आजच्या जगात देशादेशांतील तंटे, वाद सोडवून सामंजस्य निर्माण करण्यासाठी ‘डिप्लोमसी’ला अतिशय महत्त्व प्राप्त झालं आहे. याच विषयावरील ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांच्या ‘साऊथ ब्लॉक, दिल्ली’ या पुस्तकाचं प्रकाशन रोहन प्रकाशनातर्फे २६ सप्टेंबर रोजी होत आहे. त्याला माजी राजदूत व सचिव सुधीर देवरे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा
संपादित अंश..
हे पुस्तक लिहिण्याचा हेतू विजय नाईक प्रथमच स्पष्ट करतात, तो आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आजच्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामांकडे बोट दाखवून. पहिलं जग असो अथवा तिसरं, परस्परावलंबनाशिवाय पर्याय उरलेला नाही. मुत्सद्देगिरीचे नवनवे पैलू जसे पुढे येतील, तशी या विषयात आणखी भर पडेल. शिष्टाईचे भावी स्वरूप परिस्थितीनुसार बदलत जाणार हे निर्विवाद. त्या दृष्टीने शिष्टाई, मुत्सद्देगिरी अथवा कूटनीतीच्या आव्हानात्मक क्षेत्राकडे पाहण्याची गरज आहे.
परराष्ट्रनीती ही तशी नवी बाब नाही. आपल्याकडे चाणक्यनीती पुरातन काळापासून परिचित आहे. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी परराष्ट्रनीतीची मुहूर्तमेढ रोवली आणि भारताच्या स्वतंत्र आणि अलिप्ततावादी धोरणाचा पाया रचला. शीतयुद्धाच्या समाप्तीने आणि जागतिकीकरणाने परराष्ट्रनीतीला नवीन चालना मिळाली. आता भारत जगात एक उच्च स्थान प्राप्त करण्याच्या मार्गावर असताना आपली विदेशनीती व विदेशसेवा यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. तसेच त्यांच्यावरची जबाबदारीही मोठी आहे.
परराष्ट्रनीतीमध्ये किंवा राजनैतिक शिष्टाईमध्ये चार प्रमुख बाबी अंतर्भूत असतात. त्या म्हणजे, राष्ट्रहित, सद्य परिस्थितीची पूर्ण माहिती, घटनांचं व परिस्थितीचं विश्लेषण आणि संभाषण व संपर्क. राष्ट्रहित हे कायम स्वरूपाचं असतं. नाईक यांनी कौटिल्याचा संदर्भ देऊन लिहिलं आहे की, पुराणकाळात ‘राजहित’ सर्वात महत्त्वाचं मानलं जाई. तथापि, २१व्या शतकात ‘राष्ट्रहित’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण राष्ट्र हे वस्तुनिष्ठ सत्य आहे. चाणक्याच्या म्हणण्यानुसार ह्लळँी ६ी’ऋं१ी ऋ ३ँी २३ं३ीीिस्र्ील्ल२ि ल्ल ंल्ल ूं३्र५ी ऋ१ी्रॠल्ल स्र्’्रू८.ह्व ‘राष्ट्रहित’ हे पक्ष, व्यक्ती किंवा विचारप्रणाली यांवर अवलंबून नसतं. अर्थात, राष्ट्रहिताचे पैलू व व्यापकता काळाप्रमाणे बदलत राहतात, म्हणूनच त्याबद्दल सरकारला व समाजाला नेहमी सतर्क राहावं लागतं. दोन-तीनशे वर्षांपूर्वी भारत जेव्हा गुलामगिरीत गेला, तेव्हा आपल्याला विदेशी परिस्थितीचा व विदेशी राजकारणाचा पुरेसा अंदाज आला नाही, हे खरं. माहितीलाही परराष्ट्रनीतीमध्ये फार महत्त्व आहे. अचूक व सत्यनिष्ठ माहिती ही शिष्टाईसाठी अपरिहार्य असते. त्याचबरोबर केवळ माहिती पुरी पडत नाही. विश्लेषण व निदान यांची अतिशय गरज असते. जर उपलब्ध माहितीचं योग्य विश्लेषण झालं नाही आणि आवश्यक निर्णय घेता आले नाहीत, तर विदेशनीती पुढे पाऊल टाकू शकत नाही. समतोलपणे विश्लेषण करून ते राजकीय नेत्यांसमोर मांडणं ही विदेशसेवेची जबाबदारी असते. आजच्या जगात संभाषण आणि संवाद या बाबीची तेवढीच गरज आहे. त्यांच्याशिवाय आपल्या हितासंबंधी दुसऱ्यांना जागरूक करणं किंवा आपले हितसंबंध जोपासणं शक्य होणार नाही. इंटरनेट व तात्काळ दळणवळणाच्या युगात तर प्रभावी संवादाशिवाय देशाची प्रतिमा मजबूत करणं अशक्य आहे.
