News Flash

कुपोषणावर मात करणारा दक्षिण सुदान

युनिसेफ आणि इतर चाळीस सेवा-संस्थांनी मिळून दक्षिण सुदानला ग्रासणारी कुपोषणाची पीडा नेस्तनाबूत करण्याचा घाट घातला.

(संग्रहित छायाचित्र)

जाई घाणेकर

युनिसेफ आणि इतर चाळीस सेवा-संस्थांनी मिळून दक्षिण सुदानला ग्रासणारी कुपोषणाची पीडा नेस्तनाबूत करण्याचा घाट घातला. एकूण वातावरण निश्चित उमेद वाटावी असं होतं. एक मरगळलेला देश सावरू पाहतो आहे. चाचपडत आपला मार्ग शोधतो आहे, हे खरंच विलक्षण आहे. बालकांसाठी चालवलेलं हे अभियान खरोखर कौतुकास्पद आहे.

मानवी पोषण आहार आणि पर्यायाने सार्वजनिक आरोग्य या विषयांमध्ये संशोधन करून मी २००२ साली पीएच.डी. मिळवली. कालांतराने या विषयांशी निगडित असलेल्या युनिसेफमध्ये मला नोकरी मिळाली. युनिसेफची भारतातली मुख्य कचेरी किंवा इंडिया कंट्री ऑफिस दिल्लीला होतं. भारतात अन्य तेरा ठिकाणी प्रांतीय कचेऱ्या होत्या. या शाखांमधून काम करणाऱ्या पोषण विशेषज्ञांसाठी सूक्ष्म पोषक तत्त्वांवर (micronutrients) आधारित असा कार्यक्रम बेतायचा, त्यांना वेळोवेळी पूरक अशी तांत्रिक माहिती पुरवायची; आणि अखेरीस या प्रकल्पांमधून निष्पन्न झालेला परिणाम जोखून, तो प्रायोजकांपर्यंत पोचवायचा, असं काहीसं माझ्या कामाचं स्वरूप होतं.

माझ्या कामाच्या या रहाटीमध्ये तसं आव्हानात्मक असं काहीच नव्हतं. सगळी मुकादमकीच होती. प्रत्येक लहान सहान गोष्टींसाठी कर्मचाऱ्यांच्या मागे अंकुश लावावा लागे. त्याच त्या गोष्टींचा पुढे कंटाळा येऊ लागला आणि मी नोकरी सोडली. स्वत:ची सल्लासेवा- (कंसलटन्सी) सुरू केली. समाजोपयोगी आरोग्य आणि पोषणाबद्दल मार्गदर्शन करणारी ही सल्लासेवा. युनिसेफबरोबर असलेले नातेसंबंध मात्र मी कायम राखले. पाश तोडले नाहीत. अधूनमधून काही विशेष प्रकल्पांवर काम करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली जात असे. एखादा संशोधनात्मक लेख लिहिणे, कोण्या प्रयोगाची तपासणी करून अहवाल सादर करणे. किंवा काही नव्या प्रकल्पाबद्दल माहिती पत्रक लिहिणे, प्रस्ताव तयार करणे अशी कामं माझ्याकडे येत असत.

असंच एका सकाळी एक मेल येऊन थडकला. दक्षिण सुदान देशाचा वीस दिवसांचा दौरा करायला मी मोकळी आहे का, अशी विचारणा करणारा. असल्यास मी कधी निघू शकते? या देशाच्या तीव्र कुपोषित बालकांसाठी ‘युनिसेफ’ने खास पोषणपद्धती सुरू केली आहे. ही योजना इतरही अनेक विकसनशील देशांमधून चालवली जात आहे. तर दक्षिण सुदानमधल्या प्रकल्पाची पाहणी करून अहवाल सादर करायचा अशी ही कामगिरी होती. मला दक्षिण सुदानबद्दल अतिशय कुतूहल होतं. तेव्हा मी तात्काळ होकार कळवला. ‘चुकूनही या देशाच्या वाटेला फिरकू नकोस. गेलीस तर आधी मृत्यूपत्र करून जा,’ असा सल्ला आप्तेष्टांनी दिला. या अनाहूत उपदेशामुळे जाण्याचा माझा निर्धार अधिकच बळावला.

