वास्को द गामाने शोध लावलेल्या केपटाऊनपासून वीस समुद्री मैल अंतर जहाजाने पार केले की रॉबिन आयलँड येते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युद्धकैदी तसेच समाजाने वाळीत टाकलेल्या महारोग्यांना ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या बेटाला सध्या वर्षांला जगभरातील ४० लाख पर्यटक भेट देतात. त्यात काळेही असतात आणि गोरेही. या बेटाच्या आकर्षणाचे कारणही तसेच आहे. दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्यांच्या राजवटीने नेल्सन मंडेल यांना तब्बल १८ वष्रे या बेटावरच्या तुरुंगात ठेवले होते. १९९४ मध्ये त्यांची सुटका झाली. आणि नंतर लगेचच ते राष्ट्राध्यक्षही झाले. १९९७ साली या बेटाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आला. येथील तुरुंग दुसरीकडे हलविण्यात आला. तुरुंग असलेल्या या बेटावर पर्यटनाच्या माध्यमातून कोटय़वधी रँड मिळू शकतील असे या देशातील राजवटीला तेव्हा स्वप्नातही वाटले नसेल. पण आज हे बेट आफ्रिकेत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र बनले आहे. या बेटावरील पूर्वीच्या तुरुंगातील कक्ष ए मधील चौथ्या क्रमांकाच्या कोठडीजवळ पर्यटक जेव्हा जातात तेव्हा मंडेला यांना इथे भोगाव्या लागलेल्या यातनांच्या आठवणींनी त्यापैकी अनेकांचे डोळे पाणावतात.
सध्या जराजर्जर अवस्थेत असलेल्या मंडेलांसाठी या कोठडीसमोर उभे राहून प्रार्थना करणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यातही गोऱ्यांचा सहभाग लक्ष वेधून घेणारा आहे. ‘आफ्रिका म्हणजे मंडेला’ या उक्तीचा प्रत्यय या देशात फिरताना ठायी ठायी येतो. आफ्रिकन जनता आदराने त्यांना ‘मडीबा’ संबोधते. याच नावाने ‘त्यांच्या प्रकृतीला आराम मिळो’ अशी प्रार्थना करणारे फलक देशभर सर्वत्र लागलेले आहेत. दक्षिण आफ्रिकेमधील लोकशाहीचे वयोमान अवघे १८ वर्षांचे आहे. मंडेला अध्यक्ष झाल्यानंतरच साऱ्या जगाचे या देशावरील र्निबध उठले आणि त्याच्या प्रगतीला खरी सुरुवात झाली. इतक्या कमी कालावधीत या देशाने साधलेली प्रगती मात्र थक्क करणारी आहे. ‘हे सर्व मंडेलांमुळे घडले..’ अशी भावना सर्वसामान्य माणसं बोलून दाखवतात. आमचा गाइड अब्दुल रशीद याला ‘मंडेला कुठे राहतात?’ असे विचारले असता ‘आफ्रिकेतील प्रत्येक घरात त्यांचा वावर आहे,’ असे उत्तर मिळाले. यावरून या महान नेत्याच्या लोकप्रियतेची कल्पना येते.
पॅसिफिक व अरबी महासागराच्या किनाऱ्यावर वसलेल्या या देशात प्रेक्षणीय स्थळांची अजिबात वानवा नाही. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या केपटाऊनजवळच सील आयलँड आहे. जमिनीवर चालणारा व हातवारे करणारा सील नावाचा मासा या बेटावर पर्यटकांचे भरपूर मनोरंजन करतो. या बेटापासून ५० कि. मी. पुढे गेले की बोलसे बीचवर पेंग्विन पक्ष्यांचे थवे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. उभयचर असलेला हा पक्षी अतिशय दुर्मीळ म्हणून ओळखला जातो. केपटाऊनच्या भोवती समुद्रकिनाऱ्याच्या कडेला खडकाळ जमीन व त्यावर उगवलेल्या गवताळ वनस्पतींचे मोठे कुरण आहे. हा संपूर्ण परिसर आफ्रिकेने ‘नेचर रिझव्‍‌र्ह’ (नैसर्गिक ठेवा) म्हणून घोषित केला आहे.
