ऋतुराज वसंताचं आगमन झालं की साऱ्या निसर्गाला जणू आनंदाचं भरतं येते. चराचर सृष्टी हर्षोल्हासानं गाऊ लागते. माणसाच्या मनातही आपसूक गाणं उमलत जातं. भारतीय सण, पुराणकथांचे नायक-नायिका यांच्या जीवनातही वसंत अलवारपणे विरघळून गेलेला आढळतो. अभिजात संगीतात तर त्यानं राजेपदच प्राप्त केलंय. त्याचीच ही सुरीली, रंगीबिरंगी सफर..
आ पण भारतीय इतरांपेक्षा ऋतूंच्या बाबतीत जास्त श्रीमंत आहोत. आपल्याकडे चारच्या ऐवजी सहा ऋतू असतात. इतरांपेक्षा दोन जास्त! अन् आपल्याकडे या ऋतूंना साहित्यात, संगीतात भरपूर स्थानही मिळालेलं आहे. आपल्याकडच्या दिग्गज साहित्यकारांनी ऋतूंवर खूप लेखन केलेलं आहे. अगदी कालिदासाच्या ‘ऋतुसंहारम्’पासून ते दुर्गाबाई भागवतांच्या नितांतसुंदर ‘ऋतुचक्र’पर्यंत!
भारतीय दिनदíशकेचे बारा महिने सहा ऋतूंत विभागले गेल्यामुळे प्रत्येक ऋतूच्या वाटय़ाला दोन-दोन महिने आले आहेत. शाळेत लहानपणी पाठ केल्याप्रमाणे चत्र-वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण-भाद्रपद वर्षां, आश्विन-काíतक शरद, मार्गशीर्ष-पौष हेमंत आणि माघ-फाल्गुन शिशिर ऋतू! आता हे महिन्यांचं गणित चांद्रमासांवर अवलंबून.. आणि ऋतूंचं अवतीर्ण होणं हे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यावर अवलंबून! त्यामुळे वैशाख महिना उन्हाळ्याचा (‘वैशाखवणवा’ वगरे ऐकलेलं असल्यामुळे); तरीदेखील तो ग्रीष्मात कसा नाही; आणि आषाढात तर नेहमी पाऊस पडतोच; तरी तो वर्षां ऋतूचा महिना कसा गणला जात नाही, इ. प्रश्न माझ्यासारखीला नेहमीच पडतात. तरीदेखील एका प्रश्नाचं उत्तर हमखास सगळ्यांना माहीत असतं.. की, या सहाही ऋतूंमधला अनभिषिक्त राजा कोण?
.. अर्थातच वसंत ऋतू!
आपल्या सगळ्यांच्या आवडत्या श्रीकृष्ण भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये या प्रश्नाची उकल करताना स्वच्छच म्हटलंय, ‘मासानां मार्गशीर्षोस्मि, ऋतूनां कुसुमाकर :’ .. पण म्हणजे गीता सांगितली गेली त्याकाळी मार्गशीर्ष महिन्यात वसंत ऋतू असायचा की काय? अशा खगोलीय प्रश्नावर अभ्यास करून लो. टिळकांनी ‘ओरायन’ लिहिलं आणि गीता सांगितली गेली तो काळही (पाच हजार वर्षांपूर्वी) शोधून काढला असं म्हणतात.
आपलं भारतीय संगीत हे नेहमी निसर्गाशी नाळ कायम ठेवूनच प्रकटतं. आज शहरीकरणाच्या अन् आधुनिकीकरणाच्या दट्टय़ाखाली आपली ही नाळ सुटत चालली आहे खरी; पण या संगीताची मोहिनी अन् माधुरी निसर्गाशी तादात्म्य ठेवूनच जास्त प्रभावीपणे अनुभवता येते असा माझा विश्वास आहे. अर्थातच, या संगीतात ऋतूंनाही फार चांगलं सामावून घेतलं आहे. आज अनेक पिढय़ांतून कंठांतरित होत जे संगीत आमच्या पिढीपर्यंत पोचलं आहे, त्यात सगळे सहाही ऋतू कदाचित प्रतििबबित होत नसले, तरी वसंत आणि वर्षां या दोन्ही ऋतूंना अगदी थाटामाटाने राजेपद व राणीपदाचा मान दिला जातो, हे नि:संशय!