खरं तर हितचिंतकांना दोष देता येणार नाही. जगातला हा वयाने सगळ्यात लहान असलेला देश, २०११ मधल्या बंडाळीतून निपजला. तेव्हापासून तो प्रतिकूल परिस्थितीशी सतत झगडतो आहे. नाईल नदीच्या काठावर वसलेला हा देश ख्रिस्ती बहुसंख्यांक आहे. मुसलमान बहुसंख्यांक असलेल्या उत्तरेकडील सुदानशी त्याचे सतत मतभेद होत. अखेर धुमश्चक्री होऊन देशाचे दोन खंड झाले आणि दक्षिण सुदानचं गणराज्य जन्माला आलं. अठरा विश्वं दारिद्रय़, सामाजिक अस्वास्थ्य, सतत मारामाऱ्या आणि सदाची आणीबाणी असं एकूण वातावरण होतं. देशात वीज नव्हती, वाहतुकीलायक रस्ते नव्हते. सगळी पिकं नष्ट झाली होती. झाडं तोडण्यात आली होती. देशात कुपोषण हेच एक वास्तव होतं. युनिसेफ आणि इतर चाळीस सेवा-संस्थांनी मिळून दक्षिण सुदानला ग्रासणारी कुपोषणाची पीडा नेस्तनाबूत करण्याचा घाट घातला. एक जबरदस्त महत्त्वाकांक्षी कृतियोजना (action plan) आखण्यात आली. उभ्या जनतेची अन्नान्नदशा होती. अशा पीडित जनतेसाठी आणि विशेषकरून बाळगोपाळांसाठी गुणकारी रतीब आयोजित करायचा आणि तो त्यांच्यापर्यंत पोचवायचा, असं या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट होतं. थोडक्यात, दक्षिण सुदानमध्ये पोषणक्रांती घडवून आणायची. हे काम युद्धपातळीवर राबवण्याचा युनिसेफ आणि त्यांच्या साथीदारांचा मानस होता.

या अनोख्या मोहिमेवर निघण्यासाठी मग जोरदार कारवाई सुरू झाली. दक्षिण सुदानला जाणं सोपं नव्हतं. सुरक्षासंबंधी ऑनलाईन अभ्यासक्रम पार करणं सक्तीचं होतं. युनिसेफच्या आमंत्रणाची प्रत, ओळखपत्र, परवाने, दाखले, मंजुरी पत्र, असंख्य फॉम्र्स- खूप कागदी घोडे नाचवावे लागले.

पहिली ठेच लागली ती आपल्याच आंतरराष्ट्रीय विमानतळावर. माझ्या हातात दक्षिण सुदानच्या परराष्ट्र मंत्रालयाचं- ‘आगमन होताच त्वरित व्हिसा देण्यात यावा,’ अशी रोख सूचना देणारं अधिकृत पत्र होतं. असं असूनही इथिओपियन विमानसेवेची एक कर्मचारी- जी स्वत: भारतीय, नव्हे महाराष्ट्रीय होती- तिनं जालीम नकारात्मक पवित्रा घेतला. माझ्याकडे रीतसर प्रमाणपत्र नाही म्हणून ती हटून बसली. प्रसंग बाका होता. पण मी डगमगले नाही (अखेर मी मराठीच!). तिच्या वरिष्ठाला भेटण्याचा मी आग्रह धरला आणि अखेर गंगेत घोडं न्हालं. मी विमानात जाऊन बसले.

