News Flash

अंतर्नाद : चलो री माई औलिया के दरबार

इस्लाम हा आज जगातील सर्वव्याप्त धर्म आहे.

|| डॉ. चैतन्य कुंटे

स्थळ : दिल्ली, काळ : १३ वे शतक.

एकदा शेख निझामुद्दीनकडे कोणी पाहुणे आले. त्यांच्या खातरदारीसाठी वाणसामान हवे होते.

वाणी म्हणाला, ‘‘उधार देणार नाही, तुम्ही काही तरी गहाण ठेवा.’’

शेखसाहेब म्हणाले, ‘‘मी राग ‘पूर्वी’ गहाण ठेवतो. जोवर उधारी चुकती करणार नाही तोवर मी ‘पूर्वी’ राग ऐकणार नाही.’’

बरेच दिवस उधारी काही चुकवता आली नाही. म्हणून पूर्वी रागही ऐकता आला नाही. त्यामुळे शेखसाहेब आजारी पडले.

ही बातमी त्यांचा प्रिय शिष्य अमीर खुस्रोला कळल्यावर त्याने उधारीची परतफेड केली आणि ‘पूर्वी’ रागात ‘चलो री माई औलिया के दरबार, जहाँ पूर्वी दुल्हन बन बनी आई’ ही रचना गात तो शेखसाहेबांकडे आला.

‘पूर्वी’ राग ऐकताच शेखसाहेब तंदुरुस्त झाले!

भारतात इस्लामचा प्रसार मोठ्या स्तरावर होण्यासाठी कारणीभूत ठरलेला, सुफी संप्रदायाचा एक प्रवर्तक हजरत शेख निझामुद्दीन चिश्ती याला राग ‘पूर्वी’ अत्यंत प्रिय होता, त्याची ही कथा. इस्लाम आणि भारतीय संगीताच्या संबंधाविषयी अशा अनेक कथा प्रसृत आहेत.

इस्लाम हा आज जगातील सर्वव्याप्त धर्म आहे. विकिपीडियाच्या आकडेवारीनुसार, जगातील लोकसंख्येतील सर्वाधिक, म्हणजे ३१.११% जनता ख्रिश्चन असून त्याखालोखाल, म्हणजे सुमारे २५% जनता मुस्लीम आहे. या आकडेवारीवरून इस्लामचे जगभरातील वर्चस्व लक्षात येते. अन्य धर्मांच्या तुलनेत इस्लाम हा उशिराने उदयाला आलेला धर्म असूनही त्याचे वैश्विक उलथापालथीत आणि सांस्कृतिक घडामोडींतही लक्षणीय स्थान आहे.

इतर धर्मांशी इस्लामचे संबंध कायमच तणावाचे राहिले. आक्रमक, हिंसक व मूर्तिभंजकांचा धर्म अशी इस्लामची सर्वसामान्य प्रतिमा भारतातच नव्हे, जगभर आहे. मात्र एवढेच इस्लामचे रूप नाही. इस्लामच्या काही संप्रदायांनी समन्वयाची, सलोख्याची भूमिका घेतली आहे. इस्लामचे आक्रमण, काफिर म्हणून त्यांनी भारतातील हिंदूंची केलेली कत्तल, हिंदू मंदिरे व मूर्तींचा विध्वंस इ. अनेक बाबींमुळे भारतीय हिंदू समाजमन तर इस्लाम म्हटले की नकळत आक्रसतेच. वास्तविक इस्लाम आणि हिंदू धर्माच्या एकोप्याची शेकडो उदाहरणे आहेत. त्यातून भारतात संस्कृतिसंगमाची एक खरोखरच सुंदर अशी परंपरा निर्माण झाली. मात्र केवळ कुरूपताच दिसणाऱ्या कलुषित मनांना (हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्मांतील बरे!) त्यातील उदात्त-मंगल रूप कसे दिसावे? म्हणून मनाची कवाडे थोडी उघडू- तरच इस्लामच्या धर्मसंगीतातील ‘रंग’ आपल्याला दिसतील!