आजघडीला आपण माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी वसंत पंचमी साजरी करतो. या दिवशी वसंताचे आगमन होते असा संकेत आहे. ही तिथी साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात येते. या वर्षी चार फेब्रुवारीला वसंत पंचमी झाली. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच केला आहे!
वसंत ऋतूच्या नावानं सुप्रसिद्ध असलेला प्राचीन ‘बसंत’ या नावाचा जो राग आजमितीला प्रचलनात आहे, त्याचं सर्वसामान्य रूप आहे, ते पूर्वी थाटातलं. रे, ध कोमल व म तीव्र असलेलं. उत्तरांगात अधिक खुलणारा हा राग काहीसा आक्रमक, वीररसप्रधान वाटतो. अगदी राजेपदाला शोभेलसा! या रागाचे स्वरदेखील खडे, ठाशीव व तीव्र वाटावेत असे! पण राजा झाला तरी त्याला काही प्रमाणात वैराग्याचा स्पर्श आवश्यक असतो ना, तसे वैराग्य दर्शवणारे असे त्याचे तप्त सूर असतात! उत्तर िहदुस्थानात आणि बंगाल-बिहार प्रांतात आजदेखील बसंत पंचमीला वसंत ऋतूचं स्वागत करतेवेळी सरस्वतीपूजन करण्याचा प्रघात आहे. यानिमित्ताने जे गायनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात, त्या ‘बसंत’ कार्यक्रमांना पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून जाण्याचा संकेत आहे. हा पिवळा रंग म्हणजे सरसूच्या (मोहरीच्या) शेताचा पिवळा! राजपदावर विराजमान झालेल्या व्यक्तीच्या विलासी अन् विरागी वृत्तीचा निदर्शक पिवळा रंग!
१९५६ सालच्या ‘बसंत-बहार’ चित्रपटातील लोकप्रिय गीत ‘केतकी, गुलाब, जूही, चंपक बन फूले’ हे बसंत रागातच आहे. या गाण्यातील पं. भीमसेनजी आणि मन्ना डे या दोघांची जुगलबंदी अगदी अफलातूनच आहे. (भारतभूषण ऊर्फ ‘बजू’ची- म्हणजेच गाण्यात मन्ना डे यांची ‘एन्ट्री’ झाल्यावर त्याचा ‘बसंतबहार’ होतो.) अलीकडच्या ‘देवदास’मधली पं. बिरजूमहाराजांची (पं. िबदादीन महाराजांची) रचना ‘काहे छेड छेड मोहे गरवा लगाई’ हीदेखील बसंत रागातलीच आहे. या गाण्यावरील माधुरी दीक्षितचं अप्रतिम नृत्य कोण विसरू शकेल? नृत्यासाठी हा राग जरी खूप वापरला गेला असला तरी बसंत हा राग एक ‘मोठा’, ‘मुख्य’ राग म्हणून आज अनेक वष्रे मान्यता पावलेला आहे. चटकन् आठवणाऱ्या या रागातल्या लोकप्रिय बंदिशी म्हणजे- ‘फगवा बृज देखनको चलो री!’ किंवा ‘आई रितु बसंत मोरी ..’