वाटेत आदिस अबाबाला विमान बदलून एकदाची मी दक्षिण सुदानच्या राजधानीत- जुबा शहरात दाखल झाले. जुबा विमानतळ अगदी परवा परवापर्यंत चक्क एका तंबूमध्ये वसलेलं होतं. आगमन- निर्गमन इत्यादी सर्व सोपस्कार या तंबूमधून चालत असत. मी पोचले तेव्हा एक वेगळीच धांदल अनुभवायला मिळाली. शेजारच्या काँगो गणराज्यात इबोला रोगाचा दुष्ट प्रादुर्भाव होता. या रोगाच्या भीषण, थरारक कथा ऐकून अवघं जग हादरलं होतं. जुबाच्या विमानतळावर उतरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी होऊन त्याला ताप नाही ना, याची पडताळणी केली जात होती. मी ‘इबोलामुक्त’ असल्याचे निदान होताच माझी व्हिसा विभागाकडे रवानगी करण्यात आली आणि अखेरीस मी विमानतळाच्या बाहेर पडले. माझ्या नावाची पाटी घेऊन उभा असलेला युनिसेफचा ड्रायव्हर पाहताच जीव भांडय़ात पडला.

आमच्या छावणीचे स्वरूप हे एखाद्या तुरुंगाच्या आवाराशी मिळतंजुळतं होतं. मुक्त संचाराला बंदी होती. सायंकाळी सात ते सकाळी सहा वाजेपर्यंत निवासस्थानातून ये-जा करायला मनाई होती. देशामध्ये वीज उपलब्धच नसल्यामुळे या वस्तीसाठी खास जनरेटर सुसज्ज होते. आतल्या खोल्या अतिशय सुनियोजित होत्या. स्वयंपाकासाठी विजेच्या शेगडय़ा, नळाला गार-गरम पाणी, फ्रिज, टी.व्ही., कपाट, इत्यादी. या वातानुकूलित सुखसोयीमुळे मुक्कामी दाखल झाल्यावर फाटकाबाहेरच्या बिकट परिस्थितीचा विसर पडला.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता, जुबाच्या युनिसेफ कार्यालयात मी हजर झाले.  त्या दिवशीच्या प्रबोधनाचा विषय होता- आत्मसुरक्षा. या खतरनाक देशात आपला जीव कसा वाचवायचा, याबद्दल अनेक सूचना देण्यात आल्या आणि मला एक बुलेटप्रूफ जाकीट, हेल्मेट, दुतर्फा संवाद साधण्यासाठी एक छोटा रेडिओ आणि अर्थातच ओळखपत्र- आयडी कार्ड, एवढा जामानिमा देण्यात आला.

माझं काम एकूण तीन आठवडे चालणार होतं. त्या अवधीत युनिसेफने आखलेल्या बालकांच्या तीव्र कुपोषणाविरोधीच्या प्रकल्पाची छाननी करून मला निष्कर्ष लेख सादर करायचा होता. त्यासाठी हा कार्यक्रम राबवणारे कर्मचारी, मुलांची प्रत्यक्ष देखभाल करणारे संगोपक (caregivers) म्हणजेच पालक आणि खुद्द बालक, या सर्वाशी संपर्क साधायचा होता.

दक्षिण सुदानमध्ये एकूण साठ जमाती आहेत. त्यातल्याच डिंका आणि न्यूएर या दोन प्रमुख जमाती. यापैकी डिंका प्रामुख्याने बहार-एल-गझल या प्रांतात, तर न्यूएर नाईलच्या खोऱ्यातील बेंटीयू आणि आसपासच्या भागात आढळतात. त्यांच्या आपापल्या बोलीभाषा आहेत. देशात अरेबिक आणि इंग्रजीही बोलली जाते. ज्यांना इंग्रजी येते, त्यांना नोकरी मिळणं थोडं सोपं जातं- ड्रायव्हर, चौकीदार, सफाई कामगार किंवा तत्सम काहीही. शिकलेल्या लोकांना विविध सेवा संस्थांमध्ये बऱ्यापैकी काम मिळतं.