काही अभ्यासकांचे म्हणणे असे की, इस्लामी संस्कृती, इस्लामी संगीत हाच मुळात वदतोव्याघात आहे. एकमेकांत सतत भांडणाऱ्या व खूनखराबा करण्याऱ्या अरबी टोळ्यांना एकत्र करून महंमदाने स्थापन केलेला इस्लाम हा तलवारीच्या बळावर प्रदेश पादाक्रांत करत गेला. जेथे पसरला तेथील संस्कृती, विद्या, कला, संगीत त्याने अंगीकारले. त्यामुळे मूळची अस्सल इस्लामी म्हणावी अशी संस्कृती व संगीत नाहीच, ती इतरांची उसनवारी आहे. हे मत स्वीकारा वा नाकारा, एक मान्यच करावे लागेल की साहित्य, चित्र, स्थापत्य, संगीत अशा अनेक कलांत खास इस्लामी ठसा असलेली कला जोपासली गेली आहे आणि इस्लामचे या कलांसाठी मोठे योगदान आहे.

संगीताशी इस्लामचे नाते उगमाच्या काळापासूनच विरोधप्रीतीचे आहे! एका बाजूला ‘मौसिकी हराम’ म्हणून संगीताला निषिद्ध म्हणणाऱ्या इस्लामची सांगीतिक संपन्नता लक्षात घेण्यासारखीच आहे. संगीत, गायक-वादक, नर्तक यांवर इस्लामी शरीयत निर्बंध घालते. विशेषत: संगीतकार स्त्रियांवर त्यांचा फारच रोष. गेल्या काही दशकांत तर या कडव्या निर्बंधांच्या लाटा सततच कलाविश्वावर आदळलेल्या आपण अनुभवल्या आहेत. कधी रॉक बँडमध्ये मुली गायल्या म्हणून, तर कधी रिअ‍ॅलिटी शोमध्ये मुस्लीम मुलीने हिंदू भजन गायले म्हणून मुस्लीम धर्ममार्तंडांनी उठवलेली झोड व फतवा काढणे ही बाब इस्लामच्या कडव्या स्वरूपाची निदर्शक आहे. उलटपक्षी, अनेक मुस्लिम देशांत असलेली समृद्ध संगीत परंपरा व भारतीय संगीताविष्कारांत मुस्लिमांचा लक्षणीय सहभाग, योगदान या बाबी इस्लामच्या समावेशक रूपाच्या निदर्शक आहेत. यातील खरा इस्लाम कोणता? दोन्ही खरेच आहेत! धर्माचे स्वरूप स्थलकालानुसार पालटते आणि त्यामुळे संगीताशी असलेले त्याचे संबंधही सदैव एकसारखेच नसतात, हे सूत्र लक्षात घेतले तर इस्लाम आणि संगीताच्या बहुरंगी तानाबान्यांचे आकलन नेमकेपणे होईल.

इस्लाममध्ये ‘हलाल’ म्हणजे ग्राह्य व ‘हराम’ म्हणजे निषिद्ध अशा काही बाबी मानल्या आहेत. संगीताच्या संदर्भात हलाल मानलेल्या बाबींत अल्लाचे नाव उच्चारणे, ते उच्चारताना भावावेगाने स्वरांत चढउतार करणे, ते शब्द लयीत उच्चारणे, तसेच अलीच्या नावाने शोक करणे, धर्मतत्त्वे वा धर्मयात्रेला प्रोत्साहन देणारे गीत गाणे, युद्धाचा पुकारा म्हणून गाणे, हल्ला चढवताना त्वेष संचारावा म्हणून वाद्ये वाजवणे अशा क्रिया आहेत. उलट, हराम मानलेल्या बाबींत मनोरंजन म्हणून गाणे-बजावणे, वाद्ये वाजवणे, अधार्मिक उद्देशाने कोणताही स्वर निर्माण करणे, लयीत डोलणे वा नाचणे, आवाहक किंवा लालसा उत्पन्न करेल अशी गीते गाणे इ. क्रिया आहेत. धार्मिक वा आध्यात्मिक उद्देशाने वापरले तर संगीत चांगले, अन्यथा ते त्याज्य असे दुटप्पी धोरण हे काही एकट्या इस्लामचेच नाही, हे आपण याआधीच्या लेखांतही पाहिले होते. मग इस्लामबद्दल अधिक गलका का? याचे कारण- कुराण, हदीथ इ.चा दाखला देत आजवरच्या इस्लामी कायद्याने सातत्याने व आक्रमकपणे संगीताचा निषेध केला आहे. म्हणूनच इस्लाम आणि संगीत यांत विरोधप्रीती आहे, हे पटावे.