‘बसंत’ या रागाला जर आपण राजेपदी बसवलं, तर त्याचाच भाईबंद असलेला ‘बहार’! त्याचं काय बरं करावं? राजाचा चुलतभाऊ जसा राजेपदाच्या कुठल्याही जबाबदाऱ्या न सांभाळाव्या लागल्यामुळे राजवाडय़ात मुक्त, स्वच्छंद विहार करीत सगळी सुखे उपभोगतो, तसाच हा बहार! बसंताचं ‘ग्रँजर’ बहारात नाही. पण ‘बहार’ हा अतिशय खेळकर, आनंदी, उत्फुल्ल असा राग आहे. त्याची मोट कुणाशीही बांधा; त्याचं सगळ्यांशी छान जमतं. अन् ज्या रागाबरोबर त्याला बांधाल, त्या रागाचा ‘मूड’ही तो एकदम आनंदी करून सोडतो. म्हणून तर त्याचे ‘भरव-बहार’, ‘िहडोल-बहार’, ‘जौनपुरी-बहार’, ‘बागेश्री-बहार’ असे अनेक जोडराग बनू शकतात. पण बसंताबरोबरचा त्याचा जोडराग ‘बसंत-बहार’ सर्वात लोकप्रिय आहे, अन् तो थोडासा ‘चॅलेिन्जग’ही आहे. म्हणजे असं, की बसंतात लागतात ते सूर बहारात वज्र्य आणि बहारातले सूर बसंतात वज्र्य! अगदी एकही सूर या दोघांत ‘कॉमन’ नाही! ‘रे’, ‘ध’ बसंतात कोमल, तर बहारात शुद्ध, ‘ग’ बसंतात शुद्ध, तर बहारात कोमल, ‘म’ बसंतात तीव्र, तर बहारात शुद्ध. आणि बहारात दोन्ही ‘नी’ लागत असले, तरी कोमल ‘नी’ रागवाचक, तर बसंतात ‘नी’ शुद्ध! आणि तरीही या दोघांचं मिश्रण करून जो ‘बसंत-बहार’ तयार होतो, तो इतका फर्मास असतो, की ज्याचं नाव ते! बसंताच्या उंच अशा गगनस्पर्शी वृक्षावर बहाराची रंगीत फुलांची वेल वपर्यंत चढावी.. तिच्या फुलोऱ्यानं बसंताच्या महावृक्षाला वेढून टाकावं.. जणू काही ती फुलं या वृक्षालाच लगडलेली आहेत.. अन् हा देखावा पाहणाऱ्याचे डोळे आणि मन त्या वृक्षाच्या उत्तुंगपणानं, वेलीच्या नाजूकपणानं आणि रंगीत फुलोऱ्याच्या उधळणीनं भरून जावं, असाच काहीसा हा अनुभव! अशा तऱ्हेनं शुद्ध, कोमल अन् तीव्र असे सर्व स्वरांचे सर्व विकल्प वापरात घेऊन बाराच्या बारा स्वरांमध्ये विहार करणारा ‘बसंत-बहार’ हा कदाचित एकमेव भारतीय शास्त्रीय राग असावा!
आता बसंत आणि बहार या दोघांनाही निरखून झाल्यानंतर बसंताची इतर अप्रचलित रूपंही पाहायला हवीत. प्रचलित कोमल धवताच्या बसंताच्या बरोबरीने शुद्ध धवताचा बसंतही गायला जातो. सगळे स्वर आणि चलन प्रचलित बसंतासारखंच; फक्त ध शुद्धच घ्यायचा, कोमल नाही. आमच्या जयपूर घराण्याच्या सुप्रसिद्ध ‘बसंती केदार’ रागात हाच बसंत अभिप्रेत आहे असं म्हणतात.
बसंत रागाला कर्नाटकी संगीतात फारच वेगळं गातात. त्यांच्याकडे गायल्या जाणाऱ्या बसंतात फक्त ‘रे’ कोमल आहे आणि ‘म’ शुद्ध आहे. िहदुस्थानी पद्धतीतल्या ‘भिन्नषड्ज’ या रागाशी साधम्र्य सांगणारा हा राग आहे. जुन्या जमान्यातले सुप्रसिद्ध वाग्गेयकार पं. श्री. ना. रातंजनकर यांनी त्याला ‘दाक्षिणात्य बसंत’ या नावानं िहदुस्थानी पद्धतीत आणलं. या कर्नाटकी रागाशी जवळचं नातं सांगणारा ‘हवेली-बसंत’ संगीतात सापडतो. भिन्नषडजाशी साधम्र्य राखून दोन्ही ‘म’ वापरात आणणारा ‘हवेली बसंत’ (‘शुद्धबसंत’ किंवा ‘आदिबसंत’) त्याच्या दोन मध्यमांच्या विशिष्ट वापरामुळे ‘ललित’ रागाशीही नातं सांगतो. रसिकांना पं. जसराजजींचं लोकप्रिय हवेली पद ‘लाल गुपाल गुलाल हमारी आंखन में जिन डारो जू’ आठवेल! तसंच पुढे जाऊन या ‘हवेली-बसंता’त ‘पंचम’ लावला, की आपण त्याला ‘ललत-पंचम’ या नावानं ओळखू लागतो. अन् मग या रागातली ‘उडत बून्दन (किंवा बंधन)’ ही लोकप्रिय बंदिश मनात रुंजी घालू लागते.
