31 May 2020

News Flash

नाटकवाला : स्पॉट ऑन

अंतर्मनातील नाटय़ उसळून काढायला उपयोगी पडला तो कॉलेजच्या फीमधून देण्यात आलेला फ्री रंगमंच.

(संग्रहित छायाचित्र)

मकरंद देशपांडे

माझं जन्मस्थान मुंबई. रंगभूमीवरचं जन्मस्थान आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा- आयएनटी, उन्मेष, इप्टा, मुन्शी आणि युनिव्हर्सिटी, इत्यादी. नरसी मोनजी कॉलेजमध्ये असताना नट म्हणून आणि ग्रॅज्युएट झाल्यावर लेखक म्हणून, तर स्पर्धामुळे मला रंगकर्मी म्हणून शिस्त लागली. वर्गात अभ्यास केला किंवा नाही केला, पण तालीम केली- कधी दिवसा, कधी रात्री. एकांकिकेत सतत भाग घेतला नसता तर त्या वयातलं खूप काही राहून गेलं असतं. अंतर्मनातील नाटय़ उसळून काढायला उपयोगी पडला तो कॉलेजच्या फीमधून देण्यात आलेला फ्री रंगमंच.

प्राथमिक फेरीतनं अंतिम फेरीत निवडलेल्या एकांकिकेचा भाग असणं हे कौतुकास्पद होतं. कॉलेजच्या नोटीस बोर्डवर, जो सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी उभा केलेला असायचा. त्यावर आपलं नाव नसलं तरी आपण काम करत असलेल्या एकांकिकेचं नाव वाचणं, कधी जवळून, कधी दुरून, तर कधी विद्यार्थी ते वाचत असताना पाहून अभिमान वाटायचा. त्यातून काही नाटय़प्रेमी शिक्षक हाक मारून शाबासकी द्यायचे. गेटवरच्या वॉचमनला तर एवढा आनंद व्हायचा की, त्याला वाटायचं या पोरांच्या मेहनतीचं चीज झालं. कॉलेजचे तास संपल्यावर तालमी असो वा नसो, आम्ही कॉलेजमध्येच. आवारात रेंगाळणारे आपला वेळ फुकट घालवत नाहीयेत याची साक्ष म्हणजे नोटीस बोर्ड. मग अंतिम फेरी पाहायला आमच्या मंजिरी गोंधळेकर, भरत नाईक, गोविंद झा हे मराठी, गुजराती, हिंदी वाङ्मय मंडळाचे प्रमुख. आणि अफलातून प्रतिसाद देण्यासाठी आलेली कॉलेजची बरीच मित्रमंडळी! नाटय़गृहाबाहेर (साहित्य संघ, बिर्ला मातोश्री, क्लब हाऊस, भारतीय विद्या भवन, तेजपाल सभागृह ) एक उत्सवी वातावरण असायचं. काही दरवर्षी हमखास अंतिम फेरी गाठणारी तर काही नावंही माहीत नसलेली कॉलेजेस असायची. परीक्षक कोण आहेत अंतिम फेरीचे आणि त्यांना काय आवडतं याची उत्सुकता असायची. चुकून एखाद्या परीक्षकाने कधी काळी वाईट नाटक केलं असेल तर उगाच त्याला व्हिलन बनवायचं. एखाद्या नामचीन परीक्षकामुळे हुरूप यायचा. कारण त्यांनी आपलं काम पाहणं याचंच मुळी अप्रूप वाटायचं.