इस्लाम आणि भारतीय कला संगीत हा तर संगीतकार आणि विचारवंतांत मोठाच वादाचा विषय अनेक दशके आहे. एका बाजूला आजचे भारतीय कला संगीत ही कशी इस्लामचीच (पक्षी अरब-इराणी संस्कृतीची) देणगी आहे असे हिरिरीने पटवणारे लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या विरोधात पुरावे देऊन मतखंडन करत हे कलासंगीत कसे विशुद्ध भारतीय (पक्षी हिंदू!) आहे याचे प्रतिपादन केले जाते. हजरत अमीर खुस्रो, त्याचे भारतीय संगीताला योगदान, एकंदरच भारतीय कला संगीत आणि मुस्लीम परंपरा यांविषयी परस्परविरोधी मतांतरे इतकी आहेत की, त्यांचा समग्रतेने समाचार घ्यायला एखादा खंडात्मक ग्रंथच लिहावा लागेल. त्याविषयी पुन्हा कधी तरी लिहीन, पण आज इस्लाममधील संगीताचे एकंदर स्वरूप काय आहे हे जाणून घेऊ.

हे स्वरूप जाणून घेण्यासाठी इस्लामची पंथोपपंथ रचना पाहावी लागेल, कारण त्यावर संगीताचा निषेध वा स्वीकार यांचे धोरण ठरते. इस्लामच्या दोन मुख्य प्रवाहांतील शिया हा अधिक वर्चस्व असलेला संप्रदाय. महंमद पैगंबराचा जावई असलेला अली हाच अधिकृत खलिफा (उत्तराधिकारी) असे मानणारा हा संप्रदाय. शियांत पाच (झाइदी), सात (इस्माईली) वा बारा (इथ्ना अशारी) इमाम मानणारे पंथ आणि उपपंथही आहेत. उदा. इस्माईली शियांचे निझारी (खोजा), तय्यबी इस्माईली (म्हणजे बोहरा) व यांचे दाऊदी, सुलेमानी, अलवी हे उपपंथ, हाफिझी, सत्पंथी, बाबी व त्यातून पुढे आलेला बहाई पंथ इ.

महंमदाचा वारसदार म्हणून अबू बक्र यास मानणारे ते सुन्नी. सुन्नीतही हनाफी, मलिकी, शफीई, हन्बली असे चार उपपंथ आहेत. पहिल्या फित्ना म्हणजे इस्लामी धर्मयुद्धाच्या वेळी शिया आणि सुन्नी या दोन्ही गटांपासून वेगळे झालेले ‘खवारिज’ म्हणून ओळखले जातात.

यांशिवाय सुफी हा इस्लामचा महत्त्वाचा संप्रदाय. हा संप्रदायापेक्षा एक विचारसरणी आहे, असे म्हणणे उचित ठरेल. आध्यात्मिक तत्त्वचिंतनाच्या माध्यमातून अल्लाशी थेट संवाद साधता येतो असे मानणारा हा पंथ मुसलमानांत सर्वाधिक संगीताभिमुख आहे. किंबहुना सुफी संप्रदाय व त्याच्या संगीतानुकूल धोरणामुळेच इस्लाम भारतात वाढला व टिकला असे म्हणता येते. सुफींतही चिश्तिया, सुहरावर्दिया, कादिरी, मेवलवी, नक्षबंदी, निमातुल्लाही, बेकतशी, नूरबक्षीया, अझीमीया इ. उपपंथ आहेत.

कुराण हा इस्लामचा धर्मग्रंथ. पैगंबराने प्रत्यक्ष अल्लाची वचने या ग्रंथात संकलित केली आहेत अशी श्रद्धा आहे. कुराणचे अध्याय म्हणजे सुरा. असे एकंदर ११४ सुरा आहेत. सुरा-ए-फतेहा म्हणजे इस्लामी प्रार्थनेचा आरंभीचा भाग. इस्लामी दैनंदिन प्रार्थनेत काही ठरावीक शारीरिक हालचाली अनिवार्य मानल्या आहेत, त्यांना रका म्हणतात. शरिया किंवा शरीयत म्हणजे इस्लामी कायदा. कुराण, हदिथ आणि अन्य धर्मग्रंथांच्या अनुसार तयार झालेली ही इस्लामी कायदाव्यवस्था आहे. सलात ही दैनंदिन पाच वेळा करण्याची, अनिवार्य अशी प्रार्थना. सलात म्हणण्याची क्रिया म्हणजेच नमाज. दुआ म्हणजे मशीद, दर्गा अथवा घरी नित्य म्हटली जाणारी प्रार्थनावचने आहेत. अशा प्रार्थनेचे आवर्तनात्मक पठण म्हणजे वझीफा. जिक्र किंवा धिक्रचा शब्दश: अर्थ आहे नामस्मरण. अल्लाचा नामजप असलेला धिक्र हा लयाघातप्रधान व पुनरावर्तनात्मक प्रकार असून एकच आकर्षक, अंतर्मुख करणारी, मोजक्या सुरांची धून योजलेली असते. तस्बीह हा जिक्रचा विशेष प्रकार असून त्यात ‘अल्लाहू अकबर’, ‘अल हम्दू इल्लाह’ आणि ‘सुभानअल्ला’ हे शब्दसमूह अनुक्रमे ३४, ३३ व ३३ वेळा उच्चारले जातात. कसीदा या दीर्घ प्रार्थना असतात. झियारत म्हणजे मक्का, मदिना येथील मुस्लीम धर्मयात्रा. याविषयीची धर्मगीतेही झियारत म्हणूनच ओळखली जातात.