या भागातून प्रवास करताना आपल्या गाडीच्या बाजूने चालणारे अनेक शहामृग दृष्टीस पडतात. हे दृश्य मोठे विलोभनीय असते. या देशात गोऱ्यांची वसाहत असताना इंग्लंडचे राजघराणे केपटाऊनला आले की ‘माऊंट नेल्सन’ या राजवाडय़ात थांबायचे. आता या राजवाडय़ाचे रूपांतर हॉटेलमध्ये झाले आहे. या परिसरात असलेला महात्मा गांधींचा पुतळा भारतीय पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. केपटाऊनमधील सर्वात सुंदर जागा आहे नेबरहूड गुडस् मार्केट! आता ‘फूड मॉल’ या नावाने ओळखला जाणारा हा खाद्यपदार्थाचा बाजार आपल्याकडे भरणाऱ्या आठवडी बाजाराची आठवण करून देतो. वाईनचा ग्लास हातात घेऊन या बाजारात जायचे आणि पाहिजे तो खाद्यपदार्थ गरमागरम तयार करून घेऊन त्याचा आस्वाद घेत गर्दीतून धक्के खात नुसतेच फिरायचे. या बाजारात जगभरातले खाद्यपदार्थ लगेचच तयार करून मिळतात. त्यामुळे पर्यटक इथे प्रचंड गर्दी करतात. प्रत्येक स्टॉलवर विविध प्रकारचे मांस, हिरव्या भाज्या ठेवलेल्या असतात. आपण ऑर्डर दिली की लगेचच पदार्थ तयार करून मिळतो. पण या बाजारात बसायला जागा नाही. खाणे-पिणे उभ्या उभ्या किंवा फिरत फिरत करायचे आणि तृप्तीचे ढेकर देत बाहेर पडायचे. हे करताना वेळ कसा जातो, हे कळतही नाही.
पर्यटनावर सर्वात जास्त लक्ष देणाऱ्या या देशाने वाईनचा प्रसार करण्याचे धोरण सध्या आखले आहे. जगभरात युरोप खंडातील वाईनचा दबदबा आहे. येत्या दहा वर्षांत वाईन उत्पादनाच्या क्षेत्रात हे स्थान मिळवण्याच्या उद्देशाने स्पध्रेत उतरलेल्या या देशात प्रत्येक ठिकाणी वाईनला प्रोत्साहन दिले जाते. आम्ही वर्जीलिजीन या वायनरी फार्मला भेट दिली. सुमारे ११०० हेक्टरमध्ये पसरलेला हा फार्म पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचा आहे. शनिवार-रविवार या सुटीच्या दिवशी या फार्मवर पूर्ण दिवस घालवण्याच्या बेताने पर्यटक येतात. या ठिकाणी असलेल्या विविध उपाहारगृहांत अत्यंत उत्तम प्रतीचे खाद्यपदार्थ आणि द्राक्ष तसेच अन्य फळांपासून तयार केलेली वाईन मिळते.
आफ्रिकन जेवण हा तीन तास चालणारा प्रकार आहे. आधी वाईन, मग भाजलेले ब्रेड, नंतर मेन कोर्सचे जेवण, नंतर मिनी व सर्वात शेवटी मेन डेझर्ट असे लांबलचक चालणारे हे भोजन झाले की चालण्याचा मनस्वी कंटाळा येतो. प्रत्येक वायनरीमध्ये आफ्रिकन जेवणाची पद्धती वेगवेगळी असली तरी त्यासाठी लागणारा तीन तासाचा वेळ मात्र सर्वत्र सारखा आहे. आफ्रिकेत मुस्लिमांची संख्या बरीच मोठी आहे. या देशातील वसाहतवाद्यांनी भारतातून ऊसतोडणी कामगार नेले तसेच मलेशियातून मुस्लीम कामगार नेले. आफ्रिकेत मुस्लिमांना ‘केपमलाया’ म्हणतात. प्रत्येक शहरात मुस्लिमांच्या वेगळय़ा वस्त्या आहेत आणि तिथे सरकारकडून फारशा सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत हे दिसून येते. मंडेलांच्या मंत्रिमंडळात चार मुस्लीम मंत्री होते. मात्र, त्यांनीही मुस्लिमांच्या समस्यांकडे फारसे लक्ष दिले नाही अशी इथल्या मुस्लीम समुदायाची तक्रार आहे. तरीही इथे मुस्लीम लोक सुखी आहेत. कारण हा देश दहशतवादापासून मुक्त आहे. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलेल्या जगभरातील मुस्लिमांनी आफ्रिकेत येणे सुरू केले. त्यामुळे येथील मुस्लीम वस्त्यांमध्ये घरांच्या किमती वाढल्या, असे स्थानिक सांगतात. आम्हाला केपटाऊनमधील अमीना करीम या मुस्लीम महिलेच्या कुटुंबात जाऊन रात्रीचे जेवण तयार करण्याची संधी मिळाली. आम्ही तयार केलेले जेवण या कुटुंबाने अगदी चवीने खाल्ले. त्यांनी आम्हाला ‘कूकसिस्टर’ (कूक म्हणजे केक व सिस्टर म्हणजे भावाला देण्यात येणारा गोडपदार्थ) हा गोड पदार्थ करून खाऊ घातला.