दक्षिण सुदानमध्ये कायम आणीबाणीची परिस्थिती असते. अंतर्गत चकमकी, हाणामारी, दंगली चालूच असतात. शस्त्रधारी बालसैनिकसुद्धा या समरात भाग घेताना दिसतात. देशाचे चलन हा एक विनोदच म्हटला पाहिजे. चलन फुगवटा आणि वारेमाप महागाई या नित्याच्या कटकटींमुळे देश त्रस्त झाला आहे. अशा वातावरणाचा परिणाम झाला नाही, तरच नवल. तीव्र कुपोषणाचा प्रादुर्भाव दर्शविणाऱ्या देशांमध्ये दक्षिण सुदानचा अग्रणी क्रमांक आहे. तर या दुष्टचक्रातून त्याची सुटका करण्याचे जोरदार प्रयत्न जारी आहेत. देशामध्ये जवळजवळ ९०० पोषण साहाय्य केंद्रे उघडलेली आहेत. त्यात बेंटीयू गावामधली प्रसार मोहीम सर्वात कार्यक्षम आणि धडाडीची मानली जाते. साहजिकच माझा मोर्चा बेंटीयूकडे वळला.

बेंटीयू दक्षिण सुदानमधले एक असुरक्षित गाव म्हणून कुख्यात आहे. या गावाला मोटारीने जाणे अशक्य आहे, कारण वाटेत कुठेही दगाफटका संभवतो. आम्हाला युनायटेड नेशन्सच्या मानवतावादी हवाई सेवेच्या (Humanitarian Air Service) लहानग्या प्रवासी विमानाने मुक्कामाला पोचावे लागले. निवासस्थानापर्यंतच्या प्रवासात या हिंसाचाराच्या राजधानीचा एवढा दरारा का आहे याचा प्रत्यय येत राहिला. बेंटीयूमध्ये युनिसेफ आणि इतर आंतरराष्ट्रीय सेवासंस्था कार्यरत होत्या. त्यामधून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी एवढी दक्षता बाळगली जात होती.

आमची निवासभूमी मानवतावादी कार्याचं केंद्रस्थान (Humanitarian Hub) म्हणून गणली जात होती. तिला साक्षात एखाद्या लष्करी तळाचं स्वरूप आलं होतं. काटेरी कुंपणाच्या तारा, रणगाडे, उंच मनोऱ्यावरून पहारा करणारे बंदूकधारी आणि नाकाबंदी.. एकूण दृश्य भयकारी होतं. सुदैवाने एक ओळखीचा चेहरा दिसला. माझ्याच छावणीत राहत असलेली पुण्याची चंद्रकला जयस्वाल, जी इथे पोषण विशेषज्ञ म्हणून आलेली होती. आम्हाला राहायला चक्क चौकोनी डबे- शिपिंग कंटेनर्स होते. या डबाबंद खोलीच्या आत मात्र सर्व सुखसोयी होत्या.

बेंटीयूमधील काही पोषण साहाय्य केंद्रांना मी चंद्रकलाबरोबर भेट दिली. आपापले लेंढार घेऊन आलेल्या आयांना सेवा कर्मचारी शिस्तीत नोंदवून घेत होते. दाखल झालेल्या मुलाच्या दंडाचा परीघ मापून त्याच्या आरोग्याचे निदान करण्यात येते आणि त्याची वर्गवारी केली जाते. त्याला औषधे आणि तयार उपचारात्मक आहार (Ready-to-Use Therapeutic Food) दिला जातो. त्याच्या योग्य संगोपनाचे धडे आणि प्रात्यक्षिकंही मातांना दिली जातात.

