आजवरचे शिवसेनेचे यश हे बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक आणि सडेतोडपणामध्ये होते. त्यामुळे शिवसेनेचा दरारा आजवर टिकून राहिला. पण बाळासाहेबांनंतरच्या काळात केवळ दरारा आणि करिष्मा यांच्या जोरावर शिवसेनेला राजकीय पक्ष म्हणून फारसे भवितव्य राहील का? जागतिकीकरणाच्या गेल्या वीस वर्षांत ठाकरेप्रणीत नेतृत्वशैलीला काहीशी उतरती कळा लागली आहे. त्याऐवजी लोकसहभागी आणि विकासलक्ष्यी राजकारण करणारे अनेक छोटे-मोठे नेते भारतात तयार होऊ लागलेले दिसतात. बिजू पटनाईकनंतरचा ओरिसा, एनटीआरनंतरचा आंध्र आणि एमजीआरनंतरचे तामिळनाडूतील राजकारण..त्यामुळे उद्धव ठाकरे काय किंवा राज ठाकरे काय यांना या आव्हांनाचा विचार करून केवळ आक्रमकता आणि द्वेषपूर्ण राजकारणापलीकडे जावेच लागेल..त्याविषयीचे हे दोन लेख..सोबत पान आठवर कवी नामदेव ढसाळ आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे बाळासाहेबांचे काही पैलू उलगडणारे लेख..
‘आवाऽऽज कुणाचा..’ १९६६ साली महाराष्ट्राच्या आसमंतात घुमलेली ही आरोळी आजही सर्वसामान्य माणसांच्या कानामध्ये रुंजी घालते आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसाला ‘आवाज’ दिला.. बोलतं केलं,  कार्यरत केलं. ‘असूनी खास मालक घरचा, चोर म्हणती त्याला’ अशी परिस्थिती संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर याच राज्याच्या राजधानीत मराठी माणसांवर आली होती. राज्य मिळाले खरे पण स्वाभिमानाने आयुष्य कंठता येईल, अशा सिंहासहानावर बसण्याचा मान मात्र मिळाला नाही. वाटय़ाला आली ती अवहेलनाच. ही खंत प्रत्येक मराठी माणसाच्या मनात होती. परंतु याला वाचा फुटत नव्हती. एक व्यंगचित्रकार म्हणून ‘मार्मिक’मधून बाळासाहेबांनी ही व्यथा लोकांसमोर मांडली आणि त्याचंच पुढचं पाऊल म्हणून १९६६ मध्ये मराठी माणसाच्या अस्मितेला अंकुर फुटला, शिवसेनेचा जन्म झाला. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, ज्यांनी या भावनेला जन्म दिला ‘तो’ आवाज मात्र आता कायमस्वरूपी बंद झाला आहे!
