन्स घालून रॉक ऐकावं म्हटलं तर बोटं नकळत एकदम ‘युवती मना..’कडे वळू शकतात. खूप अभ्यासपूर्वक एखादा संगीतप्रकार ऐकावा म्हटलं तर तो हातातून- खरं तर कानांतून निसटून जातो आणि मग जगण्याच्या कुठल्यातरी एका टप्प्यावर अवचित गवसतो. मग तो संगीतप्रकार माणसाचा देश, धर्म, जात आणि शिक्षण ओळखत नाही; तो भिडतोच.
हेच पाहा ना, चंद्रपूरहून आलेलं अजित ढोले यांचं हे पत्र. कंट्रीसंगीत त्यांना खूप आवडतं असं तर ते लिहितातच; पण मग सांगतात, ‘‘आणखी एक गोष्ट- कंट्री साँग्जमधून आपल्याकडे भरपूर उचलेगिरी झालेली आहे. उदा. ‘वितिचा लिनमन’वरून ‘तनहाई तनहाई’ (‘कोयला’) हे गाणं आलं आहे. ‘ओ माय डार्लिग क्लेमेंटाइन’वरून’ ‘ये है मुंबई मेरी जान..’ आलं आहे!’’ त्यांचं म्हणणं बरोबर असणार, कारण मी आधी म्हटलं तसं भारतीय भावसंगीताला कंट्रीसंगीत हे रॉक, पॉप, हिपहॉप, जॅझ या साऱ्यांहून जवळचं आहे. गेले काही आठवडे आपण कंट्रीसंगीत न्याहाळतो आहोत. खूप वाचकांची भरभरून ई-मेल, पत्रं मला येताहेत. कित्येकांनी ती गाणी पहिल्यांदाच ऐकली, बघितली आहेत आणि त्यांना ती एकदम आवडली आहेत. कंट्रीसंगीत आपल्या कानांना इतकं जवळचं आहे, की ते परकं असूनही तसं वाटत नाही. शिवाय, मराठी आणि हिंदी गाणी बऱ्यापैकी चांगल्या काव्यगुणांनी युक्त असल्यामुळे आपल्याला कंट्रीसंगीतामधलं काव्यदेखील जड जात नाही. पण हा तरुण चैतू अत्रे मला लिहितोय, ‘‘मला तुमची आर्टिकल्स खूप आवडतात. पण प्लीज, पॉप म्युझिकला कचकडं म्हणू नका.. कॉझ पॉपमध्येही जादू असते. अँड प्लीज, तुम्ही पॉपवरसुद्धा आर्टिकल लिहा ना!’’ आता इतक्या गोंडस मागणीला कुणी नाही कसं म्हणेल? तेव्हा दोन आठवडय़ानंतर आपण झगमगतं, चमकदार, प्रचंड श्रीमंत आणि खूपदा मठ्ठ असलेलं पॉपसंगीत बघणार आहोत. अर्थात, मी ‘खूपदा मठ्ठ’ असं म्हटलं तरी उरलेल्या वेळातलं पॉप हे भारीच आहे आणि बुद्धिमानही! पॉप आणि कंट्रीसंगीत आता सर्रास एकमेकांमध्ये मिसळताना दिसतात. पारंपरिक कंट्रीसंगीताचा तो व्हायोलिनचा सूर आता हरवेल, उद्या नाहीसा होईल अशी चिंता खऱ्या कंट्री’च्या चाहत्यांना नेहमीच वाटते. पण कितीही पॉप झालं तरी कंट्री गाणं हे कंट्रीच राहतं. मग भले ड्रम्स वाजू दे, नाहीतर सिंथेसायझर. कंट्री आणि पॉपमधला मला जाणवलेला मुख्य फरक असा की, कंट्री गाणं हे पॉपपेक्षा खूपच खोलात जातं.. सांगीतिकदृष्टय़ा आणि काव्यदृष्टय़ाही. गायक गाताना स्वत:ला विसरून गातात. (हे पॉपच्या बरोबर विरुद्ध!) गाण्यांचे व्हिडीओ हे सहसा सौम्य रंगांची बरसात करतात. (पॉपचा व्हिडीओ हा किती धावरा असतो!) गाण्याचे शब्द हे खाल्ल्यासारखे, गिळल्यासारखे, भुंकल्यासारखे उच्चारले जात नाहीत. त्यांचा आब राखला जातो. आणि म्हणून कितीही पॉपची वाद्ये उपयोजिली तरी पुष्कळसं कंट्रीसंगीत हे त्याचं कंट्रीपण टिकवून ठेवतं. ‘लेडी अँटबेलम’ या ग्रुपचं एक गाणं मला फार आवडतं. आहे ते कंट्रीच; पण कधीही पॉप होईल असं वाटत राहतं. अर्थात शेवटपर्यंत ते पॉप होत नाही. तीच त्याची खुमारी आहे. हिलरी स्कॉट आणि चार्ल्स केली यांचं द्वंद्वगान डेव्ह हेवूडच्या पियानोवर खुलत राहतं. त्या गाण्याला पॉपची जशी किनार आहे, तशीच पाश्चात्त्य अभिजात शास्त्रीय संगीताचीही. किती सुंदर अभिव्यक्ती आहे ती!