जगभरात नव्याने निश्चित करण्यात आलेल्या सात आश्चर्यात समाविष्ट झालेले केबल माऊंटेन हे चार हजार फूट उंचीवरील ठिकाण पर्यटकांची गर्दी खेचणारे आहे. केबलकारचा वापर करून त्यावर जाणाऱ्या पर्यटकांना शिखरावरून समुद्राचे विशाल दर्शन घडते. आकाराने मोठय़ा असलेल्या दक्षिण आफ्रिकेची लोकसंख्या मात्र केवळ पाच कोटी इतकीच आहे. त्यापैकी तीन कोटी लोक केपटाऊन, डरबन व जोहान्सबर्ग या तीन शहरांत राहतात. उर्वरित दोन कोटी लोक इतर शहरे व खेडय़ांमध्ये राहतात. सर्वात जास्त भारतीय लोक डरबनला आहेत. या शहरात व्हिक्टोरिया स्ट्रीटवर असलेला बाजार बॉम्बे मार्केट म्हणून ओळखला जातो. या शहरात अनेक रस्त्यांना महात्मा गांधींचे नाव दिले गेले आहे. डरबनपासून शंभर कि. मी. अंतरावर असलेल्या कार्कलूफ परिसरात उंच पर्वतरांगा व घनदाट जंगल आहे. या जंगलात लोखंडी दोराच्या साहाय्याने एका पर्वतावरून दुसऱ्या पर्वतावर जाण्याचा साहसी खेळ पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. सनसिटी, वेगास ऑफ आफ्रिका हा भव्य कॅसिनो अशी अनेक पर्यटनस्थळे या देशाने नव्याने विकसित केलेली आहेत.
आफ्रिकेत जरी गेल्या १८ वर्षांपासून कृष्णवर्णीयांच्या हाती सत्ता असली तरी इथला वर्णभेद मात्र पूर्णपणे नष्ट झालेला नाही, याची जाणीव वृत्तपत्रांतून येणाऱ्या बातम्यांमधून होते. आज अनेक महत्त्वाच्या पदांवर कृष्णवर्णीय विराजमान झालेले दिसत असले तरी जमिनीची मालकी मात्र गोऱ्यांकडे आहे. त्यामुळे वाईन उद्योग, जंगल सफारी यावर गोऱ्यांचेच नियंत्रण आहे. स्वच्छता व उत्तम पायाभूत सुविधांच्या बाबतीत मात्र या देशाने अल्पावधीत बरीच प्रगती केली आहे. अगदी दुर्गम भागातसुद्धा गुळगुळीत रस्ते आढळतात. वाटेत क्वचित एखादा खड्डा आलाच तर वाहनचालक पर्यटकांची माफी मागतो. या देशात गरिबीचे प्रमाण भरपूर असूनही शहरे व लहान खेडीसुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत बरीच पुढे आहेत. मोठय़ा शहरांमध्ये झोपडपट्टय़ा आहेत. परंतु त्या आणखीन वाढू नयेत म्हणून त्या क्षेत्राला चारही बाजूने भिंती व तारांचे कुंपण घालून बंदिस्त केलेले आहे. प्रत्येक झोपडीधारकास पक्की घरे बांधून देण्याचा कार्यक्रम येथील सरकारने आता हाती घेतला आहे.
या देशातले ‘नाइट लाइफ’ मात्र धोकादायक आहे. बेरोजगारीमुळे व्यसनांच्या आहारी गेलेली तरुणाई रात्री पर्यटकांना लक्ष्य करते. त्यामुळे रात्री फिरू नका, असे सर्वाचे सांगणे असते. या देशात रेल्वेचे जाळे असले तरी रेल्वेत मारामारी, खून, अपहरण अशा घटना नेहमी घडतात. त्यामुळे पर्यटकांना रेल्वेचा प्रवास करू दिला जात नाही. असे असले तरी उत्तम पोलीस यंत्रणेमुळे पर्यटकांना त्रास होईल अशा घटना कमी घडतात.
आफ्रिका व भारत या दोन देशांना जोडणारा सर्वात मोठा दुवा आहे तो महात्मा गांधी व त्यांचा डरबनजवळचा फिनिक्स आश्रम. एका झोपडपट्टीच्या शेजारी असलेल्या या आश्रमात पाऊल ठेवले की राष्ट्रपित्याच्या कार्याचे दर्शन घडते. १९८५ मध्ये गोऱ्यांनी हा आश्रम पाडून टाकला. मंडेला सत्तेवर येताच त्यांनी १९९५ मध्ये या आश्रमाची पुन्हा उभारणी केली. इला गांधी अध्यक्ष असलेल्या ट्रस्टकडून या आश्रमाचे सध्या संचालन केले जाते. या आश्रमाच्या आवारात कस्तुरबा कन्याशाळा आहे. महात्मा गांधींच्या खोलीत ते वापरत असलेली खुर्ची मोडतोडीनंतरही शाबूत राहिली, असे पर्यटन विभागाचा कर्मचारी आवर्जून सांगतो. या आश्रमात जगभरातील अनेक देशांत झालेल्या लोकशाहीवादी लढय़ाचा सचित्र इतिहास साकारण्यात आला आहे. मंडेलांच्या लढय़ाचे प्रेरणास्थान महात्मा गांधीच होते. त्यांचा छापखाना मात्र मोडतोडीत नष्ट झाला, असे येथील कर्मचारी सांगतो. पंधरा दिवसांच्या सहलीत प्रत्येक युरोपीयन देशात एकेक दिवस घालविण्यापेक्षा दहा दिवस दक्षिण आफ्रिकेत घालवले तर तोच अनुभव मिळू शकतो असे हा देश फिरताना सतत जाणवत राहते.