१९७० सालची गोष्ट. मी महाविद्यालयीन विद्यार्थी होतो. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने संप केला होता. फॉर्म देऊन प्रिलीमला बसवणं असा थोडासा क्षुल्लक प्रश्न होता. परंतु रस्त्यावरील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आणि आंदोलनाला गंभीर वळण मिळालं. मी त्या आंदोलनात होतो. माझ्या काही अमराठी मित्रांनी मला विनंती केली, की मी बाळासाहेबांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळावा म्हणून प्रयत्न करावेत. मी खार येथील सार्वजनिक टेलिफोन बुथवरून ‘मातोश्री’वर संध्याकाळी फोन केला. बाळासाहेबांचे स्वीय सहाय्यक राजे यांनी फोन घेतला. मला कशासाठी भेटायचं आहे, याची माहिती मी दिली. एक तासाभराने मी पुन्हा फोन केला, तेव्हा बाळासाहेबांनी लगेचच येऊन भेटण्याची परवानगी दिली. मी थोडा अडचणीतच आलो. कारण त्यावेळी माझ्याबरोबर एकही महाविद्यालयीन विद्यार्थी नव्हता. मात्र, अशी संधी मला दवडायचीही नव्हती. म्हणून मग जे बरोबर येतील त्यांना घेऊन तडक  ‘मातोश्री’वर जाऊन पोहोचलो. बराच वेळ चर्चा होत होती. बाळासाहेब राहून-राहून प्रश्न विचारत होते- तुम्हाला हे आंदोलन सुचलं कसं, तुमचा नेता कोण, तुम्ही रस्त्यावर का आलात.. आणि एकूणच आमच्या पाठिंब्याची आग्रही विनंती या प्रश्नांच्या उत्तरांभोवतीच फिरत होती. मी शेवटी बाळासाहेबांना म्हटलं, ‘आम्ही रस्त्यावर आलो, त्याचे स्फूर्तिदाते तुम्हीच! कारण रस्त्यावर उतरल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत, असं तुम्हीच १९६६ पासून सांगत आला आहात.’ बाळासाहेबांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. लगेचच त्यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री प्रभा राव यांना फोन लावला. आम्हा विद्यार्थ्यांची त्यांच्याशी भेट घडवून आणली आणि आम्हा विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला. ही माझी बाळासाहेबांशी प्रत्यक्ष झालेली पहिली भेट! तसं म्हटलं तर १९६६ साली शाळेत असूनदेखील त्यांच्या बहुतांश सभा एक सामान्य नागरिक म्हणून पाहिल्या होत्या. त्यांना उपस्थित राहत होतो. पण पहिली भेट हीच.
नंतर मी सनदी लेखापाल (सी.ए.) झालो. वकिलीची परीक्षाही उत्तीर्ण झालो. शंभरपेक्षा जास्त सामाजिक संस्था, अनेक सहकारी संस्था यांच्याशी जवळचा संबंध होता. त्यातील काहींचं नेतृत्वही मी करत होतो. यानिमित्ताने बाळासाहेबांशी संबंध येत गेला. त्यांनीही कोणत्याही कार्यक्रमात भेट झाल्यानंतर मला प्रत्येक वेळी स्नेहाने, प्रेमाने, आपुलकीनेच वागवलं.
१९९४ चा प्रसंग. भुजबळांसारख्या आमदारांनी पक्ष सोडल्यामुळे शिवसेना थोडीशी दुखावली होती. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच सातत्याने म्हटलं जायचं, की आता शिवसेना संपली. तेच मत १९९४ मध्ये व्यक्त केलं जात होतं. परंतु बाळासाहेबांचं स्वप्न होतं, १९९५ मध्ये विधानभवनावर भगवा फडकवण्याचं! त्याची पूर्वतयारी म्हणून चेंबूरला शिवसेना नेत्यांची, जिल्हा प्रमुखांची व तत्सम पदाधिकाऱ्यांची बैठक बाळासाहेबांनी आयोजित  केली होती. आश्चर्य म्हणजे, त्या बैठकीत डब्ल्यूटीओ (त्यावेळचं नाव-GATT)  समोर असणाऱ्या डंकेल प्रस्तावावर मी भाषण करावं, असा आदेश बाळासाहेबांनी दिला. त्यांनी बैठकीचं उद्घाटन केल्यानंतर लगेचच भाषण करायचं होतं. बाळासाहेब भाषण करतील आणि निघून जातील आणि त्यानंतर मी काहीही बोललो तरी खपून जाईल, अशा भाबडय़ा भावनेत असतानाच, बाळासाहेब त्यांचे भाषण आटोपून बसले आणि मला म्हणाले, ‘आता बोला, मला तुमचं भाषण ऐकायचं आहे.’ माझ्यावर प्रचंड दडपण आलं. तेव्हा मी नेमके काय बोललो ते, मलाही माहीत नाही. पण त्यानंतर बाळासाहेबांनी बैठकीतून जाताना ‘आमचे अर्थमंत्री तुम्हीच!’ असं सांगितलं.