नाईक यांनी वरील बाबींचा व परराष्ट्रनीतीच्या झपाटय़ाने बदलणाऱ्या स्वरूपाचा या पुस्तकात फार चांगला आढावा घेतला आहे. एक तर त्यांनी आपलं पुस्तक फक्त भारताच्या परराष्ट्रनीती किंवा शिष्टाईपुरतं मर्यादित ठेवलेलं नाही. जागतिक पातळीवर शिष्टाईबद्दल राजकीय नेत्यांचे, राजनैतिक अधिकाऱ्यांचे किंवा अभ्यासकांचे काय विचार आहेत, हे त्यांनी  प्रत्येक लेखाच्या सुरुवातीस उद्धृत केले आहे. उदाहरण द्यायचं झालं, परराष्ट्र राजकारण व राजनीतीबाबतचे कौटिल्य, बिस्मार्क, शेक्सपिअर, महात्मा गांधी, दी गॉल, यशवंतराव चव्हाण, हमीद अन्सारी, रॉबर्ट फ्रॉस्ट, हॅरॉल्ड मॅकमिलन, मार्क ट्वेन, गालब्रेथ, मॅडेलिन ऑल्ब्राइट, जेम्स रेस्टन, सुन झू इ. देशोदेशींच्या नेत्यांचे, विचारवंतांचे, लेखकांचे विचार संक्षेपात मांडले आहेत.
अर्थात हे पुस्तक प्रामुख्याने भारताच्या परराष्ट्रनीतीसंबंधी असल्याने आपल्या नीतीची ऐतिहासिक पाश्र्वभूमी व वर्तमानकाळातली परिस्थिती, तिची वेगवेगळी अंगे, विदेशसेवा व त्यातल्या अनेक व्यक्ती यांची मुद्देसूद चर्चा केली आहे.
भारताच्या परराष्ट्र सेवेची स्थापना एका दृष्टीने ब्रिटिशांच्या काळात १३ सप्टेंबर, १७८३ मध्ये झाली. पुढच्या काळात भारतीय परराष्ट्र खातं निर्माण करून आवश्यक असेल त्या राष्ट्रात राजदूत नेमण्याचा निर्णय झाला आणि नंतर २०व्या शतकात, १९४६ मध्ये शिष्टाई, व्यापार व कौन्सुलर सेवेच्या दृष्टीने भारतीय परराष्ट्र सेवेची घडण करण्यात आली, असा इतिहास नाईक यांनी नमूद केला आहे. या पुस्तकातले विविध लेख, परराष्ट्रनीती व विदेशसेवा यांतील अनेक विषयांवर प्रकाश टाकतात. उदा. परराष्ट्र खात्याची मांडणी, त्यांची स्वातंत्र्यपूर्व काळातली पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखालील पहिली र्वष, विदेशसेवेची घडण इत्यादी. नवीन भारतात विदेशसेवा कोणत्या स्वरूपाची असावी व तिच्याकडून कोणत्या कार्याची अपेक्षा असावी, याबाबतचे विचार त्या काळात मोठय़ा प्रमाणावर करण्यात आले. नाईक यांनी परराष्ट्र सेवेच्या क्षेत्राबद्दल खूप अभ्यासातून लिहिलं आहे.