 

व्यावसायिक रंगभूमीचे मातब्बर रंगकर्मी आवर्जून अंतिम फेरी पाहायला यायचे. त्यांच्या असण्यानं फार बरं वाटायचं. दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी विनय आपटे, ज्यांच्या आवाजानं त्यांचं अस्तित्व साधारणपणे रस्त्यावरून बॅकस्टेजपर्यंत सहज पोहोचायचं. त्यांच्याकडे पाहून आत्मविश्वास वाटायचा. आमचे दिग्दर्शक (डॉ. अनिल बांदिवडेकर) आपुलकीनं बोलायचे तेव्हा वाटायचं, आपलं नाटक खूपच चांगलं होणार. का कुणास ठाऊक, पण अशी ज्येष्ठ मंडळी फारच मोकळ्या आणि मोठय़ा मनानं एकांकिका पाहायला यायची. जगात काहीही चाललं असलं तरीही त्या संध्याकाळी सगळ्यांचं लक्ष फक्त अंतिम फेरीकडे. मला आठवतंय, मुंबईत गणपती दूध पितोय अशी बातमी सगळीकडे पसरली होती. अनेकजण घरांसमोर, दुकानांसमोर गोळा होऊन तिथला गणपती दूध पीत आहे का हे पाहत होते. गणपती साक्षात स्वत: मुंबईत, पण साहित्य संघातल्या रंगकर्मीना मात्र त्यावेळी अंतिम फेरीत रस होता. तेव्हा जाणवलं की रंगमंचावर काम करणं म्हणजे देवाचं येणं आहेच. प्रयोगाआधी गणेश वंदना करतोच की. ज्यांना याची सवय नसेल त्यांना कधीतरीच दर्शन होणार. अंतिम फेरीत जवळपास सगळ्याच एकांकिकांचे प्रयोग अप्रतिम..त्यामुळे परीक्षकांवर खूपच सकरात्मक दबाव. निकाल ऐकताना अंगावर शहारे यायचे- आपल्या एकांकिकेचं नाव असलं, नसलं तरीही!

खूप वर्षांनंतर ‘लोकसत्ता’ आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची- ‘लोकांकिके’ची अंतिम फेरी होती. मला  अतिथी म्हणून बोलावण्यात आलं होतं. थिएटरला पोहोचलो आणि आठवणी जाग्या झाल्या. अगदी सहज नाटकाचं स्क्रिप्ट वाचताना मागच्या पानावर गेल्यासारखं वाटलं! अंतिम फेरीच्या एकांकिका पाहताना अंगावर काटा आला. बदललं नव्हतं ते स्पिरीट! बोलण्याआधी मी काही विचारच केला नव्हता, पण जेव्हा माईकसमोर उभा राहिलो तेव्हा अंधारातल्या निकालासाठी आतुर असलेली आणि समोर बसलेली युवा मंडळी, त्यांच्या सीनिअरचे- म्हणजे माझेच विचार जाणून घेण्यासाठी उत्सुक होती. मला बोलण्याचा धागा सापडला आणि गाडी अनुभवाच्या रुळावरून भरधाव सुटली- ती थांबली एका भावविवश होऊन दिलेल्या वचनानं. मी म्हणालो की, माझ्यासारखे स्पर्धेतून आलेले रंगकर्मी फक्त अतिथी म्हणून येऊन एक भाषण देऊन चालणार नाही. पुढच्या वर्षी मी या निकालाच्या आधी भाषणाऐवजी एखादी एकांकिका करीन, जी मी लिहीन, दिग्दर्शित करीन आणि अभिनयसुद्धा! प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात मी भाषण संपवून पुन्हा खुर्चीवर बसलो.

एकांकिका जरी वर्षभरानं करायची झाली, तरी त्याची तयारी ही अगदी विषय निवडण्यापासून आधीच करावी असं वाटलं, याचं कारण मुलांचा उत्साह आणि स्पर्धेनं दिलेलं अनमोल शिक्षण! मी ‘लोकसत्ता’ नियमित वाचायला सुरुवात केली. मला नेहमी असं वाटतं की, आपल्याला जे करायचं असतं त्यात एक प्रकारचं नातं असावं आणि म्हणून ‘लोकसत्ता’तले संपादकीय, लेख वाचायला लागलो. एक दिवस युरोपच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संपाविषयी बातमी वाचली आणि हबकलो. शास्त्रज्ञ संपावर जातात म्हणजे काय करतात? या प्रश्नाचा विचार करायला लागलो. एखाद्या विषयावर चाललेला शोध थांबवणं म्हणजे संप का?