वर्षांऋतूत गायले जाणारे जसे मल्हारादि राग आहेत, तसेच वसंत ऋतूचे खास, सर्वाना परिचित असलेले राग म्हणजे बसंत, बहार आणि बसंत-बहार. पण वर्षांराग हे जसे मल्हारांपुरते मर्यादित नाहीत, तसेच वसंत ऋतूसाठीही बसंत, बहार वगरेंव्यतिरिक्त इतरही राग परंपरेने गायले जातात.
‘िहडोल’ हा खरं तर पहाटे सूर्योदयापूर्वी गाण्याचा राग! पण वसंतात तो कधीही गावा! त्याचे स्वर जसे खालून वर जाताना उमलत जातात, वसंत ऋतूही काहीसा तसाच पदार्पण करीत असतो. मोठमोठय़ा वृक्षांना छोटय़ा, नाजूक कळ्यांसारखे पोपटी, गुलाबी फुटवे फुटतात. पर्णहीन फांद्या हळूहळू पोपटी, हिरव्या होऊ लागतात. मग त्यांवर पक्ष्यांचे थवे झेपावू लागतात. ‘िहडोल’ या नावात जी िहदोळ्याची, झोपाळ्याची सूचना आहे, तसेच त्या रागाचे स्वर गोल गोल आंदोलने घेत खाली उतरतात.. जणू काही बकुळीच्या झाडावरून गिरक्या घेत खाली पडणारी बकुळफुलेच! किंवा बागेतल्या झोपाळ्यावर मंद मंद झोके घेत निसर्गाची वसंतशोभा लुटणारी आपली नाजूक, सुंदर, चिरयौवना नायिका! या रागातल्या बंदिशीचे शब्दच आहेत मुळी-
‘‘चनक मूंद भईलवा, आवो बलमा,
हम-तुम खेलें बहार-बसंत/
गुमान करवेकी ये रुत नाही, ‘सदारंग’
आई बहार-बसंत//’’
या ‘िहडोल’ रागात खूप जुने ‘धमार’ही सापडतात. ‘धमार’ हा गायनप्रकार खरं तर होळीशी अनन्यभावाने जोडला गेलेला आहे. आजकाल हा जरा मागे पडला आहे. अगदी धृपद गायकी गाणारेदेखील धमाराला अंमळ डावीच वागणूक देतात. पण शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमात वसंत ऋतूत जर एखादा धमार अंतर्भूत केला, तर त्याची तबल्याबरोबरची पखवाजाच्या अंगाने केली गेलेली लयकारी काही वेगळीच गंमत देऊन जाते. असेच धमार ‘काफी’ किंवा ‘भीमपलासी’ रागांमध्ये सर्रास आढळतात. हे राग जरी ‘वसंत’ ऋतूचे राग मानले गेले नसले, तरी होळीच्या धमालीचा सांगीतिक आविष्कार ते समर्थपणे करू शकतात! पण वसंत ऋतूच्या अखेरीस येणाऱ्या या होळीकडे जरा नंतर वळूया.