परराष्ट्र सेवा हे असं एक क्षेत्र आहे, की त्यात व्यक्तीचा सर्वागीण विकास साधता येतो. त्यासह देशाचे संबंध व सामंजस्य जागतिक पातळीवर वाढवण्यासाठी मोलाची कामगिरी करता येते. परराष्ट्र सेवेकडे प्रामुख्याने ऐशोआराम सेवा व देशविदेशांच्या भ्रमंतीची संधी या नजरेने पाहिलं जातं. पण जागतिक नेत्यांबरोबर वाटाघाटी, चर्चा करताना अत्यंत जटिल प्रश्नांची उकल होत असते. त्यासाठी लागणारा चाणाक्षपणा, भाषेचा संयम आणि कळीच्या शब्दांचा योग्य वापर व भविष्याला कलाटणी देण्याची मुत्सद्देगिरीतील ताकद असे अनेकविध पैलू ही सेवा उपलब्ध करून देते. याशिवाय, भारताच्या परराष्ट्र संबंधांतल्या गेल्या साठ वर्षांतल्या प्रमुख घटना व नीतीचे मोजमापन, धर्म, श्रद्धा व परराष्ट्र धोरण, गुजराल सिद्धान्त, पत्रकार ते राजदूत, गोपनीय मुत्सद्देगिरी, यशवंतराव चव्हाण व परराष्ट्र धोरण, प्रोटोकॉलचे (शिष्टाचार) परराष्ट्रनीतीतील महत्त्व, हिंदी भाषेचा परराष्ट्र संबंधांतील प्रचार किंवा उपयोग, भारतीय महिला व डिप्लोमसी, हेरगिरी व शिष्टाई, जनसंपर्क शिष्टाई, राजदूत आणि जोखीम, मुत्सद्देगिरीपुढील आव्हानं असे जवळ जवळ पन्नासहून अधिक लेख नाईक यांनी लिहिले आहेत. परराष्ट्रनीतीबाबतचा बव्हंशी प्रत्येक पैलू त्यांनी मोठय़ा परिश्रमाने संक्षेपात उभा केला आहे.
नाईक यांनी शिष्टाईचे वर्णन करताना सदिच्छा, क्रीडा शिष्टाई, सांस्कृतिक मुत्सद्देगिरी, इंटरनेट शिष्टाई, अणुधोरण व शिष्टाई, शिष्टाईचे यशापयश व आव्हानं इ. अनेक बाबींवर मार्मिक चर्चा केली आहे. यातले अनेक विषय आजच्या बदलत्या काळात फार महत्त्वाचे आहेत आणि रोजच्या जीवनालाही लागू पडतात.
‘साऊथ ब्लॉक’ ही इमारत म्हणजे भारतीय विदेश सेवेची पंढरी. त्यात काम केलेल्या अनेक राजदूतांचे विचार व अनुभव  फारच अर्थपूर्ण आहेत. लेखकाने आजवर कित्येक राजदूतांबरोबर संवाद साधला असून त्यांच्या मुलाखती या पुस्तकात दिल्या आहेत. केवळ भारतीयच नव्हे, तर दिल्लीत कार्य केलेल्या इतर देशांच्या राजदूतांबरोबरही त्यांचा चांगला परिचय असल्याने त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चाही समाविष्ट आहेत. यांमुळे पुस्तकाच्या वाचनीयतेत भर पडली आहे.
आजच्या काळात परराष्ट्रनीती आणि आपलं दैनंदिन जीवन हे एकमेकांशी निगडित होत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती, दहशतवाद, हवामान बदल, ऊर्जा, पेट्रोल व नैसर्गिक वायू यांची उपलब्धता, जहाजनीती, चाचेगिरी अशा परराष्ट्रनीतीशी संबंधित अनेक बाबी आज सामान्य जनतेच्या हितावर आघात-प्रघात करताना दिसतात. त्याबरोबरीने इंटरनेट, टीव्ही, मोबाइल फोन्स, एनजीओ इ.च्या वाढत्या प्रभावामुळे नागरी समाज मोठय़ा प्रमाणावर निर्माण होत आहे. आज सामान्य माणसाला विदेशनीतीमध्ये आपला सहभाग असू शकतो, असं वाटायला लागलं आहे, असं म्हटल्यास वावगं होणार नाही. शिष्टाईची अनेक उदाहरणं देत लेखकाने हा सामाजिक बदल आपल्यासमोर मांडला आहे.