इस्लाममध्ये धर्मपुरुषांसाठीही बरेच शब्द आहेत. त्यांचा नेमका अर्थ कळला तर गीतांत येणारे त्यांचे संदर्भही लक्षात येतील-

नबी = प्रेषित, पैगंबर. यालाच रसूल, म्हणजे अल्लाचा संदेशवाहक असेही म्हणतात. एकंदर २५ नबी झाले व त्यांतील महंमद हा शेवटचा. त्यापूर्वीचे प्रेषित हे ख्रिश्चन धर्मातही मानले जातात. उदा. आदम (अ‍ॅडम), इद्रीस (इनॉक), इब्राहिम (अब्राहम), इस्माईल, इशाक (आयझॅक), याकुब (जाकोब), युसुफ (जोसेफ), मूसा (मोझेस), हारून (आरॉन), दाऊद (डेविड), सुलेमान (सॉलोमन), इल्यास (एलिजा), युनुस (जोनाह), याह्या (जॉन), इसा (जीजस).

वली = मुस्लीम संत. (देवसखा रक्षक हा शब्दश: अर्थ.)

पीर = सुफी धर्मवेत्ता.

इमाम = कुराण (धर्मग्रंथ) व हादिथ (धार्मिक नियम) यांचे ज्ञान असलेला धर्मगुरू.

मौलवी = मार्गदर्शक, उपदेशक.

मुल्ला = मुस्लीम धर्माचा विद्वान, शिक्षक व सामूहिक उपासनेचे नेतृत्व करणारा.

ही झाली इस्लामी धर्मसंगीताची पूर्वपीठिका. पुढल्या भागात अझान, कव्वाली, सोज, मर्सिया अशा इस्लामी गीतांचा प्रत्यक्ष परिचय करून घेऊ.

जाता जाता एक मौजेचा प्रसंग सांगतो-

मराठी नाट्यसंगीताच्या प्रेमींना बालगंधर्वांच्या ‘संगीत द्रौपदी’ नाटकातील ‘मी जरी माधवा’ हे भैरवी रागातील पद माहीत असावे. ‘देवगंधर्व’ भास्करबुवा बखले यांनी ते स्वरबद्ध केले होते भैरवी रागातील एका ठुमरीवरून; पण त्यातील एक विवक्षित, तार सप्तकातील पुकारयुक्त सुरावट त्यांनी योजली होती ‘सोज’वरून. बडोद्याला त्यांना तालीम देणाऱ्या उस्ताद फैझ महमंद खांसाहेबांनी त्यांना हा सोज- म्हणजे इस्लामी शोकगीत शिकवले होते.

महाभारतातील द्रौपदी आणि तिच्या तोंडी सोजची सुरावट! संगीताद्वारे संस्कृतिसंगम झाल्याचे हे मनोज्ञ उदाहरण आहे, नाही का!

keshavchaitanya@gmail.com

(लेखक संगीतकार, संस्कृती-संगीतशास्त्राचे अभ्यासक व

‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काईव्हज्’ या प्रयोगकला अध्ययन केंद्राचे संस्थापक-संचालक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 12:02 am

Web Title: spread of islam in india islam is the most widespread religion in the world today akp 94
Next Stories
1 अस्पर्शी द्वंद्वांची उकल
2 बहरू कळियांसि…?
3 उद्यमशीलतेत कमी नाहीच…