आपल्या ‘ऋतुराज वसंता’च्या सृष्टीतल्या आगमनाची उद्घोषणा करणारे भालदार-चोपदार म्हणजे आंब्याला आलेला मोहोर. त्याच्या धुंद सुगंधानं आकर्षति होऊन त्याच्यावर झेप घेणारे, गुं- गुं गुंजन करणारे भुंगे.. आणि मोहोरानं गच्च भरलेल्या झाडांत लपलेल्या कोकिळेनं घातलेली मीलनोत्सुक साद! या सगळ्या सभासदांनादेखील आमच्या संगीत क्षेत्रातल्या बसंताच्या राजदरबारात मानाचं स्थान असतं. आंब्याच्या मोहोराला िहदीत म्हणतात ‘बौर’! कदाचित ‘बहर’ या शब्दाचं बोलीरूप असेल.. पण ‘बौर’ म्हणजे वेड! ‘बावरा’ किंवा ‘बौरा’ म्हणजे वेडा याअर्थी! तर आंब्याला वेड लागल्यासारखा मोहोर येतो म्हणून ‘बौर’ म्हणत असतील का? त्या आंब्यालाही आमच्या बंदिशींत ‘अंबुवा’ किंवा ‘अमरैया’ अशा लाडक्या नावांनी संबोधलेलं असतं.. आणि कोकिळा किंवा ‘कोयलिया’ ही तर नायिकेची जिवाभावाची सखीच जणू! नायिकेसारखीच विरहज्वराने काळी पडलेली, किंवा नायिकेच्या विरहभावनेला आपल्या आर्त स्वराने प्रकट करणारी! पण त्याचवेळी वसंत ऋतूचा दुसरा उद्घोषक ‘भुंगा’ किंवा ‘भँवरा’ हा तर अगदी श्रीकृष्णाच्या काळापासून ‘छलिया’ म्हणूनच बदनाम झालेला! या फुलावरून त्या फुलावर स्वच्छंदपणे, बेफिकिरीनं जाऊन मधुपान करणारा. आणि मधुपान करून झालं, की खुशाल त्या फुलाला विसरून जाणारा! नायिकेला आपला जळफळाट आणि चडफडाट ज्याच्यावर सहजगत्या काढता येईल असा ‘बेइमान’ उमेदवार! म्हणून तर-
‘कोयलिया मत कर पुकार, लागे करेजवा कटार’
अशी विनंती कोकिळेला करायची. पण-
‘भौरा रे, तुम हो छलिया,
जैसो तेरो बदन कारो,
वैसोही मनके कारे’
असं म्हणून भँवऱ्याच्या नावानं बोटं मोडायची, हा तर आपल्या नायिकेचा आवडता उद्योग! काय करणार? अखेर कोयलिया ‘ती’ म्हणून जवळची; पण भँवरा ‘तो’- तर असाच असणार!
शिशिराच्या थंडीनं काढतं पाऊल घेतलंय, पण अजून ग्रीष्माचं ऊन तापायला लागायचंय. असा हा मधला सौम्य वसंत ऋतूचा काळ! या ऋतूच्या अखेरीस येतो होळीचा सण! होळी झाली की थंडी संपते. आणि आता सुरू होणार असतो उन्हाळा! त्या कोरडय़ा, रखरखीत उन्हाळ्यासाठी थोडीशी सांस्कृतिक शिदोरी साठवून ठेवावी, म्हणून असेल का होळीचा सण इतका रंगीबेरंगी, धमाल आणि मौजमस्तीचा?
या होळीला तर आमच्या संगीतकारांनी इतकं लाडावून ठेवलंय, की काही विचारता सोय नाही! जितक्या धूमधामीनं उत्तर भारतात हा सण साजरा होतो, त्या सगळ्या धूमधमालीचं वर्णन आमच्या उपशास्त्रीय संगीतातल्या ‘होरी’गीतांमधून येतं. कुणा नायिकेची होरी तिच्या प्रियकराबरोबरच्या ‘बरजोरी’मुळे रंगलेली, तर कुणी सख्यांबरोबर निघालेली असताना ‘क्यूं निकसी थी फागुन में?’ असं म्हणून ‘त्या’च्या छेडछाडीनं अन् जोरजबरदस्तीनं परेशान! कुणा नायिकेचा प्रियकर दूरदेशी असल्यामुळे तिच्या होरीला विरहाचा रंग. त्यात काळजीच्या छटा. कधी मत्सराच्यादेखील! होरीचे किती विविध रंग!
‘जसोदाके लाल खेले होरी, धूम मचो री! ..’ अशा कृष्णानं बृजभूमीत खेळलेल्या होळीत उधळलेल्या रंगांचं वर्णन कसं येतं? ‘उडत गुलाल, लाल भयो बादर, चली रंग की टोली!’ या टोळीचा नायक आपला कृष्ण.. महाबेरकी! त्यानं काय केलं?