पुढे युतीची सत्ता आली आणि अर्थखातं भाजपाकडे गेलं. परंतु बाळासाहेबांनी मला महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचा अध्यक्ष करून कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला.
१९९६ची निवडणूक. मधू दंडवतेंसारखं दिग्गज आणि अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा उभं राहणार होतं. व्यावसायिक कामानिमित्त मी परदेशात होतो. बाळासाहेबांचा फोन आला, ‘तुम्ही लगेच येऊन निवडणुकीचा अर्ज भरा व निवडणुकीसाठी उभे रहा.’ मी निवडणूक जिंकेपर्यंत अनेकदा बाळासाहेबांनी स्वत: फोन करून मला काही त्रास होत नाही ना, अडचण नाही ना याची सातत्याने खातरजमा करून घेतली.
मे महिन्याचा कोकणी उन्हाळ्याचा प्रसाद खाऊन निवडणूक जिंकल्यानंतर अनेक आठवडय़ानंतर हवीहवीशी वाटणारी विश्रांती मी घेत होतो. दुपारी झोपलो असतानाच बाळासाहेबांचा पुन्हा फोन आला, ‘आत्ताच मला वाजपेयींचा फोन आला होता. त्यांनी मंत्रीपदासाठी सेनेच्या एकाच व्यक्तीचे नाव सुचवायला सांगितले आहे. प्रभू, तुम्ही शिवसेनेचे पहिले केंद्रीय मंत्री झालात.. उद्या शपथविधीसाठी तुम्हाला दिल्लीला जायचे आहे!’ उद्धव तेव्हा परदेशी होते. मात्र राजने मला त्यांच्या घरी नेले. संपूर्ण ठाकरे कुटुंबियांनी त्यावेळी मला ओवाळले आणि मगच दिल्लीला पाठवले. १६ मे १९९६ रोजी राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा पहिला केंद्रीय मंत्री म्हणून मी उद्योग मंत्रालयाची सूत्रे हाती घेतली.
मात्र ते सरकार काही दिवसांतच गडगडलं. १९९८ मध्ये पुढच्या निवडणुकीनंतर भाजपा युतीचं सरकार केंद्रात पुन्हा एकदा आलं. मला वाटलं होतं, की बाळासाहेबांनी एका नाजूक क्षणी मला मंत्री केलं होतं. तो भातुकलीचा खेळ आता संपला. मात्र पुन्हा एकदा बाळासाहेबांनी बोलावून घेतलं आणि ‘तूच शिवसेनेचा केंद्रीय मंत्री पुन्हा एकदा होणार!’  असं सांगितलं. यावेळी मी केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री झालो. त्यानंतर शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते निवडून आले होते. म्हणून १९९९ मध्ये मात्र मला नक्कीच मंत्रीपद मिळू शकणार नाही अशी स्वत:ची मानसिक तयारी करत असतानाच बाळासाहेबांनी सलग तिसऱ्यांदा शिवसेनेचा केंद्रीय मंत्री म्हणून वाजपेयीजींच्या मंत्रिमंडळात माझी निवड करत माझ्यावर विश्वास दाखवला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची स्थापना झाल्यापासून बाळासाहेबांनी मला सतत प्रोत्साहन दिलं. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली आठ जणांच्या सुकाणू समितीत माझा समावेश करण्यात आला. अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या समितीमार्फत घेतले जायचे. साहजिकच अशा निर्णयांपूर्वी बाळासाहेबांशी कित्येक तास सखोल चर्चाही व्हायची. बाळासाहेब किती मोठे आहेत, ते राष्ट्रहिताचा विचार किती अंत:करणपूर्वक करतात याचा प्रत्यय मला जवळून येत असे.