शास्त्रज्ञांचं डोकं विचार करणं कसं थांबवू शकेल? असे प्रश्न मनात घोळायला लागले आणि असं वाटलं की, या प्रश्नांची उत्तरं देता देता किंवा जाणून घेता घेता नाटक लिहावं.

एक शास्त्रज्ञ जेव्हा उघडपणे सांगतो की विकास हवा असेल तर वैज्ञानिक शिक्षण आणि संशोधनासाठी अमुक एक बजेट द्यायला हवं, नाही तर भाषणं ही त्या त्या सभांसोबत विरून जातात. तेव्हा या गोष्टीवर एक मंत्री एका कार्यक्रमामध्ये दारू पिऊन खूप चिडतो. शास्त्रज्ञ वाद घालण्यासाठी म्हणून नाही तर त्याला कळावं म्हणून वास्तविक माहिती देतो. त्यामुळे मंत्र्याचा अपमान होतो. शास्त्रज्ञाची चौकशी केली जाते. ‘देशाचं नाव खराब करणारा’ – असा ठपका त्याच्यावर ठेवला जातो. समाजातले काही सरकारभक्त सोशल मीडियावर पटापट ग्रुप करून त्या शास्त्रज्ञाला सळो की पळो करून सोडतात. चौकशीमध्ये त्याच्यावर असे काही आरोप केले जातात की, ज्याच्यावर त्याचा विश्वास बसत नाही. चौकशी समितीव्यतिरिक्त बाहेर घरच्यांना धमक्या, शिवीगाळ. चिडून शास्त्रज्ञ सरकारला आवाहन करतो. त्याच्यावर हल्ला होतो. मोटारसायकलवरून गोळ्या झाडल्या जातात. त्यातून तो वाचतो. त्याच्या शरीराची एक बाजू पूर्ण अधू होते.

त्याला एक मुलगा, एक मुलगी आणि प्रेमळ बायको असते- जिला शास्त्रज्ञाची बायको होणं म्हणजे काय हे कळलेलं असतं. मुलगा मात्र भरकटत जातो. आपल्या वडिलांच्या हल्ल्यानंतर त्याचा देशाच्या नैतिक, तात्त्विक मूल्यांवरचा विश्वास उडतो. तो दारूडा होतो. त्याची बहीण त्याच्यावर खूप रागावते. कारण तोही वडिलांसारखा हुशार, पण मनानं हळवा! आईचं नाव जास्वंदी. तिनं आपल्या नावाप्रमाणे नवऱ्याच्या बुद्धीला वाहून घेतलं, पण आता अस्थमाग्रस्त आहे. मुलगी एका कंपनीत ुमन रिसोर्स विभागात काम करते आहे. आईला तिची मदत होते आहे. मुलाची खूप चिंता. मुलाला आपल्या वडिलांवर झालेल्या अन्यायाचं उत्तर सरकारकडून हवं आहे. तुम्ही विचार करत असाल या सगळ्याचा शेवट काय? शेवट हा गोड कसा होणार? शोकांतिकेत शेवट केला तर ती हारच, मग तिसरा मार्ग कोणता?

शास्त्रज्ञानं आपल्या हुशार मुलाला आणि हुशारच मुलीला एकत्र घेऊन आईच्या आधारानं आपलं वेगळं संशोधन सुरू करणं.. एकच आशा बाळगून की, कुणीतरी सरकारी प्रतिनिधी खरेपणाला जिवंत ठेवेल!