‘स्याही नील मिलाय तेल में, सबके मुख मलो री,
लाख जतन कर, छूटत नाही, भई कारी सब गोरी!’
निळ्या शाईला तेलात खलून तो पक्का रंग कृष्णानं वात्रटपणानं गोपींच्या चेहऱ्यावर फासलेला. आता लाख प्रयत्न करूनही तो निघत नाही. सगळ्या गौरवर्णीय बृजवासी ललना आता काळ्या झाल्याहेत. अशी त्या श्यामरंगात रंगलेल्या गोपींची बिकट परिस्थिती!
मग कृष्णाच्या अशा ‘झकझोरी’चा बदला राधा कशी घेत असेल? ती त्याला आज्ञा सोडते, ‘तुम राधे बनो श्याम, हम नंदलाला’! पण तो तरी काय असा सहजासहजी बधणाऱ्यातला थोडाच आहे? मग काय? ती त्याला स्त्रीवेशात कशी रूपांतरित करते, त्याचं रसभरीत वर्णन!
उत्तरेकडे एक म्हण आहे- ‘बुरा न मानो, होरी है’! आणि या विधानाचा आधार घेऊन होळीत सगळ्या आचरट वर्तनाला माफी दिलेली असते. ‘रसियाको नार बनावो री!’ अशीसुद्धा एक होरी आहे.
अनेक वर्षांपूर्वी नेहरू सेंटरमध्ये विदुषी गिरीजादेवींच्या कार्यशाळेत त्यांनी आम्हा विद्याíथनींना एक ‘होरी’ शिकवली होती. तिचे शब्द होते- ‘रंग डारूंगी नंद के लालन पे..’ पुन्हा एकदा राधेनं कृष्णाला ताब्यात घेतलेलं! बंदिश शिकवून झाल्यावर एक दिवस या बंदिशीवर ‘भाव’ दाखवण्याकरिता त्यांनी वरच्या मजल्यावर नृत्याची कार्यशाळा घेत असलेल्या पं. बिरजूमहाराजांना पाचारण केलं. दिवसभर नृत्याचे धडे विद्यार्थ्यांना देऊन थकले-भागलेले बिरजूमहाराजजी आमच्या वर्गात येऊन स्थानापन्न झाले. आणि त्यानंतर पुढची पन्नास मिनिटं त्यांनी मुखडय़ाच्या एकाच ओळीवर इतके तऱ्हेतऱ्हेचे ‘भाव’ रंगवले, की आम्ही सर्वजण भारावूनच गेलो. किती तऱ्हा रंग टाकण्याच्या! कोरडा रंग उधळणं असो, की द्रवरूप रंगात भिजवून टाकणं! कोरडा रंग- गुलाल, अबीर, कुमकुम- समोरून येऊन टाकणं, किंवा बेसावध क्षणी मागून येऊन उधळणं. द्रवरूप रंग बनवण्याचाच मोठा साग्रसंगीत समारंभ.. मोठय़ा घंगाळात केसर वगरे तत्सम पाण्यात विरघळणारा सुगंधी रंग किंवा चंदन उगाळून ते पाण्यात घोळून मग ते रंगीत, सुगंधी पाणी पिचकारीत भरून घेणं.. ही पिचकारी लपवीत छपवीत मग नायिकेचं सावज हेरणं.. आपल्याला सोयीच्या जागी तिला गाठून पिचकारी तिच्यावर रिती करून तिला चिंब भिजवणं.. आणि तिचं लाजणं, लटका राग मन भरून पाहणं.. हे सारं त्या दिवशी पं. बिरजूमहाराजजींनी जिवंतपणे आमच्यासमोर उभं केलं. रंगवायची ही सारी साधनं संपुष्टात आल्यावर नायिका तिच्याकडे उपलब्ध असलेल्या कोणत्या वस्तूंनी प्रियकराला रंगवते, हे अगदी तिच्या डोळ्यांतल्या काजळापासून ते भांगातल्या सिंदुरापर्यंतची सगळी साधनं वापरून महाराजजींनी त्यातला प्रणय उभा केला. पन्नास मिनिटं एकच ओळ आम्ही आळवीत होतो आणि महाराजजी ती रंगवत होते!