बरीच मुलं अतिशय अशक्त आणि मलूल होती. तोंडावरची माशी उडवण्याचे त्राणदेखील त्यांच्या अंगात नव्हते. माझ्या उभ्या आयुष्यात मी एवढय़ा माशा घोंघावताना कधी पाहिल्या नाहीत. अशा मुलांच्या बाबतीत आहाराबरोबरच खेळीमेळीचं वातावरण आणि क्रीडोपचार हेही तितकेच महत्त्वाचे आहेत.

ही केंद्रे गावकऱ्यांच्या राहत्या वस्तीमध्येच कार्यरत होती. निर्वासितांसाठी Humanitarian Hub च्या शेजारीच एक विस्तीर्ण जागा मुक्रर केलेली होती- जिच्यात त्यांची वसाहत छान फुलली होती. मंडळींनी ओळीनं आपापल्या टुमदार झोपडय़ा उभारल्या होत्या.

मी बऱ्याच घरांना भेट दिली. सगळी घरं अतिशय स्वच्छ होती. प्रत्येक घरात एक दोन खुर्च्या आणि नायलॉन नवारीने विणलेली एक तरी खाट होती. घरा घरांतून माझं मनापासून हसून स्वागत झालं. मात्र चुकूनही कुणी कधी ‘काही घेणार का?’ असं विचारलं नाही. आदरातिथ्य कुठून करणार बापडे? त्यांच्याकडे काहीसुद्धा नसतं. दुभाष्यामार्फत आमची मनमोकळी प्रश्नोत्तरं मात्र होत. अधिक करून बायकाच बाहेर कमवून घरचा भार रेटतात. शिवाय मुलांची देखभाल, स्वयंपाकपाणी त्याच करतात. बायका कामसू आणि पुरुष महाआळशी अशी स्थिती होती. त्यातून त्यांच्या समाजात बहुपत्नीत्व मान्य असल्यामुळे एकेका पुरुषाच्या तीन-चार बायका आणि खच्चून पोरवडा असाही प्रकार आढळून आला.

बायका किडकिडीत आणि विलक्षण उंच. त्यांच्या डोक्यावर केस जवळजवळ नसतातच. खोटय़ा केसांचे टोप त्या मोठय़ा हौसेनं घालतात. सगळ्या जणींची केशभूषा एकसारखी. माझी लांब पोनीटेल पाहायला पोरं धावून धावून येत असत. या मुलांना खेळणी हा प्रकार अजिबात ठाऊक नाही. युनिसेफचे भले कर्मचारी मग रिकामी झालेली पुठ्ठय़ाची खोकी एकमेकांना डकवून मोटारी, ट्रक बनवत. त्यांना दोरी बांधून मग उघडीनागडी पोरं ‘गाडी गाडी’ खेळत. आपली मोटार पळवताना होणारा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांपासूनसुद्धा अनेक प्रकारची खेळणी बनवण्यात येत. नाही म्हणायला, फुटबॉल मात्र या देशात अतिशय प्रिय आहे. रिकामी जागा कुठे सापडली की हिरीरीनं पोरं ‘फुटी’ खेळतात.

या मंडळींचा स्वयंपाक काटय़ाकुटय़ाच्या सरपणावर शिजतो. हे एकच इंधन त्यांना ठाऊक आहे. त्यांना ठरावीक रेशन फुकट मिळतं. जेवण म्हणाल तर अतिशय बेचव. ‘वाला वाला’ नावाचे भरडय़ा धान्याचे उकडे लाडू, ‘किस्सरा’ ही आंबवलेली धिरडी, आणि तांबडय़ा ज्वारीची (sorghum) पेज, चवीला शेंगदाण्याचे लोणी, क्वचित मांस वा उकडलेली पालेभाजी हे त्यांचे प्रमुख पदार्थ. जेवण हे जिभेचे चोचले पुरवायला नाही, तर केवळ उदरभरणापुरते असते. दुकाने या वस्तीवाल्यांच्या कोष्टकात बसत नाहीत. विक्रेते आपला माल- शेंगदाणे, मांस, गोळ्या, कसल्याशा सरबताच्या बाटल्या- जे असेल ते – उपडय़ा बादलीवर मांडतात.