हे नाटक लिहिताना मी सोल्यूलोकी (स्वगत) हा फॉर्म वापरला. आधी शास्त्रज्ञ हा चौकशीसाठी येतो. त्याची चौकशी अर्धा तास, मग पंधरा मिनिटं त्याच्यावर आरोप, मग त्याच्यावर गोळ्या झाडल्या जातात. मग दारूडा मुलगा येतो. तो आपला राग वीस मिनिटं ओकतो. त्याची बहीण कामावरून परत येत असते, तिच्या हातात भाजीच्या पिशव्या असतात आणि तेव्हाच ती भावाला रस्त्यावर (रंगमंचावर) आरडाओरडा करताना पाहते. त्या दोघांत भांडण, मग भावाचं निघून जाणं आणि मग बहीण प्रेक्षकांसमोर तिची खरी परिस्थिती सांगते; ज्यात तिला असं वाटतं की, एका हुशार मुलानं हार मानून असं जगण्यापेक्षा आत्महत्या करावी. मग आई येते. ती आपल्या मुलाला शोधत येते. त्यामुळे तिला धाप लागलेली आहे. तीही पंधरा मिनिटं बोलते. त्यात ती तिचा विवाह, प्रेम, एका शास्त्रज्ञाबरोबरचं जीवन आणि मग त्याच्या पांगळेपणावर बोलते.

या चारही स्वगतांना जोडणारा दुवा म्हणजे शेवटचा प्रवेश, जेव्हा शास्त्रज्ञ काठी टेकत पाय खेचत येतो. आपल्या मुलाला, मुलीला अस्पष्ट शब्दांत, हातवाऱ्यांनी देश आणि जीवनावरचा क्रोध सोडायला सांगतो. प्रेक्षकांकडे पाहून एकच म्हणतो की, माझा मुलगा-मुलगी शास्त्रज्ञ होऊ शकले असते.. या देशानं दोन शास्त्रज्ञ गमावले आहेत.

यात बायकोची भूमिका समिधा गुरुनं अगदी आपल्या नावाप्रमाणं नाटय़ संहितेला समर्पित केली. तिच्या संवादफेकीत आर्तता, दु:ख आणि प्रेम होतं. असीम हट्टंगडीनं हरवलेला, हुशार, रागावलेला मुलगा साकार करताना नट म्हणून लाज सोडली होती. त्यामुळे अगदी पँटमध्ये केलेल्या सुसूमुळे ओली झालेली पँट (नशेत) घालून राग ओकताना कोणतीही मानसिक (शरमेची) भिंत त्याच्या अभिनयाआड आली नव्हती. किंबहुना त्यातला ब्लॅकह्युमर प्रेक्षकांपर्यंत पोहचला. आकांक्षा गाडेनं मुलगी साकारताना घरातील भीषण वास्तव मांडताना आतडं पिळवटून उठेल अशी भावनांची तीव्रता कोणताही आक्रोश न करता दाखविली. तिचं आणि असीमचं भांडण हे माझ्यासाठी (भाऊ-बहिणीचं) एक लेखक म्हणून शहाणपण देऊन गेलं. नाटक मराठीत लिहिलं. लोकांकिकेच्या प्रयोगाला वेळ होता. पृथ्वीला ६ वाजताचा प्रयोग मराठीत आणि पाठोपाठ ९ चा हिंदीत केला. हाही एक प्रयोगच. कारण त्याच नटांना तासाभरात तेच हिंदीत बोलायचं होतं. अमोल गुप्ते मला म्हणाला की, हे नाटक म्हणजे सगळ्यात धाडसी प्रयोग आहे. त्यातलं भाष्य, त्याची मांडणी आणि अभिनय.

मी शास्त्रज्ञाची भूमिका साकारताना लाईटच्या स्पॉटला चौकशी समिती बनवलं आणि मग स्पॉट हेच एक पात्र झालं. प्रकाशयोजनाकार आमोघ फडकेनं आपलं पात्र फारच प्रयोगशीलतेनं अर्थपूर्ण केलं. नेमका लोकांकिकेचा प्रयोग होता तेव्हा मी मुंबईबाहेर होतो. पण मुलगा, मुलगी आणि आईचा प्रवेश मुलांनी डोक्यावर घेतला.

जय लोकसत्ता! जय स्पर्धा!

जय शास्त्रज्ञ! जय बायको!

mvd248@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2019 1:59 am

Web Title: spot on natakwala article makrand deshpande drama abn 97
Next Stories
1 संज्ञा आणि संकल्पना : शब्दांच्या पलीकडले
2 गवाक्ष : विश्वास..
3 परीकथेतील गाव- कोलमार
Just Now!
X