‘चती’ या गानप्रकाराची बातच वेगळी. चत्र महिन्यात गायची म्हणून तिला ‘चती’ म्हणतात. बऱ्याचदा तिच्यात चत्राची वर्णनं येतात. ‘चत मास बोलल कोयलिया हो रामा, मोरे अंगनवा’ वगरे. पण गंमत म्हणजे कधी कधी चत्राचा काहीही संबंध नसलेल्या गीतालादेखील ‘चती’ म्हणतात. त्याचं कारण त्या गाण्याची ती ‘टिपिकल’ चाल आणि गाण्यात येणारे ‘हो रामा’ हे शब्द! चती म्हटली म्हणजे ‘हो रामा’ यायलाच हवे. आणि याचं कारण काय? तर म्हणे, चत्र महिन्यातच रामनवमी येते ना? आता त्या कोकिळेला बिचारीला रामाच्या जन्मदिवसाचं काय देणंघेणं असणार? आणि त्याहीपुढे जाऊन ‘याही ठैय्या मोतिया हेराई गलो रामा, कहवां मं ढूँडू?’ (याच ठिकाणी माझा मोती हरवला, आता मी तो कुठे शोधू?) या गाण्याचा रामाशी काय संबंध? पण तरीही ही ‘चती’च! कारण तिचे ते टिपिकल सूर!
अद्यापही उत्तर िहदुस्थानात होळीच्या आसपास ‘गुलाबबाडी’च्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या कार्यक्रमात फक्त वसंत ऋतूशी अन् होळीशी संबंधित असलेलं साहित्यच गायचं. निमंत्रितांसाठी ड्रेसकोड असतो. सर्व पुरुष पांढऱ्याशुभ्र वेशभूषेत आणि स्त्रिया गुलाबी! पुरुषांना पांढरी लखनवी टोपी अन् गुलाबी उपरणं दिलं जातं. आल्या-गेल्यावर गुलाबजलाचा शिडकावा तर होतोच; पण चालू कार्यक्रमातदेखील मधेच कुणीतरी येऊन गुलाबपाण्याची बौछार करून जातो. किंवा सुगंधी गुलाबाच्या पाकळ्या (खास होळीच्या सुमारास फुलणारा चती गुलाब!) उधळून जातो. बाहेरच्या बाजूला कचोरी, जलेबी यांची तळणी सुरू असते. थंडाई, सुगंधी दूध यांचाही रतीब चालू असतो. गायनाच्या कार्यक्रमात बसंत, बहार वगरे सन्माननीय रागांच्या जोडीला होरी, चती वगरे मंडळीदेखील दिमाखाने विराजमान झालेली असतात. आणि कार्यक्रमाचा, गाण्याचा आणि खाद्यपदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेऊन तृप्त झालेले रसिक नंतरचे दोन-तीन दिवस त्या गायनाची अन् खाण्यापिण्याची चर्चा करीत सुखेनव वेळ घालवीत असतात. हीच तर आहे गुलाबबाडीची गंमत!
असा हा शास्त्रीय संगीतातला वसंत ऋतूचा आणि वासंतिक निसर्गशोभेचा, फुलांच्या रंगभांडाराचा आणि सुगंधाच्या खाणींचा सांगीतिक आलेख.. त्याच्या जोडीला वसंतातल्या सणसमारंभांच्या वर्णनांची बहार आणि मानवी भावभावनांच्या खजिन्यातले विविध रंग आणि गंध.. आपल्या आसपासच्या परिसरात थोडीशी शोधक नजर टाकली तर आपल्याला हळूहळू जाणवायला लागेल, की वसंताचं स्वागत करायला सृष्टी कशी सज्ज झाली आहे ते! चला तर.. आपण पण वसंताचा आनंद लुटायची तयारी करू या.
(लेखिका जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका आहेत.)

vijay kelkar
अग्रलेख: कराग्रे वसते लक्ष्मी..
Gaurav Vallabh
अग्रलेख: प्रवक्त्यांची पक्षांतरे!
अवघे पाऊणशे वयमान!
‘संगीत शारदा’ अर्थात् स्त्रीशक्तीचा उद्गार!