मध्यरात्र उलटून गेली आहे आणि त्याची/ तिची आठवण येत आहे. आता हे गाण्याचं सूत्र केवढं वैश्विक आहे! आपण सारेच कधी ना कधी तसं अनुभवलेलं नसतं का? कुणासाठी तरी मन झुरणं, हा सर्वानीच कधी ना कधी घेतलेला अनुभव असतो. आणि म्हणूनच हे गाणं Archetypal- आदिबंधात्मक स्वरूपाचं गाणं बनतं. जमिनीवर पडलेली गुलाबाची फुलं न्याहाळत हिलरी स्कॉट गाऊ लागते. मागाहून चार्ल्सही गातो..
Picture perfect memories scattered all around the floor
Reaching for the phone cause I can’t fight it anymore
And I wonder if I ever cross your mind?
For me, it happens all the time
It’s a quarter after one, I’m all alone and I need you now…l
‘आठवणींचा चांदणचुरा पसरलेला जमिनीवर
फोन करेन आता, जीव होतो आहे खाली-वर
असते का गं माझी आठवण तुझ्या मनात रेंगाळत?
माझ्या मनात तर तू असतेस सारखी घोटाळत
मध्यरात्री आता कसा एकटा एकटा झालो आहे
तुझी सोबत हवी आहे, तुझी सोबत हवी आहे! ’
किती उत्कट गाणं आहे हे! त्यातल्या ‘नीड यू नाऊ’वर ज्या तऱ्हेनं गाताना दोघं गायक जोर देतात, ते शब्दांत मांडता येत नाही. खरं तर ते कानांमध्येही आपण बेसावध असताना ते शिरतं आणि आपला ताबा घेतं. मागचा पियानो, व्हायोलिन, मँडोलिन हे जरी हा व्हिडीओ निमशहरी असला, तरी जुन्या खेडय़ामधल्या दिवसांतल्या मोकळ्या नातेसंबंधांची आठवण करीत राहतो. जरी या गाण्यात ड्रम्स असले, तरी ते कधीच चेकाळत नाहीत. लेडी अँटबेलमनं ‘कंट्री-पॉप’ हे मिश्रणही किती सच्चं कंट्री असू शकतं, हे या गाण्याच्या निमित्तानं दाखवलं आहे.
तेच गाणं मी पुन्हा ऐकत होतो. दुसऱ्या कडव्याअखेर चार्ल्स आवाज कसा फेकतो आहे याकडे माझं लक्ष होतं आणि मग त्या तरंगत्या मन:स्थितीत असतानाच माझ्या डोळय़ांसमोर उभं राहिलं- गाझापट्टीमधल्या बॉम्बहल्ल्यामध्ये घायाळ झालेल्या त्या चार-चार वर्षांच्या पोराचं चित्र! त्याचं डोकंच तेवढं फुटलं आहे. आणि बाकी शरीरावर जराही ओरखडा म्हणून नाही. त्याचं ते अचेतन शरीर घेऊन उभा असलेला तो असहाय बाप! हे चित्र मला जसं दिसलं तसं मग मला अजूनही आठवत गेली.. छायाचित्रं आणि बातम्या, मी नुकतीच लिहिलेली कविता. इस्राएल आणि पॅलेस्टाइन या दोन्ही देशांमधली कोवळी मुलं जेव्हा रोज मरताना मी बघतो, ऐकतो, वाचतो, तेव्हा मला वाटतं की, या नेत्यांना काहीच कसं कळत नाही? एक मूल जन्माला घालण्यासाठी किती कष्ट बाईच्या शरीरानं उपसलेले असतात! एक मूल वाढवण्यासाठी बाप, घरची मंडळी, सारं गाव कसं झटत असतं! आणि मग क्षणात बॉम्ब पडतो. छोटय़ा मुलींवरही बलात्कार केले जातात. नेत्यांची आणि आपली ‘स्पेसीज्’ निराळीच असल्याचं मग वाटत राहतं. आणि मग वाटतं, की ज्या संगीताविषयी आपण बोलतोय गेले काही महिने- ते इथे किती ‘इर्रीलेव्हन्ट’ आहे! ती अप्रस्तुतता केवढी अस्वस्थ करणारी आहे! र्सवकष संहाराकडे झेपावणाऱ्या या जगामध्ये संगीत ही नेत्यांच्या सोयीची बनलेली अफूची गोळी तर नाही? संगीतच कशाला, साऱ्याच कला, सारेच खेळ. नॅशव्हीलमधला जॉन हार्ट हा मार्केटिंग रिसर्चर म्हणतो, ‘‘मी ३२ रेडिओ स्टेशन्स बघतो. आणि कुणीच सध्या युद्धविरोधी गाणी (ंल्ल३्र-६ं१ २ल्लॠ२) लावताना मला दिसत नाही.’’ जिथे छोटय़ा बाळांच्या शरीराच्या चिंधडय़ा चिंधडय़ा त्या चिंचोळय़ा पट्टीच्या अलीकडे-पलीकडे होत आहेत; तिथे लेडी अँटबेलमच्या गाण्याचं कौतुक ते काय? मध्यरात्री एकटं एकटं वाटण्याचं दु:ख हे या दु:खापुढे कसा टिकाव धरेल? पण मग मला असंही जाणवतंय की, मला एकाएकी ते गाणं ऐकता ऐकता युद्धाचं चित्र स्मरलं, हीच त्या गाण्याचीही ताकद आहे! ते गाणं बोलत होतं माणसाच्या एकटेपणावर; पण त्याचे सूर असे काही तापले की, त्यांनी रसिकाला अस्वस्थ केलं, हलवलं. ढिम्मपणे बातम्या बघत युद्ध चवीनं बघणारेही पुष्कळच असतात की! बातम्यांमध्ये तळ ढवळण्याची शक्ती नसते. पण एखाद्या उत्कट गाण्यात तशी शक्ती असते! सानियाचंच वाक्य मला पुन्हा आठवतंय- ‘‘..सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला.’’ किती खरी गोष्ट आहे! ‘नीड यू नाऊ’ गाण्याचा रस्ता पॅलेस्टाइन युद्धापर्यंत जाईल असं मला वाटलं तरी होतं का?
आणि हा अजून एक फोटो तितक्यात समोर संगणकावर येतोय. फावल्या वेळात एक इस्राएली सैनिक गिटार वाजवत बसला आहे! जगणं तरी किती विरोधाभासानं भरलेलं असतं! ‘ओमियागे’ हे जपानी भेटवस्तूंचं शास्त्र आहे. आपण इथे ज्या निवांतपणे गाणी ऐकतो आहोत, त्यामागचं स्थैर्य, सुरक्षितता त्या युद्धखोर भूमीमधल्या निरागसांना मिळायला हवी. तीच इच्छा आशीर्वादपूर्वक ‘ओमियागे’ म्हणून त्या छोटय़ाशा मुलामुलींना भरल्या डोळय़ांनिशी माझ्यातर्फे आणि ‘लयपश्चिमा’च्या साऱ्या संवेदनशील, सजग वाचकांतर्फे या लेखाद्वारे पाठवतो आहे!