त्यानंतर मी मुक्काम इतर प्रांतांकडे वळवला. अवील नामक एका गावात गच्च आमराई पाहून माझे भारतीय डोळे तृप्त झाले. एका आंब्याच्या झाडाखालीच आमची मीटिंग झाली. सभोवतालची झाडं डेरेदार होती आणि कैऱ्यांनी लगडली होती. अवीलच्या आसपासच्या खेडय़ांमधूनसुद्धा पोषणाची लाट उसळली होती. पालक आणि कर्मचारी मिळून कुपोषणाच्या राक्षसाला हद्दपार करण्यासाठी झटत होते. या विभागात एकूण शांतता नांदत होती, त्यामुळे त्यांच्या कामाचा उरक दांडगा वाटला.

अखेर मी जुबाला परतले. युनिसेफच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि साथी संस्थांबरोबर एक जोरदार चर्चासत्र झालं. त्यात अनेक मुद्दय़ांवर ऊहापोह झाला. माझा एकूण अनुभव, मला जाणवून आलेले प्रकल्पाचे फायदे, पालकांचा प्रतिसाद, अनुभवलेल्या अडचणी- अशा विषयांवर मनमोकळ्या गप्पा झाल्या. मला माझा सरसकट अभिप्राय विचारला तेव्हा मी म्हटलं, ‘एकूण वातावरण निश्चित उमेद वाटावी असं होतं. एक मरगळलेला देश सावरू पाहतो आहे. चाचपडत आपला मार्ग शोधतो आहे, हे खरंच विलक्षण आहे. बालकांसाठी चालवलेलं हे अभियान खरोखर कौतुकास्पद आहे.’ पुढे मनात मी म्हटलं, दक्षिण सुदानच्या मानाने भारत किती सक्षम, सुविद्य आणि बलाढय़ आहे, मग आमच्या देशात लाखो दुर्दैवी बालकं कुपोषणाची शिकार का होतात? त्यांच्यासाठी हजारो ठोस उपक्रम जाहीर होतात, पण ते कधी तडीला जाताना का दिसत नाहीत? दुर्दैव त्या बालकांचं, आणि त्यांची दुर्दशा थंडपणाने पाहणाऱ्या आम्हा भारतीयांचं. अर्थात हे बंडखोर विचार मी भर सभेत नाही बोलून दाखवले, मनातच ठेवले.

‘‘परतण्यापूर्वी तू नाईल नदीला भेट दिली पाहिजेस.’’ एक श्रेष्ठी म्हणाला, ‘‘ठाऊक आहे? जो कुणी नाईल नदीचं पाणी पिईल, तो हमखास या देशाला पुन्हा भेट देईल, असा इथल्या लोकांचा दृढ समज आहे.’’

मी आवर्जून नाईल नदीच्या किनाऱ्यावर गेले. तिच्या संथ वाहणाऱ्या पात्राचं दर्शन मी कदापि विसरणार नाही. इतके दिवस रखरखीत उजाड परिसर, मलूल देशवासी, काटेरी तारा, रणगाडे आणि सैनिक बघून विटलेल्या डोळ्यांचं नाईल नदीचं शांत सौंदर्य पाहून पारणं फिटलं. भोवतालचा हिरवा परिसर डोळ्यात सामावत मी नदीकाठच्या एका रेस्तराँमध्ये नाईलचं बाटलीबंद पाणी पीत राहिले.

jai.ghanekar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2019 4:04 am

Web Title: south sudan overcoming malnutrition abn 97
Next Stories
1 शापित नायक
2 असा धिंगाणा अवेळी..
3 जगणे.. जपणे.. : हवे जागतिक धोरण निर्माण
Just Now!
X