देशाला फायदा होत असेल तर मग सेनेचा तोटा झाला तरी हरकत नाही, ही त्यांची पहिल्यापासूनच ठाम भूमिका होती. त्यामुळेच अनेक देशहिताचे निर्णय मी घेऊ शकलो. मंत्री म्हणून अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागत. त्यावेळी बाळासाहेबांशी प्रत्यक्ष सल्लामसलतही होत असे. त्यातून बाळासाहेबांचा देशाबाबत असलेला दृष्टिकोन प्रत्यक्ष अनुभवता येई. उदा. देशाच्या ऊर्जा क्षेत्रांत आमूलाग्र बदल करणारा वीज कायदा २००३ मी तयार करत होतो. तेव्हा मी स्वत:हूनच या कायद्याची रूपरेषा बाळासाहेबांना समजावून सांगितली. यातल्या काही गोष्टी लोकानुनयी नसतील, याचीही त्यांना कल्पना दिली. मात्र या कायद्यात राष्ट्रीय हित आहे याची खातरजमा झाल्यावर त्यांनी मला सदैव पाठिंबाच दिला.
२००५ साली नारायण राणेंनी शिवसेना सोडली. कोकणातून निवडून आल्यामुळे मी देखील पक्ष सोडणार अशा वावडय़ा होत्या. मी तसं करावं म्हणून अनेक प्रकारची दडपणं, प्रलोभनं यांचा सामनाही मला करावा लागला. बाळासाहेबांना भेटलेल्या काही लोकांनी त्यांना या विषयाबाबत छेडलं असता ‘तो एकवेळ राजकारण सोडेल पण पक्ष सोडणार नाही’ असे बाळासाहेबांनी प्रश्नकर्त्यांना ठणकावून सांगितलं.
बाळासाहेबांना अनेक लोक दैवत मानतात. मी स्वत राज्यभर अनेक कारणांनी फिरलो आहे. बाळासाहेबांचा फोटो देव्हाऱ्यामध्ये ठेवून त्याची पूजा करणारी अनेक घरं, कुटुंबं, कुटुंबातील श्रद्धाळू माणसं मी पाहिली आहेत. कोकणात तर बाळासाहेब हा प्रत्येक व्यक्तीचा आद्य देव आहे. ज्या कोकणी माणसांनी शिवसेनेला जन्म दिला, भरभरून प्रेम दिलं त्या कोकणाला बाळासाहेबांनी भरभरून दिलं. नगरसेवक, आमदार, मुख्यमंत्री, खासदार, राज्यातील तसेच केंद्रातील मंत्री बरेचसे कोकणातलेच.
आजही बाळासाहेब नजरेसमोर येतात ते नेते म्हणूनच. एक पत्रकार, असामान्य वक्ते, व्यंगचित्रकार, संघटक म्हणून ते परिचित आहेतच, पण आठवणींतले बाळासाहेब त्या पलीकडचे आहेत. वडील म्हणून, मार्गदर्शक म्हणून, सदैव प्रेम करणारी एक वडिलधारी व्यक्ती म्हणून बाळासाहेबांना मी कधीच विसरू शकत नाही. माझ्यासारख्या राजकारणात नसलेल्या माणसाला त्यांनी राजकारणात आणलं, खासदार केलं, मंत्रिपदाची संधी दिली.
बाळासाहेब त्यांच्या वडिलांची एक आठवण सांगत. माणसाची श्रीमंती ही त्याच्या घराबाहेर असलेल्या चपलांच्या संख्येवरून ओळखता येते. याचा अर्थ इतकाच, लोकप्रियता हाच खरे तर माणसाच्या यशाचा निकष मानला पाहिजे.
(शब्दांकन: स्वरूप पंडित)

pune dispute within congress marathi news
पुणे काँग्रेसमधील मानापमान नाट्य सुरूच
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
chhatrapati sambhajinagar, Chandrakant Khaire, Imtiaz Jaleel, Eid, lok sabha election 2024
औरंगाबादमध्ये मुस्लीमबहुल भागातही शिवसेनेचा राबता वाढला, खैरे आणि इम्तियाज जलील यांची गळाभेट
alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना